कोरोना : महाराष्ट्रातील रुग्णालयं मृत्यूचा सापळा होत आहेत का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
विरारमध्ये विजय वल्लभ रूग्णालयातील आग्नितांडवात 13 कोव्हिडग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. ICU मध्ये जगण्याची झुंज सुरू असतानाच, या रुग्णांवर काळाने घाला घातला.
महाराष्ट्रात कोव्हिड-19 किंवा सामान्य रुग्णालयात आग लागण्याची ही पहिली घटना नाही. गेल्याकाही महिन्यात रुग्णालयातील आगीत 45 हून अधिक रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.
रुग्णालयात आग लागल्याच्या घटनेनंतर सरकारकडून चौकशीचे आदेश दिले जातात. चौकशी अहवालानंतर कारवाई केली जाते. पण ठोस उपाययोजना मात्र होताना दिसत नाहीत.
त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णालयं मृत्यूचा सापळा बनत आहेत? हा महत्त्वाचा प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय.

फोटो स्रोत, Anadolu Agency/getty images
रुग्णालयातील अग्नितांडवाच्या घटना
- 23 एप्रिल 2021 - विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयातील अग्नितांडवात 13 रुग्णांनी प्राण गमावले. आगीचं प्राथमिक कारण एसी युनिटमध्ये शॉर्टसर्किटने स्फोट झाला असं सांगण्यात आलं.
- 10 एप्रिल 2021- नागपुरच्या वाडी परिसरातील कोव्हिड रुग्णालयात आग लागली. 4 रुग्णांचा मृत्यू झाला. ICU मधील एसी युनिटमध्ये आग लागली.
- 26 मार्च 2021 - भांडुपच्या सनराईज कोव्हिड रुग्णालयातील अग्नितांडवात 11 कोव्हिड रुग्णांचा मृत्यू झाला. आगीचं प्राथमिक कारण शॉर्टसर्कीट होतं.
- ऑक्टोबर 2020 - मुलुंडच्या एपेक्स कोव्हिड रुग्णालयात आग लागली. 1 रुग्ण मृत्यूमुखी पडला. जनरेटवर जास्तप्रमाणात तापल्याने आग लागल्याचं सांगण्यात आलं.
- जानेवारी 2021 - भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु विभागात आग लागली. यात 10 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. रेडियंट वॉर्मल कंट्रोल पॅनलमध्ये स्पार्क झाल्याने लाग लागल्याचं चौकशीत उघड झालं.
रुग्णालयात आग लागण्याची कारणं काय?
रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा, निष्काळजीपणा, रुग्णालयातील अग्निसुरक्षा तपासण्यात सरकारी यंत्रणांकडून होणारी दिरंगाई ही अग्नितांडवाची प्रमुख कारणं आहेत.

फोटो स्रोत, VINAMRA ACHAREKAR/getty images
मुंबई अग्निशमन दलाचे माजी प्रमुख प्रताप करगुप्पीकर, रुग्णालयातील अग्नितांडवाची प्रमुख कारणं सांगतात -
- कोव्हिड सेंटरमध्ये किंवा रुग्णालयात अग्नीरोधक मटेरिअल वापरण्यात येत नाही
- एसी रूममधील हवा दर तासाला कमीतकमी 20 वेळा पूर्ण बदलली गेली पाहिजे. रुममध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खूप जास्त असल्यास आग भडकण्याची शक्यता असते
- कोव्हिड रुग्णालयात हात धुण्यासाठी सॅनिटायझर वापरतात. यातील ज्वालाग्रही गॅस हवेत रहातो. त्यामुळे आग भडकू शकते.
- एसी सतत सुरू राहिला तर त्यातील पार्ट गरम होऊन स्फोट होण्याची शक्यता असते.
- वायरिंग सदोष असल्यास आग लागण्याची शक्यता असते.
"आपत्कालीन व्यवस्थेच्या नावावर या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही. देखभाल आणि दुरुस्ती याकडे दुर्लक्ष केलं जाततं. ऑक्सिजन आणि ज्वलनशील पदार्थांचं कॉम्बिनेशन खूप घातक आहे," असं प्रताप करगुप्पीकर पुढे सांगतात.
पालघरमध्ये राहणाऱ्या प्रशांत ठाकरे यांनी अनेक रुग्णालयात एसी यंत्रणा बसवलेली आहे. ते म्हणतात, "एसीची देखभाल आणि दुरूस्ती योग्यवेळी होणं गरजेचं आहे. वायरिंग, केबलिंगमध्ये बिघाड झाला तर, शॉर्टसर्किट होण्याची शक्यता असते."
एसीमध्ये स्फोट होऊ शकतो?
गेल्याकाही दिवसात रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये एसी युनिटमध्ये स्फोट झाल्याचं प्राथमिक कारण पुढे येतंय.
त्याबद्दल बोलताना प्रताप करगुप्पीकर सांगतात, "एसी मशिनला आठ तासानंतर रेस्ट गरजेची आहे. यासाठी खरंतर दोन मशिन असाव्या लागतात. एसी सतत सुरू राहिला तर, तो खूप गरम होणार. एसीमधील पार्ट गरम होणार. ज्यामुळे छोटा स्फोट होण्याची शक्यता असते."

फोटो स्रोत, Anadolu Agency/getty images
भाजप नेते किरीट सोमय्या सांगतात, "राज्यातील कोणत्याही रुग्णालयाचं फायर सेफ्टी ऑडिट करण्यात आलेलं नाही. हे ऑडिट शास्त्रीय पद्धतीने होणं गरजेचं आहे. भांडुपच्या रुग्णालयाला फायर सेफ्टी नव्हती. सरकारने सर्व कोव्हिड सेंटरचं ऑडीट केलं पाहिजे."
रुग्णालयातील अग्निसुरक्षेच्या मार्गदर्शक सूचना
नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीने देशभरातील रुग्णालयांना 2016 मध्ये अग्निसुरक्षेबाबत सूचना दिल्या आहेत -
- रुग्णालयातील भिंत आणि फ्लोअर अग्निरोधक असावी
- आग लागल्यास ऑटोमॅटिक अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित झाली पाहिजे
- फायर अलार्म सिस्टिम, आग विझवण्यासाठी यंत्रणा
- इलेक्ट्रिकल वायरिंग सुरक्षित ठेवण्यासाठी डक्ट किंवा शाफ्ट असावा
- रुग्णालयाने ICU आणि वॉर्डमधून रुग्णांना आपात्कालीन परिस्थितीत बाहेर कसं काढावं याचा वर्षातून एकदा सराव करावा
- आपत्कालीन परिस्थितीत ICU मॅनेजमेंटचा अभ्यास
- एसीचे इन्स्पेक्शन पॅनल आणि दरवाजे अग्निरोधक असावेत. 1 तासापेक्षा जास्तवेळ टिकू शकतील असे गरजेचे
यांसारख्या अनेक मार्गदर्शक सूचना रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेबाबत देण्यात आल्या आहेत.
निष्काळजीपणा प्रमुख कारण?
रुग्णालयात आग लागण्याच्या घटनेनंतर सरकारकडून कागदी घोडे नाचवले जातात. अहवाल तयार करून दोन-चार लोकांवर कारवाई होते. पण ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.
माजी सनदी अधिकारी महेश झगडे सांगतात, "रुग्णालयात फायर ऑडिट होतं का नाही, अग्निसुरक्षेची उपकरणं योग्य आहेत का, शॉर्टसर्किट होत नाहीये ना, हे तपासण्याचं काम वायरमन आणि अभियंत्यांचं आहे. त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. पण याकडे दुर्लक्ष केलं जातं."
मुंबईतील परिस्थिती काय?
रुग्णालयात आग लागण्याच्या घटनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील सर्व रुग्णालयांच्या फायर ऑडिटचे आदेश दिले होते.

फोटो स्रोत, Go Nakamura/getty images
रुग्णालयात अग्निसुरक्षा नसल्याचा मुद्दा मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळात मुंबईतील 701 रुग्णालयात अग्निसुरक्षेत त्रूटी आढळून आल्या आहेत, असं मान्य केलं होतं.
राज्य सरकारची माहिती -
- मुंबई महापालिकेने 1324 खासगी आणि सरकारी रुग्णालयांची अग्निसुरक्षा ऑडीट केलं
- 663 खासगी रुग्णालयात अग्निसुरक्षा उपाययोजनांमध्ये त्रुटी. या रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली
- 38 सरकारी आणि पालिका रुग्णालयात त्रूटी आढळून आल्या
भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमिवर ठाण्यातील रुग्णालयांचं फायर ऑडीट करण्यात आलं. ठाण्यातील 347 रुग्णालयांची तपासणी अग्नीशमन विभागाने केली. शहरातील 168 रुग्णालयांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
सरकारने विधीमंडळात दिलेल्या माहितीनुसार, आग लागण्याच्या घटनांमध्ये बहुतांश प्रकरणात सदोष विद्युत प्रणाली मुख्य कारण असल्याचं समोर आलं आहे.
एप्रिल 2019 मध्ये बॉम्बे हायकोर्टाने अग्निशमन विभागाची परवानगी नसलेल्या मुंबई आणि ठाण्यातील सर्व रुग्णालयांना सील करण्याचे आदेश दिले होते.
मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी एप्रिल महिन्यात सर्व रुग्णालयांना फायर सेफ्टी ऑडीट करण्याचे आदेश दिले होते.
सदोष वायरिंग आग लागण्याचं प्रमुख कारण
साल 2018 मध्ये तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी मुंबईत आग लागण्याच्या 69 टक्के घटना सदोष वायरिंगमुळे घडल्याची माहिती, विधानपरिषदेत दिली होती.
2008 ते 2018 या कालावधीत मुंबईत 49 हजारपेक्षा जास्त आग लागण्याच्या घटना घडल्या. ज्यातील 33 हजारपेक्षा जास्त घटनांमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती सरकारने दिली होती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








