स्पर्म काऊंट तंग अंडरवेअरमुळे कमी होतो का? तज्ज्ञ काय सल्ला देतात?

जगभरात अनेक देशांमध्ये पुरुषांमधल्या शुक्राणूंची घटती संख्या हा चिंतेचा विषय झाला आहे. कारण शुक्राणूंचा संबंध थेट प्रजनन क्षमतेशी आहे.

खाण्यापिण्याच्या सवयींवर पुरुषांचा स्पर्म काऊंट म्हणजे शुक्राणूंची संख्या किती आहे हे अवलंबून असतं. आपण जे खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो.

जर खाण्यात चरबीयुक्त पदार्थांचं प्रमाण जास्त असेल तर स्पर्म काऊंट कमी होतो.

अमेरिकेतल्या फर्टिलिटी क्लिनिकमध्ये 99 पुरुषांचा अभ्यास करण्यात आला. त्यातून असं लक्षात आलं की, जे जंक फू़ड खातात त्यांच्यातल्या शुक्राणूंची गुणवत्ता कमी दर्जाची असते.

ज्यांच्या शरीरात ओमेगा-3 फॅटी अॅसिड पुरेशा प्रमाणात असेल त्यांच्यार शुक्राणूंची गुणवत्ता चांगली असते. हे अॅसिड मासे आणि भाज्यांमधून मिळतं.

याच अभ्यासातून असंही लक्षात आलं की, जे जास्त चरबीयुक्त पदार्थ खातात त्यांचा स्पर्म काऊंट 43 टक्के कमी असतो आणि घनताही कमी असते. ज्यांच्या शरीराला ओमेगा-3 फॅटी अॅसिडचा पुरवठा होतो त्यांच्यात ही घनता चांगली आढळते.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, प्रति मिलीलीटर वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या 1.5 से 3.9 कोटी असेल तर ते प्रमाण योग्य मानलं जातं.

बऱ्याच अभ्यासांतून असंही निरिक्षण समोर आलं आहे की, स्पर्म काऊंटची घसरण अशीच सुरू राहिली तर मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. मानवाचा समावेश नामशेष होणाऱ्या सजीवांच्या यादीत होईल.

काही अभ्यासांत असंही स्पष्ट झालं आहे की, उत्तर अमेरिका, यूरोप, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथील पुरुषांमधला स्पर्म काऊंट गेल्या 40 वर्षांत निम्म्यावर आला आहे.

जेव्हा एका पुरुषाच्या विर्यात पाच कोटी ते 15 कोटी एवढी शुक्राणूंची संख्या असते तेव्हा ते फेलिपियन नलिकेत सहज तरंगू शकतात. अर्थात हे एवढं सोपं नसतं. कधी कधी एक शुक्राणूही पुरेसा असतो.

स्पर्म काऊंट योग्य राखण्यासाठी काय कराल?

  • तंग अंडरवेअर घालू नका.
  • लैंगिक संसर्गापासून दूर राहा.
  • फिट रहा आणि पोट सुटू देऊ नका.
  • व्यायाम करा, पण त्याचाही अतिरेक नको.
  • दारू बिलकूल पिऊ नका. दारू प्यायल्यानं टेस्टास्टरॉन हॉर्मोन्सच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्याचा थेट संबंध लैंगिक क्षमतेशी आहे.
  • जर तुम्ही सात ते आठ तास झोप घेत नसाल तर तुमच्या प्रजनन क्षमतेचे वाईट दिवस सुरू झाले आहेत असं समजावं.
  • एका अभ्यासानुसार, जे सहा तासांपेक्षा कमी झोपतात, त्यांच्या प्रजनन क्षमतेत घट होते.
  • गरम पाण्यानं अंघोळ करू नये. स्पर्म तयार होण्यासाठी कमी तापमान उपयोगाचं असतं. गरम पाण्यानं अंघोळ केल्यावर अंडकोषाचं तापमान वाढतं आणि त्याचा स्पर्म काऊंटवर थेट परिणाम होतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)