You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सचिन वाझे प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं?-स्फोटकं, गूढ गाड्या आणि संशयास्पद मृत्यू
- Author, मयांक भागवत आणि अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी
मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं मिळाली. नंतर मनसुख हिरेन नावाच्या व्यक्तीचा मृतदेह मिळाला. स्फोटकं असणारी गाडी तर ताब्यात घेतली. पण एका इनोव्हाचीही चर्चा होत राहिली. यासगळ्याशी सचिन वाझेंचा काय संबंध? पाहूयात 25 फेब्रुवारीपासून आतापर्यंत काय काय घडलं.
24 आणि 25 फेब्रुवारीच्या मधली रात्र...
मुंबईतल्या प्रियदर्शनी पार्क जंक्शनजवळ एक स्कॉर्पियो थांबली होती.
साधारण 1 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास एक पांढरी इनोव्हा आली आणि या दोन्ही गाड्या भायखळ्य़ाच्या दिशेने निघाल्या.
खडा पारसी जंक्शनला उजवीकडे वळत त्या महालक्ष्मीच्या रस्त्याला लागल्या. इथेच कारमायकल रोडवर मुकेश अंबानींचं अँटिलिया हे निवासस्थान आहे.
25 फेब्रुवारीच्या पहाटे 2 वाजून 18 मिनिटांनी या गाड्या अंबानींच्या घराबाहेर पोहोचल्या.
इथे स्कॉर्पिओ पार्क करण्यात आली तर इनोव्हा पुढे गेली. हीच इनोव्हा नंतर मुलुंड टोल नाका पार करून ठाण्याच्या दिशेने जाताना दिसली... आणि नंतर गायब झाली.
मुकेश अंबानींच्या सुरक्षा रक्षकांनी ही बेवारस गाडी हेरली, आणि पोलिसांना कळवलं.
आधी स्थानिक पोलीस आले... आणि मग पाठोपाठ बॉम्ब स्क्वॉड आलं... सगळ्या परिसरात बंदोबस्त लावून गाडी उघडण्यात आली.
गाडीमध्ये होत्या जिलेटीनच्या 20 कांड्या... साधारण अडीच किलो वजनाच्या... काही नंबरप्लेट्स आणि एक धमकी देणारी चिठ्ठी...
पण या कांड्या नुसत्याच होत्या... त्या एकमेकांशी सर्किटने जोडून त्याचा बॉम्ब करण्यात आला नव्हता. त्यामुळे त्यांचा स्फोट झाला नसता. मग शोध सुरू झाला, गाडीच्या मालकाचा.
स्कॉर्पिओ कोणाच्या मालकीची?
मनसुख हिरेन नावाची व्यक्ती ही गाडी वापरत होती हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांनी त्यांना संपर्क केला. पण या गाडीचं स्टिअरिंग जॅम झाल्याने आपण ती विक्रोळीजवळ रस्त्यावर पार्क केली होती, आणि तिथून ती चोरीला गेली असं मनसुख यांनी पोलिसांना सांगितलं. विक्रोळी पोलिसांमध्ये कार चोरीला गेल्याची तक्रारही दाखल आहे.
पण मुळात ही गाडी होती - सॅम न्यूटन नावाच्या माणसाच्या मालकीची.
सॅम यांची मनसुखकडे उधारी होती, आणि त्यांनी पैसे फेडले नाहीत म्हणून मनसुखने गाडी स्वतःकडे ठेवून घेतली. पण ही गाडी मनसुख यांच्या नावावर ट्रान्सफर करण्यात आली नव्हती, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.
पण ही गाडी आपली असल्याचं मनसुख यांनी मान्य केल्याचा दावा भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी केला. 5 मार्चला देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान हा मुद्दा मांडला आणि मनसुख हिरेन यांना सुरक्षा देणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं...
आणि काहीच तासांनी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूची बातमी आली.
मनसुख हिरेन यांचा मृत्यू हत्या की आत्महत्या?
4 मार्चच्या संध्याकाळी दुकानातून घरी जायला बाहेर पडलेले मनसुख घरी पोहोचलेच नाहीत. आपण तावडे नावाच्या ऑफिसरला भेटायला कांदिवलीला जाणार असल्याचं मनसुख यांनी घरच्यांना सांगितलं होतं. पण हे तावडे नेमके कोण? हे अजूनही उघड झालेलं नाही.
त्यांची वाट पाहून शुक्रवारी - 5 मार्चला त्यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी सुरू केली, आणि मुंब्रा खाडीत एक मृतदेह सापडल्याचं कळलं.
5 मार्चच्या सकाळी साडे दहाच्या सुमारास रेती बंदर खाडीतून मनसुख याचा मृतदेह क्रेनने काढण्यात आला. हा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता आणि मृतदेहाच्या तोंडावर 4-5 रुमाल होते. त्यांचे हात बांधलेले होते, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला, पण हात बांधलेले नसल्याचं गृहमंत्री अनिल देशमुखांनी सांगितलं. पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आला.
मनसुख यांची हत्या झाली, असा आरोप कुटुंबियांनी केला आणि ATS ने अज्ञातांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला. दरम्यानच्या काळात स्फोटक आढळल्याचं प्रकरणं केंद्राने NIAकडे सोपवलं.
मनसुखच्या मृत्यूशी वाझेंचा काय संबंध?
स्कॉर्पिओच्या मागोमाग असणारी इनोव्हा कुठे गेली, याचा शोध घेतला जात होता. CCTV फुटेजमध्ये दिसलेला, अंबानींच्या घराबाहेर PPE सूटमध्ये वावरणारा इसम कोण, हाही प्रश्न होताच. या प्रकरणात सुरुवातीपासून सचिन वाझे यांचं नाव चर्चेत होतं. कारण स्फोटकं सापडली तेव्हा, घटनास्थळी पोहोचणाऱ्यांपैकी ते एक होते. NIA शनिवारी 13 मार्चच्या दिवशी 12 तास सचिन वाझेंची चौकशी केली (Clock ticking fast) आणि त्यानंतर रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी त्यांना अटक करण्यात आली.
त्यानंतर रविवारी 14 मार्चला NIA ने MH 01 AN 403 नंबरची पांढरी इनोव्हा ताब्यात घेतली. ही कार मुंबई पोलिसांच्या मेंटेन्सन्स डिपार्टमेंटमध्ये सापडली. इतकच नाही तर ती गाडी क्राईम ब्रांचच्या इंटेलिजन्स युनिटची असल्याचं सांगितलं जातंय. सचिन वाझे याच युनिटमध्ये आहेत.
अंबानींच्या घराबाहेर उभी करण्यात आलेली स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ उभी करण्यात सचिन वाझेंचा सहभाग असल्याचा आरोप NIAने केलाय आणि याच आरोपाखाली वाझेंना अटक करण्यात आलीय. वाझेंनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता, पण कोर्टाने तो फेटाळून लावला. वाझेंचं या प्रकरणात नाव येण्याचं कारण म्हणजे मनसुख यांच्या पत्नीने केलेला दावा.
"सचिन वाझे माझ्या पतीला ओळखत होते. नोव्हेंबर महिन्यात माझ्या पतीने गाडी वाझे यांना वापरण्यासाठी दिली होती. वाझेंनी फेब्रुवारी महिन्यात गाडी परत दिली. 26 फेब्रुवारीला सचिन वाझेंनी माझ्या पतीला चौकशीसाठी नेलं. संध्याकाळी ते त्यांच्यासोबतच घरी आले. पुढे दोन दिवस माझे पती सचिन वाझेंसोबत जात होते आणि येत होते. माझे पती मनसुख यांचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. हा खून सचिन वाझेंनी केल्याचा मला संशय आहे." असा आरोप विमला यांनी केला.
तर सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्यात दोनदा संभाषण झालं, त्याचं कॉल डिटेल रेकॉर्ड आपल्याकडे असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी विधीमंडळात केला होता.
तर "मला मनसुख यांच्या मृत्यूबाबत काहीच माहिती नाही. पत्रकार आणि पोलीस त्रास देत असल्याची तक्रार त्यांनी दिली होती. त्याबाबत त्यांनी मुंबई आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. गाडी सापडली तेव्हा सर्वांत आधी गावदेवी पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथं पोहोचले होते, त्यानंतर इतर पोलीस अधिकारी पोहोचले होते. त्यानंतर मी तिथं पोहोचलो होतो," असं सचिन वाझे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं होतं.
सचिन वाझेंचा सरकारशी काय संबंध?
कोल्हापूरचे सचिन हिंदुराव वाझे 1990 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात PSI - पोलीस उपनिरीक्षक म्हणून दाखल झाले. मुंबईत पोस्टिंग झाल्यानंतर त्यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या हाताखाली काम केलं. मुन्ना नेपालीच्या एन्काऊंटरमुळे ते चर्चेत आले आणि त्यांनी जवळपास 60 एन्काऊंटर्स केल्याचं सांगितलं जातं.
डिसेंबर 2002 मध्ये मुंबई पोलीस घाटकोपर स्फोटाची चौकशी करत होते. पोलिसांनी चौकशीसाठी ख्वाजा यूनूस नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं होतं. पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान ख्वाजा यूनूसचा मृत्यू झाल्याचा आरोप मुंबई क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांवर झाला. आणि मे 2004 मध्ये राज्य सरकारने सचिन वाझेंना पोलीस दलातून निलंबित केलं.
सचिन वाझे यांनी 2008 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत दसरा मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला. पण ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते, असं शिवसेना नेते सांगतात.
जून 2020 मध्ये मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सचिन वाझेंचं निलंबन मागे घेतलं आणि तब्बल 16 वर्षांनी वाझे पुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत रुजू झाले.
महाराष्ट्र पोलीस दलात सचिन वाझे सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हणजेच असिस्टंट पोलीस इंनस्पेक्टर (API) पदावर कार्यरत होते. मुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट' चे ते प्रमुख होते.
पण शिवसेनेसोबत त्यांचा भूतकाळ निगडीत असल्याने शिवसेना बॅकफुटवर असल्याचं, तर गृहखातं सध्या राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांच्यावरही कठीण पाळी आल्याचं बोललं जातंय. जी माहिती फडणवीसांकडे होती, ती गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांच्याकडे नव्हती का, की ते अपुरे पडतायत अशी टीकाही सध्या सरकारवर करण्यात येतेय.
तर होता या प्रकरणातला आतापर्यंतचा घटनाक्रम.
मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणाचा तपास NIA करतेय.
तर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडे आहे.
NIA ने अटक केल्यानंतर सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय आणि मुंबई पोलिसांतून त्यांना निलंबित करण्यात आलंय.
तर एनआयएने वाझेंना फक्त संशयाच्या आधारावर अटक केली असून त्यांच्या रिमांडमध्ये आरोपी विरोधात काही पुरावा नाही, असं वाझे यांच्या वकिलांनी न्यायालयात म्हटलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)