You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
#HisChoice : एका पुरुषाने लेडीज ब्युटी पार्लर सुरू केलं तेव्हा...
त्या एका छोट्या शहरात कदाचित मी पहिला पुरुष असेल ज्याने लेडीज ब्युटी पार्लर सुरू केलं होतं. मी हे काम करतो हे समजल्यावर माझे नातेवाईक नाक मुरडत होते.
सुरुवातीला महिला ग्राहकही पार्लरमध्ये यायला दबकत होत्या. शेजाऱ्यांमध्ये कुजबूज चालू झाली होती. लेडीज पार्लर तर महिलांचं काम असतं, असं ते म्हणायचे.
पार्लरमध्ये येणाऱ्या तरुणींना पटवून सांगणं, त्यांचा विश्वास संपादन करणं आणि ब्युटी पार्लर चालवणाऱ्या इतर महिलांसारखाच चांगला मेक-अप मी पण करू शकतो, हे पटवून देणं सुरुवातीला अवघड होतं.
एखादी तरुणी पार्लरमध्ये आली की तिचे वडील, पती, भाऊ मला बघून तिला थांबवायचे. इथं तर पुरुष करतोय, असं ते म्हणायचे.
मला बघून थ्रेडिंग करायला मुली साफ नकार द्यायच्या. त्यांचंही बरोबर होतं, 8 बाय 10च्या खोलीत कदाचित एक पुरुष त्यांच्या इतक्या जवळ गेल्यावर त्यांना अवघडल्या सारखं होत असावं.
ब्युटी पार्लर एक पुरुष चालवत असल्याने हे प्रश्न येणारच होते. महिला ब्युटी पार्लरमध्ये तरुणी जेवढं मनमोकळेपणाने गप्पा मारू शकतात तेवढं त्यांना एका पुरुषाबरोबर बोलता येत नसावं.
या सगळ्या आव्हानांचा अगोदरच मला अंदाज होता. पण माझ्या आवडत्या छंदाला जेव्हा व्यवसायात बदलायची संधी आली तेव्हा मी सोडली नाही.
सुरुवात कशी झाली?
खरतर माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळी या कामाची कल्पना माझ्या मनात आली. तिच्या हाताला मेहंदी लावायची होती आणि मेहंदी लावणारा मुलगा होता.
बस्स, त्या रात्री मेहंदीचं ते डिझाइन माझ्या मनात बसलं. मग मी मेहंदीचा कोन तयार करायला शिकलो. कागदावर मेहंदी काढू लागलो. लहान मुलांच्या हातावर मेहंदी काढू लागलो. काही दिवसानंतर घरी कळाल्यावर मात्र माझ्यावर सगळे रागावले.
वडिलांनी कडक शब्दांत सुनावलं. मुलींचं काम का करतोय, असं म्हणून खडसावलं. त्यांच्यासारखं मी पण सैन्यात भर्ती व्हावं, असं वडिलांना वाटायचं. पण मला सैन्य किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या कामात रस नव्हता.
असंच मी एका लग्नात गेलो होतो. तिथं मी महिलांच्या हातावर मेहंदी काढली. त्यांना ती खूप आवडली. त्या बदल्यात मला 21 रुपये मिळाले.
ती माझी पहिली कमाई होती. माझ्या आई आणि बहिणीला माझी आवड समजली होती, पण वडिलांना या गोष्टी फालतू वाटत होत्या.
शेवटी कंटाळून मी हरिद्वारमध्ये नोकरी करू लागलो. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजताची नोकरी होती. मी वगळता इतर सगळे खूश होते कारण मी तथाकथित पुरुषांचं काम करत होतो.
मेहंदी लावायचा माझा छंद मनाच्या एका कोपऱ्यात दडून बसला होता. या नोकरीतून मला काहीही मिळत नव्हतं. ना चांगला पगार ना आनंद.
दरम्यान, दीर्घ आजाराने माझे वडील गेले. प्रपंचाची सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. पण या जबाबदारीने माझे मार्गही मोकळे केले.
मी सुटीवर घरी आल्यावर लग्न समारंभात मेहंदी लावायला जायचो. नोकरीतून मला महिन्याला अवघे 1,500 रुपये मिळायचे तर लग्नात मेहंदी लावल्यावर 500 रुपये मिळायचे.
कदाचित मी चांगले पैसे कमावू लागल्याने घरच्यांना माझं मेहंदीच काम पटू लागलं. त्याच दरम्यान मला समजलं की माझ्या ऑफिसमधला एक सहकारी त्याच्या पत्नीला ब्युटी पार्लरच्या कामात मदत करतो. ते दोघे मिळून चांगली कमाई करत आहेत.
मनात विचार आला की, चला आपणही एक ब्युटी पार्लर सुरू करूयात. मी जेव्हा ही कल्पना घरी सांगितली तेव्हा एकाएकी खूप प्रश्न विचारण्यात आले... कुठे? कसं? महिलेचं काम एक पुरुष का करणार? वगैरे वगैरे...
'चला मी ब्युटी पार्लर सुरू करणार'
पण एकदा मनाशी निश्चय पक्का केला की सगळी कवाडं उघडतात.
माझ्या मामाची मुलगी ब्युटी पार्लरचं काम करत होती. तिनंच मला शिकवायला चालू केलं. मग आम्ही दोघांनी मिळून एक पार्लर सुरू केलं. सुरुवातीला आलेल्या आवाहनांना तिच्यामुळेच तोंड देऊ शकलो.
माझ्या व्यतिरिक्त माझी बहीण पार्लरमध्ये असायची. महिला ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी तिची खूप मदत झाली.
आमच्या छोटाशा घरातच एका बाजूला पडदा टाकून ब्युटी पार्लर सुरू केलं. माझी बहीण तरुणींना वॅक्सिंग करायची आणि मी त्यांना थ्रेडिंग करायचो. अनुभवानंतर माझाही कामाबद्दलचा आत्मविश्वास वाढत गेला.
लग्नासाठी मुलगी बघायला गेलो, तेव्हाही हाच प्रश्न विचारला गेला, "तुम्ही हाच व्यवसाय का निवडला?" मी म्हणालो, "ही माझी आवड होती म्हणून."
त्यानंतर माझ्या पत्नीने हा प्रश्न मला कधीही विचारला नाही. तसंही ती माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे, म्हणून जास्त प्रश्नही विचारत नाही.
लग्नानंतर मी माझ्या पत्नीला ब्युटी पार्लरला घेऊन गेलो. माझ्या ग्राहक आणि स्टाफची भेट घडवली. त्यांना माझ्याबाबत कोणताही संशय राहू नये, हा त्यामागचा उद्देश होता.
गेल्या 13 वर्षांत 8 बाय 10च्या खोलीतल्या पार्लरचा आवाका तीन खोल्यापर्यंत पसरला आहे.
आता नातेवाईकही माझा आदर करतात आणि याआधी तणतण करणारे पुरुषही त्यांच्या पत्नी, मुलींना स्वत:हून पार्लरपर्यंत घेऊन येतात.
(ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका पुरुषाशी बीबीसीचे प्रतिनिधी नवीन नेगी यांनी केलेल्या संवादावर आधारित. या कथेतील व्यक्तीच्या आग्रहामुळे त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. #HisChoice या बातम्यांच्या मालिकेची निर्मिती सुशीला सिंह यांची आहे.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)