कोरोना: सरकारी आकडे नाही, सतत जळणाऱ्या चिता दाखवत आहेत कोरोनाचा कहर

फोटो स्रोत, Getty Images
- Author, झुबैर अहमद
- Role, बीबीसी प्रतिनिधी
एकाचवेळी इतक्या चिता जळताना मी पहिल्यांदाच पाहिल्या. एकाच दिवसात दिल्लीतल्या तीन स्मशानांमध्ये हेच चित्र होतं. ज्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत होते ते सगळे कोरोनामुळे गेले होते.
शनिवारी मी दिल्लीत हॉस्पिटलचा दौरा केला. ऑक्सिजन, बेड, औषधं यांच्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण सुरू होती. शेवटचा श्वास घेतलेल्या रुग्णांचे नातेवाईक ओक्साबोक्सी रडत होते.
सोमवारी मी ज्येष्ठ, तरुण, लहान यांना एकमेकांना कवटाळून रडताना पाहिलं. चिता जाळण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या लोकांना पाहिलं. स्मशानं अपुरं पडू लागल्याने मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार सुरू झालेत, तेही पाहिलं.
दिल्ली गेल्या काही दिवसात दररोज साडेतीनशे ते चारशे कोरोना मृत्यू होत आहेत. तीन स्मशानांमध्ये मिळून मी शंभरहून अधिक चिता जळताना पाहिल्या.
सराय काले खाँ रिंग रोडला लागून, ट्रॅफिकपासून आत विद्युत स्मशनाभूमी आहे. तिथे एकाचवेळी अनेक चिता जळत होत्या, अनेक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जात होते. नातेवाईक, अॅम्ब्युलन्स, तिथले कर्मचारी अशी गर्दीच होती तिथे. एकावेळी दहा ते बारा मृतदेह जळत होते.

अंत्यसंस्कारासाठी तिथे एक पंडित होते मात्र ते कामात इतके व्यग्र होते की त्यांच्याशी बोलणंही अवघड होतं. मी तिथले काही व्हीडिओ चित्रित करणार तोच प्रचंड उष्णतेने फोन बंद पडला.
मी विचार केला इतका मजबूत फोन पाच मिनिटात तापून बंद पडला. पंडित या सगळ्यांतून मार्ग काढत अंत्यसंस्कार करत आहेत. मी त्यांना जवळ जाऊन विचारलं की, किती चिता जळत आहेत? ते म्हणाले, चोवीस तास इथे मृतदेह येत आहेत. किती ते सांगता येणार नाही.
काही मिनिटात मृतदेहाला घेऊन एक अॅम्ब्युलन्स आत शिरली. थोड्या वेळात तिसरी आली. माझं डोकं गरगरू लागलं. कट्टरतावाद्यांनी केलेले हल्ले, हत्या अशा प्रसंगांचं वृत्तांकन केलं आहे मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर सामूहिक अंत्यसंस्कार मी पाहिलेले नाहीत.
चिता जळत असल्याने निर्माण होणारी उष्णता, तापलेला सूर्य, डोक्यापासून पायापर्यंत पीपीई किट असल्याने घामाने भिजायला होणं या सगळ्यामुळे तिथे उभं राहणं अवघड झालं. कदाचित मी भावुक झालो.

मी थोडा बाजूला जाऊन उभा राहिलो. मी तिथून निघू लागलो तेव्हा महिला पत्रकाराने सांगितलं, थोड्या अंतरावर एका मैदानात तात्पुरतं स्मशान उभारलं जात आहे. मी तिथे पोहोचलो. अनेक कामगार तिथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी 20-25 चिता तयार करत होते. तिथे उपस्थित एकाने सांगितलं कोव्हिडमुळे मरणाऱ्यांची संख्या वाढू शकते.
लोधी रोड विद्युत स्मशानभूमीत आणखी मृतदेह होते. मोठ्या प्रमाणावर चिता जळत होत्या. मृतांचे असंख्य नातेवाईक तिथे उपस्थित होते. कुटुंबातील अनेकजण एकमेकांना सावरत रडत होते.
अॅम्ब्युलन्स येत होत्या, मृतदेह ठेवले जात होते. मोजदाद केली नाही पण अंदाजे 20-25 चिता जळत होत्या. अनेक नातेवाईक पीपीई किट घालून आले होते.

असाच पीपीई किट घातलेला विमनस्क तरुण बाजूच्या बाकड्यावर बसला होता. त्याने सांगितलं की त्याचे वडील सोमवारी सकाळी गेले. ते कोरोना पॉझिटिव्ह होते. तो स्मशानभूमीत आधीच पोहोचला. त्याचा भाऊ वडिलांचा मृतदेह घेऊन आला. काही क्षणात तो रडू लागला. तिथे उपस्थित काही लोक त्याचं सांत्वन करू लागले.
तिथे उपस्थित लोक आप्तस्वकीयांना शेवटचा निरोप द्यायला आले होते. एकमेकांना सावरत ते वावरत होते.
सीमापुरी स्मशानभूमी
सीमापुरी स्मशानभूमी चिंचोळी जागा आहे मात्र तरीही तिथे मोठ्या प्रमाणावर चिता जळत होत्या. मृतदेहांच्या वाढत्या संख्येमुळे तात्पुरते प्लॅटफॉर्म उभारण्यात आलेत.

नातेवाईक स्वत:च मृतदेह आणत होते. चिता जाळण्यासाठी लाकडांची व्यवस्थाही स्वत:च करत होते. बजरंग दलाशी संलग्न एक तरुण मला भेटला. अॅम्ब्युलन्स सेवेचं तो काम करतो. गेले दहा दिवस इथे सातत्याने मृतदेह येत आहेत. शिखांची एक संघटना मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्याचं काम करत आहेत. परंतु लोक खूप आहेत.
एका सरदारजींनी सांगितलं की गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती एवढी बिघडली आहे की लोकांना दुसऱ्या स्मशानभूमीत जा असं सांगावं लागेल. ते तिथे सेवेकरी म्हणून काम करत आहेत. त्यांनी दावा केली सीमापुरी स्मशानभूमीत दररोज शंभरहून अधिक चिता जळत आहेत.
मुस्लीम कब्रस्तानांची काय स्थिती?
लोधी रोडवरच स्मशानाजवळच मुस्लीम कब्रस्तान आहे. ओखल्यातल्या बाटला हाऊस इथेही कब्रस्तान आहे. तिथे जवळच राहणाऱ्या एकांशी बोललो. त्यांनी सांगितलं की आधी तीन ते चार लोकांसाठी कबर खोदली जात असे. एप्रिल महिन्यापासून रोज 25-30 कबरी खणल्या जात आहेत. मीच काल दोन मृतदेहांसाठी नमाज पढलो.

इन्कम टॅक्स कार्यालय परिसरात टाईम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागे कब्रस्तान आहे. या कब्रस्तानात मरणाऱ्यांना भेदभाव केला जात असल्याचं लक्षात आलं. कबर खोदण्याचं काम करणाऱ्याने सांगितलं की कोव्हिडने मृत्यू होणाऱ्यांसाठी वेगळी कबर आहे.
तो मला तिथे घेऊन गेला. एका कोपऱ्यात त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोव्हिडने किती लोकांचा मृत्यू होत आहे हे विचारलं तर तो म्हणाला 20-25 मृतदेह येत आहेत. मात्र त्यांच्यासाठी नमाज पडणारं कोणीच नव्हतं. सकाळच्या नमाजनंतर किंवा संध्याकाळच्या नमाजानंतर लोक आप्तस्वकीयांचं दफन करतात.
तिथल्या एका माणसाने सांगितलं की त्याच्या आईचं सकाळी निधन झालं. त्यांचा भाऊ मृतदेह आणण्यासाठी हॉस्पिटलात गेला होता. कोव्हिड झाल्यानंतर बारा दिवसात त्या गेल्या.
मी केवळ तीन स्मशानभूमीत जाऊ शकलो. दिल्लीत डझनभर स्मशानं आहेत. कोव्हिडमुळे होणाऱ्या मृत्यूंचा नेमका अंदाज इथे येऊ शकतो. सरकार कोव्हिड मृत्यूंचा आकडा कमी दाखवत आहेत मात्र इथे जळणाऱ्या चिता वेगळंच चित्र दाखवतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








