नाशिक ऑक्सिजन गळती : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, सरकारकडून तपासासाठी 7 जणांच्या उच्चस्तरीय समितीची स्थापना

प्रतीकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक फोटो

नाशिक ऑक्सिजन टॅंक गळती दुर्घटना प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये कलम 304 (अ) खाली सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करायचे काम सुरू होतं. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूंबाबतचा गुन्हा नोंदवण्यात आल्याचं नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी म्हटलंय.

तर नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या तपासासाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेंच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

नाशिकच्या झाकिर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेचा संपूर्ण तपास व्हावा तसेच भविष्यात अशी घटना कधीही घडू नये यासाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील ही समिती देईल असे टोपे यांनी सांगितले.

या समितीमध्ये डॉक्टर, प्रशासक आणि तंत्रज्ञ यांचा समावेश आहे असंही ते म्हणाले.

या हॉस्पिटलमध्ये 150 रुग्ण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर होते. ऑक्सिजन टाकीमधून गळती झाल्याने अर्धा तास इथला ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याचं समजतंय. त्या वेळात 22 जणांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला, असं जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितलं.

टेक्निकल इंजिनियर पाठवून लिकेज थांबवलंय. 25 टक्के ऑक्सिजन शिल्लक आहे. ऑक्सिजन तुटवड्यामुळे 22 लोक दगावले आहेत. ऑक्सिजनवरच्या लोकांना प्रेशर कमी झालेलं चालतं. पण व्हेंटिलेटरवर असलेल्या लोकांना प्रेशर कमी झालेलं चालत नाही. चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असं नाशिकचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी म्हटलं आहे.

ऑक्सिजन टॅंक
फोटो कॅप्शन, ऑक्सिजन ड्युरा टॅंक

हा तांत्रिक विषय आहे. एका ठिकाणहून लीक झालं, त्यामुळे प्रेशर कमी झालं आणि अपघात झाला. आता वेल्डिंग करत आहोत. हा प्रॉब्लेम लवकरच सुटेल. मी डॉक्टर आहे, मला तांत्रिक गोष्टी कळत नाही, अशी प्रतिक्रिया झाकिर हुसैन रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी नितीन राऊते यांनी दिली.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

रुग्णालयात ऑक्सिजनवर 131 रुग्ण होते, 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते अशीही माहिती त्यांनी दिली.

नाशिकची ऑक्सिजनची रोजची मागणी 139 मेट्रीक टन इतकी आहे, तर रोज 84 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होतोय.

मृतांचा हा आकडा 30 ते 35 होऊ शकतो, असा आरोप शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी केलाय.

रुग्णालय परिसरात नातेवाईंकाच आक्रोश

रुग्णालय परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांचे नातेवाईक आक्रोश करताना दिसत आहेत. दोन तासांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्याने आमच्या कुटुंबीयांना प्राण गमवावे लागले असं त्या परिसरातील नातेवाईक म्हणत आहेत.

अमोल
फोटो कॅप्शन, आजीचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला असं व्यवहारे यांनी सांगितलं.

अमोल व्यवहारे यांची आजी लीला शेलार ( वय - 60 वर्षं) याचं या घटनेत निधन झालं. ऑक्सिजनअभावी आजीचा मृत्यू झाला असं व्यवहारे यांनी सांगितलं.

विकी जाधव यांनी देखील त्यांची आजी या घटनेत गमावली आहे. "आजीची ऑक्सिजनची पातळी अचानकपणे खालावली, मी जेव्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले तेव्हा आमच्याकडील ऑक्सिजन संपला आहे असं उत्तर मला मिळालं," असं जाधव यांनी माध्यमांना सांगितलं.

विकी जाधव
फोटो कॅप्शन, विकी जाधव

सखोल चौकशीची मागणी

"नाशिकमध्ये जे घडलं ते अत्यंत दुर्देवी आहे. हे अतिशय व्यथित करणारं आहे. अन्य रुग्णांना मदत पुरवून त्यांना आवश्यक असल्यास योग्य ठिकाणी हलवण्यात यावं. आम्ही याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी करतो", असं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

नाशिकमध्ये झालेली घटना ही हलगर्जीपणामुळे आहे असं माजी खासदार किरीट सौमय्या यांनी म्हटलं.

"नाशिकच्या रुग्णालयात एवढा रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनचा पुरवठा अनियमित झाल्याने झाला आहे. मी नाशिकला 22 मार्च रोजी भेट दिली होती. म्युनिसिपल कमिशनर आणि सिव्हिल सर्जन यांना मी इशारा दिला होता. हलगर्जीपणासाठी ठाकरे सरकार आणि अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मी मागणी करतो. हे मृत्यू म्हणजे व्यवस्थेने केलेली कोव्हिड हत्या आहे," असं माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या दोन महिन्यातली ही आठवी घटना असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

"नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील घटना धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे. ऑक्सिजन टाकीला गळती लागून बावीस जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यातली ही आठवी घटना आहे. कुठे शॉर्ट सर्किट होतं, रुग्ण दगावतात. याची चौकशी, अहवाल, कारवाई कशाचा कशाला पत्ता नाही. तातडीने याप्रकरणाची चौकशी करण्यात यावी. अन्य रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावं. मृत रुग्णांच्या नातेवाईकांना मदत मिळायला हवी," असं भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

नाशिकची घटना व्यथित करणारी आहे. मृतांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. मृत रुग्णांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सगळे सहभागी आहोत असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

ही अतिशय दुर्देवी घटना आहे. याप्रकरणी सखोल चौकशी अहवाल आम्ही घेऊ. आम्ही याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी जे दोषी असतील त्यांची गय केली जाणार नाही असं अन्न आणि औषध पुरवठा मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)