आग लागलेल्या हत्तीच्या फोटोला 'वाईल्डलाईफ फोटोग्राफी पुरस्कार'

आग लागलेले दोन हत्ती एका हिंसक गर्दीपासून दूर सैरावैरा पळत असताना टिपलेल्या एका फोटोला यंदाचा 'वाईल्डलाईफ फोटोग्राफी पुरस्कार' मिळाला आहे.

पश्चिम बंगालच्या बाकुरा जिल्ह्यात बिप्लब हाजरा यांनी हा क्षण टिपला आहे. एका जमावाच्या हल्ल्यातून तो हत्ती आणि एक हत्तीचं पिल्लू पळ काढत होते.

पूर्व आणि मध्य भारतात मानव विरुद्ध हत्ती असा संघर्ष होतच असतो.

(सूचना : खालील फोटो तु्म्हाला विचलित करू शकतो.)

या फोटोला पुरस्कार देताना 'सँक्चुरी मॅगझिन'ने लिहिलं आहे, "अशी अहवेलना दररोज होत असते."

बिप्लब हाजरा यांनी फोटो काढला तेव्हा लोक हत्तीच्या कळपावर आगीचे गोळे, फटाके फेकत होते, असं मॅगझिननं नमूद केलं आहे.

पण या क्षणानंतर त्या हत्तींचं नेमकं काय झालं, हे स्पष्ट होऊ शकलं नाही.

त्या क्षणाबद्दल बिप्लब हाजरा सांगतात, "गोंधळलेलं हत्तीचं पिल्लू सैरावैरा पळत सुटलं होतं."

त्या पिल्लाची किंकाळी हाजरा अजूनही विसरू शकत नाही.

"हे हुशार, शांत आणि सामाजिक प्राणी एकेकाळी या उपखंडात गुण्यागोविंदानं राहायचे. पण हेच ठिकाण त्यांच्यासाठी आता नरक झालं आहे," असंही ते पुढं म्हणाले.

सोशल मीडियावरही हा फोटो चांगलाच गाजला.

बाकुरा जिल्ह्याचे मैनक मजुमदार सांगतात, "या परिस्थितीला स्थानिक लोकच जबाबदार आहेत. इथे अमाप जंगलतोड झाल्यानं हत्तींचा रहिवास धोक्यात आला आहे. हत्ती मानवी अत्याचार आणि अमानुष मारहाणीचे बळी पडत आहेत."

"पण हत्तींनीही या ठिकाणी हैदोस घालून ठेवला आहे. तेसुद्धा पीकांची नासधूस करतात, लागवड मोडतात आणि कधीकधी तर लोकांनाही चिरडून टाकतात."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)