'माझ्यावर बलात्कार झाला पण त्याक्षणी ते समजलंच नाही' - #MeToo

माझ्यासोबत जे झालं तो बलात्कार होता. पण त्याक्षणी मला हे समजलं नाही. ही बळजबरी आहे, हे माझ्या मेंदूपर्यंत पोहचलंच नाही. एका क्षणी मला वाटलं की, चूक माझीच आहे. कारण त्या रात्री मला त्याचं आकर्षण वाटलं होतं.

युनिर्व्हसिटीमध्ये मी त्याला बरेचदा येताजाता पाहिलं होतं. तो दिसायला चांगला आणि स्मार्ट होता. तो जणू एखादा सेलेब्रेटी असावा, असं लोकं त्याच्याबद्दल अनेकदा बोलत असत. सहाएक महिन्यांपूर्वी त्याच्या एका मित्राबरोबर फिरताना आमची भेट झाली होती. पण तो फारसं धड बोललाही नव्हता. त्याला पाहावं तेव्हा तो सतत त्याच्या मित्रांच्या घोळक्यात गप्पाटप्पांत मग्न असे. तरीही त्यांच्यात उठून दिसे. त्याच्या लेखी जग कस्पटासमान होतं. `कुल` भासवणाऱ्या इतरांपासून वेगळं भासवण्यासाठी काही वेगळ करायची गरज नव्हती.

तेव्हा माझं तिसरं अर्थात शेवटचं वर्ष संपत आलं होतं आणि पुढच्या आयुष्यात मी काय करणार किंवा करावं हे ठरवायची वेळ शेवटी आलीच होती. त्या वर्षी उन्हाळा कधी नव्हे इतका असह्य होत होता. रोज सकाळी उठल्यावर आजतरी पाऊस पडेल अशी आशा करण्यातच सारा दिवस मावळून जायचा. वास्तविक हवामान अगदी बेक्कार झालं असलं तरीही अद्याप शाबूत असलेल्या स्वातंत्र्याच्या शक्यता मावळणं बाकी होतं.

काहीतरी चांगलं घडेल अशा आशादायी चित्रावर विश्वास ठेवून आम्हा विद्यार्थ्यांना आमची घरं सोडायची होती. त्यामुळं जवळपास दोन आठवड्यातली एकही रात्र विनापार्टीची गेली असं झालंच नाही. त्यातल्याच एका रात्री ती घटना घडली.

शहराच्या बाहेर असणाऱ्या एका गुप्त ठिकाणी ही पार्टी होणार होती. आमचा ड्रेसकोड काय, लोकांना कुठं आणि किती वाजता भेटायचं हेही सांगण्यात आलं होतं.

माझ्या बेस्ट फ्रेण्डससोबत मी तयार झाले. आम्ही थोडीशी दारू प्यायलो. एकमेकींचा मेकअप केला आणि ठरल्या ठिकाणी जायला टॅक्सी केली. तिथं पोहचल्यावर बघते तर काय माझे मित्र ड्रग्ज घेत होते. मीही त्यांच्यात सामील झाले. MDMA चा बोकांदा मारला. हे असं मी यापूर्वीही केलं होतं आणि त्यासाठी हे ठिकाण सुरक्षित आहे, असा माझा समज होता. तिथं शंभरहून अधिकजण होते आणि आम्ही एकमेकांना ओळखत होतो.

मी माझ्या मित्रांसोबत मनसोक्त डान्स केला, करत होते. मध्येच एकदा मी हळूच किलकिल्या डोळ्यांनी त्याला पाहिलं. तर त्याचं लक्ष माझ्याकडंच केंद्रित झालं होतं. भोवतालच्या घोळक्यांमधून वाट काढतकाढत तो माझ्याच दिशेनं येत होता. मग आम्ही नाचायला सुरुवात केली. त्यानं मला ड्रिंक ऑफर केलं.

नंतर मला जाग आली तेव्हा मी गवतावर पडले होते. पार्टीतल्या संगीताचा मंद आवाज थोड्याशा दूरवरून का होईना पण तिथं ऐकू येतो आहे, असं वाटत होतं. त्यामुळं पार्टीच्या ठिकाणाहून मी फारशी लांब नाहीये, याची मला खात्री पटली. हवेत गारवा होता. मैदान दवानं ओलसर झालेलं होतं. तितक्यात माझ्यावर कुणीतरी ओणवं झालंय, अशी जाणीव मला झाली. तो माझ्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न करत होता, पण माझं शरीर थंड पडलेलं होतं. तो कोण आहे, हे मी पाहिलं. मला धक्काच बसला... `तो` हे कसं काय करू शकतो? मी त्याला ओळखते. सगळेजणच त्याला ओळखतात. पण लोकांना हे घडतं आहे हे माहिती आहे का? मी असं काय वागले की हे असं करणं `ओके` आहे, असं त्याला वाटावं?

"कसं आणि काय ते महत्त्वाचं नाही, मी तुला भोगणार, तुझ्यावर जबरदस्ती करणार," असं तो अतिशय उद्धटपणं आणि कर्कश आवाजात बोलला. याआधी मी त्याचा आवाज ऐकला होता; तो अत्यंत मृदू होता. तोच आवाज आता रागानं भारलेला आणि विफल झालेला वाटत होता.

त्या क्षणी मला माझा आवाज गवसेना... पार्टीतल्या संगीताचा जसा आवाज दूरवरून येणारा वाटत होता, त्याहीपेक्षा माझा आवाज अगदी खोलखोल गेला होता. अर्धवट बेशुद्धी आणि थकवा जाणवत होता. मी त्याला थोपवू पाहाण्यासाठी बोलायला लागले खरी, पण शब्दच फुटेनासे झाले. जणू शब्द घशातच अडकून पडले होते. त्याच्या शारीरिक जबरदस्तीला माझ्याकडून काहीच प्रतिसाद दिला गेला नाही. मग त्यानं ओरल सेक्स करायला सुरुवात केली. ते बहुधा काही तास चाललं असावं असं वाटतं.

या सगळ्या प्रकारात मी सहभागी झाले नव्हते. माझी जाणीव जणू हरपली होती. म्हणजे त्या क्षणी माझं शरीर तिथं होतं पण माझं चित्त बिलकुल थाऱ्यावर नव्हतं. जणू मी कुणी तिऱ्हाईत आहे आणि तिथं काय चाललं आहे, याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करते आहे.

हळूहळू क्षितिजावर सूर्योदयाची चाहूल लागली. पहाटेचे पाच किंवा कदाचित सहा वाजले असावेत. त्यामुळं मला क्षणिक आधार वाटला. कारण रात्रीच्या अंधारात काळ जणू गोठलेला वाटत होता.

"मला वाटत नाही की यातून काही निष्पन्न होईल," मी बोलले. "थांबव आता हे सगळं. काहीही निष्पन्न होणार नाही," असं पुन्हा मी शांतपणं आणि ठामपणं म्हणाले. कुठंतरी या शब्दांनी जादू केली असावी किंवा त्यांचा योग्य तो परिणाम झाला असावा. तो झटकन उभा राहिला आणि तोंडातून अवाक्षरही न काढता चालता झाला.

अजूनही सुरूच असलेल्या पार्टीत मी अडखळत अडखळत पोहचले. तिथं माझी मित्रमंडळी अद्यापही नाचत होती, मजा करत होती. मग टॅक्सीनं आम्ही घरी आलो. काय घडलं ते मी कुण्णालाही सांगितलं नाही की कुणी मला काहीही विचारलंही नाही.

माझ्यावर बलात्कार झाला होता, पण ताबडतोब हा `बलात्कार` आहे, असं म्हणायला मन धजावत नव्हतं. हा शब्द फारफार मोठ्ठा होता, राक्षसी होता आणि त्याच्या पुढ्यात माझ्या मनात क्षुद्रपणाची जाणीव भरून राहिली होती.

आता आपण काय करावं, हे मला चांगलंच माहिती होतं. लोकांना सांगावं, पोलिसांना बोलवावं वगैरेवगैरे. पण मी पार घाबरून गेले होते. माझं भरपूर दारू प्यायलेलं असणं, माझा ड्रेस, बेकायदेशीर ड्रग्ज घेणं वगैरे गोष्टींवरून माझी पारख केली जाईल, माझ्याविषयी मतं तयार होती, अशी भीती मला वाटली.

मैदानात मी स्वतः त्याच्यासोबत गेले होते की त्यानं मला नेलं होतं? या लोकांच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं नव्हतं. कारण त्या काळात काय घडलं ते मला आठवतच नव्हतं. कदाचित त्यांनी मला विचारलं असतं की, त्यानं ते ड्रिंक घ्यायचा आग्रह केला होता का... आता मला वाटतंय की, हो त्यानं तसं केलं होतं... पण त्याचीही मला खात्री देता येणार नाही.

मला महिती आहे की यात माझी काहीच चूक नाही, पण मला याचीही काळजी वाटतेय की माझ्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. पण प्रश्नांच्या झाडल्या जाणाऱ्या फैरींना उत्तर देण्याच्या मन:स्थितीत मी नव्हते. आता मला वाटतं की वेळेवर तक्रार केली असती तर, पण मी तक्रार केली नाही हेच खरं. इतर अनेकजणींप्रमाणं मीही मूग गिळून बसले. आजवर इंग्लड आणि वेल्स परगण्यातील जवळपास ८५ टक्के स्त्रियांना लैंगिक अत्याचाराचा अनुभव आला असेल, पण त्यांनी त्याविषयीची तक्रारच दाखल केलेली नाही.

मी पार्टीला गेले. छान तय्यार होऊन गेले आणि लोकांचं लक्ष माझ्याकडं वेधलं जावं, असं मनोमन मला वाटत होतं. मी सिंगल होते. २३ वर्षांची होते. पण मी कोणताही गुन्हा केला नव्हता.

पण मग गुन्हा घडवायला मी प्रवृत्त केलं का?... माझ्यासोबत घडलेली घटना स्वीकारायला मन धजावत नव्हतं...

मनाचा हा संघर्ष खूप काळ चालू होता.

आता जवळपास सात वर्षं उलटून गेली आहेत या घटनेला. शांतपणं विचार करताना वाटतं की, सेक्सला होकार द्यावा की नाही हा विचार करण्याजोगी आपली परिस्थितीच तेव्हा नव्हती. त्यामुळं परवानगी द्यायचा प्रश्नच येत नाही. मूळ मुद्दा हा की अशा प्रसंगी सहमती किंवा परवानगी या मुद्द्याचा फारसा विचार केला जातच नाही.

कायद्यानं बोलायच तर तर सेक्स ही गोष्ट परस्पर सहमतीनं, परवानगीनं आणि दोघांच्या आवडीनिवडीवर अवलंबून असते. पण मी त्याला माझ्याशी जबरदस्ती करण्याची, माझ्यावर हुकूमत गाजवण्याची परवानगी कधीच दिलेली नव्हती.

समजा आपण बेशुद्ध आहोत किंवा दारूच्या अंमलाखाली आहोत किंवा ड्रग्ज घेतलेले आहेत, जे मी केलं होतं, तरी अशा वेळी सेक्ससाठी तुमची सहमती आहे हे गृहीत धरता कामा नाही. एखाद्याच्या संमतीविना त्याच्याशी केलेला सेक्स हा बलात्कार ठरतो. ही एवढी साधी गोष्ट आहे.

अंतर्यामी मला हे सगळं माहिती होतं, पटत होतं आणि त्या घटनेनंतर लगेचच ते माझ्या लक्षातही आलं. पण बलात्कार ही संकल्पना - टर्म पचवायला, ते दुःख जिरवायला फारफार काळ मध्ये जावा लागला. ते सगळं फार दुःसह्य आणि मनोवेदना देणारं होता. बलात्कार हा शब्द उच्चारायलादेखील मला अनेक वर्ष जाऊ द्यावी लागली. अजूनही मी त्या शब्दाचा तिरस्कारच करते.

आता अनेक जर-तर वेगगेवळ्या रूपांत पुढं येत असतात. त्यांचा विचार करते आणि वाटतं की, त्याच्या कृत्याची जबाबदारी माझी आहे का? असे विचार अधूनमधून डोकावतातच आणि एका परीनं दरवेळी मी स्वतःचीच परीक्षा घेते, चाचपणी करत राहाते.

ठराविक मानसिकतेच्या चौकटीत विचार करायचा झाला तर बलात्काराविषयी बोलणं ही गोष्ट कोसो मैल लांबची ठरते. ही गोष्ट शक्य तितकी दडपून टाकणं, गुप्त ठेवणं, त्याबद्दल लाज बाळगणं हेच अधिकांशी केलं जातं. वाढत्या वयाच्या मुलींना अनोळखी व्यक्तींकडून त्रास होईल, अशी चिंता पालकांना सतावत असते. त्यामुळं गल्लीबोळात फिरणं किंवा घराबाहेर एकटीनं जाणं याला चटकन परवानगी मिळत नाही. हा विचार आपल्या मनात इतका रुजलेला आहे की त्या पलिकडं काही होऊ शकतं याचा विचारही केला जात नाही. त्यामुळं त्या पलिकडं जाऊन पुन्हापुन्हा पडताळून पाहिलं तर इंग्लड आणि वेल्स परगण्यातले केवळ १० टक्के बलात्कार हे अनोळखी व्यक्तींनी केलेले दिसतात. बहुसंख्य वेळा झालेले अत्याचार हे ओळखीच्यांनीच केलेले असतात.

कसंय की, आता मला ही गोष्ट कळलेली असल्यानं माझ्या त्यावर विश्वास बसलेला आहे. माझ्यावर लागलेला कलंक वाढतावाढता इतका वाढला की त्यानं मला पार गिळून टाकायचा प्रयत्न केला. तरी मी मूग गिळून गप्पच राहिले. सुरुवातीच्या काळात या घटनेचा मला जबर मानसिक धक्का बसलेला असल्यानं मी पार गोंधळून गेले होते. स्वतःलाच अपराधी मानत होते. माझा आत्मविश्वासच हरवून गेला होता. माझा हा संघर्ष अधिकच कठीण होता कारण अपराधी मला माहिती होता. मला वाटत होतं की ही माझी चूक झाली आहे. कारण त्या रात्री त्याचं मला आकर्षण वाटलं होतं. पण त्या अंधारात त्यानं केलेल्या अघोरी कृत्यामुळं माझ्या मनावर भीतीचा कायमचा पगडा बसला.

त्या एका रात्रीनं माझ्या मानसिक आरोग्यावर आणि एकूणच नातेसंबंधांच्या व्यवहारांवर फार दूरगामी परिणाम झाले. हा एक प्रकारे थेट मनोधैर्यावरच हल्लाबोल झाला होता. आताशा हळूहळू एकेक करून माझ्या आयुष्याचं गाडं रुळावर येऊ लागलं आहे. सध्या मी लॉग टर्म रिलेशनशिपमध्ये आहे. त्यामुळंच मला या साऱ्या प्रकाराविषयी बोलण्याचं बळ मिळालं आहे.

#MeToo या मोहीमेअंतर्गत येणारे अनेकींच्या व्यथा-कथा वाचल्या. डॉ. ख्रिस्तिन ब्लेसे फोर्ड यांच्यासारख्या स्त्रियांच्या टेस्टीमोनीज ऐकल्या आणि या साऱ्यातून बाहेर पडायची संधी स्वतःला द्यायला हवी हे मनाशी पक्कं केलं. मग मीही या प्रवाहात सामील व्हायचं ठरवलं आणि संमती या मुद्द्याच्या अनुषंगानं बोलायचं ठरवलं.

आपल्याला हवंतसंच दुसऱ्याकडून करून घेणं ही गोष्ट ओके असते, ही मानसिकताच मला समजू शकत नाही. अगदी ते सेक्सच्याबाबतीत का असेना किंवा बलात्काराबद्दल का असेना समोरच्याला अपमानित करणं, त्याच्या सहमतीचा विचारदेखील न करणं ही बाब अयोग्य आहे.

आपली वेशभूषा काय आहे, आपण प्यायलेलो आहोत की नाही, ड्रग्ज घेतलेले आहेत की नाही किंवा अगदी आपली सेक्स करायची इच्छा असली तरी काहीही फरक पडत नाही. बलात्कार ही घटना केवळ आणि केवळ तो करणाऱ्या अपराध्याचीच जबाबदारी ठरते. आणि मला वाटतं, त्याबद्दल आणखी काही नाही तर सहमती असणं किंवा नसण्याबद्दलचा गोंधळ हा घातक ठरतो.

(लेखिकेच्या विनंतीवरून त्यांचं नाव गुपित ठेवण्यात आलं आहे.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)