You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'गुलाबी बोंडअळीसमोर BT कॉटन निष्प्रभ असल्याचं 2009 साली लक्षात आलं होतं'
- Author, मोहसीन मुल्ला
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कापसावर पडणाऱ्या गुलाबी बोंडअळीमुळे हजारो कोटींचं नुकसान झाल्याचं आता उघड झालं आहे. बीटी कॉटनचं बियाणं वापरल्यानंतर मुळात सर्व अळ्यांपासून पिकाला संरक्षण मिळणं अपेक्षित होतं. पण गुलाबी बोंडअळीच्या बाबतीत बीटी बियाणं फेल गेल्याचं 2009 साली लक्षात आलं होतं, अशी माहिती आता बीबीसी मराठीच्या हाती लागली आहे.
बीटी कॉटन गुलाबी बोंडअळीसमोर प्रभावहीन ठरल्यामुळे शेतकऱ्यांना अतिविषारी कीटकनाशक वापर करावा लागला. त्यामुळे एक प्रकारे 30हून अधिक शेतकऱ्यांच्या मृत्यूला बीटी बियाण्यांचं अपयशच जबाबदार आहे का, असा प्रश्न आता शेतकरी विचारत आहेत.
अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या तांत्रिक माहिती विभागाचे प्रमुख के. आर. क्रांती यांनी गुलाबी बोंडअळीनं बीटी कॉटनला प्रतिकारशक्ती विकसित केली असल्याची माहिती बीबीसी मराठीला दिली. क्रांती नागपूरमधल्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च (CICR) या संस्थेत संचालक म्हणून कार्यरत होते.
इमेलवर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गुलाबी बोंडअळीनं कशा प्रकारे बीटी कॉटनला प्रतिकार क्षमता विकसित केली याची सविस्तर माहिती दिली आहे.
बीटी कॉटन हे जनुकीय बदल करण्यात आलेलं बियाणं 2002 साली पहिल्यांदा 'बोलगार्ड-1' या नावानं भारतात उपलब्ध झालं.
कापसावरील सर्वाधिक उपद्रवी समजणाऱ्या 3 प्रकारांच्या बोंडअळींना प्रतिबंध करण्याची क्षमता यात असल्याचं सांगण्यात आलं.
ते म्हणाले "CICR आणि इंडियन काउन्सिल ऑफ अॅग्रीकल्चर रिसर्च (ICAR) मध्ये माझ्या टीमने गुलाबी बोंडअळीनं बोलगार्ड1 आणि बोलगार्ड2 या दोन्ही बियाणांना प्रतिकार क्षमता विकसित केल्याचं सिद्ध केलं आहे."
सुरुवातीची काही वर्षं या बीटी तंत्रज्ञानानं गुलाबी बोंडअळीला चांगला अटकाव केला होता.
पण गेल्या 2 -3 वर्षांत बोलगार्ड 1 आणि बोलगार्ड 2 या दोन्ही वाणांच्या कापसांच्या बोंडांचे गुलाबी बोंडअळी मोठं नुकसान करत आहे, असं त्यांनी सांगितलं.
प्रयोगशाळांतील चाचण्यांनी गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांत बीटी कॉटनला गुलाबी बोंडअळीनं प्रतिकार क्षमता विकसित केल्याचं निर्विवाद सिद्ध केल आहे, असं क्रांती यांनी सांगितलं.
2009 मध्ये इंडियन अॅग्रिकल्चर रीसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधक डॉ. ध्रुव आणि डॉ. गुजर यांनी गुजरातमध्ये महत्त्वाची नोंद केली.
यात बोलगार्ड1 या बीटी कॉटनला गुलाबी बोंडअळी प्रतिकारशक्ती दाखवत असल्याची त्यांच्या लक्षात आलं.
हे संशोधन 'पेस्ट मॅनेजमेंट' या जर्नलमध्ये 2011 ला प्रसिद्ध झालं आहे.
2006 ला गुलाबी बोंडअळीला अटकाव बोलगार्ड2 हे बियाण बाजारात आलं.
बोलगार्ड 2ही ठरले अपयशी
क्रांती सांगतात, "ICAR आणि CICR यांनी 2014, 2015 आणि 2016 या वर्षी केलेल्या सर्व्हेमध्ये गुलाबी बोंडअळीने बोलगार्ड 2साठी प्रतिकार क्षमता विकसित केल्याचं निष्पन्न झालं आहे."
गुलाबी बोंडअळी बोलगार्ड 2मधील cry1Ac+cry2Ab या विषारी जनुकांनां प्रतिकार करत असल्याचं, या सर्व्हेमधून लक्षात आलं होतं.
तब्बल 40 ते 80 टक्के कापसांच्या बोंडात गुलाबी बोंडअळी मिळाली होती, असं क्रांती यांनी सांगितलं.
'सध्या कीटकनाशकच उपाय'
गुलाबी बोंडअळीवर परिणामकारक ठरणारं आणि तातडीनं उपलब्ध होऊ शकणारे जी. एम. तंत्रज्ञान सध्यातरी उपलब्ध नाही, असं क्रांती यांनी सांगितलं.
गुलाबी बोंडअळीपुढे बीटी कॉटन अपयशी ठरत असल्याचा अहवाल कृषी विभागाने जुलै महिन्यातच सरकारला दिला आहे.
ही माहिती कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाचे संचालक एम. एस. घोलप यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
सध्याच्या परिस्थितीमध्ये कीटकनाशक वापरण्याला अन्य पर्याय नसल्याचं घोलप यांनी सांगितलं.
कापसावर अमेरिकन बोंडअळी, ठिपक्यांची बोंडअळी आणि गुलाबी बोंडअळी या 3 प्रकारच्या बोंडअळींचा मोठा उपद्रव असतो.
यातील अमेरिकन बोंडअळी आणि ठिपक्यांची बोंडअळी यावर बीटी कॉटन प्रभावी ठरले आहे.
त्यामुळं बीटी कॉटन अपयशी ठरलं, असं म्हणता येणार नाही असे क्रांती यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
कापसावर तीव्र स्वरूपाच्यां कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन 31 शेतकऱ्यांच्या बळी गेला असून सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
जय जवान जय किसान या संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार म्हणाले, "बोलगार्ड 2 हे बियाणं अपयशी ठरलं आहे. सध्या शेतकरी पीक वाचवण्यासाठी हवालदिल आहे. त्यामुळं शेतकरी अधिक प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करतात."
पण या बळींचा संबंध बीटी कॉटनशी जोडता येणार नाही, असे क्रांती यांनी म्हटलं आहे. हा विषय कीटकनाशकांच्या स्वैर वापराशी निगडित आहे, असं क्रांती म्हणाले.
शेतकऱ्यांचं अर्थकारण बिघडलं
बीटी कॉटनमुळं शेतकऱ्याचं अर्थकारण गोत्यात आल्याचं शेतकरी नेते विजय जावंधिया म्हणाले.
ते म्हणाले, "बीटी कॉटनच्या बियाण्यांचा खर्च एकरी 3 हजार रुपये आहे. बीटी कॉटनमुळं उत्पादन वाढल्याच सांगितलं जात असलं तरी उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे."
कोरडवाहू शेतीत कापसाचा सध्याचा एकरी उत्पादन खर्च 15 ते 20 हजार असून तो पूर्वी 7 हजारच्या जवळपास होता, असं शेतकरी सांगतात.
बोलगार्डची बाजू
या संदर्भात बीबीसी मराठीने बोलगार्डची निर्मिती करणारी कंपनी मोन्सॅन्टोला प्रतिक्रियेसाठी इमेल केला आहे. बीबीसी मराठी त्यांच्या खुलाशाच्या प्रतीक्षेत आहे.
गुलाबी बोंडअळीमध्ये बीटी कॉटनसाठी निर्माण झालेल्या प्रतिकार क्षमतेसंदर्भात मोन्सॅन्टोच्या वेबसाईटवर 4 एप्रिल 2017 खुलासा करण्यात आला आहे.
यामध्ये गुलाबी बोंडअळीने बोलगार्डI साठी प्रतिकार क्षमता निर्माण केल्याचं म्हटलं आहे.
यात म्हटले आहे की, 2009मध्ये बोलगार्ड I साठी गुलाबी बोंडअळीने रोगप्रतिकार क्षमता विकसित केल्याचं लक्षात आलं.
जीईएसीची बोलगार्डI ला मान्यता मिळण्यापूर्वीच काही अनिधिकृत बीटी कॉटनचा वापर, तसेच रेफ्यज प्लान्टचा वापर न करणे या कारणांमुळे ही प्रतिकारक्षमता निर्माण होण्यामागची काही कारणे आहेत, असे यात म्हटले आहे.
बीटी कॉटनची लागवड करत असताना या पिकात रेफ्युज प्लान्ट म्हणून काही प्रमाणात सामान्य पिकांची लागवड करणे आवश्यक असते, जेणेकरून कीटक या झाडांवर वाढतात, असं कंपनीचं मत आहे.
यामध्ये कंपनीने गुलाबी बोंडअळी बोलगार्ड II समोर पूर्ण बळी पडते असं म्हटलं आहे.
शिवाय कंपनी थ्री प्रोटिन बीटी तंत्रज्ञानावर काम करत असून शेतकऱ्यांना अत्याधुनिक कीटक नियंत्रक तंत्रज्ञान देण्यास कंपनी कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे.
काय आहे बीटी कॉटन?
बीटी कॉटन हे जनुकीय बदल केलेलं कापसाचं वाण आहे.
मातीमधील बॅसिलस थिरुजिअनसिस जीवाणूतील काही जनुकं बोंडअळीसाठी विषारी असतात.
ही जनुक जेनॅटिक तंत्राच्या सहायाने कापसात सोडली जातात.
त्यामुळं कापसाच्या झाडातचं बोंडअळीसाठी प्रतिकार क्षमता निर्माण होते.
कापसावर पडणाऱ्या प्रमुख किडींमध्ये बोंडअळी आहे. या अळ्यांचे तीन प्रकार असून ठिपक्याची आणि गुलाबी बोंडअळी बोंडाचे मोठे नुकसान करते.
यामुळे कापसाचा उतारा कमी भरतो. शिवाय बोंडअळीमुळे डागाळलेला, कमजोर तंतू असलेला शिवाय पोकळ सरकीचा कापूस निघतो.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)