You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंकज रामदास तडसः आधी लैंगिक छळाचे आरोप, नंतर लग्न, खासदारपुत्रावरील आरोपांमुळे खळबळ
- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
वर्धा खासदार रामदास तडस यांच्या मुलावर शारीरिक छळ करून लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप एका युवतीने केले होते. लग्नाचं आमिष देऊन खासदार पुत्राने फसवणूक केल्याची तक्रार नागपूर पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे करण्यात आली होती. आरोपानंतर काल 8 सप्टेंबरला आरोप करणाऱ्या युवतीशी खासदार तडस यांच्या मुलाचे लग्न पार पडले आहे.
खासदार रामदास तडस यांच्या मुलाने वैदिक पद्धतीने लग्न केलं. पण नंतर मारझोड करून घरातून बाहेर काढले, असा आरोप पूजा तडस (शेंद्रे) यांनी केला होता. स्थानिक पोलिसात त्यासंदर्भात तक्रारसुद्धा देण्यात आली होती. दरम्यान पूजा यांनी नागपूर पोलीस महानिरीक्षक यांच्याकडेही तक्रार दाखल केली होती.
पुढे पूजा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याकडे थेट एका व्हीडिओतून मदतीची मागणी केली. रुपाली चाकणकर यांनी तो व्हीडिओ ट्विट केला आणि नागपूर पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर काही तासांमध्येच पूजा शेंद्रे आणि पंकज तडस यांच लग्न पार पडलं.
लग्नानंतर पूजा शेंद्रे यांनी तडस यांच्यावरचे सगळे आरोप मागे घेतले. एका स्त्रीच्या सन्मानाची लढाई होती आणि त्यात जिंकल्याची प्रतिक्रिया त्यांनी बीबीसीशी बोलतांना दिली.
त्या म्हणाल्या, "ही माझ्या अस्तित्वाची लढाई होती. पंकज यांनी माझ्याशी खोट्या लग्नाचं चित्र उभे करून माझ्यावर शारीरिक आणि लैंगिक अत्याचार केले होते. माझ्यासोबत फसवणूक झाल्याच कळलं आणि माझा संघर्ष सुरू झाला. लग्नाचा विषय काढला की पंकज मला लोखंडी रॉडने मारहाण करायचा".
"आम्ही नवरा-बायकोसारखे राहात होतो. दरम्यान मला गर्भधारणा झाली. पंकजने मला गर्भपात करण्यास भाग पाडले. तू ठेवलेली बायको आहेस तुला कोणतेही अधिकार मिळणार नाही, अस पंकज नेहमी म्हणायचा. त्या एका शब्दासाठी ही लढाई होती. कागदोपत्री केलेलं लग्न हे समाजापुढे येऊ दे. त्यामुळं काल झालेलं लग्न मला माझा अधिकार प्राप्त करून देणारं आहे," पूजा तडस म्हणाल्या.
सध्या पूजा तडस पतीच्या फ्लॅटवर राहतात. त्यांनी तक्रार मागे घेतली असली तरी यापुढे शारीरिक छळ झाल्यास त्या पुन्हा पोलिसात तक्रार दाखल करून शकतात, असा इशारा त्यांनी दिला आहे.
त्या म्हणतात "माझ्यावर दबाव टाकून सोडचिठ्ठी घेण्याचा विचार पंकजनी केला तर मी पोलिसांत तक्रार देणार. पंकज यांना प्रॉपर्टीमधून बेदखल केल्यानंतर मी त्यांच्याशी लग्न केलं. पण माझ्या सासू-सासऱ्यांनी मला कधी मारहाण केलेली नाही," असंही पूजा म्हणाल्या.
6 ऑक्टोबर 2020 मध्ये पंकज तडस आणि पूजा शेंद्रे यांचा वैदिक पद्धतीने विवाह पार पडला होता. मात्र कागदोपत्री झालेला विवाह पूजा यांना मान्य नव्हता.
समाजापुढे लग्नाची अट त्यांनी पंकज यांच्यापुढे मांडली होती. आधीच्या लग्नाचे पुरावे नष्ट करण्यात आले, असा आरोप पूजा यांनी केला होता.
लग्नानंतर खासदार रामदास तडस यांनी पंकजला बेदखल करून घराबाहेर काढले. त्यानंतर पंकजने पुजाला एका फ्लॅटवर ठेवले. दरम्यान विधिवत लग्नावरून दोघांमध्ये खटके उडत गेले. त्यातून पंकज हात-पाय बांधून मारहाण करायचा असा आरोप पूजाने त्याच्या तक्रारीत केला होता.
"खरं सांगायचं झाल्यास ही ब्लॅकमेलिंग आणि राजकीय सुपारी होती. त्यात मी बळी पडलो", अशी प्रतिक्रिया पंकज तडस यांनी दिली.
ते म्हणाले "अहंकारामुळे प्रकरण उभे झाले आणि त्यात राजकीय मंडळींनी आपली पोळी शेकली. मी खासदार तडस यांच्यासोबत राहात नाही. तरीही तक्रारीत माझ्या सर्व कुटुंबाची नाव घेण्यात आली. आधीच्या पोलीस तक्रारीत आम्हाला आरोपमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा तिच तक्रार देण्यात येते. तसेच ज्यांना माझ्यापासून धोका आहे, तेच पुन्हा माझ्यासोबत राहायला तयार होतात. यातून स्पष्ट हेतू दिसून येतो"
शारीरिक आणि लैंगिक छळा संदर्भात 4 सप्टेंबरला वर्धेच्या रामनगर पोलीस स्टेशन मध्ये पूजा यांनी तक्रार दाखल केली होती.
कौटुंबिक तक्रार असल्यामुळे ती चौकशीत ठेवण्यात आली अस ठाणेदार हेमंत चांदेवार यांनी सांगितले.
चांदेवार म्हणाले "साध्या पेपरवर त्यांनी तक्रार दाखल केली होती. चौकशीसाठी प्रकरण ठेवले होते. समजूत काढण्यासाठी दुसऱ्या दिवशी त्यांना पोलीस स्टेशनला बोलावले होते. मात्र काल त्यांनी त्यांची तक्रार मागे घेतली. यावर कुठलीही कारवाई होऊ नये असं लेखी त्यांनी लिहून दिलंय" अस ठाणेदार म्हणाले.
मात्र लैंगिक छळाची तक्रार आणि लग्न यावर चांगलाच राजकीय धुरळा उडाला. आरोप प्रत्यारोप झाले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही खासदार रामदास तडस यांच्याशी संपर्क साधला. समन्वयाने प्रकरण हाताळण्याचा सल्ला त्यांनी तडस यांना दिला.
तर अटक थांबवण्यासाठी तडस कुटुंबाने लग्न लावून दिल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केला आहे. एकदा लग्न झाल्यानंतर दुसऱ्यांदा लग्न करण्याची आवश्यकता काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्या म्हणाल्या "लग्न झाल्यानंतरही पूजाला तडस कुटुंबीयांनी घरामध्ये प्रवेश दिलेला नाही. आधी त्याचं लग्नच झालेलं नव्हतं. पंकज दाखवत असलेल्या नोंदणीपत्रात ते दोघे सोबत नव्हते. खोटं प्रमाणपत्र पंकज दाखवायचा. लग्न केल्याच्या नावाखाली त्याने तिच्यावर अत्याचार केले. गेल्या 11 महिन्यापासून ती अत्याचार सहन करतेय. दबावापोटी आणि गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्यांनी हे लग्न केलंय. मात्र यानंतर पूजाच्या केसालाही धक्का तर गाठ आमच्याशी आहे," असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)