You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Bra : महिलांनी ब्रा घालायला कधी सुरुवात केली?
- Author, सिन्धुवासिनी
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी दिल्लीतल्या एका शाळेने 9 वी ते 12वीच्या विद्यार्थिनींसाठी एक आदेश काढला - "मुलींनी प्लीज त्वचेच्या रंगाची ब्रा घालावी, त्यावर स्लीपही घालावी."
या आदेशाचा अर्थ नेमका काय होता? त्वचेच्या रंगाचीच ब्रा कशासाठी? दिल्लीतल्या या कडकडीत उन्हात 'ब्रा'च्या वरती स्लीप घालण्याचा आदेश कशासाठी देण्यात आला? मूळात ब्राचा इतिहास काय आहे? हे सांगणारी बीबीसीची बातमी पुन्हा शेयर करत आहोत.
तसं पाहायला गेलं तर या आदेशात काही नवीन नाही, आणि हा आदेश काही पहिल्यांदाच देण्यात आलाय, असंही नाही.
महिलांची अंतर्वस्त्रांकडे, खासकरून ब्राकडे एक लैंगिक वस्तू पाहिलं जातं. आजही अनेक महिला ब्राला इतर कपड्यांखाली झाकून ठेवतात. आतल्या खोल्यांमध्ये कुठेतरी वाळी घालतात, जिथे कुणाचीही नजर जात नाही.
इथे एखादा पुरुष आपली बनियन लपून वाळवतो का, हा मात्र शोधाचा विषय आहे.
आजही लोक एखाद्या मुलीच्या 'ब्रा'चे पट्टे बघून अस्वस्थ होतात. पुरुषच नाही तर महिलाही अस्वस्थ होतात आणि एकमेकींना इशारा करून बाहेर आलेला पट्टा आत ढकलण्यासाठी सांगतात.
या गोष्टी जुनाट वाटत असतील तरी तुम्हाला हे सांगायला हवं की, कंगना राणौतच्या 'क्वीन' चित्रपटात सेन्सॉर बोर्डानं एका सीनमध्ये ब्राला ब्लर करायला सांगितलं होतं.
गेल्या वर्षी साहित्य कला परिषदेनं एका नाटकाचा प्रयोग अस्वस्थ करणाऱ्या कारणाहून बंद केला होता. या नाटकातल्या एका दृश्यामध्ये ब्रा आणि पँटी अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे, अशी त्यावेळी चर्चा होती.
पण आयोजकांच्या मते, त्यांना हरकत फक्त ब्रा किंवा पँटी सारख्या शब्दांमुळे नव्हती तर नाटकात अनेक अश्लील शब्दांचा वापर करण्यात आला होता.
महिलांशी चर्चा केल्यावर तुम्हाला लक्षात येईल की ब्रा घालणं त्यांच्यासाठी किती महत्त्वाचं आहे. तसंच हेही लक्षात येईल की, ब्रा घालणं हा काही सुखावह अनुभव नाही. यामुळे त्यांना खूप त्रासही होतो.
हळूहळू ब्रा घालायला सुरुवात
24 वर्षीय रचनाला सुरुवातीला ब्रा घालायला आवडायचं नाही. पण नंतर मात्र तिला याची सवय झाली, किंवा असं म्हणू शकता की तिने सवय लावून घेतली.
"आई मला ब्रा घालायला लावायची तेव्हा मला तिचा राग यायचा," रचना सांगते. "ब्रा घातल्यानंतर शरीर बांधल्या-बांधल्यासारखं वाटतं, पण नंतर मला याची सवय झाली. आता ब्रा नाही घातली तर वेगळंच वाटतं," रचना पुढे सांगते.
"गावांमध्ये ब्राला बॉडी म्हणतात. शहरातल्या काही मुली 'बी' म्हणून काम भागवतात. सरळ ब्रा म्हटल्यानंतर काय संकटच ओढवणार आहे, कुणास ठाऊक," रीवा सांगते.
गीतालाही असंच काहीतरी वाटतं. "आपण आपल्या शरीराचा सहजपणे स्वीकार केला तर लोकही त्याला तितक्याच सहजतेने स्वीकारतात," गीता सांगते.
"ब्रा न घालता सार्वजिनक ठिकाणी जायचं म्हटल्यावर सुरुवातीला मला अस्वस्थ वाटायचं, पण नंतर सवय होत गेली," गीता पुढे सांगते.
आज बाजारात हजारो प्रकारच्या ब्रा मिळतात - पॅडेड, अंडरवायर, स्ट्रॅपलेसपासून ते स्पोर्ट्स ब्रापर्यंत अनेक प्रकार आहेत. काही स्तनभार दाखवण्यासाठी तर काही लपवण्यासाठी.
पण ब्रा घालायची सुरुवात कशी झाली?
बीबीसी कल्चरमधल्या एका लेखानुसार, 'brassiere' या फ्रेंच शब्दाचं ब्रा हे संक्षिप्त रूप आहे. 'Brassiere'चा अर्थ शरीरचा वरचा भाग असा होतो.
पहिली मॉर्डन ब्रा फ्रान्समध्ये तयार करण्यात आली होती.
फ्रान्सच्या हर्मिनी कॅडोल यांनी 1869मध्ये कॉर्सेटला दोन तुकट्यांत तोडून अंतर्वस्त्र बनवलं होतं. याच वस्त्राचा वरचा भाग नंतर ब्रा म्हणून घालण्यात येऊ लागला आणि नंतर तसा विकण्यातही आला.
असं असलं तरी सर्वप्रथम ब्रा कधी आणि कशी तयार करण्यात आली, याचं एकच उत्तर देणं अवघड काम आहे.
स्तन दिसू नयेत म्हणून...
ग्रीसच्या इतिहासात ब्रासारख्या दिसणाऱ्या कपड्यांचं चित्रण केलेलं आहे. स्तन झाकण्यासाठी रोमन साम्राज्यातल्या महिला छातीभोवती एक कपडा बांधायच्या.
याउलट काही ग्रीक महिला स्तनांखाली एक पट्टा बांधून त्यांना उभारी द्यायचा प्रयत्नही करायच्या.
आज आपण ज्या प्रकारची ब्रा दुकानात पाहतो तशी 1930मध्ये अमेरिकेत तयार करण्यास सुरुवात झाली.
आशियात मात्र ब्रासंबंधी स्पष्ट असा इतिहास सापडत नाही.
ब्रा आली आणि विरोध सुरू झाला...
प्रसिद्ध फॅशन मॅगजिन 'वोग'नं 1907मध्ये 'brassiere' शब्द लोकप्रिय होण्यात मोठी भूमिका निभावली. यानंतर ब्राचा विरोध होण्यास सुरुवात झाली.
याच काळात काही स्त्रीवादी संघटनांनी ब्रा घातल्यामुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांची जाणीव करून देण्यास सुरुवात केली. तसंच महिलांना असे कपडे घालाण्याचा सल्ला दिला जे त्यांना सर्व प्रकारच्या सामाजिक आणि राजकीय बंधनांतून मुक्त करतील.
आधुनिक ब्राची सुरुवात
1911मध्ये ब्रा या शब्दाला ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीत स्थान मिळालं.
यानंतर 1913मध्ये मेरी फेल्प्स नावाच्या एका प्रसिद्ध व्यक्तीने रेशमचा रुमाल आणि रिबन वापरून स्वत:साठी ब्रा बनवली. 1914मध्ये त्यांना यासाठीचा पेटंटही मिळालं.
मेरी यांनी बनवलेल्या ब्राला आधुनिक ब्राचं प्राथमिक रूप म्हणता येईल. पण या ब्रामध्ये अनेक उणिवा होत्या.
ही ब्रा स्तनांना उभारी देण्याऐवजी त्यांना सपाट करत होती आणि एकाच साईजमध्ये उपलब्ध होती.
महिलांनी ब्रा जाळली तेव्हा...
1921मध्ये अमेरिकन डिझायनरआइडा रोजेंथल यांना वेगवेगळ्या साईजची ब्रा बनवण्याची कल्पना सुचली. यानंतर खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या साईजसाठीचे ब्रा तयार होऊ लागल्या.
'ब्रा'च्या प्रचार आणि प्रसाराचा जो काळ इथपासून सुरू झाला तो आजतागायत कायम आहे.
1968मध्ये जवळपास 400 महिला 'मिस अमेरिकन ब्युटी पेजंट' स्पर्धेचा विरोध करण्यासाठी एकत्र आल्या. त्यावेळी त्यांनी ब्रा, मेकअपचं सामान आणि हाय हील्ससोबत इतर काही वस्तू कचऱ्याच्या पेटीत फेकल्या. ज्या पेटीत या वस्तू फेकण्यात आल्या तिला 'फ्रिडम ट्रॅश कॅन' असं म्हणण्यात आलं.
महिलांना सौंदर्याच्या पातळीच्या चौकटीत बसवण्याची ही धडपड असल्याचं सांगत हा विरोध करण्यात आला होता.
'ब्रा नाही तर प्रॉब्लेम नाही'
1960च्या दशकात 'ब्रा बर्निंग' सारखा विरोध महिलांमध्ये खूपच लोकप्रिय झाला होता. प्रत्यक्षात मात्र खूप कमी महिलांनी ब्रा जाळल्या होत्या.
हा एक प्रातिनिधिक विरोध होता. अनेक महिलांनी ब्रा जाळल्या नाहीत पण विरोध दर्शवण्यासाठी ब्रा न घालता त्या बाहेर पडल्या होत्या.
2016मध्ये पुन्हा एकदा ब्रा विरोधी मेहिमेनं सोशल मीडियावर जोर धरला. याला कारण ठरली एक घटना.
17 वर्षांच्या कॅटलीन जुविक टॉपच्या आत ब्रा न घालता शाळेत गेली आणि शाळेच्या उपमुख्यध्यापकानं तिला बोलावून ब्रा न घालण्याचं कारण विचारलं.
कॅटलीननं या घटनेचा उल्लेख तिच्या स्नॅपचॅटवर केला आणि तिला अनेकांचं समर्थन मिळालं. अशा प्रकारे 'No Bra, No Problem' या मोहिमेची सुरुवात झाली.
'ब्रा'बद्दल अनेक समज आहेत. अनेक शोधांनुसार ब्रा घालण्याचे काय फायदे आहेत, तोटे काय आहेत, हे आजही स्पष्टपणे समोर आलेलं नाही.
ब्रा घातल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होतो, असं बोललं जातं. पण अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, याचं कोणतंही वैज्ञानिक प्रमाण आजपर्यंत मिळालेलं नाही.
पण हो, 24 तास ब्रा घालणं अथवा चुकीच्या साईझची ब्रा घालणं नुकसानदायी ठरू शकतं. यामुळेच डॉक्टर गरजेपेक्षा जास्त फीट ब्रा घालणं अथवा चुकीच्या साईजची ब्रा न घालण्याचा सल्ला देतात. तसंच झोपताना हलके आणि सैल कपडे घालण्यास सांगितलं जातं.
महिलेला शारीरिक हालचाली करण्यासाठी ब्रा महत्त्वाची भूमिका बजावते, हे खरं आहे. खासकरून व्यायाम, खेळ आणि शारीरिक मेहनतीच्या कामं करताना ब्राची खूप मदत होते.
समाज इतका अस्वस्थ का?
आज ब्राकडे महिलांच्या कपड्यांमधील एक अनिवार्य भाग म्हणून पाहिलं जातं. ब्राच्या विरोधात आज कमी विरोध होताना दिसतो.
ब्राचा विरोध व्हायला हवा की नको, या प्रश्नापेक्षा ब्राविषयी समाज इतका अस्वस्थ का आहे, हा प्रश्न मोठा आहे. ब्राच्या रंगावरून वाद, ब्राच्या दिसण्यावरून वाद, ब्राच्या उघड्यावर सुखण्यावरून वाद तसंच ब्रा या शब्दावरूनही वाद.
महिलेचं शरीर आणि तिचे कपडे यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अशाप्रकारचे प्रयत्न का केले जात आहेत?
शर्ट, पँट आणि बनियान या कपड्यांप्रमाणेच ब्रासुद्धा एक वस्त्रच आहे. ब्राकडे आपण एक वस्त्र म्हणूनच पाहायला हवं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)