You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लग्नः 'हो, मी सिंगल आहे आणि मला लग्नही नाही करायचं'
- Author, शिवकुमार उळगनाथन
- Role, बीबीसी तामिळ प्रतिनिधी
"तू अजूनही त्याचाच विचार करतोय का?" माझ्या मित्राने विचारलं. मी निरुत्तर होतो.
"गप्प राहिलास म्हणजे तुझंच बरोबर आहे, असा अर्थ होत नाही," त्याने आणखी मला चिथावण्याचा प्रयत्न केला. "तू खरंच मूर्ख आहेस. तुझं प्रेमप्रकरण संपून अनेक वर्षं झाली आहेत. तुला ते विसरून पुढे जायला हवं. मोठा हो. काळानुसार तू परिपक्व हो."
"तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे?" मी भडकलो त्याच्यावर. "हा माझा निर्णय आहे."
मला त्याच्या श्रीमुखात एक लगवायची इच्छा होत होती. पण मग विचार आला, मी किती जणांना असं मारत बसणार. या प्रश्नासाठी मला रोजच कुणाला ना कुणाला मारत बसावं लागेल.
माझी गोष्ट आहे तरी काय? खरंतर कुठून सांगू हेच कळत नाहीये.
माझा भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही याच्याशी निगडित आहे. फसलेलं प्रेम प्रकरण आणि त्यानंतर एकटं राहण्याचा घेतलेला निर्णय, माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांना दररोज पडणारा गहन प्रश्न आहे.
या निर्णयाने माझं काय बरंवाईट झालंय? माझ्या निर्णयाने बाकीच्यांना काही फरक पडणार आहे का?
मित्र, नातेवाईक, ओळखीचे असे सगळेच मला वेगळं मानतात. आणि हे माझ्या गुणवत्तेसाठी नव्हे किंवा कौशल्यांसाठी नव्हे. केवळ माझं सोशल स्टेटस सिंगल असल्याने माझ्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं.
लग्न झालंय की नाही? सिंगल की कमिटेड? या दोन्ही प्रश्नांची उत्तर नकारार्थी, म्हणजे लग्न नाही, कमिटेड नाही, अशी असतील तर लोकांच्या भुवया उंचावतात. सिंगल म्हटल्यावर तुमच्याकडे करुणेने, अनुकंपेने बघणाऱ्यांची संख्या जास्त असेल.
कामाच्या निमित्ताने मी एका शहरातून मेगासिटीत दाखल झालो आहे. एका मल्टीनॅशनल कॉर्पोरेट कंपनीत काम करतो. मी राहतो तो भाग शहरातला उच्चभ्रू, असा म्हणावा लागेल. इथे सगळं चकचकीत, आधुनिक आहे. प्रत्येक जण आपापल्या विश्वात दंग असतो.
शेजाऱ्यांचं माझ्याशी धड एकदाही बोलणं झालेलं नाही. दररोज जिममध्ये जातो. रोजची चहाची टपरी ठरलेली आहे. कुणीही माझ्या आयुष्यात लुडबूड करत नाही. रोज हाय, हेलो होतं. पण दुसरा कुठलाही विषय नाही.
पण जेव्हा त्यांना मी सिंगल असल्याचं कळतं त्यांची उत्सुकता चाळवली जाते.
तू अजूनही एकटा जीव सदाशिव आहेस? बालवाडीत असल्यासारखा हा प्रश्न नेहमी विचारला जातो. उत्तर देण्याचा माझा कंटाळा टाळण्यासाठी किंवा मला लाज वाटेल म्हणून अनेकदा बरोबर असलेले मित्रच मग सांगतात की तो पुढच्या वर्षी लग्न करणार आहे.
मला नेहमी वाटतं की त्यालाही मोकळपणाने सांगावं, "ऐक. मला अजिबात लाज वगैरे वाटत नाही उत्तर देण्याची. आणि तू त्यांना सांगितलं ते लग्नाचं पुढचं वर्ष येणारही नाहीये."
अनेकदा आजूबाजूच्या मुलींशी माझं नाव जोडलं जातं. त्यांच्या आणि माझ्या वयातला फरक, बाकी गोष्टींचा जराही न विचार करता गावगप्पांमध्ये आमची जोडी तयार केली जाते.
घराशेजारी, ऑफिसमध्ये माझ्या नावाने सातत्याने वावड्या उठतात. यामुळे एखाद्या मुलीशी असलेली माझी मैत्री तुटू शकते, याचा कुणीही विचार करत नाही. चांगले मित्रमैत्रिणी मिळणं खरंच खूप दुर्मीळ आहे.
मी व्हर्जिन आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. मला कधी बरं नसेल तर माझ्या लैंगिक गरजांबद्दल, लैंगिक क्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात.
आणि अनेकदा तर माझी लैंगिकताही त्यांच्या मायक्रोस्कोपमध्ये असते - तुला पुरुषांमध्ये इंटरेस्ट आहे का, हा प्रश्नही विचारला जातोच की. अरे मित्रांनो, जर तसं असतं तर मी एखाद्या पुरुषाबरोबर नसतो का राहत?
प्रश्नांचा भडिमार झेलून मी कधी रागात उत्तर दिलं तर याच्याशी मैत्रीही होऊ शकत नाही, असं ग्रह करून दिला जातो. म्हणून मी गप्पच राहणं पसंत करतो.
ते माझ्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसतंय, असी माझी तक्रार नाही. कारण त्यांना माझी काळजी आहे, असाच त्यांच्या प्रश्नांचा सूर असतो. म्हणून मी तक्रार करत नाही आणि करूही नये.
मी सिंगल आहे का, असं विचारण्याऐवजी काहीजण मी सेटल झालोय का, अशा शब्दांत तोच प्रश्न विचारतात.
या भन्नाट प्रश्नाचं मी तितक्याच खुलेपणाने उत्तर देतो. "मी समाधानकारक कमावतो आहे. माझ्या डोक्यावर कोणतंही कर्ज नाही. माझी प्रकृती उत्तम आहे...."
माझं म्हणणं अर्धवट तोडून "तुमचं लग्न झालं आहे का?" असा थेट प्रश्न येतो. मग काय? पुन्हा तेच चक्र...
एकटं असण्याचे फायदे
सिंगल असल्याने समाजात वावरताना अनेक फायदे होतात.
"तू एकटा आहेस, वीकेंडलाही ऑफिसला येऊ शकतोस. लेट शिफ्टलाही थांबू शकतोस," असं मला आधीच्या एका बॉसने सांगितलं होतं.
अरे, एकटा आहे तर काय झालं? मला माझं बाकीचं जग आहे. माझी माणसं आहे. माझाही काही ठरलेला दिनक्रम आहे, हे बॉसला सांगावसं वाटलं, पण मी सांगू शकलो नाही.
तू एकटाच आहेस. तू वरच्या मजल्यावर कपडे वाळत घालू शकतोस. खालच्या बाल्कनीत फॅमिलीवाल्यांना कपडे वाळवू देऊ शकतो. असं एकदा माझ्या घरमालकाने मला थेट सांगितलं.
मी त्या फॅमिलीवाल्यांइतकंच घरभाडं देतो. मग मला असा वेगळा न्याय का?
"तू एकटाच तर आहेस. मग तुला माझ्या घरी सोहळ्यासाठी वेगळ्या निमंत्रणाची गरज काय? व्हॉटसअॅप मेसेज हेच निमंत्रण समज आणि हजर हो," असं माझ्या एका मित्राने हे परस्पर ठरवून टाकलं होतं.
समारंभाची, सोहळ्याची छापील निमंत्रण पत्रिका मिळण्यासाठी विवाहित असणं आवश्यक असतं, याचा शोध मला त्यावेळी लागला.
खूप काम असेल तर ऑफिसात उशिरापर्यंत थांबून ते करायला माझी ना नसते. घरातल्या कामांमध्येही माझा सहभाग असतो. जंगलं वाचावीत असं मला मनापासून वाटतं. छापील पत्रिका मिळावी, याचा मी भुकेला नाही.
पण सिंगल असणं पाप आहे का?
लग्न करावं की नाही, हा ठोस निर्णय असू शकतो किंवा जाणीवपूर्वक केलेला उशीर असू शकतो. एकूणच समाजासाठी माझं लग्न हा कळीचा मुद्दा असतो.
मला सल्ल्याची गरज नसताना वारंवार तो दिला जातो. समुपदेशनाचे डोसही न विचारता मिळतात. मोफत वैद्यकीय सल्ला दिला जातो, सिंगल राहिलो तर 10 वर्षांनंतर काय होईल नि 20 वर्षांनंतर काय, असं भविष्यरंजनही केलं जातं.
तुझ्यासारखा विचार करणारी कुणीतरी बघ, असा सल्लाही दिला जातो.
"भौगोलिकदृष्ट्या की आर्थिक?" असा प्रश्न मी विचारतो.
"नाही. अशी कुणीतरी बघ जिचं आयुष्यही तुझ्याप्रमाणे आहे. अशी कुणीतरी जिने योग्य वेळी योग्य गोष्टी केलेल्या नाहीत. तुम्ही एकमेकांना भेटा. तुम्ही एकत्र आयुष्य व्यतीत करू शकता."
माझं काही चुकलंय किंवा मी आयुष्यात योग्य वेळी निर्णय घेऊ शकलो नाही किंवा प्रेमात फसलोय, असं मी कदापिही म्हटलेलं नाही. मी आतुरतेने आयुष्यात कोणाचीतरी वाट पाहतोय, असं कधी म्हटलंय का?
आधी मी मित्रमंडळींच्या, नातेवाईकांच्या लग्नसोहळ्यांना हजर राहायचो. समोरच्याने दिलेल्या निमंत्रणाचा मान ठेवणं मला महत्त्वाचं वाटायचं. पण आता मला तसं वाटत नाही.
मला नाईलाजाने न जाण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. कारण कुणी भेटलं की सतत लग्नाबद्दल प्रश्नांचा भडिमार केला जातो.
"खूप दिवसांनी तुला भेटून खूप बरं वाटलं. पाच वर्षं झाली, नाही? तुझी बायको कुठे आहे?"
माझ्याबरोबर किंवा माझ्यामागे कोणी दिसलं नाही की "तू अजूनही सडाफटिंग आहेस?" असं आश्चर्याने विचारलं जातं.
या सगळ्या प्रश्नांना आणि पर्यायाने सोहळ्यांना जाणं थांबवण्याची वेळ आली आहे, असं मला वाटतं. आता मी गावाहून रिकाम्या हातानेच परततो. मी मिठाई वगैरे काहीही आणत नाही. खास वस्तू वगैरेही काहीही आणत नाही. कारण काही आणलं की तो नेहमीचा प्रश्न विचारला जाणार, याची मला खात्री असते.
"काय विशेष? स्पेशल न्यूज आहे वाटतं?" म्हणजे लग्न जुळलंय किंवा ज्यांना माहीत नाही, त्यांच्यासाठी मुलगा/मुलगी होणार असल्याची बातमी.
आता हे नको वाटतं. लहानपणी सगळे क्रिकेट खेळत असताना मला हॉकी आवडायचं. फार कुणी दखल घेत नाही.
लेटेस्ट बाईकची फॅशन तेजीत असताना मी जुन्या-पुराण्या गाड्या वापरायचो. हलके रंग माझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असतानाही मी गडद रंग आवडीने वापरायचो.
मी शिक्षण एका विशिष्ट गोष्टीचं घेतलं पण काम दुसऱ्याच एका क्षेत्रात करतोय. ज्यांनी मला समजून घेतलं त्यांच्याप्रती मला आदर आहे. मित्रमैत्रिणी, घरचे, नातेवाईक यांनीच मला समजून घेतलं आहे.
मात्र मी जेव्हा एकटं राहण्याचा, सिंगल राहण्याचा निर्णय पूर्ण विचार करून घेतो, तेव्हा त्या निर्णयाला आधीसारखी साथ मिळत नाही.
मी लग्न करणार नाही. मला तशी कुणीतरी मिळालेली नाही. भूतकाळातलं प्रेमप्रकरण मनाआड केल्यालाही आता अनेक वर्षं झाली. पण मी एकटा आहे, एकटाच राहणार, या विचाराला साथ मिळत नाही.
तूर्तास तरी मी सिंगल आहे. हे आजचं सत्य आहे. उद्याचा दिवस वेगळा असू शकतो.
मी पुन्हा प्रेमात पडेन का? माहिती नाही. तशी वेळ आली तर का नाही?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)