2017 वर्ष सर्वाधिक उष्ण ठरणार

    • Author, मॅट मॅकग्रा
    • Role, पर्यावरण प्रतिनिधी, बोन

जागतिक हवामान संघटनेच्या प्राथमिक आकडेवारीनुसार 2017 वर्ष आतापर्यंतच्या सर्वाधिक उष्ण वर्षांपैकी एक ठरणार आहे. अल निनोच्या अभावी असं होणार असल्याचं हवामान संघटनेचं म्हणणं आहे.

मानवाच्या निसर्गावरील आक्रमणामुळेच असं होत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. हवामानातले अभूतपूर्व बदल हे यंदाच्या वर्षातील ध्रुवीय वातावरणाचं द्योतक आहेत.

त्यामुळेच 2017 हे वर्ष सार्वकालीन अतिउष्ण तीन वर्षांपैकी एक असणार आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या, वर्षाच्या पूर्वार्धात झालेल्या जागतिक बैठकीत संशोधकांनी जागतिक हवामान वाढीचा अहवाल सादर केला.

हरितगृह उर्त्सजकांमुळे (ग्रीन हाऊस गॅसेस) वातावरणात कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण सर्वाधिक झाल्याचं गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातही नमूद करण्यात आलं होतं.

जागतिक हवामान संघटनेचा यंदाच्या वर्षासाठीचा निष्कर्ष जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीतील नोंदींवर आधारित आहे. मात्र या काळातलं हवामान 1.1 सेल्सिअसनं जास्त असल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे.

माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी हवामान नियंत्रणात राखणं अत्यावश्यक आहे, असं अनेक देशांचं म्हणणं आहे. मात्र धोक्याची पातळी असलेल्या 1.5 अंश सेल्सिअसपर्यंतची तापमान वाढ फार दूर नाही.

1981-2010 या कालावधीतील सरासरी हवामानाच्या तुलनेत 2017 वर्षातील हवामान 0.47 सेल्सिअसनं अधिक आहे.

गेल्या वर्षी 0.56 सेल्सिअसनं हवामान जास्त होतं. मात्र अल निनोच्या आगमनांतर तापमानात घट झाली. जागतिक हवामान संघटनेच्या अभ्यासानुसार 2015 या वर्षाचं तापमान सार्वकालीन उष्ण वर्षांच्या यादीत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असण्याची शक्यता आहे.

गेल्या तीन वर्षातल्या तापमानवाढीने नवनवीन उच्चांक गाठले आहेत. गेली अनेक वर्षं हवामानातील उष्णता दरवर्षी वाढते आहे असं जागतिक हवामान संघटनेचे महासचिव पेट्टेरी तलास यांनी सांगितलं.

यंदाच्या वर्षात हवामानात टोकाचे बदल अनुभवायला मिळाले आहेत. आशिया उपखंडात काही ठिकाणी तापमान 50 सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदलं गेलं आहे. कॅरेबियन तसंच अटलांटिक क्षेत्राला भयंकर तीव्रतेच्या चक्रीवादळांनी तडाखा दिला.

पूर्व आफ्रिकेत मुसळधार पावसामुळे धोकादायक पूरस्थिती निर्माण झाली होती. अशा घटना हवामान बदलाचे द्योतक आहेत. सखोल संशोधनानंतर या घटनांची कारणं स्पष्ट होतील.

मानवी समाजाच्या निसर्गावरील आक्रमणाचा भाग म्हणून हरितगृह वायूंच्या उर्त्सजनाने परिसीमा गाठली आहे, असं तलास यांनी सांगितली.

2017 वर्षातील कोणत्या घटना हवामान वाढीसाठी कारणीभूत ठरल्या याचा आढावा शास्त्रज्ञ घेत आहेत. मात्र प्रचंड वेगाने जगभरातील किनाऱ्यांवर आदळणारी चक्रीवादळं धोक्याचा इशारा आहेत. समुद्रातील उष्णतेचं प्रमाण वाढल्यामुळे चक्रीवादळांचा जोर वाढू शकतो. त्याचा परिणाम पुरांच्या तीव्रतेवर होतो.

'अॅक्युम्युलेटेड सायक्लोन एनर्जी इंडेक्स' अर्थात चक्रीवादळांचा तपशीलवार अभ्यास करणाऱ्या शाखेनुसार सप्टेंबर महिन्यातील हवामानाची पातळी धोकादायक असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अमेरिकेत चार श्रेणीतील चक्रीवादळं एकाच वेळी धडकल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. इरमा चक्रीवादळ हे पाचव्या श्रेणीच्या तीव्रतेचं होतं. याचा परिणाम म्हणून नेदरलँड्स, टेक्सास या ठिकाणी 1,539 मिलीमीटर एवढा प्रचंड पाऊस झाला.

भीषण पूरस्थितीचा सर्वाधिक फटका पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओनला बसला. याव्यतिरिक्त नेपाळ, भारत, बांगलादेश आणि पेरू या देशांमध्येही मोठ्या तीव्रतेचे पुराच्या घटना घडल्या होत्या. तर दुसरीकडे दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेमुळे आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत नुकसान झालं.

सोमालियात निम्म्याहून अधिक शेतीखालच्या क्षेत्राला फटका बसला. इथिओपिया, केनिया आणि सोमालिया देशातील 11 दशलक्ष नागरिक अन्नसुरक्षितेपासून वंचित आहेत.

यंदाच्या वर्षात हवामानाने धोकादायक टप्पे गाठले आहेत. हरितगृह वायू उर्त्सजनाचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे, असं यूकेतील रिडिंग विद्यापीठातील हवामान शास्त्राचे प्राध्यापक रिचर्ड अॅलन यांनी सांगितलं.

'येत्या काही वर्षांमध्ये हवामानात आणखी धोकादायक बदल अपेक्षित आहेत. पृथ्वीची उष्णता वाढतच चालली आहे. पॅरिस इथे झालेल्या हवामान बदलाच्या करारानुसार हरितगृह वायूंच्या उर्त्सजनाचं प्रमाण नियंत्रित राखणं अत्यावश्यक आहे. अन्यथा मानवी समाज आणि परिसंस्थेचं कायमस्वरुपी नुकसान होऊ शकतं', असं त्यांनी सांगितलं.

जर्मनीतील बॉन येथे सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या हवामान बदलावरील परिषदेत याप्रश्नी गंभीर चर्चा होऊन ठोस उपाययोजना ठरण्याची शक्यता आहे.

'यंदाच्या वर्षातील हवामान वाढ हे पृथ्वीवरील प्रत्येक माणसासाठी, अर्थकारण आणि एकूणच आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाच्या दृष्टीने धोक्याचं चिन्ह आहे', असं संयुक्त राष्ट्र हवामान बदलाच्या कार्यकारी सचिव पॅट्रिसिआ एस्पिनोसा यांनी सांगितलं.

'पॅरिस करारानुसार ठरलेल्या मुद्यांचे पालन न झाल्यास सर्व मानवी समाजाला मोठा फटका बसू शकतो', असं पॅट्रिसिआ एस्पिनोसा यांनी सांगितलं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)