You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मी सेक्स वर्करकडे जाऊ लागलो कारण...
ती एक अतिशय अविस्मरणीय रात्र होती. 28 वर्षांच्या आयुष्यात मी पहिल्यांदाच एका स्त्रीला स्पर्श केला होता. ती माझी पत्नी नव्हती तर एक देहविक्रय करणारी स्त्री होती. मात्र त्यामुळे काहीच फरक पडत नव्हता. माझ्या इच्छा पूर्ण झाल्या आणि म्हणून मी खूप आनंदात होतो.
तो अनुभव आठवडाभर माझ्या मनात जिवंत होता. मी एका वेगळ्याच विश्वात असल्याचा भास मला होत होता. त्याला कारणही अर्थात तसंच होतं.
माझं लग्न होत नव्हतं. गुजरातमधल्या ज्या शहरात मी राहतो तिथे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या कमी आहे. त्यामुळे माझ्यासारख्या अनेक तरुणांची लग्नं होत नाहीत.
लग्न ठरवण्यासाठी गेलेल्या माझ्या आईवडिलांना बरंच काही ऐकावं लागायचं. तुमच्या मुलाला सरकारी नोकरी असती तर बरं झालं असतं.
खाजगी कंपनीतल्या नोकरीचा काय भरवसा? शिवाय तुमच्याकडे फार जमीनही नाही, वगैरे.
त्यावेळी माझा पगार 8,000 रुपये महिना होता. मी घरात सर्वात थोरला होतो आणि लग्न जुळत नव्हतं. मला वाटायचं कुठलंही स्थळ चालेल. लग्न झालं तर किमान समाजात मान तरी राहील.
जेव्हा माझ्यापेक्षा कमी पगार असलेल्या माझ्या मित्राचं लग्न झालं तेव्हा तर हद्दच झाली. त्याच्या वडिलांकडे 20 एकर जमीन होती, म्हणूनही असेल कदाचित...
आनंदाचा सोपा मार्ग
आम्ही चार मित्र होतो. दारु पिण्यासाठी अधून-मधून जवळच्या शहरात जायचो. कदाचित 'त्या' दिवशी माझ्या मित्रांना माझं दुःख कळलं असावं.
ग्लासमध्ये बिअर ओतत माझा मित्र म्हणाला, "अरे, इतकी काळजी का करतो? चल माझ्याबरोबर. लग्न झाल्यावरही इतकी मजा येणार नाही. हे जग किती सुंदर आहे ते बघ. त्याचा आनंद घे. ये माझ्याबरोबर..."
मला काहीच सुचत नव्हतं. पण माझे मित्र मला समजावत होते. अखेर आम्ही सगळे एका हॉटेलमध्ये गेलोच.
मी बऱ्याचदा ब्लू फिल्मस् बघितल्या होत्या. पण खऱ्या आयुष्यात एका स्त्रीसोबत मी पहिल्यांदाच होतो.
त्यानंतर मला सवयच लागली. मी वारंवार हॉटेलमध्ये जाऊ लागलो. पाच वर्षं झाली. स्वतःच्या आनंदासाठीचा हा सोपा मार्ग होता.
मात्र एक दिवस माझ्या वडिलांना कळलं आणि त्यांचा पारा चढला. माझ्यावर हात उचलू शकत नव्हते. त्यामुळे खूप आरडाओरडा केला.
"असं करताना लाज वाटली नाही? एकदा आपल्या आई-बहिणींचा तरी विचार करायला हवा होता. त्या कुठल्या तोंडानं समाजात फिरतील?."
आई आणि बहीण... दोघीही रडत होत्या. बहिणीच्या सासरीसुद्धा हे कळलं होतं.
कुटुंबीय नाराज
मी म्हटलं, "मित्रांनी दारू पाजली आणि हॉटेलमध्ये घेऊन गेले. मी नशेत होतो. मला कळलंच नाही." नंतर चूक झाली म्हणून सगळ्यांची माफी मागितली.
"मग इतकी वर्षं तीच चूक वारंवार कशी होत राहिली?" या वडिलांच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकलो नाही.
बहीण आणि भाऊजी सुद्धा ओरडत होते. ते सर्व ऐकून जणू मी एखादा गुन्हाच केलाय की काय असं मला वाटू लागलं.
तीन दिवस वडील माझ्याशी बोलले नाही आणि तिसऱ्या दिवशी सरळ म्हणाले, "तुझ्यासाठी एका विधवेचं स्थळ आलं आहे. तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. पण मुलगी चांगल्या घरातली आहे."
"मुलीच्या वडिलांना तुझ्याबद्दल सगळं माहीत आहे. पण ते लग्नाला तयार आहेत. तुझंही वय झालं आहे. तू 31 वर्षांचा आहेस. या स्थळाला नाही म्हणू नको."
"आता तर पगारपाणीही चांगलं आहे. आता लग्न कर. आम्हालाही त्यातच सुख आहे." असंही वडिल म्हणाले.
पण मला दुसरी एक मुलगी आवडायची. जिथे मी सेक्स वर्कर्सकडे जायचो त्या हॉटेलमध्ये ती हाऊसकिपिंगचं काम करायची.
तिचा पगार कमी असला तरी तिच्यात काहीतरी वेगळं होतं.
हसायची तेव्हा खूप सुंदर दिसायची. पण तिलाही माझं सेक्सवर्करकडे जाणं आवडायचं नाही. म्हणून तिने माझ्याशी लग्न करायला नकार दिला.
तिने दुसऱ्या मुलाशी लग्न केलं तेव्हा मला धक्काच बसला.
आता मी पूर्णपणे एकाकी पडलो होतो. कुणाचीतरी साथ हवी होती. असं कुणीतरी जो माझ्या भावना समजून घेईल आणि आयुष्यभर माझ्यासोबत राहील.
वैवाहिक आयुष्य आता हवंहवंसं वाटायला लागलं होतं.
माझ्या घरच्यांनाही समाजात वावरता येत नव्हतं. मग मी घर सोडलं. पण दोनच आठवड्यात आई-वडिलांनी बोलवल्याने मी घरी गेलो.
माझ्या लग्नाचं भिजत घोंगडं कायम होतं आणि घरच्यांची काळजीसुद्धा.
समाजालाही दुखऱ्या नसेवर बोट ठेवायला आवडतंच.
नवं शहर, जुन्या सवयी
नवं शहर, नवी माणसं... पण माझ्या सवयी जुन्याच होत्या. कधी शेजारी तर कधी जवळच्या शहरांमध्ये जाऊन आनंद शोधायचो.
अनेकवेळा माझे बॉसही माझ्यासोबत यायचे. त्यांना माझ्यावर खूप विश्वास होता. आज माझं वय 39 आहे. पण आता एकटेपणा जाणवत नाही.
लग्नाचं स्वप्न बायकोसोबत नाही पण इतर स्त्रियांकडून पूर्ण झालं होतं.
आता तर घरच्यांनीही त्यावर बोलणं सोडलं आहे. लहान भावाने एका आदिवासी मुलीसोबत प्रेमविवाह केला आहे.
आता मी स्वतंत्र आहे. लग्नाचा विचार सोडला आहे. कारण आता मला हेच आयुष्य आवडतं.
सध्या माझा महिन्याचा पगार 40,000 रुपये आहे. वरकमाईसुद्धा आहे. कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. म्हणूनच मनात अपराधी भावनाही नाही.
लग्न झालं असतं तर आयुष्य कसं असतं, माहिती नाही. मात्र आज समाजाच्या टोमण्यांपासून दूर माझं स्वतंत्र आयुष्य बरंच चांगलं चाललंय.
(ही कथा एका पुरुषाच्या जीवनावर आधारलेली आहे. त्या व्यक्तीशी बीबीसीचे प्रतिनिधी ऋषी बॅनर्जी यांनी बातचीत केली. त्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. #HisChoice या बातम्यांच्या मालिकेची निर्मिती सुशिला सिंह यांची आहे.)
(ही #HisChoice मालिकेतली पाचवी बातमी आहे. #HisChoice या सीरिजद्वारे आम्ही अशा पुरुषांच्या मनाचा वेध घ्यायचा प्रयत्न करत आहोत ज्यांनी एका ठराविक सामाजिक साच्यात अडकून पडण्यास नकार दिला.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)