कोरोना: सगळीकडे फक्त अॅम्ब्युलन्स, मृतदेहांचा ढीग, अन् काळीज पिळवटणारा आक्रोश

उत्तर प्रदेश, कोरोना, आरोग्य व्यवस्था

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, अनेक स्मशानांमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार होण्यासाठी वाट पाहावी लागते आहे.
    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

देशात कोव्हिडची दुसरी लाट धोकादायक पद्धतीने संसर्ग करत आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात कोरोनाने थैमान घातलं आहे.

कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच, व्यवस्था अपुरी ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे. गोष्टी नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी लोकांनी आपल्या व्यथा बीबीसीकडे मांडली.

कंवजजीत सिंह यांचे वडील 58वर्षीय निरंजन पाल सिंह यांचा शुक्रवारी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. बेड्स उपलब्ध नसल्याने त्यांना दाखल करून घेण्यास चार रुग्णालयांनी नकार दिला होता.

कानपूरहून बोलताना त्यांनी सांगितलं की, माझ्यासाठी हा आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस आहे. बाबांवर वेळीच उपचार झाले असते तर त्यांचा जीव वाचला असता. पोलीस, आरोग्य प्रशासन, सरकार कोणीही आमची मदत केली नाही.

गेल्या वर्षी कोरोनाचं संकट देशात आल्यापासून उत्तर प्रदेशात 8,51, 620 लोकांना याचा संसर्ग झाला होता. उत्तर प्रदेशात कोरोनामुळे 9,830 लोकांचा मृत्यू झाला होता. पहिल्या लाटेवेळी उत्तर प्रदेशची स्थिती आताइतकी भयावह नव्हती. दुसऱ्या लाटेने लोकांना अगतिक स्थितीत ढकललं आहे.

उत्तर प्रदेश, कोरोना, आरोग्य व्यवस्था

फोटो स्रोत, Getty Images

अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की परिस्थिती आटोक्यात आहे. मात्र उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, वाराणसी, कानपूर, इलाहाबाद या शहरातील रुग्णालयांमधील प्रचंड गर्दी, बेड्स नसल्याने परत पाठवलं जाणाऱ्या रुग्णांची संख्या, स्मशानभूमीत 24 तास जळत असलेल्या चीता ही परिस्थिती राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरली आहे.

देशातील सगळ्यात मोठं राज्य

24 कोटी लोकसंख्येसह उत्तर प्रदेश देशातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य आहे. देशातला सहावा नागरिक या राज्याचा रहिवासी आहे, इतकं हे राज्य मोठं आहे. भौगोलिक संदर्भात सांगायचं तर उत्तर प्रदेश स्वतंत्र देश असता तर चीन, भारत, अमेरिका, इंडोनेशिया यानंतरचा जगातला सगळ्यात मोठा देश झाला असता. पाकिस्तान आणि ब्राझील या देशांपेक्षा उत्तर प्रदेशचं क्षेत्रफळ जास्त झालं असतं.

राजकीयदृष्ट्याही उत्तर प्रदेश महत्त्वाचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मूळचे गुजरातचे असले तरी त्यांनी वाराणसीतून निवडणूक जिंकली होती. तो त्यांचा मतदारसंघ आहे. संसदेत उत्तर प्रदेशचे 80 खासदार असतात. संसदेत म्हणजेच राष्ट्रीय पातळीवर संख्याबळ असूनही उत्तर प्रदेशमध्ये विकास म्हणावा तसा पाहायला मिळत नाही.

उत्तर प्रदेश, कोरोना, आरोग्य व्यवस्था

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना चाचण्यांसाठीही गर्दी आहे.

उत्तर प्रदेशात कोरोनाचे 1,91,000 अक्टिव्ह केस आहेत. दररोज कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. कोरोना संक्रमित झालेल्या लोकांची संख्या जास्त असल्याने राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. कोरोना संसर्ग झालेल्यांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कॅबिनेटमधील सहकारी, डझनभर अधिकारी, शेकडो डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसात मी उत्तर प्रदेशातल्या अनेकांशी बोलले. त्यांच्याकडून हृदयद्रावक कहाण्या ऐकायला मिळाल्या.

कानपूरमध्ये कार्यरत एका पत्रकाराने शेअर केलेल्या व्हीडिओत, लाला लजपतराय सरकारी रुग्णालयाच्या वाहनतळामध्ये एक रुग्ण जमिनीवर पडलेल्या स्थितीत आहे. थोड्या अंतरावर एक वयस्क व्यक्ती बाकड्यावर बसला आहे. या दोघांनाही कोरोना झाला आहे मात्र बेड उपलब्ध नसल्याने ते अशा अवस्थेत आहेत.

सरकारच्याच कांशीराम रुग्णालयाच्या बाहेर, एक मुलगी रडते आहे कारण दोन रुग्णालयांनी तिच्या आजारी आईला भरती करून घेण्यास नकार दिला.

ती मुलगी रडत सांगत होती, रुग्णालयाचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे बेड उपलब्ध नाही. बेड नसेल तर किमान त्याला फरशीवर ठेवा पण उपचार तर करा. माझ्यासारखी अनेक माणसं आहेत. मी अनेक रुग्णांना परत पाठवताना पाहिलं आहे. मुख्यमंत्री सांगतात की पुरेसे बेड्स आहेत. मला दाखवा की कुठे बेड्स आहेत? कृपा करून माझ्या आईवर उपचार करा.

राजधानी लखनौची अवस्था तितकीच खराब आहे.

कोरोना
लाईन

गाडीत बसलेल्या आणि चेहऱ्यावर मास्क लावलेल्या सुशील कुमार श्रीवास्तव यांचा फोटो सोशल मीडियावर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांच्या घरचे इकडून तिकडे फिरत होते. जेव्हा त्यांना बेड मिळाला, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

आम्ही त्यांचा मुलगा आशिषला फोन केला. त्यांनी सांगितलं की या दु:खातून सावरलेलो नाही आणि आता काही बोलू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे काय काय झालं ते. मी आता बोलण्याच्या स्थितीत नाही.

उत्तर प्रदेश, कोरोना, आरोग्य व्यवस्था

फोटो स्रोत, SUMIT KUMAR

फोटो कॅप्शन, सुशील कुमार यांच्यासाठी त्यांचा मुलगा हॉस्पिटलमध्ये बेड शोधत होता पण..

निवृत्त न्यायाधीश रमेशचंद्र यांनी हिंदीत लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केलं. त्यांच्या पत्नीला कोरोना झाला होता. पत्नीचा मृतदेह घरातून अंत्यसंस्कारासाठी न्यावा यासाठी त्यांनी पत्राद्वारे प्रशासनाला विनंती केली. मात्र त्यांना कोणाकडूनही काहीही उत्तर मिळालं नाही.

त्यांनी या पत्रात लिहिलं- मी आणि माझ्या बायकोला कोरोना झाला. कालपासून अनेक सरकारी हेल्पलाईन नंबर्सवर कॉल केले. किमान पन्नास वेळा कॉल केला असेल. मात्र औषध देण्यासाठी, रुग्णालयात नेण्यासाठी कोणीही आलं नाही. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच माझ्या पत्नीचं निधन झालं.

पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत अनेक वर्ष राहत असलेल्या 70वर्षीय निर्मला कपूर यांचा गुरुवारी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांचा मुलगा विमल कपूर यांनी परिस्थिती भीषण असल्याचं सांगितलं.

विमल सांगतात, मी अनेकांना अम्ब्युलन्समध्ये मरताना पाहिलं आहे. रुग्णालय रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी तयार नाहीत कारण त्यांच्याकडे पुरेशी यंत्रणा नाहीये. दुकानदारांकडे औषधं तसंच इंजेक्शन्स नाहीयेत. ऑक्सिजन पुरेसा नाहीये.

आईला स्मशानात घेऊन गेलो तिथे मृतदेहांचा ढीग लागला होता. चितेसाठी लाकडाची किंमत तिप्पट सांगण्यात आली. अंत्यसंस्काराला अर्धा तास लागतो. मृतदेह इतक्या मोठ्या प्रमाणावर होते की पाच ते सहा तास लागतात.

मी याआधी असं दृश्य कधीच पाहिलं नाही. जिथे बघावं तिकडे अम्ब्युलन्स आणि मृतदेहांचे ढीग.

खरं चित्र जनतेच्या समोर नाही

कोव्हिडमुळे होणारे मृत्यू आणि यामुळे उद्ध्वस्त होणारी कुटुंब यादरम्यान राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढते आहे. रविवारी उत्तर प्रदेशात 30,596 नव्या रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात सर्वाधिक रुग्णांना कोरोना संसर्ग झाला.

विरोधी पक्षनेते आणि कार्यकर्तेही कोरोना संसर्गासंदर्भात खरं चित्र सांगू शकलेले नाहीत. राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या होत नाहीयेत आणि खाजगी प्रयोगशाळांचे आकडे आकडेवारीत न घेतल्याने कोरोना मृत्यूंचा खरा आकडा लपवला जात असल्याचा आरोप विरोध करत आहेत.

उत्तर प्रदेश, कोरोना, आरोग्य व्यवस्था

फोटो स्रोत, SUMIT KUMAR

फोटो कॅप्शन, स्मशानातलं चित्र

विरोधकांच्या दाव्यात तथ्य दिसते आहे. ज्या लोकांशी आम्ही बोललो त्यापैकी अनेकांच्या चाचण्या झाल्या नव्हत्या. अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह असूनही राज्य सरकारच्या आकडेवारीत त्यांच्या नावाची नोंदणी झाली नव्हती.

लखनौच्या 62वर्षीय अजय सिंह यांनी आपल्या पत्नीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मला पाठवला. मात्र राज्य सरकारच्या वेबसाईटवर त्यांच्या पत्नीचा नावाचा पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये उल्लेखच नाही.

कानपूरचे निरंजन सिंह आणि वाराणसीच्या निर्मला कपूर या दोघांची नावं राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये सामील होती मात्र डेथ सर्टिफिकेटवर कोरोना मृत्यू असा उल्लेख नव्हता.

प्रसारमाध्यमांनीही सरकार देत असलेल्या कोरोना मृत्यूंच्या आकड्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लखनौ आणि वाराणसीत स्मशानात जळणाऱ्या चिता आणि कोरोनामुळे झालेले मृत्यू यांच्यात ताळमेळ नाही.

सरकारने संधी गमावली

वाराणसीतील खाजगी रुग्णालय हेरिटेज हॉस्पिटलचे संचालक अंशुमान राय सध्याची परिस्थिती अभूतपूर्व असल्याचं सांगितलं. आरोग्य व्यवस्था कोलमडली असल्याने अनेक डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, लॅब टेक्निशियन आजारी पडत आहेत.

उत्तर प्रदेश, कोरोना, आरोग्य व्यवस्था

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, अॅम्ब्युलन्सची अशी रांग आहे.

अशा परिस्थितीत आम्ही दोनशे टक्के योगदान द्यायला हवं तिथे आम्ही शंभर टक्के योगदानही देऊ शकत नाही. कारण आरोग्य व्यवस्था पूर्णत: मनुष्यबळावर अवलंबून आहे.

दुसऱ्या लाटेचं अनुमान करण्यात अपयशी ठरल्याचं खापर विरोधक राज्य आणि केंद्र सरकारवर फोडत आहेत.

सप्टेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत काहीच काम झालं नाही. या काळात आरोग्य व्यवस्था आणि पायाभूत यंत्रणा बळकट करता आली असती असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. ऑक्सिजन बँकसह राज्याला औषधंही जमा करता आली असती. मात्र सरकारने ही संधी गमावली.

कोरोना अक्राळविक्राळ वेगाने पसरत असताना, सगळं ठीक होण्याची आशा दिसत नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)