बलात्कारानंतर सावरणाऱ्या सेक्स वर्कर्सच्या मुलींची कहाणी

    • Author, दिव्या आर्य
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

संध्या मुंबईतल्या सांताक्रूझजवळच्या रेडलाईट वस्तीत लहानाची मोठी झाली. तिची आई सेक्स वर्कर आहे.

आईसोबत राहत असल्याने आर्थिक सुरक्षा होती. पण अवतीभवतीचं वातावरण अजिबात सुरक्षित नव्हतं. 10 वर्षांची असतानाच पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार झाला आणि त्यानंतरही अनेकदा तिने त्या यातना भोगल्या.

पण मी तिला इंग्लंडमध्ये भेटले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर सकारात्मकता होती. ज्या ठिकाणी तिच्यावर वारंवार बलात्कार झाला, त्या ठिकाणाविषयी ती आजही चांगलंच बोलली.

"तिथं लहानाचं मोठं होण्याचा अनुभव मस्त होता. तिथल्या सगळ्या बायका आमच्यासाठी आमच्या आयाच होत्या. बाहेरच्या समाजाने आमचं जगणं अंध:कारमय असल्याची प्रतिमा रंगवली आहे. आमच्यासाठी मात्र ही वस्ती सुरक्षित आहे," चेहऱ्यावर हास्य खेळवत संध्याने सांगितलं.

संध्या कमजोर कधी नव्हतीच. पण तिला दिशा मिळाली 'क्रांती' या सेक्स वर्कर आणि वंचित मुलींसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेकडून. क्रांती या संस्थेनं सुरुवातीला अशा 18 मुलींना एकत्र आणलं. रेडलाईट वस्तीतून या मुलांना बाहेर काढून मुख्य वस्तीतल्या जागी त्यांच्यासाठी हॉस्टेल सुरू केलं.

संध्या आणि तिच्या मैत्रिणींची रेडलाईट वस्तीतूनसुटका झाली. त्या हॉस्टेलमध्ये गेल्या.

"जगात सगळ्यांचंच आयुष्य कडू-गोड प्रसंगांनी भरलेलं असतं. संघर्ष प्रत्येकालाच करावा लागतो. पण, सगळ्यांसाठी एक गोष्ट कायम आहे - ती म्हणजे आशा. पुढे काय करायचं आहे त्यापासून माझा भूतकाळ मला थांबवू शकत नाही. माझा भूतकाळ मला दुर्बळ करत नाही," संध्याने सहजपणे सांगितलं.

मला लक्षात आलं, ती या अनुभवांकडे डोळसपणे पाहते. नियमित आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते.

संध्याच्या चेहऱ्यावर एक मोकळं हसू होतं. पण आपला भूतकाळ लपवण्यासाठी ते बाणवलेलं नाही तर भूतकाळातून कमावलेल्या ताकदीतून ते फुललं होतं.

संध्या आणि तिच्या मैत्रिणी इंग्लंडमध्ये आल्या होत्या इथल्या आंतरराष्ट्रीय थिएटर ऑलिंपिकमध्ये त्यांचं नाटक सादर करण्यासाठी. नाटकातली सगळी पात्र संध्यासारखीच. एक तर रेडलाईट एरियात वाढलेली किंवा इतर कारणांनी वंचितांचं जिणं जगणारी.

मुलींनी सादर केलेलं नाटकही त्यांच्याच अनुभवांवर बेतलेलं होतं. जीवनातले खरे प्रसंग त्यांनी नाट्यरूपात मांडले होते. रेड लाईट वस्तीत लहानाचे मोठे होताना अनुभवलेले प्रसंग...

'मी आई-वडिलांनी माफ केलं'

''मी अकरा वर्षांची असताना माझे वडील वारले. तेव्हापासून माझ्या आईबद्दल माझ्या मनात प्रचंड राग होता. कारण तिने दुसऱ्याच दिवशी घरात एका पुरुषाला आणलं आणि मला सांगितलं की हे माझे नवीन वडील आहेत. या वडिलांनी पुढे मला आणि आईला फक्त मारहाणच केली. रोज केली.''

पण संध्याप्रमाणे या मुलीच्या मनातही कटूता नाही. तिने आपल्या आई आणि वडिलांना चक्क माफ केलं आहे.

''मी जीवनात यशस्वी झाले आहे. कारण मी माझे सावत्र वडील आणि आई यांना माफ केलं आहे. तीही माणसंच आहेत. आपल्या परीने तीही आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहेत. फक्त त्यांच्या जगण्याला काही मर्यादा आहेत. माझ्या आयुष्यात एक गोष्ट मी शिकले आहे, क्षमाशीलता ही माझ्याकडून स्वत:ला आणि इतरांना दिलेली माझी सर्वोत्तम भेट असेल.''

या मुलीचं नाव तिच्या विनंतीवरून आम्ही गुप्त ठेवलं आहे. शिक्षणामुळे या मुलींच्या आयुष्यात किती फरक पडला आहे?

क्रांती संस्थेनं मुंबईत हा उपक्रम सुरू केला 18 मुलींसह. 12 ते 21 वयोगटातल्या या मुली आहेत. शिक्षणाचा गंध नसलेल्या. त्यामुळे त्यांची शाळा रोज भरते तीही अगदी वेगळ्या पद्धतीने.

त्यांच्या खास शाळेत योग, ध्यानधारणा, लेखन आणि संगीत शिकवलं जातं. मग संध्याकाळच्या वेळेत इंग्रजी, नाटक आणि आरोग्य यांचे वर्ग भरतात. हळूहळू यातल्या काही मुलींनी डिग्रीपर्यंतचं शिक्षणही पूर्ण केलं आहे. आता त्यांना आस आहे सर्वसामान्य जीवन जगण्याची.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)