You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पु. ल. देशपांडे : विशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र
- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
प्रिय पु. ल.,
खरं तर तुम्हाला काका म्हणावं की आजोबा हा प्रश्न आमच्या पिढीला पडायला हवा. आम्ही पहिलं 'ट्यॅह्यॅ' केलं (आमच्या आईशीस नक्की सांगता येईल आम्ही कुठल्या खाटेवर 'ट्यॅह्यॅ' केलं ते) तेव्हा तुम्ही सत्तरी गाठलेली. पण मायन्यांच्या पलीकडे जाऊन तुमचं-आमचं नातं जुळलं ते आयुष्यभरासाठी.
घरातल्या प्रत्येकाला तुमच्या लिखाणात, अभिवाचनात, नाटकात आणि वगैरे वगैरेत स्वतःला लागू पडेल, असं काही ना काही सापडत होतं. 'हॉटेल दिसलं की आमच्या शंकऱ्याला तहान लागते' या तुमच्या वाक्याचा जसा आमच्या पालकांना आधार वाटला, तसा इतर कुणाला वाटला नसेल. अहो कुठल्याश्या बालनाट्याला जाताना मला इतक्या रंगीबेरंगी खाण्याच्या गोष्टी दिसल्या की जिभेचा म्हणजे अगदी नळ झाला होता! पण, कसचं काय? तोंड उघडलं की कोंब राजगिऱ्याचा लाडू या न्यायाने दीड पाकीट संपवलं त्या दिवशी त्यांनी माझ्यावर. तुमच्या 'उपासा'च्या दिवशीही तुम्ही इतके लाडू खाल्ले नसतील जितके मी त्या दिवशी खाल्ले.
वाढदिवसाच्या केकचीही तशीच गत! "शाळेत जा आणि लोकांच्या पोरांचे वाढदिवस साजरे करा" असं बर्थडे सेलिब्रेशनचं तुम्हीच गुणवर्णन करून ठेवलंत. त्यामुळे माझ्या पहिल्या वाढदिवसानंतर केकला चाटच मिळाली. वाढदिवसाला आईने केलेला बटाटेवडा, आज्जीने केलेल्या नारळाच्या वड्या आणि आपल्या घरापासून ते कोपऱ्यावरच्या काकूंच्या घरापर्यंत सगळ्या मोठ्यांना नमस्कार करणे हा शिरस्ताच होऊन गेला.
वाढदिवसाचा केक आला तो एकदम कॉलेजला गेल्यानंतर! भरपूर केक खाण्याची अनेक वर्षांची इच्छा अखेर तेव्हा पूर्ण झाली! एक समाधानाची जागा एवढीच की आमच्या लहानश्या शहरात सांद्र स्वर आणि मंद प्रकाशाचं वातावरण असणारी कोणती 'माँजिनीझ' बेकरी नव्हती त्यामुळे आमची तुमच्यासारखी फजिती व्हायची टळली.
जशी शिंगं फुटायला लागली तसं मग शाळा, अभ्यास, त्यात खासकरून गणितादी विषयांचा मनापासून तिटकारा करत आम्ही नाटकं, कविता यासारख्या कल्पनाविश्वात घेऊन जाणाऱ्या गोष्टींमध्येच रमत गेलो. गटण्यासारखी प्राज्ञ परीक्षा मात्र उत्तीर्ण होता आली नाही.
शाळेत असताना गोव्याचं दर्शन झालं ते फक्त बा. भ. बोरकरांच्या 'माझ्या गोव्याच्या भूमीत' या 'पाठ्य' कवितेमुळे. काही भाग्यवंतांना चांगले (म्हणजे कवितेला चाली वगैरे लावून शिकवणारे) मास्तर होते आणि काही जणांना दामले मास्तरांसारखे 'गोव्याच्या म्हणजे गोवा राज्याच्या, भूमीत म्हणजे जमिनीत, गड्या म्हणजे मित्रा...', अशी सालं सोलून कविता शिकवणारे शिक्षक होते.
पण बोरकरांच्या या आनंदयात्रेकडे तुम्ही आणि सुनीताबाईंनी ज्या नजरेतून पहायला शिकवलंत, त्याने आमची दृष्टीच बदलली. 'बाकीबाब' आमचे झाले आणि 'लोभस इहलोकातच' राहण्याचा हट्ट करायला भाग पाडणारी ती 'रमलाची रात्र' आयुष्यभरासाठी मनात घर करून बसली.
तुमच्या कथाकथनात तुम्ही चितारलेली मुंबई आम्ही मोठे होईपर्यंत खूप बदलली होती. पण लोकलमध्ये शिरताना किंवा बसमधून उतरताना पेस्तनकाकांनी वर्णन करून सांगितलेला 'घाम ने घान ने घाम' फुटायला लागला आणि या अव्याहत गोंधळातला आपणही एक थेंब होऊन गेलो आहोत याची सचैल जाणीव झाली.
अख्खं शालेय जीवन 'क् क् क्' ची बाराखडी असलेले आणि 'काहीतरी नंबर 1' चे सिनेमे पाहत पोसलेल्या या डोळ्यांना मध्येच दूरदर्शनवर किंवा केबलवर एखाद्या रविवारी 'गुळाचा गणपती' पाहायला मिळाल्यानंतर होणारा हर्ष आणि 'एक होता विदूषक' पाहताना मनाची झालेली घालमेल काय वर्णावी!
कॉलेजात जायचं ठरल्यावर शाळेच्या इंग्रजीच्या सरांनी स्पेलिंग घालू नये म्हणून मराठी नाव असलेलंच कॉलेज निवडलं. प्रत्यक्ष कॉलेजात आल्यावरही वर्ग आणि लायब्ररीपेक्षाही नाटकाच्या तालमीचा हॉल आणि अमृततुल्य कुठे आहे हे शोधण्याची घाई जास्त.
रावसाहेब आणि बेळगावच्या नाटक कंपनीच्या गोष्टी ऐकत मनातल्या मनात स्टेज बांधलेल्या आम्हाला, कॉलेजातल्या नाटकाच्या तालमींच्या पहिल्या दिवशीपासूनच तो अवलिया कुठे भेटतो याची आस लागलेली. पण स्पर्धा आणि करंडकांच्या भाषेत बोलणाऱ्यांच्या गर्दीत हे असं 'ब्राँझचं काळीज' असणारा कुणी भेटलाच नाही.
कळत्या वयात आल्यानंतर तुमच्या विनोदामागे दडलेली संवेदनशीलता कळली. तुमच्याकडे केवळ 'एक विनोदी लेखक' म्हणून पाहण्याची चूक करणाऱ्या अनेक लोकांमध्ये आमचाही काही काळ समावेश होता हा सल मनात राहील.
साम्यवाद, समाजवाद आणि भांडवलवादाचं विश्लेषण करणारा लोकोत्तर अंतू बर्वा, शिवरायांचा इतिहास डोळ्यापुढे उभा करणारे हरीतात्या, ज्याची स्टाईल परिमाण ठरावी असा पॉश नंदा प्रधान आणि प्रत्येक लग्नघरात भेटणारा हरकाम्या नारायण ही सगळी माणसं आमच्या अनेक दशकं आधी जन्माला आली, लोकांच्या गळ्यातला ताईत बनली आणि तरीही ती आम्हाला कालबाह्य किंवा परकी वाटली नाहीत.
बाबांकडून घेतलेल्या, पानं पिवळ्या पडलेल्या बटाट्याच्या चाळीच्या आवृत्तीत आजही मी शाळेत एकपात्रीसाठी पाठ केलेल्या पंतांच्या उपासाची गोष्ट ताजी आहे. सतत ऐकून ऐकून दोन्ही बाजू घासल्या गेलेल्या कॅसेटमधली 'म्हैस' आजही हंबरते तेव्हा हसवून जाते. 'सुंदर मी होणार' मधली दीदी आणि डॉक्टर काकांची घालमेल पाहून काळजात चर्र होतं.
जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि वुडहाऊसच्या मोठेपणाने, त्यांच्या प्रतिभेने आम्ही दडपून गेलो नाही कारण त्याआधीच तुम्ही त्यांची हसत हसवत ओळख करून दिलीत. रेन अँड मार्टिनच्या व्याकरणाच्या पुस्तकातून घडलेल्या आमच्या इंग्रजीला तुमचं अकादमी पुरस्कार घेतानाचं सहज- सोपं आणि लाघवी इंग्रजी आधार देऊन गेलं.
साहित्यिकांच्या मांदियाळीत तुमचं स्थान असाधारण आहे. माणसात देव पाहणाऱ्या तुम्हाला काहींनी साक्षात देवस्थानीच नेऊन बसवलं ही गंमतच आहे नाही का? बहुत काय लिहिणे, तुमच्या साहित्याचा आमच्यावर लोभ असावा आणि लोभ असावा नाही, तो वाढावा हीच प्रार्थना.
तुमचाच,
एक लहानसा चाहता
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)