You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
100 Women - ग्रामीण शेतकरी महिला जेव्हा चौकट ओलांडतात
मागच्या काही दशकांमध्ये विकसनशील देशांमध्ये शेतीच्या कामात महिलांना रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. कामाच्या ठिकाणी सुविधा मिळवण्याच्या दृष्टीने कार्यक्रम आखले जात आहेत. पण त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेत प्रगती झाली आहे का?
''इथं रताळ्याचं खूप जास्त उत्पादन झालं आहे. आम्ही फक्त ग्राहकांची वाट बघत आहोत,'' रोझलिना बॉलस्टेरोस म्हणाली.
कोलंबियाच्या उत्तरी किनाऱ्याजवळच्या या डोंगराळ भागात मोंटेस दी मारिया नावाचं हे गाव. रोझलिना इथेच काम करते.
इथे यंदा पीकपाणी चांगलं झालं आहे. पण मागणी नसल्याने रताळी सडत आहेत.
इथल्या लोकांनी मिळून मग युट्यूबची मदत घेतली आहे. अल्पावधीतच एक व्हीडिओ व्हायरल झाला.
यात एक महिला शेतकरी म्हणते की, "आमच्याकडची रताळी खरेदी करुन आम्हाला मदत करा.'' तिची एक सहकारी तिचं वाक्य पूर्ण करते, ''रताळी संधीवात, बद्धकोष्ठसाठी चांगली असतात. महिलांनी रजोनिवृत्तीच्या वेळी रताळी खावी.''
त्यामुळे सामान्य शेतकरी महिला आता युट्यूबर झाल्या आहेत. आणि आपल्या उत्पादनांची जाहिरात करताना दिसत आहेत.
महिला बचत गटाचं माध्यम
32 वर्षांची एनेगल अब्राखामनोवा पाच मुलींची आई आहे. मध्य किरगिझस्तानच्या डोंगराळ भागातल्या तिच्या गावातून ती पण लोकांना मदतीसाठी आवाहन करते आहे. तिने माध्यम वापरलं आहे ते महिला बचत गटाचं.
''पेरणी आणि ठिबक सिंचनासाठी मला त्यांची मदत झाली,'' अब्राखामनोवा सांगत होती. आपल्या शेतात आता ती टोमॅटो, काकडी आणि गाजरांची लागवड करते. या शेतात यातलं काहीही उगवणार नाही, असं तिला आधी सगळ्यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, लाओसच्या उत्तरेला लुआंग प्रबांग शहरात विंग ही महिला अळंबीच्या शेतीतून आपलं घर चालवते. रानटी अळंबी हा खरा तर तिच्या भागातला रोजचा खाद्यपदार्थ आहे.
पण त्याची शेती कशी करायची याची कल्पना या लोकांना नव्हती. विंग आणि गावातल्या इतर महिलांना रीतसर प्रशिक्षण देण्यात आलं.
या सगळ्या घडामोडी जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात घडतात. पण सामायिक दुवा आहे महिलांच्या यातील सहभागाचा.
शेतकी कामात महिला अग्रेसर
विकसनशील देशांमध्ये शेतकी रोजगारात महिलांचा तब्बल 43 टक्क्यांचा वाटा आहे. आणि तज्ज्ञांच्या मते मागच्या वीस वर्षांत शेती हा प्रांत महिलांनी पादाक्रांत केला आहे.
2016 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या शेती आणि अन्नविषयक संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालातही हे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.
पुरूष शेतीच्या कामांपासून दूर जात आहेत, किंवा महिला शेती अंतर्गत विविध कामांमध्ये आपला सहभाग वाढवत आहेत, असं हा अहवाल सांगतो.
"शेतीत महिला मोठी भूमिका बजावताना दिसत आहेत. आणि शेतीतल्या रोजगारातही त्यांचा वाटा वाढत आहे," असं लिबर स्लोकाल यांनी म्हटलं आहे. ते अन्न व शेतीविषयक संस्थेच्या आर्थिक, सामाजिक विकास विभागाचे धोरण अधिकारी आहेत.
संयुक्त राष्ट्र कामगारास संघटनेच्या आकडेवारीनुसार 2015 मध्ये पगारदार किंवा कमावत्या महिलांपैकी 25 टक्के महिला या शेतीची कामं करत होत्या.
शहरांमधले दृश्य वेगळे
पण हे आकडे खरे असले तरी यात ग्रामीण आणि शहरी भागातील फरक अधोरेखित झालेला नाही. कारण मिळकत जिथे कमी आहे, अशा देशात शेती हाच जरी उपजीविकेचा मुख्य स्त्रोत असला तरी श्रीमंत देशांमध्ये हे प्रमाण घटत आहे.
शहरात पुरूष आणि स्त्रियाही कारखाने आणि इतर सेवांकडे वळले आहेत. मग अशावेळी शेतीचं महिलाकरण नेमकं कुठे होतं?
उत्तर आफ्रिकेत 1980 ते 2010 या कालावधीत हे प्रमाण 30 टक्क्यांवरुन 43 टक्क्यांवर आलं. तर पूर्वेकडच्या देशांमध्ये याच कालावधीत हे प्रमाण 35 टक्क्यांवरुन 48 टक्क्यांवर आलं.
पूर्व आणि आग्नेय आशिया तसंच लॅटिन अमेरिकेत महिलांचा वाढता सहभाग सहज दिसून येतो. आफ्रिकेच्या वाळवंटी भागात महिलांच्या सहभागात फारसा बदल झालेला नाही.
तर लिसोथो, सिएरा लिऑने आणि मोझांबिकमध्ये तीस वर्षांत हे प्रमाण 60 टक्क्याहून जास्त वाढलं. या भागांमध्ये शेतीचं महिलाकरण जोरात झाल्याचं तज्ज्ञ सांगतात.
पुरुष स्थलांतरित झाल्यामुळे...
शेतीतला महिलांचा सहभाग वाढणं हे सकारात्मकच म्हटलं पाहिजे. काहीजणी प्राथमिक शेतकरी म्हणून पुढे येतील, काहींना शेतीपासून रोजगार मिळेल, ज्यामुळे त्या घरी हातभार लावतील.
पण यामुळे महिला सक्षमीकरण शक्य होईल का हा प्रश्नच आहे. कारण महिलांचं शेतीकडे वळण्याचं मुख्य कारण म्हणजे पुरुषांचं गावातून बाहेर पडणं.
श्री स्लोकाल म्हणतात त्याप्रमाणे, तरुण, ग्रामीण पुरूष शहरी भागात स्थलांतरित होण्याचं प्रमाण वाढत आहे. औद्योगिक आणि सेवा क्षेत्रात शेती बाहेरचे, किफायतशीर रोजगार उपलब्ध आहेत. तिथे पुरुषांचा ओढा आहे.
अशावेळी ज्या स्त्रिया गावात मागे राहतात, त्यांना शेतीची उरलेली कामं हाती घ्यावी लागतात.
शेतीच्या कामांमध्ये महिलांचं प्रमाण वाढलेलं स्पष्ट दिसत आहे. पण त्याचवेळी ग्रामीण भागात त्यांना मिळणारे इतर रोजगार कमी झाले आहेत. किंवा तिथे अनिश्चितता वाढत आहे.
...मात्र विपणनात पुरूष आघाडीवर
महिलांचा सहभाग बऱ्याच अंशी मोबदला न मिळणारी कामं, हंगामी कामं आणि अर्धवेळची कामं यांच्यापुरता मर्यादित आहे. रोजंदारीची काम देताना महिलांना अनेकदा कमी श्रमाची आणि हलकीफुलकी कामंच दिली जातात.
शिवाय व्यवस्थापकीय कामांसाठी महिलांचा नाही तर पुरुषांचाच विचार होतो. 2016चा जागतिक बँकेचा अहवाल हेच अधोरेखित करतो.
आंतरराष्ट्रीय शेतकी संशोधन संस्थेच्या (ICARDA) तज्ज्ञ दिना नज्जर यांच्यामते महिला शेतीच्या कामात असल्या तरी विपणन आणि पैशाची उलाढाल पुरूष मंडळीच करतात. तिथे महिलांना अधिकार नसतोच.
एकसारख्या कामासाठी महिलांना पुरुषांपेक्षा कमी मोबदला मिळतो. मोबदल्यातली असमानता इथेही आहेच.
मोबदल्यात असमानता
महिला आणि पुरुषांच्या मोबदल्यामधली ही असमानता ठिकठिकाणी असमान आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण कमी आहे, असं म्हटलं तरी 14 देशांची आकडेवारी गोळा केल्यावर महिलांना पुरुषांपेक्षा 28 टक्के कमी मोबदला मिळत असल्याचं स्पष्ट झालं.
यातला आणखी एक मुद्दा आहे उत्पादनातील असमानतेचा. कारण विकसनशील देशात महिला शेतकरी पुरुषांपेक्षा कार्यक्षमतेत-उत्पादन क्षमतेत 20 ते 30 टक्क्यांनी मागे आहेत. याचं एक कारण कदाचित हे असावं की घरची सर्व कामं महिलांनाच करावी लागतात.
बहुतांश देशात आणि समाजात घरातील सर्व कामं, मुलांचा सांभाळ ही महिलांचीच जबाबदारी आहे. अन्न आणि शेती संघटनेनं हे निरीक्षण नोंदवलेलं आहे.
ग्रामीण भागात तर घरातील कामं म्हणजे लांबवर जाऊन पाणी भरणं आणि हलकी सलकी कामं करून आर्थिक भारही उचलणं याचाही समावेश होतो.
''महिलांना जेव्हा दोन आघाड्यांवर तारेची करसत करावी लागते, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा सांभाळत जगावं लागतं, बदल सोपा नसतोच,'' अन्न आणि शेतीविषयक संस्थेच्या कार्यक्रम सहाय्यक मेरी लुईस हायेक यांनी या मुद्द्याकडे लक्ष वळवलं.
मदतीचा हात
महिलांच्या शेतीतील सहभागाचे काही फायदे आहेत. माली देशातल्या बारामेडोगा गावातली 28 वर्षीय सनिहा थेरा म्हणतात, ''आज मी कठीण काळासाठी तयार आहे. मी नवीन कामं शिकते त्यामुळे पैसे शिल्लक राहतात.''
थेरा यांना अन्न आणि शेती संस्थेकडून शेतीविषयक एक किट मिळालं होतं. यात बियाणं, गोमूत्र, शेतीची अवजारं आणि अव्वल दर्जाचा भाजीपाला होता. शिवाय, आर्थिक मदत आणि प्रशिक्षणही मिळालं.
घरातील पुरूष मंडळी हंगामी कामांसाठी शहरात गेली असताना मालीच्या या महिला शेतकरी नवीन तंत्र वापरून शेती करतात आणि कुटुंबालाही हातभार लावतात.
''आमचं कुटुंब काही महिने गुजराण करू शकेल इतका अन्नसाठा घरी नक्कीच असेल. यंदा पीक चांगलं आलंय,'' थेरा म्हणाली.
या कार्यक्रमाच्या प्रवक्त्या फातोमा सीद यांच्या म्हणण्यानुसार, शेतीमुळे या महिलांचा आवाज समाजात ऐकला जातो आहे. मुलांचं संगोपन आणि लग्नविषयक समस्यांवर महिलांनी एकमेकांना सल्ला द्यावा यासाठी एक मंचही स्थापन करण्यात आला आहे.
विषमता कमी करण्यासाठी पुढाकार
आंतरराष्ट्रीय संस्था, सेवाभावी संस्था आणि केंद्र सरकार, असे सगळेच स्त्री-पुरुष विषमता कमी करण्यासाठी काम करत आहेत. शेतीत तंत्रज्ञानाचा वापर तसंच महिलांसाठी कर्जाची सोय अशा काही योजनांमुळे ही विषमता कमी होऊ शकेल.
सामाजिक सक्षमीकरणासाठी आवश्यक आहे जमिनीचे मालकी हक्क. बऱ्याचशा विकसनशील देशात महिलांना मालमत्ता हक्क पुरुषांच्या बरोबरीने मिळत नाहीत.
आंतरराष्ट्रीय शेतकी संशोधन केंद्राच्या दिना नज्जर यांनी स्पष्ट करतात की मुळातच साधनांची असलेली कमतरता याला कारणीभूत आहे.
जमीनच कमी असल्यामुळे तिच्या मालकीसाठी पुरुषांमध्येच वाद असतील तर महिलांना त्यांचा हक्क कसा आणि कधी मिळावा?
जगभरात पाहिलं तर शेतीच्या मालकीचे प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांकडेच जास्त आहे. म्हणजे शेतजमिनीचं व्यवस्थापन आणि शेतीविषयक निर्णय घेण्याचे अधिकार पुरुषांकडेच सर्वाधिक आहेत.
''जमिनीची मालकी आणि व्यवस्थापनाचा अधिकार यातूनच सक्षमीकरण साध्य होतं. त्यामुळे धोरणात्मक बदल ही सुरुवात असली तरी सामाजिक व्यवस्था बदलून महिलांच्या हाती जमिनीची मालकी, वारसा हक्क देण्याच्या दृष्टीने काम करणं गरजेचं आहे,'' असं दिना नज्जर म्हणतात.
तर स्लोकाल यांच्या मते सामाजिक बदल हे होतच असतात. त्यात हा बदल व्हावा. थोडक्यात म्हणजे, शेतीतला महिलांचा सहभाग वाढला तरी शेतीच्या महिलाकरणाचा महिलांना थेट फायदा होईलच असं नाही, असंच अनेक तज्ज्ञांचं मत आहे. (कारण, त्यासाठी महिलांना हक्कही हवेत.)
ग्रामीण भागात काम करणारी बहुतांश जनता ही तरुण नाही तर मध्यमवयीन आहे. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेत बदल होणं थोडं अवघडच आहे. त्यामुळे जसं हायेक म्हणतात, "शेतीच्या महिलाकरणामुळे स्त्री-पुरूष असमानता कमी होणार असली तरी त्याला वेळ लागणार आहे."
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)