कोरोना: पाकिस्तानच्या नागरिकांनी केली भारतीयांसाठी प्रार्थना

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी न्यूज, दिल्ली

भारत आणि पाकिस्तानातले संबंध ताणलेले आहेत आणि सोशल मीडियावर याचं प्रतिबिंब अनेकदा पहायला मिळतं.

पण एप्रिल अखेरीस भारत कोरोनाच्या जागतिक साथीच्या दुसऱ्या लाटेशी झुंजत असताना शेजारच्या पाकिस्तानातले लोकही भारतासाठी दुवा मागत होते. #IndiaNeedsOxygen आणि #PakistanStandsWithIndia हे हॅशटॅग्स तिथल्या सोशल मीडियावर ट्रेंड होत होते.

21 एप्रिल ते 4 मे या काळामध्ये हे हॅशटॅग्स वापरून करण्यात आलेल्या ट्वीट्सपैकी बहुतेक ट्वीट्स सकारात्मक होती, असं आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने करण्यात आलेल्या एका अभ्यासात आढळलंय.

दया, सहानुभूती आणि एकजूट दाखवणारी ही ट्वीट्स या संशोधनामध्ये मशीन लर्निंगचा वापर करत शोधण्यात आली. कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटीच्या आशिकर खुदाबक्ष यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता.

संशोधकांनी 'होप सर्च क्वालिफायर'च्या मदतीने या ट्वीट्समध्ये वापरण्यात आलेली सकारात्मकता शोधण्यात आली. शत्रुत्त्व कमी करणाऱ्या सकारात्मक गोष्टी, प्रार्थना, सहानुभूती, संकट आणि एकी यासारखे शब्द हे टूल ओळखू शकतं.

सकारात्मक ट्वीट्सची संख्या जास्त

पाकिस्तानातून करण्यात आलेल्या ट्वीट्सपैकी भारताला सहानुभूती आणि समर्थन देणाऱ्या ट्वीट्सची संख्या विरोधातल्या ट्वीट्सपेक्षा जास्त असल्याचं या पाहणीत आढळलं. या ट्वीट्सनी जास्त लाईक्स आणि री-ट्वीट्सही मिळालेली होती.

खुदाबक्ष सांगतात, "लोक आपल्या भावना कशा व्यक्त करत आहेत, हे आमच्या अभ्यासातून समजलं. यामध्ये एक साधर्म्य आहे. जर तुम्ही शोधायला सुरुवात केलीत तर तुम्हाला 44 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह ट्वीट्स आढळतील."

एप्रिल संपून मे महिना सुरू होत असताना भारतातल्या रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध नव्हते, लोक ऑक्सिजनसाठी तडफडून जीव सोडत होते आणि स्मशानांमध्ये 24 तास चिता धडधडत होत्या. सीमेपलीकडचे लोक पाठिंबा आणि एकीच्या गोष्टी करत होते.

'घटनांचे सीमेपलिकडे होणारे परिणाम'

पाकिस्तानातही कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असल्याने असं झालं असण्याची शक्यता असल्याचं लाहोरमध्ये इतिहासाच्या प्राध्यापक असणाऱ्या आरिपा जेहरा सांगतात.

"तेव्हा इथलीही परिस्थिती भीषण होती, आमच्या आशाही धुळीला मिळत होत्या. आमचा शत्रू समान होता. आमच्या सीमा इतक्या जवळ आहेत की सीमेच्या त्या बाजूला जे काही होतं, त्याचा आमच्यावर परिणाम होतो."

पाकिस्तानी युजर्सची ट्वीट्स

एका युजरने लिहिलं, "आमच्या प्रार्थना आणि भावना तुमच्यासोबत आहेत. आम्ही शत्रू नाही, शेजारी आहोत."

दुसऱ्या एकाने लिहिलं, "आम्ही शेजारी आहोत, शत्रू नाही. आम्ही प्रतिस्पर्धी आहोत, विरोधात नाही. सीमा अस्तित्त्वात असल्या तरी त्या आमच्या हृदयात नाहीत."

तिसऱ्याने ट्वीट केलं, "आमच्या शेजाऱ्यांची ही अवस्था पाहून वाईट वाटतंय. पाकिस्तानातून प्रेम आणि प्रार्थना पाठवा. या जागतिक साथीशी लढण्यासाठी अल्लाने मानवजातीची मदत करावी."

सकारात्मक संदेश ओळखून त्यांना प्रोत्साहन दिल्याने लोकांचं मनोधैर्य वाढेल आणि समाज आणि देशांमधले संबंध सुधारायला मदत होईल, असं खुदाबक्ष सांगतात.

"जेव्हा एखादा देश जागतिक साथीमुळे राष्ट्रीय आरोग्य संकटाशी लढत असतो तेव्हा आशा वाढवणारे असे शब्द औषधांसारखेच असतात. या काळात नकारात्मकता कोणालाच नको असते. जर तुम्ही वाईट भाषा वा नकारात्मकतेच्या सान्निध्यात आलात तर त्याचा तुमच्यावर परिणाम होतो हे अनेक संशोधनांमध्ये आढळून आलंय."

'हेट स्पीच' चा मुकाबला

हेट स्पीच म्हणजे द्वेषपूर्ण वक्तव्यांचा मुकाबला करण्यासाठी या पद्धतीचा वापर करता येऊ शकतो, असं खुदाबक्षना वाटतं.

"युद्धकाळ किंवा आरोग्यसंकटासारख्या काळात मजकूर रोखण्यापेक्षा सकारात्मकता जास्त दाखवून देणं जास्त योग्य आहे. यामुळे दुसऱ्या बाजूच्या लोकांच्या संवेदना जागृत आहेत असा विश्वास निर्माण होईल."

पण टेक्नॉलॉजीचा वापर याच्या अगदी विरुद्ध कामासाठी म्हणजे चांगल्या गोष्टी सेन्सॉर करण्यासाठी करण्यात आला तर?

इंटरनेटवर कोणत्याही प्रकारची वक्तव्य 'फिल्टर' करता येत असल्याचं खुदाबक्ष सांगतात. "याचा वापर चांगला कंटेंट सेन्सॉर करण्यासाठीही केला जाऊ शकतो. म्हणूनच टेक्नॉलॉजी वापरताना काळजी घ्यायला हवी. एक चांगली यंत्रणा उभी करणं, हे आमचं काम आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)