You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सनी लिओनी : भारतातल्या पॉर्न इंडस्ट्रीबद्दल काय म्हणाली सनी
- Author, दिव्या आर्य
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सनी लिओनीच्या जीवनावर आधारित वेब सीरिज करनजीत कौरच्या एका ट्रेलरमध्ये एक पत्रकार तिला विचारतो, "एका वेश्येत आणि पॉर्नस्टारमध्ये नक्की काय फरक आहे?"
त्याच्या उत्तरादाखल सनी म्हणते, "एक सारखेपणा आहे, गट्स (हिंमत)"
जेव्हा मी तिची मुलाखत घ्यायला गेले तेव्हा ही हिंमत तिच्या चेहऱ्यावर, तिच्या बोलण्यावागण्यात मला पदोपदी दिसली.
तिनं मला सांगितलं की त्या पत्रकाराबरोबर तो सीन शूट करणं अतिशय कठीण होतं.
तिच्याबाबतीत विशेष मत
सनी सांगते, "मला ते फार विचित्र वाटलं. कारण ते फार वाईट प्रश्न होते. आम्ही ते तसेच ठेवले कारण हे प्रश्न लोकांच्या मनात असतात आणि मला त्याचं उत्तर द्यायचं होतं."
सनी लिओनीचं नाव गेल्या पाच वर्षांत भारतात सगळ्यांत जास्त वेळा गुगलवर शोधलं गेलेलं नाव आहे. लोक तिला पाहू इच्छितात, तिच्याविषयी जाणून घेण्याची लोकांची इच्छा असते. पण तिच्याविषयी लोकांनी आधीच आपलं मत तयार करून ठेवलं आहे.
नावावर वाद
सनी मानते की तिच्याविषयी असं मत तयार होण्यासाठी ती स्वत: बऱ्याच अंशी जबाबदार आहे.
"मी माझ्या आयुष्याबाबत आणि माझ्या विचारांबाबत अतिशय पारदर्शी आहे. पण लोक मला मागच्या व्यवसायाशी जोडूनच बघतात. त्यात त्यांची काही चूक नाही. पण वेळेनुसार मीसुद्धा बदलले आहे. मला अपेक्षा आहे की लोक माझ्यात झालेल्या या बदलाला समजून घेतील."
सनीनं आयटम नंबर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गाण्याबरोबरच चित्रपटात लीडरोल सुद्धा केला आहे. नुकतंच तिनं 'द लस्ट' नावाचं परफ्यूमसुद्धा बाजारात आणलं आहे.
ब्रॅंडच्या या नावामुळे तुझी आधीची प्रतिमा अधोरेखित होत आहे असं वाटत नाही का? असा प्रश्न मी विचारला.
तिनं नकार दिला आणि सांगितलं की इतक्या कमी वयात आपल्या नावाचं परफ्युम बाजारात येणं कोणत्याही मुलीसाठी स्वप्नवत आहे. जेव्हा हे स्वप्न सत्यात उतरण्याची चिन्हं निर्माण झाली तेव्हा हेच नाव सुचलं.
सनी म्हणते, "बाकी परफ्युमची नावं अशीच असतात. उदा. सिडक्शन किंवा फायर अँड आईस."
करनजीत कौर हे सनी लिओनीचं खरं नाव आहे.
तिच्या आयुष्यावर तयार झालेल्या वेब सीरिजला हे नाव द्यायला शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीनं विरोध केला होता. त्यांच्या मते कौर या नावाला वेगळं महत्त्व आहे आणि सनीचं काम पॉर्नशी निगडित आहे.
सनीजवळ जेव्हा मी याबाबत बोलले तेव्हा ती म्हणाली की हे नाव तिच्या पासपोर्टवर आहे. हे नाव तिच्या आईवडिलांनी दिलं आहे आणि यावर स्पष्टीकरण देण्यासाठी ते या जगात नाहीत.
ती म्हणाली, "तसंही माझं खरं नाव करनजीत कौर आहे आणि माझ्या कामासाठी मी सनी लिओनी हे नाव वापरते."
पॉर्न इंडस्ट्रीमधल्या कामाची तिला अजिबात लाज वाटत नाही. ही तिची निवड होती असं तिनं मला सांगितलं.
भारतात खासगीपणे पॉर्न व्हीडिओ पाहण्यावर कोणतीही बंदी नाही, मात्र पॉर्न व्हीडिओ, छायाचित्रं पाठवणं बेकायदेशीर आहे.
पॉर्न हब ही जगातली सगळ्यांत मोठी पॉर्नसाईट आहे. त्यांच्या मते अमेरिका, ब्रिटन, कॅनडा या देशानंतर भारतात सगळ्यांत जास्त पॉर्न पाहिलं जातं.
मग भारतातसुद्धा कायदेशीर पॉर्न इंडस्ट्री असायला हवी का?
या प्रश्नाचं उत्तर देताना तिनं एका क्षणाचाही विलंब केला नाही. ती म्हणाली, "हा माझा निर्णय नाही. भारत सरकारचा आणि इथल्या लोकांचा हा निर्णय असेल."
मात्र असं झालं तर लैंगिक संबंधाबद्दल मोकळेपणा येईल का? अमेरिकेत त्यांचा अनुभव काय सांगतो?
या प्रश्नाच्या उत्तरादाखल सनी म्हणाली की खासगी आवडनिवड कोणावरही थोपवू नये. समाजाच्या विचारसरणीसाठी प्रत्येक कुटुंबाचं योगदान असतं. त्याचप्रमाणे मुलीची विचारसरणी तिच्या आईवडिलांमुळे तयार होते.
सनीच्या आईवडिलांना तिचा निर्णय अमान्य होता. पण तिच्या मते तिच्या आईवडिलांनी तिला एक स्वतंत्र विचारांची मुलगी म्हणून मोठं केलं. म्हणून ती आपल्या आईवडिलांचा आदर करते. त्यामुळेच ती स्वतंत्रपणे निर्णयही घेऊ शकली.
आता सनीला एकूण तीन मुलं आहेत. त्यांनी एका मुलीला दत्तक घेतलं आहे आणि सरोगसीद्वारे तिला दोन मुलं आहेत.
मग त्यांच्या आयुष्याचे निर्णय घेण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य देशील का?
त्यावर सनी म्हणते, "नक्कीच. मला असं वाटतं की त्यांनी चांगली उंची गाठावी. मंगळावर जावं परंतु त्यांचे निर्णय आणि त्यांचे रस्ते हे त्यांचे आपले असतील."
मुलांना काय सांगेल सनी लिओनी?
माझा शेवटचा प्रश्न सगळ्यांत कठीण होता. कारण तो होता सनी लिओनीबद्दल मात्र त्याचं उत्तर करनजीत कौरला द्यायचं होतं.
तिच्या आधीच्या व्यवसायाबद्दल तिच्या मुलांना ती काय समजावेल? हा प्रश्न तिला आवडला तर नाही. मात्र हा प्रश्न तिला पडलाच नाही असंही नाही.
तिनं आपल्या आयुष्यात जे निर्णय घेतले त्यावरून सामान्य लोकांच्या ज्या समजुती तयार झाल्या आहे त्याबरोबर जगणं तितकंसं सोपं नाही.
पण त्याच हिमतीने तिनं सांगितलं की सध्या हा त्यांच्या काळजीचा विषय नाही. तिला बऱ्याच काळापासून आई होण्याची इच्छा होती आणि ती आईपणाचा प्रत्येक क्षण मनापासून आनंद घेत आहे.
योग्य वेळ येईल तेव्हा ती आपली बाजू खरेपणाने मांडेल असं सांगायलाही ती विसरली नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)