'मी 37 वर्षांचा होईपर्यंत कधीही सेक्स केला नव्हता'

मी माझ्या वयाची तिशी उलटून गेली तरी व्हर्जिनच होतो. हे किती विचित्र आहे याची मला कल्पना नाही. पण मला फारच लाजीरवाणं वाटत असे आणि माझ्यावर बट्टा लागलाय की काय असं वाटे.

साधारणतः वयाच्या विशीत एखादा माणूस आपल्या कौमार्यातून बाहेर पडतो, पण हे काही सगळ्यांबाबत खरं नाही. 60 वर्षांचे विधुर असणारे 'जोसेफ' यांच्यासाठी कौमार्यातून बाहेर पडणं हे खूपच लाजिरवाणं आणि वैतागवाणं होतं. ही त्यांची कहाणी.

मी खूपच लाजाळू आणि नेहमी काळजीत असायचो, पण मी एकलकोंडा मात्र नव्हतो. मला अनेक मित्रमैत्रिणी होत्या पण मला त्यातून कधी जवळीकीचं नात तयार करता आलं नाही.

शाळेत असताना माझ्या भोवती मुलींचा आणि बायकांचा गराडा असायचा. पण माझ्याकडून 'तशी' कोणतीच पावलं उचलली गेली नाहीत. तसे जर मी प्रयत्न केले असते तर ते नैसर्गिकच समजलं गेलं असतं.

मी विद्यापीठात शिक्षण घ्यायला लागलो तोपर्यंत माझं आयुष्य साचेबद्ध झालं होतं. रिलेशनशिप नसणं किंवा न ठेवणं हेच खूप स्वाभाविक झालं होतं. याचं मोठं कारण म्हणजे माझा कमकुवत स्वाभिमान आणि लोकांना मी फारसा आकर्षक वाटणार नाही हा मला स्वतः बद्दल वाटत असलेला न्युनगंड आणि त्यावरचा दृढ विश्वास.

तुम्ही तुमच्या 'टीन एज' म्हणजेच वय वर्ष १३-१९मध्ये आणि विशीत पदार्पण केल्यानंतर कधीच कुणाबरोबर रिलेशनशिपमध्ये राहिला नसाल तर तुमच्याकडे लोकांना तुम्ही का आवडता हे सांगण्यासाठी काहीच पुरावा नसतो. तुम्ही हे कधीच म्हणू शकत नसता की, "बघा! ही मुलगी माझी गर्लफ्रेंड होती, तीसुद्धा माझी गर्लफ्रेंड होती."

यामुळे तुम्ही आकर्षक नाही, असं तुमचं मत बनत जातं आणि हे मत नंतर अधिकाधिक बळकट होत जातं.

मी कधीच माझ्या मित्रांशी याबद्दल बोललो नाही आणि त्यांनीही मला कधी याबद्दल विचारलं नाही. मला कधी त्यांनी याबद्दल विचारलं असतं तर, अगदी खरं सांगायचं तर, मी बचावात्मक पवित्रा घेतला असता. याचं मुख्य कारण हेच होतं की मला याची लाज वाटू लागली होती.

सेक्स केला नाही यावरून कदाचित समाज लोकांची पारख करत नसेलही. पण मला असं वाटतं की, जेव्हा एखादी गोष्ट नॉर्मलच्या बाहेर आहे, असं समाजाला वाटतं, तेव्हा ती गोष्ट नक्कीच अडचणीची आहे असा समज होऊ शकतो. या सगळ्यांमुळे मला लाज वाटू लागली.

माझ्या अनेक मित्रांना गर्लफ्रेंड होत्या. त्यांच्या रिलेशनशिपकडे आणि पुढे त्याच रिलेशनशिपचं लग्नात रूपांतर होताना मी लांबून पाहायचो. माझ्या स्वाभिमानाला यामुळे तडे जाऊ लागले होते.

मी एकटा पडलो होतो आणि खिन्न झालो होतो. पण मला याची तेव्हा जाणीव झाली नाही. ते कदाचित माझे कुणाशीच शारीरिक संबंध नव्हते म्हणून असेल. पण कुणाशीच भावनिक जवळीक नसणं हेसुद्धा यामागचं एक कारण होतं.

आता जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा दिसतं की किमान, १५ वर्ष, कदाचित २० वर्षसुद्धा, मला कधीच मानवी स्पर्श झालाच नव्हता. आई, बाबा आणि माझ्या बहिणीसारख्या माझ्या अगदी जवळच्या नातेवाईकांव्यतिरिक्त कधीच कुणी जवळ घेतलं नव्हतं. या व्यतिरिक्तसुद्धा कोणत्याच प्रकारचा शारीरिक जवळकीचा संबंध नव्हता. हे फक्त सेक्सबद्दल नव्हतं.

मला आवडणारी एखादी व्यक्ती दिसली तर मला कधी उत्तेजना जाणवली नाही. किंबहुना माझी पहिली प्रतिक्रिया ही दुःखाची आणि उदासीनतेची असे. मला या सगळ्यांबद्दलच निराशा आली होती.

मला नकाराची भीती कधीच नव्हती. मुळात कुणी आपल्याला नकार देईलं हेच माझासाठी असंबद्ध होतं. मला असा विश्वास होता की कुणीच मला प्रतिसाद देणार नाही.

मी कदाचित बचावात्मक पवित्रा घेतला होता पण माझी अशी भावना झाली होती की स्त्रियांबरोबर मिसळताना मनात हाच उद्देश असणं हे गैर आहे आणि कदाचित हे त्या स्त्रियांवर लाद्ल्यासारखं होईल. मला "स्त्रियांचा उपभोग घेणारा" कधीच व्हायचं नव्हतं.

मला वाटायचं की स्त्रियांना मुक्तपणे त्यांचं दैनंदिन आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य असायला हवं. एखादी रात्र, कुणी आपल्याला 'अप्रोच' होईल की काय याची तमा न बाळगता, स्वखुशीत घालवता यावी.

मला आकर्षक वाटणाऱ्या अनेक स्त्रियांशी माझी मैत्री झाली. मला खात्री आहे की त्यांना माझ्या रोमँटीक भावनांबद्दल थोडीसुद्धा कल्पना नव्हती.

त्यावेळी माझी खात्री होती की त्यांना मी नको आहे. आता मात्र मागे वळून पाहताना मला खरच नेमकं काय ते माहिती नाही. मला वाटतं की माझ्याकडे आत्मविश्वासातून येणारा आकर्षकपणा नव्हता.

मला कुठल्याच स्त्रीने डेट साठी विचारलं नाही. हे झालं असतं तर किती छान झालं असतं! पण कदाचित हे त्या काळात अमान्य होतं.

मी वैद्यकीयदृष्ट्या उदास झालो ते माझ्या तिशीत. म्हणून मी माझ्या जनरल फिजिशियनला भेटलो आणि त्यांनी मला उत्साहवर्धक औषधं दिली. मी समुपदेशनालाही जाऊ लागलो. इथे गोष्टी बदलल्या.

सगळ्यात आधी समुपदेशनाने माझा आत्मविश्वास वाढू लागला. दुसरी गोष्ट म्हणजे त्या उत्साहवर्धक औषधांचाही थोडा परिणाम व्हायला सुरुवात झाली होती. कदाचित ती औषधं माझ्या लाजरेपणावरही उपचार करत असावीत आणि मी मोठाही झालो होतो.

मी अधेमध्ये कुणाला तरी डेटसाठी विचारत होतो. त्याचंच पुढे अल्पकाळासाठी का होईना, रिलेशनशिपमध्ये रूपांतर व्हायला लागलं होतं.

मला आठवतं, मी पहिल्या डेटला गेलेलो असताना थोडासा चिंतेत आणि घाबरलेला होतो. पान्माला वाटलं, "हे छान आहे, मला हे आवडतंय." मग मी तिला पुन्हा डेटसाठी विचारलं, आणि ती हो म्हणाली आणि गोष्टी तिथून पुढे गेल्या.

त्यानंतर काहीच आठवड्यांत आमच्यात शारीरिक जवळीक निर्माण झाली. किशोर वयात होणाऱ्या घोटाळयांबद्दल सगळेच बोलतात. पण मी किशोर वयाचा नव्हतो. मला काय करायचं आहे हे माहिती होतं असं मला जाणवलं. मला ते उत्तेजक आणि समाधान देणारं आहे असंही जाणवलं. काही लोक म्हणतात की पहिल्यांदा सेक्स करणं हा चांगला अनुभव नसतो, पण माझा अनुभव चांगला होता.

मी कौमार्यातून बाहेर आलेलो नाही हे मी तिला सांगितलं नव्हतं. पण जर तिने मला विचारलं असतं तर मी मोकळेपणाने तिच्याशी बोललो असतो.

माझी आणि माझ्या पत्नीची भेट तिथून पुढे १८ महिन्यांनी कामानिमित्ताने झाली. तिने लगेचच माझं लक्ष वेधून घेतलं होतं. ती खरंच खूप सुंदर होती. टपोरे स्वप्नील डोळे.

मी तिला लगेच डेटसाठी विचारलं नाही. पण आमच्या दोघांच्या मैत्रीत असणाऱ्या व्यक्तीला मी, ती कुणाबरोबर नाही ना हे विचारलं. तीच व्यक्ती आमच्यातला दुवा झाली.

आमची पहिली डेट माझ्या ४०व्या वाढदिवसाला होती. त्यानंतर १८ महिन्यांनी आमचा लग्न झालं. ती खूपच खास होती.

तिने माझ्या प्रेमाचा स्वीकार केला हे मी माझं भाग्यच समजतो. तिने माझावर भरभरून आणि निस्वार्थीपणे प्रेम केलं. मी ते मिळवायला भाग्यवानच होतो.

मी जेव्हा तिला माझ्या लैंगिक गतकालाबद्दल सांगितलं तेव्हा तिने ते सहज समजून घेतलं आणि त्यावरून कधीच माझी पारख केली नाही. आमचं नातं भावनिकदृष्ट्या खूपच घट्ट होतं. तिने माझ्यावर कधीच टीका केली नाही. तिच्या बरोबर असणं सहज-सोपं होतं.

आमच्या लग्नाला १७ वर्ष झाली. दुर्दैवाने ३ वर्षांपूर्वी ती गेली. ती माझ्यासाठी खूपच त्रासदायक गोष्ट होती.

मला कायम असं वाटतं की आमची खूप उशिरा भेट झाली आणि ती माझ्यापासून खूप लवकर दूर गेली. पण आम्ही तरुण असतानाच भेटलो असतो तर मी तिला तितकाच आकर्षक वाटलो असतो का हे काही मला सांगता येणार नाही.

मी माझ्या तारुण्याकडे अतिशय खेदाने पाहतो. जे घडलंच नाही अशासाठी मी शोक करत आहे असंच मला वाटतं. मला वाटतं की माझ्या नाहीत अशा अनेक सुंदर आठवणी आहेत.

तरुण असताना प्रेमात पडणं म्हणजे काय याची मला कल्पना नाही. आपल्या विरुद्ध लिंगी व्यक्ती बरोबर त्या नवीन जगात पाऊल टाकण्याचा आनंदी प्रयोग म्हणजे काय असतं मला कल्पना नाही. म्हणूनच मला खूप पश्चाताप होतो.

म्हणूनच अशा परिस्थितीत असणाऱ्या कुणालाही मी आता हेच सांगतो, ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे.

आणि अशा परिस्थितीत कुणी आपल्याला दिसला तर तिथेच त्याला मदत करण्याबाबत आपण विचार करायला हवा. हे कसं साधायचं मला माहिती नाही, कारण मला जर कुणी या बाबत विचारलं असतं तर मी सरळ नकार दिला असता. पण काही लोकांना हे नक्की समजेल.

मुद्दा असं आहे की माझ्यासारखे लोक कुणाच्याच खिजगणतीत नसतात.

आपल्याला तरुण लोक ड्रग्सच्या आहारी जातील किंवा गुन्हेगारीकडे वळतील किंवा वेळेच्या आधीच लैंगिक संबंध ठेवतील अशा गोष्टींची काळजी असते. एखादी गोष्ट न करणं हा आपल्या काळजीचा विषय कधीच नसतो.

पण जर तुम्हाला अशी एखादी व्यक्ती दिसली की जिला कधीच गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड नाही, तर त्या व्यक्तीलाच हे नको आहे असं विचार करणं टाळा. त्यांच्या बाबतीत आश्वासक राहा, त्यांची मदत करा. "तुम्ही कधीच कुणाबरोबर डेटला का जात नाही?" असं न विचारता "पहिल्यांदा डेट वर जाताना प्रत्येकाच्याच मनात हुरहूर असते, शंका असतात हे त्यांना समजून सांगून त्यांना प्रोत्साहन द्या.

घाबरणं साहजिक आहे. पण कुणाबरोबर तरी जवळीक असावी हे वाटणसुद्धा साहजिक आहे. ह्या सगळ्या भावना ह्या माणूसपणाचं लक्षण आहेत. तुम्ही या भावनांपासून स्वतःला वंचित ठेवलं तर तुम्ही अनुभवाचा एक मोठा ठेवा गमावून बसता.

टोरंटोमध्ये 23 एप्रिलला एका तरुणाने अपघात घडवला त्यात 10 लोक मारले गेले. त्याने तो INCEL या कम्युनिटीचा सदस्य असल्याचं सांगितलं होतं. हे लोक ते स्वतः कधीही सेक्स करू शकणार नाहीत, असं मानतात आणि स्वतःच्या लैंगिक अपयशासाठी स्त्रियांना जबाबदार धरतात. या घटनेला मिळालेली प्रसिद्धी लक्षात घेता मला असं वाटतं की जे लोक अजूनही खऱ्या प्रेमाच्या शोधात आहेत ते स्वतःला कलंकित समजतात आणि त्यांना स्वतःची घृणा वाटत असते.

ज्या लोकांना अजून प्रेमाचं माणूस सापडलेलं नाही आणि ते समाजात मिसळू शकत नाहीत, असे लोक विचित्र असतात असा जो समज आहे त्याला हे खतपाणी घालणारं आहे.

मला असं वाटतं की मी माझ्या पत्नीला भेटायच्या आधी आणि नंतर नॉर्मलच होतो. मी बदललो नव्हतो. माझ्याबद्दल काहीही चुकीचं नव्हतं.

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे प्रेमाच्या शोधात आहेत.

प्रेम शोधणं किंवा कुणीतरी आपल्यावर प्रेम करणं हा आपला हक्कही नाही आणि अधिकारही नाही. पण ते मिळावं अशी इच्छा असणं हे मात्र गैर नाही. प्रेम न मिळणं यात कुणाचीच चूक नाही, ती केवळ परिस्थिती आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)