कोरोना व्हायरस : केरळमध्ये ऑक्सिजनची कमतरता का भासली नाही?

फोटो स्रोत, Hindustan Times
- Author, इमरान कुरैशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
देशात कोव्हिड-19 ची दुसरी लाट त्सुनामीसारखी पसरली. महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेशसारख्या राज्यात आरोग्य व्यवस्थेचा कणा मोडला. राजधानी दिल्लीत कोरोनाने हाहा:कार उडवून दिला.
श्वास घेण्यासाठी, जगण्यासाठी लोक तडफडताना पहायला मिळाले. रुग्णांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी नातेवाईकांची फटफट झाली. काहींनी ऑक्सिजन आणि रुग्णालयात जागा न मिळाल्याने रस्त्यावर जीव सोडला.
महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये ऑक्सिजनविना रुग्णांचे हाल होत असताना केरळमध्ये मात्र जगण्यासाठी ऑक्सिजनची कमतरता जाणवत नाहीये. गरज पडल्यास आणखी ऑक्सिजन उत्पादन करण्याची क्षमता या राज्यामध्ये आहे.
सद्यस्थितीत केरळकडून 70 मेट्रिक टन ऑक्सिजनचा तामिळनाडूला आणि 16 मेट्रिक टनचा कर्नाटकला पुरवठा केला जातोय.
डॉ. आर वेणुगोपाळ मेडिकल ऑक्सिजन मॉनिटरिंगचे नोडल अधिकारी आहेत.
बीबीसीशी बोलताना ते म्हणतात, "कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी राज्याला दररोज 35 मेट्रिक टन आणि इतर रुग्णांसाठी 45 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. सद्यस्थितीत आमची उत्पादन क्षमता 199 मेट्रिक टन आहे. येत्याकाळात गरज भासली तर, उत्पादन वाढवता येईल."

फोटो स्रोत, Hindustan Times
केरळमध्ये ऑक्सिजनची कमतरता न भासण्याचं प्रमुख कारण म्हणजे, इतर राज्यांच्या तुलनेत रुग्णांना ऑक्सिजनची लागणारी गरज कमी आहे. देशातील इतर राज्यांमध्ये ऑक्सिजन वेळेवर न मिळाल्याने लोकांना जीव गमवावा लागला आहे.
केरळच्या कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. मोहम्मद अशील सांगतात, "आम्ही संसर्गाच्या पहिल्या टप्प्यातच लोकांना शोधू शकतोय. रुग्णांवर उपचार तात्काळ सुरू केले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला ऑक्सिजन लावण्याची गरज नाहीये."
देशातील इतर राज्यांप्रमाणे, गावागावातील आशा सेविका आणि पंचायत समितीचे स्थानिक सदस्य, केरळच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे.
डॉ. अशील पुढे सांगतात, "आम्ही गावागावात वॉर्ड समिती कार्यानवित केली. वॉर्ड समितीचे सदस्य रुग्णांची ओळख करतात. ताप असलेल्या प्रत्येक रुग्णाची कोव्हिड टेस्ट केली जाते. त्यानंतर उपचार सुरू होतात."
दररोज रुग्णांसाठी ऑक्सिजन लागत असल्याने, मागणी 73 मेट्रिक टनावरून 84 मेट्रिक टन पोहोचलीये.

- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-लहान मुलांमध्ये कोव्हिड-19ची कोणती लक्षणं आढळतात? MIS-C म्हणजे काय?
- वाचा-कोरोनाची लक्षणं जाणवल्यावर कोणती टेस्ट करायची?
- वाचा-लस घेण्यासाठी Co-Win वर नोंदणी कशी करायची?
- वाचा- कोरोना लसीकरणाबाबत तुम्हाला पडलेले 15 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

पण मेडिकल ऑक्सिजन मॉनिटरिंगचे नोडल अधिकारी डॉ. वेणुगोपाळ यांना हे आकडे चिंतेचा विषय वाटत नाहीत.
ते म्हणतात, "सद्यस्थितीत राज्यातील सर्व ऑक्सिजन फिलिंग प्लांट पूर्ण क्षमतेने काम करत नाहीयेत. राज्यात 11 एअर सेपरेशन युनिट आहेत. मागणी वाढली तर सर्व प्लांट 100 टक्के क्षमतेने कार्यान्वित केले जातील."
सध्या आयनॉक्सकडून दररोज 149 मेट्रिक टन ऑक्सिजनचं उत्पादन केलं जातंय. ASU प्लांटद्वारे 44 मेट्रिक टन तर, KMML कडून 6 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण केला जातोय. याचसोबत, कोचिन शिपयार्ड 5.45 मेट्रिक टन आणि बीपीसीएलकडून 0.322 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण होत आहे.
डॉ. वेणुगोपाळ म्हणतात, "गरज पडल्यास सहा महिन्यात ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढवण्याची आमची तयारी आहे."
आयनॉक्स, ASU, KMML आणि बीपीसीएलची दररोज उत्पादन क्षमता 204 मेट्रीक टन आहे. पलक्कड जिल्ह्यात एक ASU प्लांट येत्या महिनाभरात उभारण्यात येईल. या प्लांटमध्ये चार मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती शक्य आहे.
राज्यातील सर्व ऑक्सिजन प्लांट 24 तास सुरू राहू शकतात. यांच्यातून राज्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात ऑक्सिजन सिलेंडर पाठवला जाऊ शकतो, असं डॉ. वेणुगोपाळ म्हणतात.

फोटो स्रोत, Hindustan Times
यावर्षी केरळ इतर राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करतोय. पण, आश्चर्य म्हणजे, गेल्यावर्षी केरळमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासला होता.
पण, कोरोनाच्या पहिल्या लाटेतून शिकून केरळने दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्यात मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती वाढवण्यास सुरूवात केली.
डॉ. वेणुगोपाळ म्हणतात, गेल्यावर्षी आम्ही केलेल्या प्रयत्नांचं आता चीज झालंय.
केरळमध्ये सोमवारी 21 हजारपेक्षा जास्त नवीन कोरोनारुग्णांची नोंद झाली. सरकारच्या माहितीनुसार, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत कमी झालेली पहायला मिळत आहे.
केरळमध्ये संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेला नाही. पण, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








