खऱ्या सौंदर्याची नेमकी व्याख्या काय?

    • Author, स्टीव्हन मॅकइन्तोश
    • Role, मनोरंजन प्रतिनिधी

सौंदर्य कशात असतं? या प्रश्नाचं उत्तर सापेक्ष आहे. छायाचित्रकार मिहाइला नोरॉक यांनी सौंदर्याच्या साचेबद्ध आणि पारंपरिक प्रतीकांना तडा देत सौंदर्याची एक नवीन प्रतिमा जगासमोर मांडत आहेत.

मिहाईला नोरॉक सांगते - आता गुगल इमेजेसवर जा आणि "ब्युटिफल वुमेन" असं शोधा.

जसं तिनं सांगितलं तसं मी केलं. लगेच लाखो रिझल्ट आले.

तिनं विचारलं, "काय दिसलं तुला? अतिशय मादक फोटो दिसले. बरोबर?"

"हो. पहिल्या सगळ्या फोटोजमध्ये मुलींनी उंच हिल्स आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे घातलेले आहेत. त्या प्रकर्षाने तरुण, स्लिम आणि ब्लाँड आहेत, त्यांची त्वचा एकदम तुकतुकीत."

मिहाईला सांगते, "सौंदर्य हे नेहमी असंच असतं. मुलींचं वस्तू म्हणून प्रदर्शन करणं, हे अतिशय दुर्दैवी आहे."

"स्त्रिया खरंतर अशा नसतात. आमच्या पण काही गोष्टी असतात. आमचा संघर्ष, आमची ताकद असते. आम्हाला फक्त प्रतिनिधित्व हवं आहे. कारण तरुण स्त्रिया फक्त असंच चित्र बघतात. त्यामुळे त्या जशा दिसतात तशाच सुंदर दिसतात, असा आत्मविश्वास त्यांच्या अंगी असायला हवा."

ती पुढे सांगते, "खरं गुगल आपण आहोत. कारण आपल्यामुळेच असे फोटो तयार होतात."

मिहाईलाने नुकतंच तिचं 'अटलास ऑफ ब्युटी', हे फोटोग्राफीचं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं आहे. त्यात तिने काढलेले 500 स्त्रियांचे फोटो आहेत.

खरंतर यातून असं दिसतं की या रोमानियन फोटोग्राफरची सौंदर्याची व्याख्येला कुठलीच मर्यादा नाही. वय, व्यवसाय आणि त्यांचा इतिहास म्हणजे खरी स्त्री, असं ती सांगते.

"मी काढलेल्या फोटोजमध्ये लोकांना रस असतो कारण ते आपल्या आजूबाजूच्या लोकांचे फोटो असतात. आपण रोज त्यांना आपल्या आसपास बघत असतो," मिहाईला सांगते.

"जेव्हा आपण एखादी स्त्री आणि सौंदर्याबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर तिचं चित्र तयार करण्यासाठी आपल्या फारच उच्च अपेक्षा असतात.

त्यामुळे मी काढलेले सगळे फोटो साधे आणि नैसर्गिक असतात. खरंतर हे थोडं आश्चर्यकारक आहे, कारण आपण हे सगळं कधी बघितलेलंच नसतं," ती सांगते.

या पुस्तकातल्या 500 फोटोंना तिनं नावं दिलेली आहेत. सोबतच, ते कुठे काढले आहेत आणि बहुतांश ठिकाणी फोटोचा एक शीर्षक दिलं आहे.

हे फोटो वेगवेगळ्या ठिकाणी काढले आहेत - नेपाळ, तिबेट, इथिओपिया, इटली, म्यानमार, उत्तर कोरिया, जर्मनी, मेक्सिको, भारत, अफगाणिस्तान, इंग्लंड, अमेरिका आणि अगदी अमेझॉनच्या जंगलातही.

त्यातल्या काही ठिकाणी तर पोहोचणंही अवघड आहे.

"ज्या बाईचा फोटो हवा आहे मी तिच्याकडे जाते. मी माझ्या प्रकल्पाबद्दल माहिती देते. कधीकधी मली होकार मिळतो, तर कधी नकार. मी कोणत्या देशात आहे, यावर ते सगळं अवलंबून असतं," ती सांगते.

"जेव्हा तुम्ही एखाद्या रूढी, परंपरा मानणाऱ्या भागात जाता, तेव्हा स्त्रियांवर वेगवेगळ्या प्रकारचा दबाव असतो. त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर कोणाचं तरी लक्ष असतं. तेव्हा त्यांचे फोटो काढणं इतकं सोपं नसतं. त्यासाठी तिच्या घरातील पुरुष सदस्याची परवानगी लागते."

"जगाच्या काही भागात सुरक्षेचा मोठा प्रश्न असतो. उदाहरणार्थ, कोलंबियामध्ये पाब्लो इस्कोबार सारखे माफिया अनेक वर्षं आहेत."

"ते म्हणतात, "ठीक आहे!". पण फोटो काढल्यानंतर कदाचित माझं अपहरणही होऊ शकतं. कारण ते माफिया आहेत. आणि जसे ते दाखवतात, तसे ते नसतात."

ती सांगते, "जर कोणाला पुरुषांवर असा प्रकल्प करायचा असेल तर त्यांना ते खूप सोपं जाईल. कारण त्या पुरुषांना त्यांच्या बायको, बहीण किंवा आईकडून परवानगी घ्यावी लागणार नाही."

मिहाईला सांगते की कधीतरी ती फोटोशॉपचा वापर करते. पण तुम्हाला वाटतं करतात त्या कारणांसाठी नाही.

"जेव्हा तुम्ही एखादा फोटो काढता तेव्हा तो कोरा करकरीत असतो, अगदी एखाद्या कोऱ्या कॅनव्हाससारखा. त्यामुळे मी मूळ फोटोलाच व्हायब्रंट आणि रंगीबेरंगी ठेवण्याचा प्रयत्न करते. पण कधी कुणाला बारीक वगैरे करत नाही. ते अतिशय दु:खद असतं."

मी स्त्री असल्यामुळे मलासुद्धा मोठी होताना अनेक अडचणी आल्या. मला बारीक व्हायचं होतं, विशिष्ट प्रकारे दिसायचं होतं. ते सुद्धा रोजच्या रोज दिसणाऱ्या फेक फोटोंशी निगडीत होतं.

मिहाईलाचं पुस्तक हे किम कर्दार्शियानच्या सेल्फी पुस्तकापेक्षा वेगळं आहे.

"हल्ली प्रसिद्ध माणसांमुळे सौंदर्याचे चुकीचे निकष पक्के झाले आहेत. आमच्यासारख्या महिलांना या निकषांशी जुळवून घेणं अशक्य आहे," ती सांगते.

"किम कर्दार्शियानचे इन्स्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्स आहेत. माझे दोन लाखही नाहीत. हा फरक लक्षणीय आहे.

पण हळूहळू माझं म्हणणं लोकांना पटेल. नैसर्गिक आणि साधेपणातल्या सौंदर्याचं महत्त्व लोकांना उमगेल."

फोटोग्राफी क्षेत्रात येणाऱ्यांना मिहाईलाचा काय सल्ला असेल? चांगल्या दर्जाचा कॅमेरा ही गरज आहे का? लेन्स आणि अँगलचं प्रशिक्षण घ्यावं का?

"नक्कीच नाही. चांगले फोटो काढण्यासाठी न थकता भटकावं लागतं. त्यासाठी चांगल्या दर्जाचे शूज घ्या."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)