महाराष्ट्र लॉकडाऊन: प्रवासासाठीचे नवीन नियम काय आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
राज्य सरकारने कडक निर्बंधांच्या यादीत आणखी काही नियम लागू केले आहेत. या नवीन नियमांची अंमलबजावणी आज (22 एप्रिल) रात्री आठ वाजल्यापासून ते 1 मे सकाळी सात वाजेपर्यंत केली जाणार आहे.
यात खासगी आणि सार्वजनिक वाहतुकीसंदर्भातील निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत.
लोकल रेल्वे, मेट्रो, मोनोरेल तसंच बस आणि रेल्वे सार्वजनिक वाहतूक तसंच खासगी प्रवासावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
आजपासून केवळ आपत्कालीन सेवेसाठी किंवा वैध कारणासाठीच खासगी वाहनातून प्रवास करता येणार आहे. यासाठी चालक आणि 50 टक्के प्रवासी आसन क्षमतेची कमाल मर्यादा आहे.
हा नियम केवळ शहराअंतर्गत प्रवासासाठीच लागू आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील प्रवासासाठी ही मर्यादा अपेक्षित नाही असं शासनाच्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे.
जीवनावश्यक सेवेची पूर्तता, वैद्कीय आपत्कालीन प्रसंग, अंत्यसंस्कार आणि कुटुंबातील कोणी गंभीर आजारी असणे या परिस्थितीत आंतरजिल्हा किंवा आंतरशहर प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे.

फोटो स्रोत, ANI
या नियमांचा भंग करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
खासगी बसमधून प्रवास करण्यासाठी नवीन नियम
- खासगी बस सेवा आसनक्षमतेच्या 50 टक्के प्रवासी घेऊन प्रवास करू शकतील. बसमध्ये उभं राहून प्रवास करण्यास बंदी आहे.
- एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठीही स्वतंत्र नियम लागू करण्यात आले आहेत.
- यानुसार, बस एका शहरात फक्त दोन ठिकाणी थांबू शकेल. याची माहिती आणि वेळापत्रक स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देणं बंधनकारक असेल. तसंच गरज भासल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना यात बदल सूचवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
- या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस गृहविलगीकरणात रहाणे बंधनकारक आहे. त्यासाठी त्यांच्या हातावर शिक्का मारला जाईल. याची जबाबदारी संबंधित बंस कंपनीची असेल.

फोटो स्रोत, ANI
- प्रत्येक ठिकाणी थर्मल स्कॅनरचा उपयोग करून कोणत्याही व्यक्तीमध्ये लक्षणं आढळल्यास त्यांना कोरोना केअर सेंटर (सीसीसी) किंवा रुग्णालयात पाठवले जाईल.
- स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) शहराच्या प्रवेशद्वारावर रॅपिड अँटीजन टेस्ट (आरएटी) करण्याचा निर्णय घेतील आणि त्यासाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेला या सेवेची जबाबदारी देतील.
- सदर चाचणीसाठी लागणारा खर्च प्रवासी किंवा सेवा प्रदाता यांना करावा लागेल.
- या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास ऑपरेटरला दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागेल आणि एकापेक्षा अधिक वेळेस दंड भरावा लागल्यास संबंधित ऑपरेटरचा परवाना कोव्हिड-19 ची परिस्थिती संपेपर्यंत रद्द करण्यात येईल.
सार्वजनिक रेल्वे आणि बस वाहतुकीसाठीचे नियम
- अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही लोकल रेल्वे, मेट्रो आणि मोनो रेलमधून प्रवास करता येणार नाही.
- सर्व वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी (डॉक्टर / पॅरामेडिकल /प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ रुग्णालय आणि वैद्यकीय चिकित्सालयातील अधिकारी- कर्मचारी) यांना त्यांच्या वैद्यकीय संस्थेने दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे तिकीट आणि पासेस देण्यात येईल.
- त्याप्रमाणे सर्व शासकीय व्यक्ती/ अधिकारी/ कर्मचारी (राज्य/ केंद्र व स्थानिक) यांना तिकीट /पासेस शासनाद्वारे त्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्राच्या आधारावर देण्यात येईल.
- वैद्यकीय उपचारासाठी प्रवास आवश्यक असणारे व्यक्ती आणि अपंग व्यक्तींनाही यातून प्रवास करता येईल. त्यांच्यासोबत एका व्यक्तीला प्रवास करण्याची सवलत असेल.
- खासगी बस प्रमाणेच सरकारी आणि स्थानिक प्रशासनाच्या बसेसमध्ये क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी घेता येणार आहेत. उभं राहून प्रवास करता येणार नाही.
- आंतरजिल्हा प्रवासासाठी लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये मात्र प्रवाशी क्षमतेवर मर्यादा नाहीत. आसन क्षमतेनुसार प्रवास करता येणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
स्थानिक रेल्वे अधिकारी यांना आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंच्या तसंत त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रवाशांची माहिती द्यावी लागेल.
आंतर जिल्हा प्रवास करत असताना प्रत्येक थांब्यावर उतरणाऱ्या प्रवाशाला गृहविलगीकरण बंधनकारक असेल. तसंच थमर्ल स्कॅनरच्या माध्यमातून प्रवाशांची तपासणी केली जाईल.
कोरोनाची लक्षणं आढळल्यास प्रवाशांना कोरोना केअर सेंटर किंवा रुग्णालयात दाखल केले जाईल.
स्थानिक प्रशासन शहर किंवा जिल्ह्याच्या प्रवेशाच्या थांब्यावर (स्टॉपवर) अँटिजन चाचणी करण्यासंदर्भातन निर्णय घेतील. कोणत्याही मान्यताप्राप्त प्रयोगशाळेला या सेवेसाठी नियुक्त केले जाऊ शकते. या चाचणीचा खर्च प्रवाशाला करावा लागेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








