You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
#HisChoice : साच्यात अडकून न पडता स्वेच्छेनं जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुरुषांसाठी
- Author, सुशीला सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
'स्त्रीचा जन्म होत नाही, ती घडवली जाते.' साधारणतः 70 वर्षांपूर्वी फ्रेंच लेखिका आणि तत्त्वज्ञ सीमॉन दि बुवेअरा यांनी हे वाक्य त्यांच्या 'द सेकंड सेक्स' या पुस्तकात लिहिलं होतं.
समाज आवश्यकतेनुसार स्त्रीला घडवत आला आहे. तिच्यात बदलही घडवत आला आहे. तिला झुकवत आला आहे. ते साध्य करण्यासाठी अनेक कथाही रचल्या गेल्या.
उदाहरणार्थ, एकदा सत्यवानाचा मृत्यू झाला. मग सावित्री यमराजाकडे गेली त्याच्याशी भांडली आणि पतीचे प्राण पुन्हा परत आणले. पण तुम्ही कधी एखाद्या पुरुषानं त्याच्या पत्नीचे प्राण परत आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेची गोष्ट ऐकली आहे का? कधी कोणा पुरुषाच्या अंगात सावित्रीच्या गुणांची झलक तुम्ही पाहिली आहे का?
स्त्रियांनी हजारो वर्षं पुरुषांसाठी खर्ची घातली आहे. कधी एखाद्या महिलेसाठी एखादा पुरुष सती गेल्याचं ऐकलं आहे का? कारण सर्व नियम, व्यवस्था, कायदे हे पुरुषाने तयार केलेले आहेत. त्यानेच हे नियम महिलांवर थोपवलेत.
या सर्व कथा त्यानेच रचल्या आहेत. त्या कथांमध्ये महिला पुरुषांचे प्राण वाचवतेय, अशा कथा नाहीत. पुरुषच महिलेचे प्राण वाचवतो अशाच त्या कथा आहेत.
या अशा कठीण परिस्थितीमध्ये स्वतःच्या मताने आणि मनाने जगणाऱ्या धैर्यवान महिलांच्या कथा आम्ही तुम्हाला #HerChoice मध्ये सांगितल्या.
जेव्हा आम्ही #HerChoice ही सीरिज चालवली तेव्हा आमचे वाचक आणि पुरुष सहकाऱ्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की फक्त #HerChoice का? #HisChoice का नाही? आम्हाला इच्छा आकांक्षा नाहीत का? आम्हाला सुद्धा लोक एकाच साच्यात टाकून पाहतात. त्याबद्दल काय म्हणणं आहे?
हे प्रश्न विचार खरंच करायला लावणारे होते. मग आमच्या संपादकीय बैठकीत सर्वांनुमते असा निर्णय घेण्यात आला की ज्या पुरुषांनी एका साच्यात अडकून राहणं पसंत केलेलं नाही, स्वतःच्या इच्छेनं जगण्याचा प्रयत्न केला, बंध झुगारून पुन्हा उभं राहण्याचा निर्णय घेतला अशा पुरुषांच्या आयुष्यावर #HisChoice ही सीरिज करावी.
आपण या गोष्टीला परिवर्तनाची सूक्ष्म रेखा म्हणू शकतो पण हे योग्य आहे की अयोग्य याचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. अर्थात, पुरुषांच्या जीवनातील अडचणी समजून घेतल्यानंतरच.
या सीरीजच्या माध्यमातून आम्ही पुरुषांच्या मनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
या दहा कथा तुम्हाला फक्त धक्का देतील असं नाही, तर तुम्हाला स्वतःच्या मनाचा ठाव घेण्यासाठीही प्रेरणा देतील असा आम्हांला विश्वास वाटतो.
1. एका पुरुषानं पत्नीला सांगितलं की, घरातली कामं मी करणार आणि बाहेरची काम तू कर. ...तू नोकरी कर मी घर सांभाळतो.
2. एक असा युवक जो नोकरी करतोच पण त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यानं असा व्यवसाय निवडला की त्यासाठी त्याला बंद खोलीत काम करावं लागतं.
3. लग्न योग्य वयात व्हायला हवं. या गोष्टीचा अनुभव अनेक मुलींना आला असेल... त्यांना लग्नासाठी दबावालाही बळी पडावं लागलं असेल. पण जर एखाद्या 35 वर्षीय व्यक्तीने असं म्हटलं की मला लग्न नाही करायचं तर तुमच्या मनात कोणते प्रश्न येतील? तामिळनाडूतील अशाच एका व्यक्तीची कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
4. लहानपणापासून एका मुलाला मेंहदीची आवड होती. त्याला वाटू लागलं की असंच काही काम करावं. पण एक पुरुष महिलेला नटवण्या-सजवण्याचं काम कसं करू शकतो असा प्रश्न उपस्थित झाला. मग त्या मुलानं काय केलं?
5. एका मुलाची गोष्ट. त्याच्या सोबतच्या मुलांची लग्नं झाली. पण त्याला मात्र स्थळं येत नव्हती. एखाद्या मुलीबरोबर पाहायचा कार्यक्रम झाला तर मुलीची नापसंती येत होती. मग अशा स्थितीत त्याने काय केलं. गुजरातमधल्या अशाच एका युवकाची कथा.
6. म्हणतात ना पहिलं प्रेम पहिलंच असतं. ते शेजारी होते. त्याला माहीत होतं ती मुलगी नाही. तरी त्यांनी लग्न केलं. पण हे लग्न टिकलं का?
7. एकदा एका युवकानं वर्तमानपत्रात एक जाहिरात पाहिली. मनात प्रश्न आला की मदत करायला काय हरकत आहे. पण अशा प्रकारची मदत त्याने केली ही गोष्ट तो कुणासोबत शेअर करू शकत नाही. त्याच्या पत्नीबरोबर देखील नाही.
8. एका व्यक्तीनं प्रेम विवाह केला. त्यांना मुलगी झाली मग त्यांचा घटस्फोट झाला. पत्नीनं दुसरं लग्न केलं मग त्यानं त्या मुलीचं काय केलं?
9. जेव्हा एखाद्या मुलीवर बलात्कार होतो तेव्हा त्याचं खापर मुलीवरच फोडलं जातं. आईवडिलांची काही जबाबदारी नाही का? त्यांनी मुलांना असं वाढवावं की ते मुलींचा आदर करतील. एका युवा पित्याची ही कहाणी. जेव्हा तो दीड वर्षांच्या मुलाकडे पाहतो तेव्हा त्याच्या भवितव्याबद्दल त्याच्या मनात काय विचार येतात?
10. प्रियंका चोप्राने जेव्हा तिच्यापेक्षा कमी वयाच्या मुलाशी लग्न केलं तेव्हा लोकांनी हे नातंच मेळ न खाणारं आहे, असं म्हणत त्यांची टर उडवली. ही कथा आहे एका अशा व्यक्तीची ज्याने आपल्या पेक्षा जास्त वयाच्या महिलेबरोबर लग्न केलं. त्याला त्याच्या निर्णयाचा आनंद होत आहे की पश्चाताप?
बीबीसीची विशेष सीरिज #HisChoice मध्ये येणाऱ्या प्रत्येक शनिवारी रविवारी तुम्ही या कथा वाचू शकता. कदाचित या गोष्टी तुम्हाला अंतर्मुखही करतील.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)