पैसे की वेळ काय महत्त्वाचं? वाचा संशोधकांचा सल्ला

घरकामासाठी मोलकरणीला पैसे देण्याऐवजी आपण स्वतः घरकाम करू आणि वाचलेल्या पैशातून आवडीची वस्तू विकत घेऊ. वेळेच्या बदल्यात आवडीची वस्तू यातच खरं सुख आहे, असं तुम्हाला वाटतंय का? तर थांबा ! त्याआधी हे तज्ज्ञ काय म्हणतात हे वाचा.

आपल्याकडे आजकाल मजेत जगावं कसं याचा प्रश्न पडलेले अनेक लोक आढळतात. आपल्या आवडीची एखादी वस्तू घेण्यासाठी जीवापाड मेहनत करतात. पण ती वस्तू घेतल्यावर खरंच ते सुखी होतात का?

आज लोक एखादी महागडी वस्तू विकत घेण्याऐवजी हातात मोकळा वेळ शिल्लक राहावा म्हणून पैसे खर्च करतात ते लोक अधिक सुखी होतात, असं कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापिका डॉ. एलिझाबेथ डून यांनी म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि नेदरलॅंड्समधील 6,000 जणांना या संशोधनात सहभागी करुन घेण्यात आलं होतं.

या सर्वेक्षणात सहभागी झालेले 800 जण धनाढ्य होते. काही उच्च-मध्यमवर्गीय आणि काही मध्यमवर्गीय होते. या लोकांना त्यांच्या पैसे खर्चायच्या सवयीबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आलं. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या आधारे निष्कर्ष मांडण्यात आले.

एक तृतीयांशपेक्षा कमी लोक, वेळ वाचावा म्हणून पैसे खर्च करतात ही बाब तज्ज्ञांच्या लक्षात आली. ज्या लोकांनी दुसऱ्या लोकांकडून सेवा घेतल्या आहेत ते लोक तुलनेनी समाधानी होते, असं संशोधकांनी म्हटलं आहे. हे संशोधन नॅशनल अॅकाडमी ऑफ सायन्समध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

या संशोधकांच्या पथकाने आणखी एक प्रयोग करुन पाहिला. यासाठी त्यांनी 60 तरुणांची निवड केली. प्रत्येक तरुणाला त्यांनी 2400 रुपये दिले आणि हे पैसे फक्त विविध सेवांसाठी खर्च करा, असं सांगितलं.

या तरुणांनी कपडे धुणं, घराची साफ-सफाई, बाग-काम करणाऱ्यांकडून सेवा घेतल्या.

पुढच्या आठवड्यात त्यांनी याच मंडळीला पुन्हा तितकेच पैसे दिले आणि हे पैसे पुस्तकं, वाइन किंवा कपड्यावर, थोडक्यात आवडीच्या वस्तूंवर खर्च करा, असं सांगितलं.

दोन्ही आठवड्यांची तुलना करून तुम्हाला काय वाटतं, असं मग त्यांना विचारण्यात आलं. बहुतांश तरुणांनी आपण पहिल्या आठवड्यात जास्त आनंदी होतो, असं उत्तर दिलं.

ज्या देशांमधील नागरिकांच्या उत्पन्नात वाढ होत आहे, त्या ठिकाणी एक भीतीदायक चित्र निर्माण झालं आहे. अशा देशातील लोक भरपूर काम करतात. आपल्या कुटुंबीयांसाठी आणि स्वतःसाठी वेळच त्यांच्याकडे राहत नाही. या स्थितीला संशोधक 'वेळेचा तुटवडा' म्हणतात.

बऱ्याचदा असं होतं की ऑफिस आणि घरकामाच्या व्यापात माणसं स्वतःची काळजी घेणं विसरुन जाता. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात, असं संशोधक सांगतात. ऑफिसनंतर घरी काम केल्यामुळे मोकळा वेळच शिल्लक राहत नाही.

"आपल्या हाती कमी वेळ आहे, ही भावना जर तुमच्यामध्ये बळावली तर तुम्ही नकारात्मक व्हाल. तुम्हाला ताण येईल. तणावामुळे निद्रानाश होऊन तुमचं आरोग्य बिघडेल. त्या बरोबरच तुमच्या मनात असुरक्षिततेची भावना तयार होईल," असं या सर्वेक्षणावर काम करणाऱ्या डॉ. एलिझाबेथ डून यांचं मत आहे.

धुणं-भांडी, स्वयंपाक, घराची साफसफाई, बागकाम ही कामं इतरांना करू द्या आणि तुम्ही निश्चिंत रहा, असंही संशोधक म्हणतात.

मोकळ्या वेळेमध्ये तुम्हाला तुमची आवड किंवा छंद जोपासता येईल. पैसे वाचवण्यापेक्षा वेळ वाचवण्यास प्राधान्य द्या; सुखी व्हाल, असा कानमंत्र डॉ. एलिझाबेथ देतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)