You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रकांत पाटील - 'करुणा शर्मा एकट्या लढत आहेत, भाजप त्यांच्या पाठीशी आहे' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. करुणा शर्मा एकट्या लढत आहेत, भाजप त्यांच्या पाठीशी आहे- चंद्रकांत पाटील
अॅट्रॉसिटीचा एवढा दुरूपयोग कधीही पाहिली नव्हता. भाजप करुणा शर्मा यांच्या पाठीशी आहे. त्यांना न्यायालयात साथ देणे आणि त्यांच्यासाठी आंदोलन करण्याबाबत भाजप विचार करेल, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय..
सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित असलेल्या करुणा शर्मा यांना रविवारी (5 सप्टेंबर) बीड जिल्ह्यातील परळीत अटक करण्यात आली होती. करुणा शर्मा यांनी अटकेनंतर "धनंजय मुंडेंनी जबरदस्तीने माझ्यावर गुन्हा दाखल केला," असा आरोप केला.
"करुणा शर्मा परळी येथे गेल्यानंतर त्यांना गुन्ह्यात गोवण्यात आलं. त्यांच्या बनावट आवाजात क्लिप तयार करून व्हायरल करण्यात आली. त्यांच्या गाडीत एक महिला पिस्तूल ठेवत असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या गाडीच्या चालकावरही अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ॲट्रॉसिटी कायद्याचा इतका दुरुपयोग कधी पाहिला नव्हता. करुणा शर्मा एकट्या लढत आहेत. अशा स्थितीत भाजप करुणा शर्मा यांच्या पाठीशी राहील," असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, बीड पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या करुणा शर्मा यांच्या सांताक्रूझ येथील घरी बीड पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलं. करुणा शर्मा यांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आलीये. टीव्ही9 मराठीने ही बातमी दिली आहे.
2. आम्ही न सांगता नांदेडला गर्दी जमली होती...आता सांगून बघू का?- संभाजीराजेंचा इशारा
"राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत पाठवलेलं पत्र अधिकाऱ्यांनी लिहून पाठवलंय. फक्त पाठवायचं म्हणून हे लेखी उत्तर पाठवलंय. मुख्यमंत्र्यांनी देखील याची पुरेशी दखल घेतली नाही", असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय.
काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये बोलताना खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारच्या भूमिकेवर परखड टीका केली होती. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात पाठवलेलं पत्र आपल्याला मान्य नाही, असं म्हणत संभाजीराजे यांनी म्हटलंय.
बुधवारी (8 सप्टेंबर) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी पुन्हा सरकारच्या भूमिकेवर टीका केली.
"आवाज उठवायचा म्हटला तर मी करू शकतो. आम्ही न बोलवता किंवा सांगता देखील नांदेडला 50 ते 70 हजार लोक हजर होते. रायगडसारख्या ठिकाणी आम्ही सुरुवात करू. नांदेड ही फक्त एक झलक होती. तीही न सांगता. सांगून बघू का? मग बघा," असा इशाराही संभाजीराजेंनी दिला.
यावेळी बोलताना संभाजीराजे भोसले यांनी आपण समाजाला वेठीला न धरता एकटे आंदोलन करू, ज्यामुळे करोनामध्ये होणारी गर्दी टाळता येईल, असं देखील नमूद केलं.
लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
3. डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का?- आशिष शेलार
'आज जरी मंदिरं बंद असली, तरीदेखील आपण सध्या अत्यावश्यक आरोग्य मंदिरं उघडत आहोत. त्याबद्दल जनता नक्कीच आशीर्वाद देईल,' असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. आरोग्य केंद्र बंद करून त्याच्याबाजूचे मंदिर उघडू? असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला होता.
कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील मंदिरं बंद आहेत. भाजपकडून मंदिरं उघडण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (7 सप्टेंबर) एका कार्यक्रमात बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली होती.
मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे.
राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रं आहेत का? असा सवाल करत भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
"पब, रेस्टाँरंट, डिस्को, बार यांचे मालक यांच्याशी वाटाघाटी होतात आणि वाटाघाटी नंतर ते खुले होतात. एक्साईजची कमाई हवी म्हणुन दारुची दुकानं उघडी केलीत. मॉलमधल्या कामगारांच कारण सांगून मॉल उघडे केलेत, मग या मंदिरांच्या बाहेर नारळ, अगरबत्ती, धूप, फुलं विकणारे यांची उपासमार दिसत नाही?
त्यांना जगण्याचा अधिकार नाही? मंदिरात किती लोक आले पाहिजेत या बद्दल कोरोनाचे नियम करुन बाहेर नारळ,अगरबत्ती, फुल विकणाऱ्यांचं पोट भरु शकत नाही का?" असं आशिष शेलार यांनी म्हटलं.
झी24तासनं ही बातमी दिली आहे.
4. रब्बी पिकांसाठी MSP वाढवण्याचा सरकारचा निर्णय
केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने गहू, बाजरी, हरभरा, मसूर, मोहरी आणि केशर यांची एमएसपी वाढवली आहे. गव्हाच्या एमएसपीत 40 रुपये, मोहरीच्या एमएसपीत 400 रुपये, सूर्यफुलाच्या एमएसपीत 114 रुपये, मसूरच्या एमसपीत 400 रूपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे.
बुधवारी (8 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठीत गहू, ज्वारी-बाजरी, मोहरी, वाटाणे-हरभरा अशा पिकांच्या एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच वस्त्रोद्योगाला प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) म्हणजे उत्पादनासंबंधी चालना देण्याच्या धोरणालाही मान्यता देण्यात आली आहे.
या क्षेत्रात 10 वेगवगेळ्या उत्पादनांसाठी पुढील 5 वर्षं 10,600 कोटी रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे.
महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.
5. 'डोअर टू डोअर' व्हॅक्सिनेशनचा आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार
सर्वोच्च न्यायालयाने 'डोअर टू डोअर व्हॅक्सिनेशन' म्हणजे घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा आदेश द्यावा अशा आशयाच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. सध्याचा लसीकरणाचा कार्यक्रम हा व्यवस्थित सुरु आहे, असं सर्वोच्च न्यायायलाने सांगितलं.
यूथ बार असोसिएशन नावाच्या संस्थेने दाखल केलेल्या एका याचिकेत असं म्हटलं होतं की, घरोघरी जाऊन लसीकरण केल्यास सध्याच्या लसीकरणाच्या कार्यक्रमात वेग येईल. वयोवृद्ध नागरिक, दिव्यांग आणि इतर दुर्बल घटकांना याचा फायदा होईल. पण न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या बेंचने असा आदेश देण्यास नकार दिला.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, "घरोघरी जाऊन लसीकरण करायचं म्हटल्यावर प्रशासनासमोर अनेक अडचणी उभ्या राहतील. देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमावर सुरुवातीपासून सर्वोच्च न्यायालयाचं लक्ष आहे. सध्या देशात लसीकरणाचा कार्यक्रम योग्य आणि व्यवस्थित सुरु आहे."
दरम्यान, भारतातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने 70 कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी ही माहिती दिली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)