कोरोना : महाराष्ट्रातील रुग्णांना उपचारांसाठी सुरत, हैदराबाद का गाठावं लागत आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
महाराष्ट्रात कोव्हिड-19 संसर्ग मोठ्या झपाट्याने पसरतोय. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनच्या पर्यायाची चाचपणी राज्य सरकारकडून केली जात आहे.
पण, उद्धव ठाकरे सरकारसमोर खरं आव्हान आहे, कोरोना रुग्णांना योग्य वैद्कीय मदत मिळवून देण्याचं. कोव्हिड-19 च्या दुसऱ्या लाटेसमोर राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्याचं चित्र दिसून येत आहे.
राज्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातलंय. याचा थेट परिणाम रुग्णालयांवर झालाय. रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी नातेवाईकांची धावपळ सुरू झालीये. पुण्यात कोरोना रुग्णांसाठी एकही व्हॅन्टिलेटर उपलब्ध नाहीये, तर मुंबईत ICU, ऑक्सिजन बेड्ससाठी नातेवाईकांची फरफट सुरू आहे.
ग्रामीण भागातही परिस्थिती वेगळी नाही. बेड मिळत नसल्याने रुग्ण आणि नातेवाईकांना उपचारासाठी सुरत आणि हैदराबाद गाठवं लागतंय.
'बेड मिळाला नाही म्हणून हैदराबादला आलो'
साईनाथ पैटवार मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात रहातात. कोरोनाबाधित वडील आणि भावाला बेड मिळत नसल्यामुळे पैटवार यांना उपचारांसाठी हैद्राबाद गाठावं लागलं.

फोटो स्रोत, Hindustan Times
बीबीसीशी बोलताना ते म्हणतात, "माझे वडील आणि भाऊ कोरोनाबाधित होते. वडिलांची तब्येत नाजूक होती. रुग्णालयं पालथी घातली. बेडसाठी खूप शोधाशोध केली. पण, बेड मिळाला नाही. अखेर उपचारांसाठी हैदराबादला जाण्याचा निर्णय घेतला."
महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत मुंबई, पुणे, नाशिकप्रमाणे नांदेडही कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाला कडक लॉकडाऊन करावा लागला होता.
वडील आणि भावाला घेऊन साईनाथ 31 मार्चला हैदराबादला गेले.
"वडिलांची परिस्थिती गंभीर होती. योग्य वेळी अॅम्ब्युलन्सही मिळाली नाही. हैदराबादला पोहोचल्यानंतर चार तासांनी वडीलांना बेड मिळाला. तो पर्यंत ते अॅम्ब्युलन्समध्येच होते. भावाला बेड मिळण्यासाठी दुसरा दिवस उजाडला," असं साईनाथ पैटवार पुढे सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे म्हणतात, "भावाची तब्येत आता चांगली आहे. पण, वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला."
हैदराबादमध्ये महाराष्ट्रातून येणारे रुग्ण वाढले?
कुटुंबीयांच्या उपचारासाठी हैदराबादला गाठणारे साईनाथ एकटे नाहीत. हैदराबाद लगतच्या मराठवाड्यातील शहरातून रुग्ण बेड्सच्या अभावी सीमा ओलांडून हैदराबादला पोहोचत आहेत.
बीबीसी तेलुगूला मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद शहरातील मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयात उपचारांसाठी महाराष्ट्रातून दाखल झालेल्या रुग्णांची संख्या 10 ते 15 टक्के आहे.
न्यू इंडियन एक्सप्रेसशी बोलताना हैदराबादच्या यशोदा रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवा विभागाचे संचालक डॉ. लिंगया अमिदायला सांगतात, "महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होत आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
तज्ज्ञांच्या मते आंध्रप्रदेशच्या महाराष्ट्र सीमेलगतच्या शहरातून हैदराबादमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या गंभीर रुग्णांची संख्या जास्त आहे.
KIMS रुग्णालयाचे डॉ. प्रवीण न्यू इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणतात, "महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील काही शहरात ऑक्सिजन, ICU सुविधा नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचारासाठी रुग्ण याठिकाणी येत आहेत."
द न्यूज मिनिटच्या माहितीनुसार, तेलंगणाचे आरोग्यमंत्री इटाला राजेंदर यांनी 7 एप्रिलला "महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांमुळे हैद्राबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे," असं वक्तव्य केलं होतं.
'महाराष्ट्रातून सूरतमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या 9-10 टक्के वाढली'
हैदराबादप्रमाणेच गुजरातच्या सूरत शहरात महाराष्ट्रातून कोरोना रुग्ण उपचारांसाठी दाखल होत आहेत. नंदुरबार, धुळे गुजरातच्या सीमेलगत आहेत. या जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने कोव्हिड-19 रुग्ण सूरतमध्ये पोहोचत आहेत.
महाराष्ट्रातील रूग्ण सुरतमध्ये का पोहोचत आहेत? हे जाणून घेण्यासाठी आम्ही सुरत महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकरी डॉ. प्रदीप उम्रिगर यांच्याशी संपर्क केला.

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसीशी बोलताना ते सांगतात, "गेल्या 20-25 दिवसांपासून सुरतमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. रुग्णालयात येणारे 9 ते 10 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत."
सुरत महानगरपालिकेच्या सूरत म्युनिसिपल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल एज्यूकेशन अॅन्ड रिसर्च (SMIMER), न्यू सिव्हिल हॉस्पिटल आणि शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये महाराष्ट्रातून आलेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
"या रुग्णांवर ओपीडीत (OPD) उपचार केले जात आहेत. काहींना रुग्णालयात दाखल करावं लागत आहे. हे रुग्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आहेत. नाशिकसारखं अद्ययावत सुविधा असलेलं शहर खूप दूर असणं हे सुरतमध्ये रुग्ण येण्याचं हे एक कारण असू शकतं," असं डॉ. उम्रिगर पुढे म्हणतात.
सुरतचं न्यू सिव्हिल रुग्णालय आणि सुरत म्युनिसिपल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल एज्युकेशन अॅन्ड रिसर्चमध्ये सध्या 60 टक्के रुग्ण दाखल आहेत, अशी माहिती डॉ. प्रदीप यांनी दिलीये.

फोटो स्रोत, NurPhoto
डॉ. उम्रिगर म्हणतात, "काही रुग्ण स्वत:हून रुग्णालयात येतात, तर काही रुग्णांचे नातेवाईक सुरतमध्ये आहेत. त्यामुळे नातेवाईकांसोबत हे रुग्ण उपचारांसाठी येत आहेत."
सुरतच्या महापालिका आणि सरकारी रुग्णालयांप्रमाणेच खासगी रुग्णालयातही मोठ्या संख्येने रुग्ण येत आहेत.
सुरतच्या निर्मल रुग्णालयाचे डॉ. निर्मल चोरारिया बीबीसीशी बोलताना सांगतात, "गेल्या सात-आठ दिवसांपासून महाराष्ट्रातून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. या रुग्णांना गंभीर स्वरूपाचा आजार असल्याचं दिसून आलंय. ज्यांना ऑक्सिजन आणि व्हॅन्टिलेटरची गरज आहे."
"सुरत शहरातील काही खासगी रुग्णालयात मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून येणारे रुग्ण दाखल झाले आहेत," असं डॉ. चोरारिया म्हणतात.
नंदूरबारमध्ये ट्रेनमध्ये आयसोलेशन सेंटर
एकीकडे बेड्सची कमतरता नसल्याने नंदूरबार आणि धुळ्यातील रुग्ण सुरतला उपचारांसाठी जात आहेत, तर बेड्सची संख्या वाढवण्यासाठी नंदुरबारमध्ये ट्रेनमध्ये आयसोलेशन सेंटर बनवण्यात आलंय.

फोटो स्रोत, Getty Images
याबाबत बीबीसीशी बोलताना पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर म्हणाले, "नंदुरबार जिल्हा प्रशासनाने कोव्हिड आयसोलेशनसाठी रेल्वेची मदत मागितली होती. रेल्वेने आयसोलेशनसाठी 21 कोच (डब्बे) नंदुरबार जिल्हा प्रशासनाला पुरवले आहेत."
"या प्रत्येक कोचमध्ये 60 रुग्णांना ठेवण्याची क्षमता तयार करण्यात आली आहे. हे कोच नंदुरबारमध्ये पोहचले आहेत," असं सुमीत ठाकूर पुढे म्हणाले.
नंदुरबारमध्ये 7338 अॅक्टिव्ह कोरोनारुग्ण आहेत. 11 एप्रिलला 348 नवीन कोरोनारुग्ण आढळून आले होते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








