You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आम्ही प्रेमात आहोत, पण कधी सेक्स करत नाही'
- Author, क्लेर विलियम्स
- Role, बीबीसी व्हिक्टोरिया डर्बशायर प्रोग्राम
दोघा जोडीदारांचं एकमेकांवर नितांत प्रेम आहे, पण त्यांच्यात शारीरिक संबंध नाहीत. काही जोडीदार असेही आहेत की काम, मुलांचं पालणपोषण यांच्यामुळे कामेच्छा कमी झाली आहे. पण असं का होतं? अशा संबंधात या व्यक्तींच्या काय भावना असतात?
Mumsnet आणि Gransnet या वेबसाईटने सेक्ससंबंधी 2000 लोकांचा एक सर्व्हे केला आहे. यातून अनेक आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत.
30 वर्षांखालच्या जवळपास 18% लोकांनी गेल्या वर्षभरात दहावेळाही शारीरिक संबंध ठेवलेले नाही. तर सर्वच वयोगटात ही टक्केवारी 29% आहे, असं यातून दिसून आलं आहे.
एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या, मात्र या वर्गात मोडणाऱ्या तीन जोडप्यांना आम्ही भेटलो आणि त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
"आमच्यात शरीर संबंध कमी होण्यासाठी मी जबाबदार आहे. सततच्या कामामुळे मी दमून गेलेले असते. यामुळेच माझ्यात कामेच्छा राहिलेली नाही." 35 वर्षांची अमांडा बीबीसी व्हिक्टोरिया डर्बशायर या कार्यक्रमात सांगत होती.
अमांडा आणि स्टीव्ह यांच्या लग्नाला सहा वर्षं झाली आहेत. त्यांचा मुलगा 22 महिन्यांचा आहे. आणि त्यांच्यातील संबंधातील प्रमाण आता 6 आठवड्यांतून एकदा इतकं कमी आलं आहे.
घरभर फिरणाऱ्या आपल्या मुलाकडे ते जेव्हा या मागच कारण सांगतात, तेव्हा त्यांना हसू आवरत नाही.
स्टीव्ह म्हणतात, "मुलगा घरात फिरत असताना दिवसा किंवा दुपारी सेक्स करणं शक्य नसतं. तो दोन तासांसाठी झोपवला तर आम्हाला वाटत 'अरे एवढ्या वेळेत दुसरं काहीतरी काम उरकून घेऊ' किंवा थोडी झोप घेऊ."
मात्र Relate या संस्थेचे सेक्स थेरपिस्ट आणि समुपदेशक मार्टिन बरो सांगतात केवळ पालकांचं सेक्स लाईफ कमी झालं आहे, असं नाही तर लैंगिक जीवनात समाधानी नसल्याची तक्रार अनेकांची आहे.
"याचं कारण लोकं आता सेक्सविषयी मोकळेपणानं बोलू लागले आहेत. सेक्स करण्याचं प्रमाण कमी होत चाललं आहे, हे खरं असलं तरी याबद्दल खात्रीपूर्वक सांगता येणार नाही," असं ते म्हणाले.
"सेक्स असो किंवा नसो, तुमच्या जोडीदारासोबतचं तुमचं नातं सुदृढ असू शकतं. काहींना आनंदी राहण्यासाठी सेक्सची गरज असते. काहींना नसते," असं ते म्हणाले.
23 वर्षांचे जेकब आणि शर्लोट यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. मात्र सेक्स त्यांच्या नात्याचा भाग नाही.
शर्लोट सांगते, "आम्ही गेली चार वर्षं एकत्र आहोत. त्यातली गेली तीन वर्षं आम्ही सेक्स केलेला नाही आणि तसं काही आमच्या मनातही नाही."
शर्लोट 'Asexual' आहे. म्हणजे तिच्यात कामेच्छा निर्माणच होत नाही. मात्र जेकब तसा नाही.
"सुरुवातीचे सहा महिने आम्ही सेक्स करून पाहिलं. पण ते खूप थकवणारं होतं. त्यातून दोघांनाही आनंद मिळत नव्हता. कामेच्छा नसलेल्या व्यक्तीसोबत जेकबला सेक्स करायचं नाही. अशावेळी इतर कुणी नातं तोडलं असतं. पण जेकबने तसं केलं नाही," असं शर्लोट सांगते
जेकब म्हणतो, "एका सुंदर व्यक्तीबरोबर माझं उत्तम नातं आहे. प्रेम व्यक्त करण्याचे इतरही मार्ग असतात."
मात्र सगळेच इतके समजूतदार नसतात.
शर्लोट म्हणते, " मी याबद्दल एखाद्याशी काही बोलू शकेन असं मला वाटत नाही. हे माझ्यावरच दडपण नसून प्रत्यक्षात मी निवडलेला पर्याय आहे. काही जणांसाठी आनंदापेक्षा सेक्स महत्त्वाचं असतं."
ब्रिस्टॉलचे थॉम आणि स्टीव्ह गेल्या चार वर्षांपासून एकत्र आहेत. गेल्यावर्षीच त्यांचं लग्न झालं. मात्र त्यांनी कधीच सेक्स केलेलं नाही.
दोघंही 'Asexual' आहेत. गमतीने ते म्हणतात, "आमच्या पहिली डेटवेळी आम्ही एकत्र झोपलो होतो. दोघांसाठीही उत्तम वन नाईट स्टँड होती. कारण तेव्हा आम्हा दोघांमध्ये काहीच घडलं नाही."
थॉम म्हणतात, "समाज खूपच कामेच्छुक होत चालला आहे, मात्र लोक जास्त सेक्स करत असल्याचं त्यातून दिसत नाही."
ते सांगतात,"सेक्स करण्यासाठी खूप दबाव आहे. कदाचित जास्तीत जास्त नियमित सेक्स करण्यासाठी लोकं स्वतःवरच बळजबरी करत आहेत. आम्ही कधीच शरीरसंबंध ठेवलेले नाहीत हे लोकांना कळत तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं. लोकांना प्रश्न पडतो सेक्स न करताही आम्ही एकमेकांवर प्रेम कसं करू शकतो?"
यावर त्यांचं उत्तर असतं, "प्रेम नसताना सेक्स करू शकता. मग सेक्सशिवाय प्रेम का करू शकत नाही?"
नात्यामध्ये सेक्सचं प्रमाण किती असावं याचं ठोस उत्तर नाही, असं मार्टिन यांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते काहीजण सेक्स न करतासुद्धा खूप जवळ येऊ शकतात.
इतरांमध्ये मुलं, काम, ताण आणि आजारांमुळे सेक्सचं प्रमाण कमी होत असतं, असं दिसून आलं आहे.
अमांडाच्या मते सेक्स न करतासुद्धा दोघांमध्ये सुदृढ आणि घट्ट नातं निर्माण होतं आणि त्यामागे दोघांतील संवाद हे महत्त्वाच कारण आहे.
नव्याने पालक झालेल्यांना ती सांगते, "पूर्वीसारखं सेक्स करता येत नाही, यासाठी फार दुःखी होऊ नका. कारण हे आपल्या सर्वांबाबतीतच घडत असतं.
जुने दिवस परत येतील, असं म्हणत ती स्टीव्हकडे पाहून हसते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)