कोरोना : ऑक्सिजन एक्स्प्रेसमुळे पुरवठ्याची समस्या संपणार का?

फोटो स्रोत, Indian Railways
- Author, विनीत खरे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे भारतातली ऑक्सिजनसाठीची मागणी वाढली. ती पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वेने सोमवार (19 एप्रिल) रात्रीपासून ऑक्सिजन एक्सप्रेसला सुरुवात केली.
यातली पहिली ट्रेन मुंबईतल्या कळंबोली स्टेशनहून रिकामे कंटेनर्स घेऊन विशाखापट्टणमला गेली आणि तिथे या कंटनेर्समध्ये ऑक्सिजन भरून आणण्यात येणार आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सात डब्यांच्या या विशेष गाडीच्या प्रत्येक डब्यातून 16 मेट्रिक टन ऑक्सिजन आणण्यात येईल आणि या ट्रेनला रेल्वेमार्गांवर प्राधान्य दिलं जाईल.
अशा प्रकारच्या इतर गाड्या सुरू करण्याची रेल्वे मंत्रालयाची योजना आहे.
भारतामध्ये कोव्हिडचे 21 लाखांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आहेत आणि 1 लाख 82 हजारांपेक्षा जास्त जणांचा यामुळे मृत्यू झालाय.
ऑक्सिजन तुटवड्यामुळे किती मृत्यू?
हॉस्पिटलचे बेड्स, औषधं आणि मेडिकल ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या बातम्या देशाच्या अनेक भागांमधून आल्या.
कोरोनाच्या रुग्णांसाठी मेडिकल ऑक्सिजन अतिशय महत्त्वाचा आहे.
ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे भोपाळच्या एका हॉस्पिटलमध्ये तथाकथितपणे 6 जणांचा मृत्यू झाल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीत म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
तर मुंबईतल्या एका हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे एका दिवसात सात जणांचा मृत्यू झाल्याचे आरोप झाल्याची बातमी एनडीटीव्हीने दिली होती.
भारतातल्या ज्या 12 राज्यांमध्ये वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय, ती आहेत - महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान.
एकीकडे मध्य प्रदेशासारखी राज्यं आहेत ज्यांची वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनची मागणी पूर्ण करेल, इतकं उत्पादन करण्याची क्षमता नाही, तर दुसरीकडे ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या गुजरात, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांकडची ऑक्सिजनची मागणी वाढतेय.
सरकार काय पावलं उचलतंय?
परिस्थिती इतकी चिंताजनक आहे की, 50,000 मेट्रिक टन ऑक्सिजन आयात करण्यासाठी तयारी करण्यात येतेय. सरकारच्या एम्पॉवर्ड ग्रुप - 2 ने नऊ उद्योग वगळता इतरांच्या ऑक्सिजन वापरावर बंदी घातलेली आहे.
याशिवाय सरकारने 162 PSA मेडिकल ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचं जाहीर केलंय.

फोटो स्रोत, Getty Images / MONEY SHARMA
तात्पुरत्या स्वरूपाच्या या लहान प्लांटच्या मदतीने दुर्गम भागातली ऑक्सिजनची मागणी पूर्ण करता येऊ शकते. पण विनायक एअर प्रॉडक्टस प्रायव्हेट लिमिटेडच्या राजीव गुप्तांच्या मते कोव्हिडनंतर या प्लांट्सची गरज उरणार नाही.
ते सांगतात, "या प्लांटमधल्या ऑक्सिजनची शुद्धता 92-93 टक्के असते. याने काम भागतं आणि यांची क्षमता 1 ते 2 मेट्रिक टनांची असते."
पण ऑक्सिजनचा इतका तुटवडा कसा निर्माण झाला?
ट्रेनची गरज का?
भारतामध्ये वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनचा तुटवडा ही समस्या नसून तो जिथे गरजेचा आहे, तिथपर्यंत पोहोचवणं ही खरी समस्या असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
आयनॉक्स एअर प्रॉडक्टसचे संचालक सिद्धार्थ जैन यांच्या मते कोव्हिडच्या आधी भारताची ऑक्सिजन निर्मितीची दैनिक क्षमता 6,500 मेट्रिक टन होती. त्यानंतर त्यात 10 टक्क्यांनी वाढ होऊन आता ती दररोज 7,200 मेट्रिक टन इतकी आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भारतातमध्ये आधी दररोज 700 मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनची गरज भासायची पण आता ही मागणी वाढून जवळपास 5,000 मेट्रिक टन झाल्याचं जैन सांगतात.
वैद्यकीय वापरासाठीचा हा ऑक्सिजन ज्या भागात गरज आहे, तिथपर्यंत पोहोचवणं हे सगळ्यात मोठं आव्हान असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.
ऑल इंडिया इंडस्ट्रियल गॅसेज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे प्रमुख साकेत टिकू सांगतात, "मेडिकल ऑक्सिजनची गरज आहे एका टोकाला असणाऱ्या महाराष्ट्रात. पण त्याचा साठा आहे पूर्व भारतातल्या रूरकेला, हल्दिया मधल्या स्टील प्लांट्समध्ये."
हा मेडिकल ऑक्सिजन एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी विशेष टँकर्स वापरावे लागतात. त्यांना 'क्रायोजेनिक टँकर्स' म्हटलं जातं,
मेडिकल ऑक्सिजनचं वितरण सिलेंडर्स आणि द्रवरूपात क्रायोजेनिक टँकर्सद्वारे केलं जातं.
रेल्वेच्या वापराने काय होईल?
क्रायोजेनिक टँकर्समध्ये द्रवरूपातील ऑक्सिजन उणे 183 (-183) अंश तापमानामध्ये ठेवला जात असल्याचं साकेत टिकू सांगतात. पण इतक्या मोठ्या प्रमाणात मेडिकल ऑक्सिजनची गरज भासेल, अशी कल्पनाच कोणी केली नव्हती.

फोटो स्रोत, Getty Images
एका मोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या कंपनीकडे 550 क्रायोजेनिक टँकर्स आहेत आणि गेल्या वर्षभरापासून त्यांचा सतत वापर होतोय. असं असूनही द्रवरूपातील ऑक्सिजन एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचवण्यास वेळ लागत असल्याचं ते सांगतात.
अशावेळी रेल्वेचा वापर केल्याने ऑक्सिजन पुरवठा वेगाने करता येण्याची अपेक्षा आहे.
अशा प्रकारे रेल्वे ट्रेन्सनी ऑक्सिजन वाहतूक करण्यासाठीचं एक धोरण तयार करण्यात आलं असून मागणी आल्यास रेल्वे मंत्रालय क्रायोजेनिक टँकर्स डिझाईन करून ते तयार करण्याचा विचार करत असल्याचं रेल्वे मंत्रालयातल्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.
ऑक्सिजनची मागणी किती आहे?
ऑल इंडिया इंडस्ट्रियल गॅसेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये कोव्हिडच्या पहिल्या लाटेचा पीक येण्याच्या वेळीस ऑक्सिजनची मागणी प्रतिदिन 3000-3200 मेट्रिक टन झाली होती. पण त्यानंतर जसजशी कोव्हिड रुग्णांची संख्या कमी झाली, ऑक्सिजनच्या मागणीतही घट झाली.
इंडस्ट्रियल ग्रेड म्हणजे व्यावसायिक वापरासाठीचा ऑक्सिजन आणि मेडिकल म्हणजेच वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजन यात फारसा फरक नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. इंडस्ट्रियल ग्रेड ऑक्सिजन 99.5 टक्के शुद्ध असतो, तर मेडिकल ऑक्सिजन 90 ते 93 टक्के शुद्ध असतो.
मग कोव्हिडची रुग्णसंख्या कमी असताना ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न का करण्यात आले नाहीत?

फोटो स्रोत, AFP
दोन हजार कोटींची गुंतवणूक करत पुढच्या 36 महिन्यांमध्ये आठ ते नऊ प्लांट उभारण्याची घोषणा आपल्या कंपनीने फेब्रुवारी महिन्यात केल्याचं आयनॉक्स एअर प्रॉडक्टसचे संचालक सिद्धार्थ जैन सांगतात.
जैन म्हणतात, "भारताने आपली क्षमता दहा टक्क्यांनी वाढवली. आयनॉक्ससोबतच इतर कंपन्यांना लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी दोन वर्ष लागतात."
राजीव गुप्ता म्हणतात, "स्टील उद्योगात मोठ्या प्रमाणात मेडिकल ऑक्सिजनचा वापर होतो आणि स्टील उद्योगाच्या गरजेनुसार नवीन मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्लांट्स उभारले जातात."
पण वाढत्या रुग्णसंख्येमुळे साकेत टिकू काळजीत आहेत. ते सांगतात, "आपल्याकडे ऑक्सिजनचा अमर्याद साठा नाही. पण अजूनही आपल्याकडे ऑक्सिजनचा स्टॉक उपलब्ध आहे."
ऑक्सिजनचा वापर कसा व्हावा?
ऑक्सिजन जाणीवपूर्वक वापरला जाणं गरजेचं असल्याचं साकेत टिकू सांगतात.
एकीकडे 60,000 कोव्हिड रुग्ण असणाऱ्या गुजरातला दररोज 700 ते 800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो, तर दुसरीकडे 6.5 लाख कोव्हिड रुग्ण असणाऱ्या महाराष्ट्राला रोज 1200 मेट्रिक टन लागतो. असं का, हे त्यांना समजत नाहीये.
ते म्हणतात, "केरळमध्ये तर दररोज 100 मेट्रिक टन ऑक्सिजनचाही वापर होत नाहीये. आम्ही ही गोष्ट आरोग्य मंत्रालयाच्या लक्षात आणून दिली आहे."

फोटो स्रोत, Getty Images
घाबरून जात लोकांनी स्वतःकडे ऑक्सिजन सिलेंडर आणून ठेवल्याने सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचं राजीव गुप्ता सांगतात.
गेलया काही दिवसांपासून गुजरातमधली परिस्थिती गंभीर आहे.
मधुराज इंडस्ट्रीज गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड च्या जिग्नेश शाह यांच्या माहितीनुसार पूर्वी गुजरातमध्ये उत्पादन करण्यात आलेल्या 1000 मेट्रिक टन ऑक्सिजन पैकी 150 मेट्रिक टन दररोज रुग्णालयांत जायचा. आता हे प्रमाण वाढून 850 ते 900 मेट्रिक टन झालेलं आहे.
ते म्हणतात, " लोकं हातापाया पडून विनवणी करतायत...एक बाटली द्या, दोन बाटल्या द्या...माझ्या आईचा जीव जातोय, माझ्या वडिलांचा जीव जातोय, बायकोचा जीव जातोय. अशी परिस्थिती आहे की घास घशाखाली उतरत नाही. असा दिवस येईल, असं कधी वाटलं नव्हतं."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









