तरुण तेजपाल प्रकरण: न्यायाधीशांचं बलात्कार पीडितेच्या 'योग्य' वर्तनावर प्रश्नचिन्ह

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी न्यूज, दिल्ली

बलात्कार पीडितेनं कसं वागायचं याची काही 'योग्य' पद्धत असते का?

सहकारी महिलेवर बलात्कार केल्याचे आरोपातून पत्रकार तरुण तेजपाल यांना मुक्त केल्यानंतर हा प्रश्न आता भारतात बरेचजण विचारतायेत. तेजपाल यांना दोषमुक्त करताना बलात्कार पीडितेच्या वर्तनावर (Behaviour) प्रश्न उपस्थित केलेत.

न्या. क्षमा जोशी यांनी निकालपत्रात लिहिलंय की, "ज्यावेळी गैरवर्तन झालं, असा आरोप तरुणीनं केला, त्याच्या काही वेळानंतरच्या फोटोत तरुणी हसत आणि आनंद होती, सर्वसामान्य, चांगल्या मनस्थितीत दिसत होती."

"ज्यावेळी लैंगिक छळ झाल्याचा तिनं आरोप केलाय, त्यानंतर लगेच ती अस्वस्थ, घाबरलेली किंवा मानसिक धक्का बसलेली दिसली नाही," असंही न्यायाधीशांनी 527 पानी निकालपत्रात म्हटलंय.

तेहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्यावरील बलात्काराचे आरोप कोर्टाने फेटाळले. गोवा सरकारनं कोर्टाच्या या निर्णयाविरोधात अपील केले आहे.

प्रकरण काय आहे?

2013 साली एका महिला पत्रकारानं तेजपाल यांच्यावर बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि आपल्या कनिष्ठ सहकाऱ्याचा विनयभंग केल्याचे आरोप लावले होते. त्या वर्षीच नोव्हेंबरमध्ये गोव्यात झालेल्या तहलकाच्या एका कार्यक्रमादरम्यान ही घटना घडल्याचं या महिलेचं म्हणणं होतं.

नोव्हेंबर 2013 मध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.

पोलिसांनी तरुण तेजपाल यांच्यावर 3000 पानांचं आरोपपत्र दाखल केलं. त्यात लैंगिक छळ, बलात्कार, दबाव इत्यादी आरोपांचा समावेश होता. तरुण तेजपाल यांनी हे आरोप फेटाळले होते.

तरुण तेजपाल यांच्यावरील हे आरोप भारतीय माध्यमविश्व आणि जगभरातही गंभीर चर्चेचे विषय बनले.

2000 साली तहलका मासिकाची स्थापना झाली. अल्पावधीतच शोध पत्रकारितेच्या बाबतीत भारतीय माध्यमविश्वात महत्त्वाच्या स्थानी तहलकाचं नाव घेतलं जाऊ लागलं.

पुढच्या वर्षी म्हणजे 2014 च्या मेपासून ते जामिनावर बाहेर होते. 27 एप्रिल रोजी या प्रकरणावर निकाल येणं अपेक्षित होतं. पण, तो पुढे ढकलण्यात आला. अखेर 21 मे 2021 गोवा सत्र न्यायालयाने तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून मुक्त केलं आहे.

'नैतिकतेचं परीक्षण'

ज्या तरुणीने तरुण तेजपाल यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते, ती केवळ त्यांची सहकारी कर्मचारी नव्हती, तर तेजपाल यांच्या मित्राची मुलगी होती. तसंच, तेजपाल यांच्या मुलीचीही ती मैत्रीणच होती. तरुणीने कोर्टातही सांगितलं होतं की, तरुण तेजपाल हे वडिलांसारखे वाटायचे आणि तसाच त्यांच्यावर विश्वास ठेवला होता.

तेजपाल यांची सुटका झाल्याचं अनेकांना आश्चर्य वाटलं. त्यांनी या घटनेचं वर्णन करताना वापरलेले शब्द बदलत गेले होते. आधी तेजपाल म्हणाले होते, की जे घडलं ते परस्पर सहमतीनं होतं, मग त्यांनी 'निर्णयात झालेली चूक' यासाठी जबाबदार असल्याचं म्हटलं आणि ही 'परिस्थितीचा चुकीचा अर्थ' लावल्यानं घडलेली 'दुर्दैवी घटना' असल्याचं म्हटलं. त्यानंतर त्यांनी 'तुझा विरोध असतानाही लैंगिक सुखाची आशा केली' हे आधी केलेलं विधान मागे घेतलं, आणि आपल्याला असं विधान करण्यासाठी भाग पाडण्यात आलं होतं असं म्हटलं.

कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्यांनी लिफ्टमधला प्रसंग म्हणजे 'ड्रंकन बँटर' अर्थात दारूच्या अंमलाखाली केलेली बडबड असल्याचं म्हटलं होतं.

तरुण तेजपाल यांची निर्दोष सुटका केल्यानंतर न्यायाधीश आरोप करणाऱ्या तरुणीकडे वळल्या. तिला विचारण्यात आलं की, महिला रुममेटऐवजी तीन पुरुष सहकाऱ्यांना या घटनेबद्दल का सांगितलं? मित्रांसमोर तरुणी रडली का नाही? आणि अशा स्थितीत दिसणारं वर्तन तिच्यात का दिसलं नाही?

"तिनं ताकदीनं संघर्ष केला, परंतु तिला काहीच दुखापत झाली नाही, हे अविश्वासनीय आहे," असंही न्यायाधीशांनी निकालपत्रात लिहिलंय.

या निकालपत्राने नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

दिल्लीस्थिती वकील अर्पणा भट म्हणतात, तरुण तेजपाल यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार होता आणि त्याला नियंत्रित करणं न्यायाधीशांचं काम होतं.

अपर्णा पुढे म्हणतात, "मात्र, इथं न्यायाधीश तरुणीची बदनामी करताना दिसतात. पूर्ण निकालपत्र म्हणजे त्या पीडित तरुणीचा छळ आहे."

"तरुणीने केलेले आरोप शक्य नसल्याचे दाखवण्यासाठी तरुणीबद्दल असे अपमानजनक संदर्भ, हास्यास्पद निष्कर्ष काढण्यात आलेत की, ती इतरांबरोबर गप्पा मारत होती ज्यांच्याशी तिचा पूर्वी लैंगिक संबंध आला होता," असं भट सांगतात.

संपूर्ण निकालपत्र म्हणजे अशी साखळी आहे, ज्यात तरुणी लैंगिक संबंधांमध्ये गुंतल्याचे दाखवण्याचा प्रयत्न आहे, असंही भट म्हणतात.

वकील पायल चावला म्हणतात, "हे निकालपत्र केवळ तरुणीच्या प्रतिमेचं विद्रुपीकरण नाही, तर तिच्या प्रतिमेचं हत्याकांड आहे."

"महिलांनी बारमध्ये पार्टी केली आणि हातात पेय घेऊन डान्स केल्यास न्यायाधीशांना खटकतं बहुधा. बलात्कार झाला की नाहीय, यापेक्षा तरुणीच्या नैतिकतेचं परीक्षण सुरू होतं बहुतेक," असं पायल चावला म्हणतात.

स्त्रीविरोधी निर्णय हे काही भारतात पहिल्यांदच घडत नाहीय. गेल्याच वर्षी, कर्नाटकातील न्यायाधीशांमुळे असा वाद उद्भवला होता, जेव्हा त्या न्यायाधीशांनी पीडित महिलेच्या वर्तनाला 'अशोभनीय' म्हटलं होतं.

"तिच्याकडून दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, दुष्कर्मानंतर तिला थकवा आला आणि ती झोपी गेली, हे भारतीय महिलांसाठी अशोभनीय आहे," असं न्यायाधीश म्हणाले होते. त्याचसोबत, हे न्यायाधीश असंही म्हटले होते की, "बलात्कारानंतर महिला ज्या प्रकारे वागतात, तसं हे नव्हतं."

वकील अपर्णा भट यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आणि तीन महिला न्यायाधीशांना पत्र लिहून विचारलं आहे की, "बलात्कार पीडितेनं घटनेनंतर कसं वागावं, याचे काही नियम कायद्यात आहेत का, असतील तर मला माहित नाहीत."

या निकालानंतर प्रसिद्ध व्यंगचित्रकार @PENPENCILDRAW यांनी व्यंगात्मक तक्ता रेखाटलाय. या तक्त्याचा मथळा त्यांनी असा दिलाय की, "आदर्श बलात्कार पीडितांसाठी भारतीय न्यायाधीशांची मार्गदर्शकपर सूचना"

हा व्यंगात्मक तक्ता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय आणि व्हायरल झालाय.

असेच निर्णय याआधीही झालेत. एकाने सामूहिक बलात्कार पीडित मुलीवर बिअर पिणे, धूम्रपान करणे, अंमली पदार्थांचे सेवन करणे आणि तिच्या खोलीत कंडोम ठेवल्याबद्दल टीका केली.

भारतीय सर्वोच्च न्यायालयाने हे वारंवार अशा प्रश्नांना विरोध करताना सांगितलंय की, एखाद्या महिलेचा लैंगिक इतिहास किंवा प्रतिमा याबाबतचे अनुमान किंवा तथ्य लागू होत नाही. काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये न्यायाधीशांनी स्पष्ट केलंय की, न्यायाधीशांसमोर एकच प्रश्न असावा की, आरोपीने बलात्कार केला आहे का?

"सुप्रीम कोर्टानं वारंवार सांगूनही, न्यायाधीशांकडून पीडितेच्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित करणं सुरूच आहे. एखाद्याच्या खासगी आयुष्याच्या तपशिलात जाण्याबाबतच्या नियमांविरोधात हे आहे," असं चावला म्हणतात.

तेजपाल प्रकरणातील भल्यामोठ्या निकालपत्राचं वाचन केल्यानंतर लक्षा येतं की न्या. जोशींनी तर तरुणींच्या आईवरही प्रश्न उपस्थित केले होते. "तिने तिच्या आघात झालेल्या मुलीला पाठिंबा देण्यास तिच्यासोबत राहण्यासाठी आपली योजना बदलली नाही," असं न्या. जोशींनी निकालपत्रात तरुणीच्या आईबद्दल लिहिलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)