कोरोना : भारतातील ऑक्सिजनचा तुटवडा टाळता आला असता का?

फोटो स्रोत, Hindustan Times/getty images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"मी श्वास घ्यायचा प्रयत्न करत होते, पण मला जमत नव्हतं. आता मी मरणार, असंच मला वाटलं."
श्रुतीला (कोव्हिड-19शी आपल्याला भयंकर झटापट करावी लागली हे आई-वडिलांना वाचायला लागू नये अशी संबंधित मुलीची इच्छा असल्यामुळे नाव बदललं आहे.) ती कोव्हिड-पॉझिटिव्ह असल्याचं 5 एप्रिलला कळलं.
तिने स्वतःला अलगीकरणामध्ये ठेवलं आणि आपली तब्येत आता ठीक आहे असं तिला वाटू लागलं. पण ९ एप्रिलला ती उठली तेव्हा तिला श्वास घेणं अवघड जात होतं, तिच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खाली आली होती.
"माझा नवरा अस्वस्थपणे सगळीकडे कॉल लावत होता. पण बहुतांश हॉस्पिटलांमध्ये नवीन रुग्णांना जागा नव्हती किंवा ऑक्सिजन उपलब्ध नव्हता."
बारा तास श्वास घेण्यासाठी झगडून झाल्यावर शेवटी श्रुतीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथे बेड मिळून ऑक्सिजनचा पुरवठा सुरू करायला आणखी दोन तास जावे लागले.
दहा दिवसांनी तिला हॉस्पिटलातून सोडण्यात आलं आणि आता ती मुंबईतल्या तिच्या घरी आहे, तिची तब्येतही सुधारते आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"मला अजूनही कमजोर वाटतं, पण मी जिवंत आहे याचाच मला आनंद आहे. त्या दिवशी माझं नशिब बलवत्तर होतं म्हणून मला बेड मिळाला."
या घटनेला दोन आठवडे उलटलेत, आणि आता श्रुतीसारखा भयंकर अनुभव भारतभरातील अगणित रुग्णांना घ्यावा लागतोय- बहुतेकदा या अनुभवांचा शेवट उद्ध्वस्त करणारा ठरतो आहे.
श्वासासाठीची लढाई
भारतातील या साथीचा प्रसार पाहिलेल्या डॉक्टर, अधिकारी यांच्यापासून ते पत्रकारांपर्यंत सर्वांनाच आता दुर्दैवी पुनर्प्रत्ययाचा अनुभव घ्यावा लागतो आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सात महिन्यांपूर्वी देश अशाच प्रकारे ऑक्सिजनच्या तुटवड्याशी झगडत होता आणि रुग्णांची संख्याही वाढत होती. पण आज परिस्थिती त्याहून खालावलेली आहे.
ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या बेडसाठी हजारो लोक तीन ते चार दिवस वाट बघत आहे. अनेक जण वाट पाहतानाच प्राण सोडत आहेत.
श्वास घेता न येणाऱ्या कोव्हिड रुग्णांना सामावून घेण्यासाठी रुग्णालयांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतेय, ऑक्सिजनचा साठा संपत आल्याने डॉक्टर धास्तावलेत, आणि माध्यमांमधील बातम्यांपासून, ट्विटरपर्यंत आणि व्हॉट्स-अॅपपर्यंत सर्वत्र ऑक्सिजन सिलेंडरांची मागणी करणारे, त्यासाठी विनवणी करणारे संदेश फिरत आहेत.
भारत पुन्हा या स्थितीत कसा येऊन पोहोचला?
"परिस्थिती इतकी वाईट होती की काही रुग्णांवर आम्हाला 12 तास कार्डिअॅक अॅम्ब्युलन्समध्ये उपचार करावे लागले, त्यानंतर कुठे त्यांना आयसीयूत बेड उपलब्ध झाला," पुण्यामध्ये एका कोव्हिड हॉस्पिटलचे प्रमुख असणारे डॉ. सिद्धेश्वर शिंदे सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
ही जागतिक साथ सुरू झाली तेव्हापासून महाराष्ट्र राज्यातील कोव्हिड रुग्णांची संख्या सर्वाधिक राहिलेली आहे. आत्ताही भारतातील कोव्हिडच्या एकूण रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत.
भारतातील सर्वाधिक कोव्हिडग्रस्त जिल्ह्यांमध्ये पुण्याचा समावेश आहे. आत्तापर्यंत कोरोना रुग्णांच्या बाबतीत पुणे दुसऱ्या क्रमांकावर (1,21,200) आहे, तर या विषाणूमुळे मरण पावलेल्यांच्या आकडेवारीमध्ये पुणे तिसऱ्या क्रमांकावर (8,890) आहे.
गेल्या आठवड्यात एके दिवशी एकही व्हेन्टिलेटर उपलब्ध नव्हता, तेव्हा डॉ. शिंदे यांनी रुग्णांना दुसऱ्या शहरांमध्ये हलवलं. ही अभूतपूर्व गोष्ट म्हणावी लागेल, कारण अनेकदा जवळपासच्या जिल्ह्यांमधील लोक पुण्यात उपचारांसाठी येत असतात. महाराष्ट्राची राजधानी व भारताचं आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईमध्ये परिस्थिती याहून वेगळी नाही. मुंबईत आपात्कालीन सेवेचे सुमारे 95 टक्के बेड भरलेले आहेत.
महाराष्ट्रातील एकूण रुग्णांपैकी एक दशांश रुग्णांना ऑक्सिजन पुरावावा लागतो आहे, असा अंदाज तज्ज्ञ वर्तवतात. पण ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा नाही. राज्यात दररोज सुमारे 1200 मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनचं उत्पादन होत असलं, तरी तो सर्वच ऑक्सिजन कोव्हिड रुग्णांसाठी वापरावा लागतो आहे.
रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ होऊ लागली आहे- सध्या राज्यातील ऑक्सिजनची मागणी 1500 ते 1600 मेट्रिक टन इतकी आहे, आणि यात काही घट होण्याची चिन्हं नाहीत.
ऑक्सिजनसाठी अथकपणे मागणी होत असून ती पुरवठ्याच्या पुढे निघून गेलेली असल्यामुळे भारतभरात हीच स्थिती आहे.
सर्वसाधारणतः आरोग्यसेवेसाठी सुमारे 15 टक्के ऑक्सिजन पुरवठा वापरला जातो, आणि उर्वरित ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी पाठवला जातो. पण सध्या भारतातील सुमारे 90 टक्के ऑक्सिजन पुरवठा- रोज 7500 मेट्रिक टन- वैद्यकीय वापरासाठी पाठवला जातो आहे, असं वरिष्ठ आरोग्य अधिकारी राजेश भूषण सांगतात. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या मध्यात कोरोना विषाणूची पहिली लाट सर्वोच्च बिंदूपर्यंत गेली होती, तेव्हा दररोज 2700 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन वापरला जात होता, त्यापेक्षा आताची मागणी कितीतरी पटींनी अधिक आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मागच्या वर्षी भारतात दररोज सुमारे 90,000 नवे रुग्ण सापडत होते. या वर्षी एप्रिल महिन्याच्या आरंभी श्रुती रुग्णालयात दाखल झाल्या, तेव्हा एका दिवसातील नवीन रुग्णांची संख्या सुमारे 1,44,000 होती. दोन आठवड्यांनी रोजच्या नवीन रुग्णांची संख्या दुप्पट होऊन तीन लाखांच्या पलीकडे गेली आहे.
यामुळे भारताची दुबळी आरोग्यसेवा यंत्रणा तणावाखाली आली असून तिचा कडेलोट होण्याइतकी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला दिल्लीमधील अनेक मोठ्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन संपत आला होता- तेव्हा मुख्यमंत्र्यांना जाहीर विनंती करावी लागली आणि उच्च न्यायालयाने कठोर शब्दांत सूचना केली.

- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-लहान मुलांमध्ये कोव्हिड-19ची कोणती लक्षणं आढळतात? MIS-C म्हणजे काय?
- वाचा-कोरोनाची लक्षणं जाणवल्यावर कोणती टेस्ट करायची?
- वाचा-लस घेण्यासाठी Co-Win वर नोंदणी कशी करायची?
- वाचा- कोरोना लसीकरणाबाबत तुम्हाला पडलेले 15 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

त्यानंतर केंद्र सरकारने रात्री उशिरा ऑक्सिजनचा पुनर्भरणा करण्यासाठी सोय करून दिली. उत्तर प्रदेशामध्ये काही रुग्णालयांनी 'ऑक्सिजनचा साठा संपला' असे फलकच लावले आहेत आणि लखनौमधल्या दोन रुग्णालयांनी ऑक्सिजनच्या तुटवड्याचं भय वाटू रुग्णांना दुसरीकडे जाण्याची विनंती केली आहे.
चिंताग्रस्त नातेवाईक अनेक शहरांमध्ये ऑक्सिजन पुनर्भरणा केंद्रांबाहेर रांगा लावत आहेत. हैदराबादमधील एका केंद्रावर गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी खास सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेले आहेत.
ऑक्सिजनच्या तुटवड्यावर तोडगा काढणारी राष्ट्रीय कोव्हिड योजना तयार करावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारला केली आहे.
'हे कधी संपणार ते कोणालाच माहीत नाही'
निवडणुकांच्या प्रचारमोहिमा, कुंभमेळा यांसारख्या कार्यक्रमांना परवानग्या देऊन आणि लसीकरण मोहीम वेगाने पुढे नेण्यासाठी प्रयत्न न करून केंद्र सरकारने परिस्थिती आणखी बिकट केल्याची टीका होते आहे. दुसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठीही सरकारने फारसे प्रयत्न केलेले नाहीत, असं टीकाकार म्हणत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात- म्हणजे भारतात कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर आठ महिन्यांनी- आरोग्य मंत्रालयाने नवीन ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पांसाठी निविदा मागवल्या. यातील 162 निर्मितीकेंद्रांना मान्यता देण्यात आली, त्यापैकी केवळ 33 केंद्रांचं काम सुरू झालं आहे. 59 केंद्रं एप्रिलअखेरीस सुरू होतील आणि 80 केंद्रं मेअखेरीला सुरू होतील, असं मंत्रालयाने सांगितलं.
पण वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता हा ऑक्सिजनपुरवठाही पुरेसा ठरेल का, याबद्दल अधिकाऱ्यांना शंका आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रामध्ये पहिल्या लाटेनंतर ऑक्सिजननिर्मिती क्षमता वाढवण्यात आली, पण यासाठी तयार असलेल्या रुग्णालयांनाही ढासळत्या परिस्थितीला सामोरं जाणं अवघड जातं आहे.
"सर्वसाधारणतः आमच्यासारख्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा असतो. पण गेल्या पंधरवड्यामध्ये लोकांचा श्वासोच्छवास सुरू ठेवणं हे एक प्रचंड अवघड कार्य झालं आहे. अगदी 22 वर्षांच्या तरुण रुग्णांनाही ऑक्सिजनचा बाहेरून पुरवठा करावा लागतो आहे. याचा अंदाज सरकारलाही नव्हता, असं मला वाटतं."
राज्यातील अनेक जिल्हा सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या टाक्या बसवण्यात आल्या असल्या तरी छोट्या शहरांमध्ये व खाजगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी होते आहे.
"लोक सरकारी रुग्णालयांमध्ये जायला इच्छुक नसतात, पण या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा चांगला साठा असल्यामुळे जीव वाचण्याची शक्यता आहे," असं डॉ. सिद्धेश्वर म्हणाले.
त्यामुळे आता राज्यं ऑक्सिजननिर्मितीचे नवीन प्रकल्प उभारत आहेत किंवा इतर राज्यांकडून ऑक्सिजन मिळवायचा प्रयत्न करत आहेत. आणि 50,000 मेट्रिक टन इतका द्रव ऑक्सिजन आयात करण्याचा विचार केंद्र सरकार करतं आहे. प्रत्येक पुरवठादार सतत काम करतो आहे.
नांदेडमध्ये ऑक्सिजन पुनर्भरणा केंद्र चालवणारे गणेश भारतीय सांगतात, "आम्ही दिवसाला 150 ते 200 सिलेंडर विकायचो, त्यातही बहुतांशाने औद्योगिक क्षेत्रातच हे सिलेंडर जायचे. आता मागणी 500 ते 600 सिलेंडरांपर्यंत वाढलेय. आम्ही आता उद्योगांना पुरवठा बंद करून फक्त रुग्णालयांनाच ऑक्सिजन पुरवतो आहोत."

फोटो स्रोत, Getty Images
दिवसाचे 10-12 तास काम करूनही आपल्याला कशीबशी मागणी पूर्ण करता येत असल्याचं ते सांगतात.
"आता थोडी सुधारणा आहे, पण हे सगळं कधी संपेल याची कोणालाच कल्पना नाही," असं डॉ. सिद्धेश्वर सांगतात.
त्यामुळे डॉक्टर शक्य तितक्या काळजीपूर्वक ऑक्सिजनचा वापर करत आहेत.
"ऑक्सिजनचा पुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे, पण त्याचं सुसूत्रीकरण गरजेचं आहे," असं मुंबईतील संसर्गरोगतज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव सांगतात.
पण सध्याच्या परिस्थितीत एखाद्या रुग्णाला किती ऑक्सिजन लागणार आहे, याचा अंदाज बांधणं अशक्य असल्यामुळे गुंतागुंत निर्माण झाल्याचं ते म्हणतात.
"प्रत्येक रुग्णाला ठराविक कालावधीसाठी ठराविक प्रमाणात ऑक्सिजन गरजेचा असतो, असं नाही. एखाद्या रुग्णालयात किती रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, ही संख्या तासातासाला बदलतेय. एखादा स्थिर झालेल्या रुग्णाची तब्येत अचानक गंभीर होऊ शकते."
ऑक्सिजनची उपलब्धता असलेल्या पलंगांची मागणी ज्या वेगाने वाढली, ते अचंबित करणारं आहे- काही आठवड्यांमध्ये ही मागणी सुमारे 50 टक्क्यांनी वाढल्याचं ते सांगतात.
"आम्ही शक्य तितकी काळजी घेतो आहोत. पण मी असं काही आधी कधी पाहिलं नाही. किंबहुना इथल्या कोणीच असं काही कधी अनुभवलं नसावं."
केरळसारख्या राज्यांनी ऑक्सिजननिर्मिती क्षमता वाढवली आणि ते अतिरिक्त ऑक्सिजन इतर ठिकाणी पाठवत आहेत, पण दिल्लीसारख्या ठिकाणी बहुतांश ऑक्सिजनपुरवठा बाहेरूनच होतो आहे, हे नमूद करणं आवश्यक आहे.
पुरवठ्याइतकीच वितरणाचीही समस्या
राज्यांमध्ये पुरवठा वाढवला जात असला, तरी वितरणाचंही आव्हान आहे.
भारतातील एका सर्वांत मोठ्या ऑक्सिजन पुरवठादार कंपनीच्या प्रमुखाने म्हटल्यानुसार, पूर्व भारतातून (ओडिशा व झारखंड यांसारख्या औद्योगिक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा जास्त आहे) पश्चिम वा उत्तर भारतामध्ये (महाराष्ट्र किंवा दिल्ली) रुग्ण वेगाने वाढत असलेल्या ठिकाणी ऑक्सिजन आणणं हे एक आव्हान आहे.
फिका निळा व अत्यंत थंड असणारा द्रव ऑक्सिजन 183 अंश तापमानामध्ये असतो. हा निम्नतापी वायू असल्यामुळे विशेष सिलेंटरांमध्ये व टँकरांमध्येच साठवून त्याची वाहतूक करावी लागते.
भारतातील सुमारे 500 कारखाने हवेतून ऑक्सिजन मिळवून त्याचं शुद्धीकरण करतात आणि द्रवरूपात रुग्णालयांना पुरवतात. यातील बहुतांश पुरवठा टँकरांच्या माध्यमातून होतो. मोठ्या रुग्णालयांकडे बहुतांश वेळा स्वतःची एक टाकी असते, तिथे ऑक्सिजन साठवला जातो आणि मग पाइपद्वारे थेट रुग्णांच्या पलंगांपर्यंत पोचवला जातो. छोटी व हंगामी रुग्णालयं स्टीलच्या व अॅल्युमिनियमच्या सिलेंडरांवर अवलंबून असतात.
ऑक्सिजनचे टँकर अनेकदा प्रकल्पांबाहेर तासन्-तास रांगा लावून उभे असतात आणि एक टँकर भरायला सुमारे दोन तास लागतात. मग हे टँकर विविध राज्यांमधील विविध शहरांपर्यंत जाण्यासाठी आणखी अनेक तास जातात. या टँकरांना काही वेगमर्यादाही- कमाल प्रति तास 40 किलोमीटर- पाळावी लागते. शिवाय, अपघात टाळण्यासाठी या टँकरांचा प्रवास सर्वसाधारणतः रात्री होत नाही.
काही ठिकाणी वाहतूक कोंडीतून वाट काढण्यासाठी ऑक्सिजन टँकरांना- अॅम्ब्युलन्सप्रमाणे प्राधान्य देण्यात आलं आहे. पण तरीही मोठ्या शहरांमधून छोट्या शहरांमध्ये टँकर पोचण्यासाठी 15 ते 25 तास लागतात.
ऑक्सिजनचा पुरवठा व वितरण वाढवण्यासाठी केवळ अधिक भांडवल खर्च करून पुरत नाही, तर अधिक कुशल मनुष्यबळही गरजेचं असतं, असं एका सरकारी अधिकाऱ्याने निनावी राहण्याच्या अटीवर सांगितलं.
"या प्रकल्पांमधील व अगदी रुग्णालयांमधीलही अनेक कर्मचाऱ्यांकडे या कौशल्यांचा अभाव आहे आणि आम्ही गळती थांबवण्याचा व वाया जाण्याचे प्रकार कमी करण्याचा प्रयत्न करतो आहोत."
परंतु ऑक्सिजनचे पुरवठादार राजकीय इच्छाशक्ती व तयारी यांच्या अभावाकडेही निर्देश करतात.
"आम्हाला आमची क्षमता वाढवण्याची इच्छा आहे, पण त्यासाठी आम्हाला आर्थिक सहाय्य लागेल, असं आम्ही अधिकाऱ्यांना सांगत होतो," असं महाराष्ट्रात एक छोटा ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प चालवणारे राजाभाई शिंदे सांगतात.
"पण त्यावर कोणीच काही म्हणालं नाही आणि आता अचानक रुग्णालयं व डॉक्टर अधिकाधिक सिलेंडरांची मागणी करत आहेत. हे टाळता आलं असतं."
एकदा काही आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यावर ऑक्सिजन मिळायला अडचण आली, तेव्हा आपण ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प सुरू केल्याचं ते सांगतात.
"तहान लागण्याआधी विहीर खोदायला हवी, असं म्हणतातच ना. पण आपण तसं केलं नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








