You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सचिन वाझेंचं निलंबन, अटक अवैध असल्याचा दावा, आज कोर्टात काय होणार?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीनच्या कांड्या सापडल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसातील API सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) अटक केली आहे. 13 मार्च रोजी ही अटक झाली, त्यानंतर NIA च्या हालचाली वेगवान झाल्यात.
अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सचिन वाझे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. दुसऱ्यांदा सचिन वाझे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे.
हिरेन प्रकरण पुढे आल्यावंतर याआधी वाझे यांची क्राईम ब्रांच मधून साईट ब्रांचला बदली झाली होती. पण अटकेनंतर मात्र आता त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
13 मार्च रोजी 12 हून अधिक तासांच्या चौकशीनंतर रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सचिन वाझे यांना NIA नं अटक केली. त्यानंतर काल (रविवारी) म्हणजे 14 मार्च रोजी त्यांना NIA च्या कार्यालयात आणलं गेलं. काल दिवसभरात बऱ्याच घडामोडी घडल्या. त्या आणि आज काय होणार आहे, याचा आढावा आपण घेऊया.
आज (15 मार्च) काय होईल?
सचिन वाझे यांच्या वकिलांनी सेशन्स कोर्टात अर्ज दाखल करून दावा केलाय की, सचिन वाझे यांना NIA ने केलेली अटक अवैध आहे.
NIA ने रिमांडची कॉपी न दिल्याचं वाझेंच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं. या प्रकरणावर आज (15 मार्च) सेशन्स कोर्टात संध्याकाळी 4 वाजता सुनावणी होणार आहे.
दुसरीकडे, सचिन वाझे यांचे वकील मुंबई हायकोर्टातही धाव घेणार आहेत. वाझेंच्या अटकेला हायकोर्टात आव्हान दिलं जाणार आहे.
आज सेशन्स कोर्टात काय होतं आणि हायकोर्टात आव्हान दिल्यानंतर पुढे काय होतं, हे पाहावं लागेल. शिवाय, NIA कडून पुढे काय पावलं उचलली जातात, हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल.
काल (14 मार्च) दिवसभरात काय घडलं?
सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आलं होतं. कारण 14 मार्चला जेव्हा त्यांना NIA च्या कार्यालयात आणलं गेलं, तेव्हा त्यांच्या हाताला आयव्ही लावलेलं होतं. बीबीसी मराठीच्या कॅमेऱ्यात त्यांच्या हाताला आयव्ही लावल्याचं कैद झालं होतं.
त्यानंतर काल NIA कार्यालयाच्या आवारात पांढऱ्या रंगाची इनोव्हा कारही दिसली. ही कार स्कॉर्पिओ गाडीचा पाठलाग करत होती, अशी शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे ही इनोव्हा कार NIA च्या कार्यालयाच्या आवारात आणल्यानं शंकांना दुजोरा मिळताना दिसतोय.
दुसरीकडे, सचिन वाझे यांच्यासोबत CIU विभागात काम करणारे सहकारी API काझी आणि इतर दोन कॉन्स्टेबल यांचीही NIA नं चौकशी केली. यात काय निष्पन्न झालं किंवा काय माहिती मिळाली, हे अद्याप समोर आलं नाही. मात्र, हे तिघेजण सचिन वाझे यांच्यासोबत काम करत असत.
दिवसभर हे घडल्यानंतर कालच (14 मार्च) रात्री सचिन वाझे यांची तब्येत खराब झाली होती. त्यानंतर डॉक्टरांना बोलावण्यात आलं. वाझेंना तपासलेल्या डॉक्टरनं त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली.
सचिन वाझे यांना शुगरचा त्रास आहे. त्यामुळे त्यांची शुगर लो झाल्यानं त्यांना त्रास झाल्याचं बोललं जात आहे.
सचिन वाझे यांचं निलंबन होणार का?
सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. याबाबत माध्यमांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रश्नही विचारला. मात्र, या प्रश्नावर काहीही बोलण्यास अनिल देशमुख यांनी टाळलं.
त्याऐवजी देशमुख म्हणाले, "मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीमध्ये आढळलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडल्याच्या घटनांची NIA आणि ATS मार्फत चौकशी केली जात आहे. या चौकशीतून जे काही निष्पन्न होईल, त्यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून कायदेशीर कारवाई केली जाईल."
दुसरीकडे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सचिन वाझे यांची पाठराखण केली आहे.
संजय राऊत म्हणाले, "सचिन वाझे प्रामाणिक आणि योग्यता असलेले अधिकारी आहेत, यावर मला विश्वास आहे. त्यांना जिलेटनच्या कांड्या सापडल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. एक संशयास्पद मृत्यूही झालाय. या प्रकरणाचा तपास घेण्याची मुंबई पोलिसांवर जबाबदारी आहे. कुठल्याही राष्ट्रीय तपास यंत्रणेची आवश्यकता नव्हती."
तर भाजप आमदार राम कदम यांनी सचिन वाझे यांच्या नार्को टेस्टचीही मागणी केली आहे. तसं पत्र राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.
सचिन वाझे कोण आहेत?
महाराष्ट्र पोलीस दलात सचिन वाझे सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हणजेच असिस्टंट पोलीस इंनस्पेक्टर (API) पदावर कार्यरत होते.
मुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट' चे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. मुंबईत घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायांची गोपनीय माहिती मिळवून, त्या रोखण्याचं काम क्राइम ब्रांचच्या या युनिटकडे आहे.
जून 2020 मध्ये मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सचिन वाझेंच निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. निलंबन मागे घेतल्याने तब्बल 16 वर्षांनी वाझे यांचा पुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत येण्याचा मार्ग खुला झाला.
पोलीस दलात परतल्यानंतर वाझे यांची आयुक्तांनी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मुंबई क्राइम ब्रांचमध्ये नियुक्ती केली.
अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामींच्या अटकेमागे वाझेंची महत्त्वपूर्ण भूमिका होती. अर्णब गोस्वामींच्या कथित TRP घोटाळ्याचा तपास सचिन वाझे करत होते. या प्रकरणात बार्कचे माजी प्रमुख पार्थो दासगुप्ता यांना अटक करण्यात आली होती. अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना रनौत यांच्या ई-मेल प्रकरणाची चौकशी वाझेंचं युनिट करत होतं.
हे प्रकरण नेमकं काय आहे?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत गुरूवारी (25 फेब्रुवारी) स्फोटकं सापडली. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथकं घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या होत्या.
मुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो.
स्फोटकांनी भरलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच आढळला आणि प्रकरण आणखीनच चिघळलं.
पोलिसांच्या माहितीनुसार, मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता. क्रेनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आला.
मृतदेहावर खूप माती लागली होती. शरीरात पाणी आणि माती गेल्याचा संशय आहे. मृतदेहाच्या चेहऱ्यावर कानटोपीसारखं मास्क होतं. त्यात 3-4 रुमाल होते. हे रुमाल पोलिसांनी जप्त केले आहेत.
मनसुख यांच्या पत्नीचे सचिन वाझेंवर आरोप
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर सरकारने तपास एटीएसला दिला. एटीएसला दिलेल्या जबाबात विमला यांनी सचिन वाझेंवर खळबळजनक आरोप केले.
"सचिव वाझे माझ्या पतीला ओळखत होते. नोव्हेंबर महिन्यात माझ्या पतीने गाडी वाझे यांना वापरण्यासाठी दिली होती. वाझेंनी फेब्रुवारी महिन्यात गाडी परत दिली," असा आरोप विमला यांनी केला.
विमला पुढे म्हणतात, "26 फेब्रुवारीला सचिन वाझेंनी माझ्या पतीला चौकशीसाठी नेलं. संध्याकाळी ते त्यांच्यासोबतच घरी आले. पुढे दोन दिवस माझे पती सचिन वाझेंसोबत जात होते आणि येत होते."
"वाझेंनी माझ्या पतीला या प्रकरणात अटक हो. तुला 2-3 दिवसात जामिनावर बाहेर काढतो," असं माझ्या पतीने मला सांगितल्याचा जबाब एटीएसला दिलाय.
या जबाबात विमला पुढे आरोप करतात, "माझे पती मनसुख यांचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. हा खून सचिन वाझेंनी केल्याचा मला संशय आहे."
एटीएसने मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांच्या तक्रारीवर अज्ज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)