कोरोना: नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील 6 महत्त्वाच्या गोष्टी

फोटो स्रोत, Getty Images
लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांना केलं आहे. पंतप्रधान मोदींनी आज (20 एप्रिल) देशाला संबोधित केले. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आतापर्यंत काय काय योजना करण्यात आल्या तसेच पुढे काय करता येईल याबाबत त्यांनी जनतेला संबोधित केले.
देशातील राज्य सरकारांना ते म्हणाले, लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय समजावा, कारण लॉकडाऊनमुळे खूप मोठे आर्थिक नुकसान होते.
नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून सहा घटकांना उद्देशून काही सूचना दिल्या, माहिती दिली. आपण ते क्रमाक्रमाने पाहूया :
1) 'लॉकडाऊन अखेरचा पर्याय ठेवा'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना उद्देशून लॉकडाऊनबाबत सल्ला दिला की, लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवा.
मोदी म्हणाले, "आपल्या सगळ्यांचे प्रयत्न आयुष्य वाचवण्यासाठीच सुरू आहेत. त्याचसोबत, आर्थिक गोष्टी सुरळीत राहाव्यात, यासाठीही आपले प्रयत्न सुरू आहेत. लसीकरण 18 वर्षांवरील लोकांचंही करण्याची परवानगी दिल्यानं शहरांमधील काम करणाऱ्यांनाही लस उपलब्ध होईल."
तसंच, "माझं राज्य प्रशासनांना आग्रह आहे की, कामगारांचा विश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न करा, कामगार जिथे आहेत तिथेच राहण्यास सांगा. राज्यांद्वारे दिलेला विश्वास खूप मदतीचा ठरेल. ज्या शहरात लोक आहेत, तिथेच त्यांना लस मिळेल आणि त्यांचं कामही सुरू राहील."

"आजच्या स्थितीत आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचायचं आहे. मी राज्यांना विनंती करतो की, लॉकडाऊन अंतिम पर्याय म्हणून वापरा. लॉकडाऊनपासून वाचण्यासाठी प्रयत्न करा. मायक्रो कंटेन्मेंट झोनवर लक्ष केंद्रित करा," असंही मोदी म्हणाले.
2) 'ऑक्सिजन पुरवठा वाढवण्यासाठी उपाय सुरू'
दिल्लीतील केजरीवाल सरकार असो किंवा महाराष्ट्रातील ठाकरे सरकार, ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत सातत्यानं बोलताना दिसतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या भाषणात यातलं कुणाचं नाव घेतलं नाही, मात्र त्यांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत भाष्य केलं.
"ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा वाढवण्यासाठी विविध स्तरावर उपाय केले जात आहेत," असं मोदी म्हणाले.

- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-लहान मुलांमध्ये कोव्हिड-19ची कोणती लक्षणं आढळतात? MIS-C म्हणजे काय?
- वाचा-कोरोनाची लक्षणं जाणवल्यावर कोणती टेस्ट करायची?
- वाचा-लस घेण्यासाठी Co-Win वर नोंदणी कशी करायची?
- वाचा- कोरोना लसीकरणाबाबत तुम्हाला पडलेले 15 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

तसंच, "राज्यांमध्ये नवीन ऑक्सिजन प्लांट्स असो, एक लाख नवे सिलेंडर पोहोचवणं असो, ऑक्सिजनचा वैद्यकीय वापर असो, ऑक्सिजन रेल्वे असो किंवा इतर असे अनेक प्रयत्न आपण करत आहोत," असंही मोदी म्हणाले.
3) वेगवान लसीकरणाबाबत मोदींचं आश्वासन
नरेंद्र मोदी यांनी लोकांना उद्देशून लसीकरणाबाबत माहिती दिली आणि लोकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.
मोदी म्हणाले, "कालच लसीकरणाबाबत एक निर्णय आपण घेतला. एक मेपासून 18 वर्षांवरील सगळ्यांचं लसीकरण केलं जाणार आहे."
"आता जी लस भारतात बनेल, तिचा अर्धा भाग थेट राज्यांना आणि रुग्णालयांना मिळेल," असं मोदींनी सांगितलं.
4) 'तरुणांनो, समित्या बनवून गरजूंना मदत करा'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणवर्गाला उद्देशून एक आवाहन केलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मोदी म्हणाले, "माझ्या बालमित्रांना मी विशेषत: विनंती करतो की, घरात असं वातावरण तयार करा की, कामाशिवाय घरातल्या लोकांना बाहेर जाऊ देऊ नका. तुमच्या प्रयत्नांचा मोठा परिणाम होऊ शकतो."
"तरुणांनो, तुमच्या सोसायटी, मोहल्ला, अपार्टमेंटमध्ये लहान-लहान कमिट्या बनवा आणि कोरोनाचे नियम पाळण्यासाठी लोकांना मदत करा. आपण असं केल्यास कंटेन्मेंट झोन बनवण्याची गरज पडणार नाही, कर्फ्यू किंवा लॉकडाऊनही लावण्याची गरज भासणार नाही," असं मोदी म्हणाले.
5) प्रसारमाध्यमांना मोदी काय म्हणाले?
नरेंद्र मोदी यांनी माध्यमांनाही महत्त्वाचं आवाहन केलंय.
मोदी म्हणाले, "माध्यमांना विनंती आहे की लोकांना सतर्क करण्यासाठी. भीतीचं वातावरण तयार करू नका."
6) 'मजुरांनो आहात, तिथेच थांबा'
गेल्यावर्षी कोरोना काळात झालेल्या स्थलांतराला लक्षात घेऊन नरेंद्र मोदी यांनी यावेळी विविध शहरातील मजुरांना आवाहन केलंय.
"मजुरांनी आहात त्याच शहरात राहावं. त्यासाठी राज्य प्रशासनांना विनंती करतो की, त्यांनी मजुरांना यासाठी आवाहन करावं. राज्यांनी दिलेला विश्वास मजुरांना मदतीचा ठरेल," असं मोदी म्हणाले.
तसंच, "ज्या शहरात तुम्ही आहात, तिथेच लसीकरण होईल आणि परिणामी त्यांचं कामगारांचं कामही बंद होणार नाही," असं मोदी म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








