दिल्लीचा श्वास कोंडणारं धुरकं म्हणजे काय रे भाऊ?

    • Author, निरंजन छानवाल
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली

सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी राजधानी दिल्लीची सकाळ उगवली ती प्रदूषित धुराक्याच्या विळख्यात. परिस्थिती एवढी वाईट आहे की प्राथमिक शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे आणि शहरात आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असं दिल्ली सरकारने म्हटलंय.

शहराच्या काही भागात प्रदूषणाची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा 200 टक्क्यांनी जास्त असल्याचं स्पष्ट झालं आहे.

ऑक्टोबर महिन्यानंतर उत्तर भारतातील शेतकरी कापणीनंतर शेतातील काडीकचरा आणि उरलेले बुंधे जाळतात. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर तयार होतो.

उत्तरेकडून आणि वायव्येकडून वाहणारे वारे मग हा धूर दिल्लीच्या दिशेने घेऊन येतात. थंडीमुळे दिल्लीत धुकं पडायला सुरुवात झालेली असते. त्या धुक्यात हा धूर मिसळतो आणि धुरकं तयार होतं. यामुळे आधीच विषारी होत चाललेल्या दिल्लीच्या हवेत आणखी प्रदूषणाची भर पडते.

त्यातच वाहनांमधून आणि कारखान्यांमधून निघणारा धूर यात मिसळतो.

स्कायमेट या खाजगी वेधशाळेनं आगामी दोन दिवस दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाची पातळी अशीच राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

कशामुळे उद्भवली ही परिस्थिती?

पाकिस्तानसह उत्तर भारतातील आकाशात दाट धुकं तयार व्हायला सुरुवात झाली आहे. दुपारच्या वेळी पश्चिमी आणि वायव्यकडून येणारे वारे 10 ते 15 किलोमीटरच्या वेगानं वाहत आहेत.

या भागातील घनदाट धुकं दिल्लीच्या दिशेनं वाहून नेण्याचं काम हे वारे करत आहे. हेच वारे पंजाब आणि हरयाणा राज्यांमध्ये शेतीतील काडीकचरा आणि बुंधे जाळण्यातून निर्माण होणारा धूरही सोबत वाहून आणत आहे.

आरोग्यावर होणारे परिणाम

दिवसाला 50 सिगारेट ओढल्यास जेवढा धूर शरीरात जाईल, तितका धूर प्रत्येक दिल्लीकराला सहन करावा लागत आहे. सकाळ आणि सांयकाळच्यावेळी घराबाहेर पडणं टाळा. व्यायामाला जाणंही टाळा, असं यात म्हटलं आहे.

बहुसंख्य लोकांना डोळे चुरचुरणं, घसा दुखणं तसंच छातीत दुखण्याचा त्रास सुरू झाला आहे. निरुत्साह जाणवू शकतो आणि थकल्यासारखंही वाटू शकतं.

सरकारनं वयोवृद्धांसह लहान मुलं, सकाळी फिरायला जाणारी मंडळी, गरोदर स्त्रिया, दम्याचे रुग्ण आणि हृदयरोगींना विशेष काळजी करण्याचा सल्ला दिला आहे.

कार्यालयांमध्ये किंवा घरामध्ये हवा शुद्ध करणारी प्युरिफायर लावली जात आहेत.

धोक्याचा इशारा

इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) मंगळवारी धोक्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने तातडीनं पावलं उचलण्याची गरज संस्थेनं व्यक्त केली आहे.

मंगळवारपेक्षा बुधवारी परिस्थितीत थोडीफार सुधारणा दिसत आहे, असं IMAने स्पष्ट केलं. पण पुढचे दोन दिवस काळजी घ्यावी असं आवाहन IMAने केलं आहे.

काय करत आहे सरकार?

दिल्ली सरकारनं सर्व प्राथमिक शाळांना सुटी जाहीर केली आहे. बालदिन आणि हाफ मॅरेथॉनच्या आयोजनाविषयी सरकार पुनर्विचार करत आहे.

दिल्ली सरकार पुन्हा एखदा सम आणि विषम क्रमांकाच्या वाहनांना एक दिवसाआड रस्त्यावर उतरवण्याचा विचार करत आहे.

शेजारच्या राज्यांमधून दिल्लीत येणाऱ्या ट्रकवर निर्बंध आणण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली, असं हिंदुस्थान टाइम्सनं म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात करण्यात आलेल्या CRPFच्या जवानांसाठी 9 हजार मास्क मागविण्यात आले आहेत. हे जवान विमानतळाशिवाय दिल्ली मेट्रो आणि इतर मंत्रालयीन कार्यालयांबाहेर तैनात असतात.

दिल्लीत येणार असाल तर...

बाहेर पडताना मास्क वापरणं हे कधीही उत्तम. कार्यालयाऐवजी घरी राहून काम करता येत असेल, तर तो पर्याय निवडावा.

प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडल्यास प्रदूषणात भर पडणार नाही. सहकाऱ्यांची संख्या जास्त असल्यास कार-पुलिंगचा पर्यायही आहे. पण प्रवासात मास्क जरूर वापरावा.

वाहतुकीचं रिअल टाईम अपडेट आणि प्रदूषण पातळीविषयी वेळोवेळी माहिती करून घेतल्यास पुढील नियोजन करणं सोपं जाईल.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)