लॉकडाऊन नियम: महाराष्ट्रात कठोर लॉकडाऊनची घोषणा, काय चालू आणि काय बंद?

फळ

फोटो स्रोत, Getty Images

राज्यात आज रात्री आठपासून (22 एप्रिल) कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्यात लॉकडाऊनचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत.

लॉकडाऊन संबंधीची नवी नियमावली बुधवारी (21 एप्रिल) जाहीर करण्यात आली होती. आज संध्याकाळी 8 वाजल्यापासून या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली.

सरकारी कार्यालयात 15 टक्के हजेरी, लग्न समारंभात नियमांचा भंग केल्यास 50,000 रुपयांचा दंड, अत्यावश्यक कामासाठीच जिल्ह्याबाहेर जाता येणार असे तीन महत्त्वाचे नियम या लॉकडाऊनमध्ये असणार आहेत.

सामान्य लोकांच्या प्रवासावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आपले ओळखपत्र दाखवूनच तिकीट दिले जाणार आहे.

सार्वजनिक वाहतूक फक्त 50 टक्के आसन क्षमतेनी सुरू राहील. खासगी वाहतूक करणाऱ्यांना अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करता येणार नाही. खासगी वाहतूक करणाऱ्यांनी जर नियम मोडले तर 10,000 रुपये दंड लावण्यात येणार आहे.

याआधी जाहीर केलेले नियम पूर्ववत पाळणे बंधनकारक असणार आहे.

ब्रेक द चेन अंतर्गत राज्यातील लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत.

प्रवासी वाहतूक

आंतरजिल्हा प्रवास महत्त्वाच्या कारणांसाठीच केला जाऊ शकतो. मुंबईत खासगी गाडीत प्रवास 50 टक्के क्षमतेने करण्यात येईल. खासगी बसेस 50 टक्के क्षमतेने चालवल्या जाऊ शकतात.

लोकल ट्रेनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश असेल. आयकार्ड तपासून प्रवेश देण्यात येईल.

लग्न समारंभ

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता लग्न समारंभासाठी फक्त 25 लोकांना परवानगी. एकाच हॅालमध्ये 2 तास कार्यक्रम होऊ शकतो. लग्न समारंभात नियमांचं उल्लंघन केल्यास 50 हजार दंड ठोठावण्यात येईल.

सरकारी कार्यालयासंबंधी नियम

सरकारी कार्यालय 15 टक्के क्षमतेने सुरू राहतील.

मंगळवारी (20 एप्रिल) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनीही कठोर लॉकडाऊनच्या निर्णयबाबत सहमती दर्शवली होती.

राज्यात कडक लॉकडाऊन लावून राज्यातील नागरिकांचे लसीकरण व्हावे अशी मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.

सकाळी 7 ते 11 भाज्या आणि किराणा मिळणार

राज्यात असलेला लॉकडाऊन आणखी कडक केला जाणार अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिली आहे. सध्या राज्यात जागोजागी नियमांचं उल्लंघन होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं शेख यांनी सांगितलं. या संबंधातली नियमावली लवकरच राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात येईल.

राज्यामध्ये 14 एप्रिलच्या रात्रीपासून लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. एप्रिल महिना संपेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. या कालावधीसाठीच्या नियमांमध्ये आज सकाळीच काही बदल करण्यात आले.

किराणा मालाची दुकानं, भाज्यांची दुकानं, फळविक्रीकेंद्र, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी यांच्यासह सर्वप्रकारची अन्नधान्य विक्री केंद्र (यामध्ये चिकन, मटन, पोल्ट्री, अंडी, मासे विक्रेत्यांचा समावेश आहे), शेतमालाशी निगडीत खरेदी-विक्री केंद्र, पाळीव प्राण्यांचे अन्नविक्री केंद्र, पावसाळी हंगामाच्या दृष्टीने आवश्यक वस्तूविक्री केंद्र सकाळी 7 ते 11 या वेळेपुरतीच खुली राहतील.

या दुकानांमधून होम डिलिव्हरी अर्थात घरपोच वस्तू पोहोचवण्याची सुविधा सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहील. परिस्थितीचा अंदाज घेऊन स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये बदल करू शकतं.

आज रात्रीपासून सुधारित नियम लागू होतील. 1 मे पर्यंत नागरिकांना लॉकडाऊन नियमांचं पालन करायचं आहे.

स्थानिक आपात्कालीन यंत्रणा, राज्य आपात्कालीन व्यवस्थापनाच्या अनुमतीनंतर अत्यावश्यक सेवांमध्ये काही अतिरिक्त गोष्टींचा समावेश करू शकते.

नव्या नियमासह 13 एप्रिल रोजी लागू करण्यात आलेले नियम तसेच कायम लागू होतील असं राज्य सरकारने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

या काळात सार्वजनिक वाहतूक बंद होणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.

अचानक लॉकडाऊन लागू केल्यास, गोंधळ निर्माण होऊ शकतो हे जाणून सरकारने यासंदर्भात घोषणा करण्यापूर्वी पुरेसा वेळ घेतला. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सशी चर्चा केली. त्यानंतरच लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात आला.

राज्यात वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र तरीही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने प्रदीर्घ लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

व्हीडिओ कॅप्शन, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र लॉकडाऊन नियमांबद्दल नेमकं काय म्हणाले?

लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था, उद्योग ठप्प होते हे लक्षात घेऊन राज्य सरकारने लॉकडाऊनऐवजी कठोर निर्बंध लागू केले. मात्र तरीही कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत नसल्याने वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात केंद्र सरकारनं अचानक लॉकडाऊन लावल्यानं स्थलांतरित मजुरांचे जथ्थेच्या जथ्थे पायी चालत आपापल्या गावाकडे निघालेले दिसले. तसंच, कार्यालयं, व्यवसाय, कारखाने बंद झाल्यानं नोकऱ्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला. तो अजूनही कायम आहे.

संचारबंदी

14 तारखेला रात्री 8 वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागू झाली. पंढरपूर इथे निवडणुकीनंतर निर्बंध लागू होतील. सकाळी 7 ते रात्री 8 अति आवश्यक सेवा सुरू राहतील. सार्वजनिक वाहतूक बंद होणार नाही.

संचारबंदी

फोटो स्रोत, Getty Images

ट्रेन, बस सुरू होणार. जीवनावश्यक सोयीसुविधा देणारा कर्मचारी वृंदांची येजा नीट व्हावी यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू राहील.

आस्थापने बंद राहतील

अत्यावश्यक सेवा वगळता इतर सार्वजनिक आस्थापने बंद राहणार. हॉटेल आणि रेस्टॉरंटना पूर्वीचेच निर्बंध लागू असतील. पार्सल किचन सुरू राहतील.

काय सुरू असेल?

  • हॉस्पिटलं, डायग्नोस्टिक सेंटर्स, क्लिनिक्स, व्हॅक्सिनेशन, मेडिकल इन्शुरन्स ऑफिस, फार्मसी, फार्मसिटकल कंपन्या, हेल्थ सर्व्हिस, उत्पादन यंत्रणा आणि त्याची वाहतूक करणाऱ्या यंत्रणा.
कोरोना

फोटो स्रोत, GETTY IMAGES /MENAHEM KAHANA

  • दवाखाने, विमा, औषधं, औषधी सेवा डिलर, लस उत्पादन कारखाने, लस वाहतूक वाहनं, वैद्यकीय कच्चा माल वाहतूक. जनावरांशी संबंधित- कृषीची जनावरं, पाळीव प्राणी, वेअरहाऊसिंग, पावसाळ्याची कामं करण्यासाठीचा कर्मचारी, रिझर्व्ह बँक, सेबी, ईकॉमर्स, अधिस्वीकृती धारक पत्रकार, पेट्रोल पंप, कार्गो सेवा, सुरक्षामंडळं सुरू राहतील.
  • किराणा, दूध, भाजीपाला दुकानं सुरू राहतील. कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाऊस खुली असतील. विविध देशांचे दूतावास कार्यालयं सुरू राहतील.
  • पावसाळ्याची कामं सुरू राहतील. रिझर्व्ह बँक आणि सेबीप्रमाणित कार्यालयं सुरू असतील. टेलिकॉम क्षेत्राशी संबंधित यंत्रणा तसंच मालवाहतूक, पाणीपुरवठा यंत्रणा सुरू राहतील.
  • कृषीक्षेत्राशी निगडीत खतं, बियाणं, उपकरणं, दुरुस्ती सुरू राहील. आयात-निर्यात यंत्रणा. ईकॉमर्स यंत्रणा. डेटा सेंटर्स, क्लाऊड सर्व्हिसेस, आयटी यंत्रणा सुरू राहतील. सरकारी आणि खाजगी सुरक्षायंत्रणा.
  • इलेक्ट्रिक आणि गॅस पुरवठा यंत्रणा. एटीएम, पोस्ट सेवा, बंदरं, परवानाधारक औषधं आणि फार्मा उत्पादनांची वाहतूक करणाऱी वाहनं

तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ

राज्य सरकारतर्फे अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्रत्येकी तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ मोफत दिले जातील. सात कोटी नागरिकांना ही सुविधा देण्यात येईल.

1500 रुपये अर्थसाहाय्य. 12 लाख बांधकाम वर्गाला याचा फायदा होईल. अधिकृत पाच लाख फेरीवाल्यांना 1500रुपये. 12 लाख परवानाधारक रिक्षाचालकांना 5000 रुपये देण्यात येईल.

शिवभोजन थाळी मोफत देण्यात येणार

शिवभोजन थाळी काही कोटी लोकांनी याचा लाभ घेतला आहे. दहावरून पाचवर किंमत करण्यात आली होती. आता ही थाळी मोफत देणार आहोत.

कशी होईल वाहतूक, काय असतील नियम?

  • रिक्षात-ड्रायव्हर आणि 2 प्रवासी
  • टॅक्सी-ड्रायव्हर आणि 50 टक्के क्षमतेने वाहतूक
  • बस-सीटिंग कपॅसिटीनुसार वाहतूक मात्र उभ्याने जा-ये करण्यास परवानगी नाही.
  • मास्क न घालणाऱ्या व्यक्तीला पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल.

काय सुरू आणि काय बंद?

  • वर्तमानपत्रांचं प्रकाशन आणि वितरण केलं जाऊ शकतं. वर्तमानपत्राशी निगडीत व्यक्तींनी लवकरात लवकर लस घ्यावी.
  • सिनेमागृहं, नाट्यगृहं आणि सभागृहं बंद राहतील. अम्यूजमेंट पार्क, आर्केड, व्हीडिओ गेम पार्लर बंद राहतील.
  • वॉटर पार्क , क्लब, स्विमिंग पूल, जिम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
  • चित्रपट, मालिका, जाहिरातीचं चित्रीकरण थांबवण्यात येईल.
  • दुकानं, मॉल, शॉपिंग सेंटर्स जे अत्यावश्यक सुविधांमध्ये मोडत नाहीत ते बंद राहतील.
  • समुद्रकिनारे, बगीचे, खुल्या जागा बंद असतील.
  • धार्मिक केंद्र बंद असतील. सलून, स्पा, ब्युटी पार्लर बंद असतील.
  • शाळा, महाविद्यालयं बंद असतील. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सवलत देण्यात येईल.
  • सर्व प्रकारचे खाजगी क्लासेस बंद राहतील.
  • कोणत्याही स्वरुपाचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी नाही.
  • लग्नाला केवळ 25 जणांच्या उपस्थितीला परवानगी आहे.
  • अंत्यविधीला केवळ 20 जणांना उपस्थित राहण्यास परवानगी आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)