जेकब झुमा : पोलिसांचा अटकेचा इशारा आफ्रिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांची शरणागती

कोर्टाचा अवमान प्रकरणातल्या एका केसमध्ये देण्यात आलेली शिक्षा भोगण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा पोलिसांच्या स्वाधीन झाले आहेत.

बुधवारी (7 जुलै) रात्री उशीरा क्वाजुलु - नताल प्रांतातल्या त्यांच्या घराजवळच्या एका तुरुंगात ते हजर झाल्याचं झुमा यांच्याद्वारे चालवण्यात येणाऱ्या फाऊंडेशनने सांगितलंय. 79 वर्षांचे झुमा बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत शरण आले नाहीत तर त्यांना अटक करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला होता.

भ्रष्टाचार प्रकरणाविषयीच्या एका तपासात सहभागी न झाल्याबद्दल झुमांना गेल्या आठवड्यात 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

पोलिसांनी झुमांच्या अटकेसाठी दिलेला इशारा आणि त्यानंतर झुमांनी अशाप्रकारे शरण येणं यामुळे लोकांमध्ये आता या केसबद्दलचं कुतुहल वाढलंय.

आपण शरण येणार नाही, असं झुमांनी यापूर्वी रविवारी (4 जुलै) म्हटलं होतं. यानंतर पोलिसांनी त्यांना बुधवार मध्यरात्रीपर्यंतचा कालावधी शरण येण्यासाठी दिला होता.

झुमांच्या फाऊंडेशनने पत्रकात म्हटलंय, "राष्ट्राध्यक्ष झुमा यांनी अटकेच्या आदेशाचं पालन करण्याचा निर्णय घेतला आहे."

तुरुंगात जाणारे दक्षिण आफ्रिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष

झुमांची मुलगी दुदू झुमा - सांबुदला यांनी ट्विटरवर लिहीलं, "माझे वडील तुरुंगाच्या दिशेने निघाले असून त्यांची मनःस्थिती चांगली आहे."

एखाद्या माजी राष्ट्राध्यक्षांनी तुरुंगात जाण्याचा दक्षिण आफ्रिकेतला हा पहिला प्रसंग आहे.

आपल्या कार्यकाळादरम्यान झालेल्या भ्रष्टाचाराविषयीच्या तपासात पुरावे देण्याची सूचना झुमांना देण्यात आली होती. पण या आदेशाचं पालन न केल्याने त्यांना 15 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली.

पण आपण एका राजकीय कटाचे बळी ठरल्याचं झुमांनी म्हटलंय.

2018मध्ये झुमांना आफ्रिकन नॅशनल काँग्रेस (ANC)कडून पदावरून हटवण्यात आलं, पण असं असलं तर पक्षात आणि त्यांच्या क्वाजुलु-नताल राज्यात त्यांचे भरपूर समर्थक आहेत.

मोठ्या राजकीय व्यक्तिमत्त्वाचा अंत

झुमांना अटक होऊ नये यासाठी त्यांच्या पाठिराख्यांनी गेल्या रविवारी त्यांच्या घराबाहेर एक मानवी भिंत उभी केली होती. बुधवारी त्यांनी आत्मसमर्पण करण्याआधीही अशीच गर्दी गोळा झाली होती.

जेकब झुमा हे एक मोठं राजकीय व्यक्तिमत्त्वं असून दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णभेदाविरोधातल्या लढ्यादरम्यान त्यांनी तुरुंगवास भोगल्याचं बीबीसीचे प्रतिनिधी फारुख चोथिया सांगतात.

पण झुमा यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप गंभीर आहेत. दक्षिणा आफ्रिकेतल्या सर्वात मोठ्या कोर्टाचा अनादर केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली आहे.

स्वतंत्र न्यापालिका असणाऱ्या लोकशाहीसाठीच झुमांनी लढा दिला होता, पण ते राष्ट्राध्यक्ष असताना भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांना उत्तरं देण्यापासून पळ काढण्याचा आता त्यांनी प्रयत्न केलाय.

हा त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा लाजिरवाणा अंत असल्याचं चोथिया सांगतात. पण दक्षिण आफ्रिकेतल्या लोकशाहीसाठी हा अभिमानाचा क्षण आहे, कारण कायद्यापुढे इतर कोणीही - अगदी एखादा माजी राष्ट्राध्यक्षही मोठा नसल्याचं त्यांनी दाखवून दिलंय.

मध्यरात्री काय घडलं?

बीबीसीच्या प्रतिनिधी नोम्सा मसेको या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून होत्या. झुमांच्या घराबाहेर त्यावेळी मोठ्यासंख्येने सशस्त्र पोलिस हजर होते.

झुमांनी अटकेसाठी तयार होण्यासाठी ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या एका पथकाने त्यांना काही तास समजवल्याचं समजतंय.

यानंतर काही कारचा ताफा त्यांच्या घरुन निघाला. यातल्या एका गाडीत जेकब झुमा होते. आपण तुरुंगात जायला तयार असल्याची घोषणा झुमांनी त्यापूर्वी केली.

पण ते म्हणाले, "जागतिक साथीच्या दरम्यान माझ्या वयाच्या व्यक्तीला तुरुंगात धाडणं हे मृत्यूदंड दिल्यासारखं आहे."

आपण एका राजकीय कटाचा बळी ठरल्याचं झुमांनी पुन्हापुन्हा म्हटलंय. भ्रष्टाचाराच्या या संपूर्ण तपासादरम्यान त्यांनी फक्त एकदा साक्ष दिली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)