कोरोना : डॉक्टरांचं मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललंय का?

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"कस्तुरबा रुग्णालयातच काम करणाऱ्या एका परिचारिकेच्या पतीला कोरोनाची लागण झाली. ते कस्तुरबा रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्याशी मी रोज बोलायचो. काऊन्सिलींग करायचो. तुम्ही बरे होणार हा विश्वास द्यायचो. पण एक दिवस ते व्हेंटिलेटरवर गेले.

"आमची परिचारिका रोज मला म्हणायची, सर प्लीज काहीतरी करा ना. 28 दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. पण त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी ती परिचारिका गरोदर होती. तिच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर मी सुन्न झालो.

"त्या परिचारिकेचा चेहरा बघून ती घटना आठवत राहते. आपण काहीच करू शकलो नाही का? हा प्रश्न वारंवार मनात येतो. मला माझे घरचे म्हणतात, तू पूर्वीसारखा बोलत नाहीस, हसत नाहीस. का इतक्या टेन्शनमध्ये असतोस? पण काहीही केलं तरी मागच्या दीड वर्षांपासून रूग्णांचे सुरू असलेले हाल, अपुऱ्या सुविधांमुळे झालेले मृत्यू आणि ते मागे टाकून नवीन रूग्णांना वाचवण्याची धडपड संपत नाहीये. रूग्णांची हे हाल सतत डोळ्यासमोर असतात. आपल्या कुटुंबावर ही परिस्थिती आली तर? ही भिती मनातून जात नाही. यातून नैराश्य आल्यासारखं वाटतं."

मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयातीस डॉ. साहिल मोरिवाला त्यांचा अनुभव सांगत होते. हे सांगताना त्यांचा गळा दाटून आला होता. मुंबईतल्या अगदी पहिल्या रुग्णावरही मोरिवाला यांनी उपचार केले होते. तेव्हापासून ते आजतागायत रुग्णांची सेवा करत आहेत.

"माझ्या वॉर्डमध्ये 200-250 रूग्ण येतात. त्यापैकी 5-10 रूग्णांची स्थिती गंभीर असते. ज्यांना अतिदक्षता विभागात हलवण्याची व्हेंटिलेटर लावण्याची गरज असते. पण अतिदक्षता विभागात जागा नसल्यामुळे त्यांना फक्त ऑक्सिजनवर ठेवावं लागतं. आपल्याला त्यांच्या तब्येतीची सगळी परिस्थिती माहिती असूनही अपुऱ्या सुविधांमुळे काहीच करता येत नाही. अनेक रूग्णांचे यामुळे डोळ्यासमोर जीव गेले आहेत. त्यावेळी आम्ही हतबल असतो," साहिल पुढे सांगतात.

कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत सध्या संपूर्ण देश होरपळून निघाला आहे. या लाटेच्या केंद्रस्थानी असलेल्या डॉक्टरांची अवस्थाही बिकट झाली आहे. पहिल्या लाटेला कसंबसं परतवून लावताना तोच दुसरी लाट अधिक तीव्रतेने आदळली आहे. त्यामुळे डॉक्टर शरीराने तर थकलेच आहेत. पण मनोधैर्य टिकवून ठेवणं हेही त्यांच्यासमोरचं एक मोठं आव्हान ठरतं आहे. याच विषयावर साहिल यांच्यासारख्या इतर डॉक्टरांची व्यथा आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

डोंबिवलीमधल्या काही हॉस्पिटलमध्ये व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून काम करणारे भरत जैन त्यांचा अनुभव सांगतात. ते म्हणतात, "34 वर्षांची गरोदर महिला व्हेंटिलेटरवर गेली. त्या हॉस्पिटलमधला ऑक्सिजन संपत आला होता. उद्या काय होईल हा विचार करत दिवस संपतो. तरूण रूग्णांचे मृत्यू होतायेत. पण याउलट ज्यांना कोव्हिड झालेला नाही तर इतर आजारांसाठी उपचाराची गरज आहे त्यांनाही उपचार मिळत नाहीत. हृदयविकार, स्ट्रोक अशा आजारांच्या रूग्णांना औषधं देऊन घरी पाठवावं लागत आहे. आम्ही रोज ज्या टेन्शनमधून जातो ते टेन्शन घरी आपोआपच येतं. त्यामुळे कुटुंबावर त्याचा परिणाम होतो आहे".

पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रसन्न फुटाणे यांची अवस्थाही फारशी वेगळी नाही.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

"सकाळी संपूर्ण लॉबी रूग्णांनी भरलेली असते. अनेकजण कोव्हिड पॉझिटिव्ह असतात. कोणी बेड देण्यासाठी विनवण्या करत असतं, कोणी रडत असतं, कोणी ओडरत असतं. पण रूग्णांनी भरलेल्या वॉर्डमुळे अनेकांना हॉस्पिटलमध्ये बेड देता येत नाही. त्यांना बाहेरच औषधं देऊन घरी विलगीकरणात राहायला सांगावं लागतं.

"अनेक जण रडून सांगत असतात की, 'आमच्या घरी जागा नाही आमच्या रूग्णाला इथे अॅडमिट करून घ्या'. रूग्णांच्या नातेवाईकांना कसं आणि किती समजवायचं? त्यांचं रडणं, ओडरणं, विनवण्या करूनही काहीच करता येत नाही. यामुळे अपराधी वाटत राहतं. हा एक दिवसाचा अनुभव नाही. तर मागचं वर्षभर आम्ही रोज हे सहन करतोय. जर माझ्याकडे बेड उपलब्‍ध असेल तर मी का तुम्हाला देणार नाही? मी तुमचा शत्रू नाही. हे रूग्णांच्या नातेवाईकांना कसं समजवणार?"

कोरोना
लाईन

तर ससून हॉस्पिटलमध्येच काम करणारे निवासी डॉक्टर प्रशांत मुंडे सांगतात, "रूग्णांचे नातेवाईक अनेकदा आमच्यावर ओरडतात. तुमच्याकडे द्यायला बेड नाहीत? ऑक्सिजन नाहीत? इंजेक्शन नाहीत तुम्ही काय करताय? सरकारवरचा राग ते आमच्यावर निघतो. पण आम्ही काहीच बोलू शकत नाही. यातून आम्हाला नैराश्य येतं."

तरूण डॉक्टरांमध्ये मानसिक ताण जास्त ?

ही परिस्थिती फक्त मोठ्या शहरातल्या डॉक्टर्सची नसून जगभरातल्या डॉक्टरांची आहे. कोरोनाच्या साथीत काही जागतिक पातळीवरच्या संशोधकांच्या मते इंग्लंड, अमेरिका, इटली, चीन, भारत या देशांमध्ये आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांमध्ये मानसिक आरोग्याच्या तक्रारी अधिक दिसून आहेत

ससून हॉस्पिटलमधल्या मनोचिकित्सक विभागाने केलेल्या सर्वेक्षणात हॉस्पिटलमधल्या औषध विभागाच्या डॉक्टरांमध्ये 70-75% मानसिक ताण आणि काम करण्याची इच्छा कमी झाल्याचं आढळून आलं. तर इतर डॉक्टर्समध्ये 50% मानसिक ताण आणि 'बर्न आऊट' चं प्रमाण (काम करण्याची इच्छा नसल्याचं) आढळून आलं.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

मानसोपचार तज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे सांगतात, "इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याबाबत एक शिबिर आयोजित केलं होतं. या अशा शिबिराला पूर्वीपेक्षा दुप्पट प्रतिसाद मिळाला. यात विशेष करून निवासी डॉक्टरांची संख्या अधिक होती. शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या त्या निवासी डॉक्टरांचं आयुष्य या साथीत बदलून गेलं आहे.

"कोरोना रूग्णांच्या उपचारापलीकडे त्यांच्या आयुष्यात फार काही करण्यासाठी वेळ उरलेला नाही. यंत्रणेविषयी निर्माण झालेली चीड, मनाविरुद्ध करावं लागणारं काम यामुळे त्या डॉक्टरांना मानसिक तणावाखाली राहावं लागतय. अनुभवी डॉक्टरांमध्ये नैराश्य, काळजीचं प्रमाण आहे. पण तुलनेने ते निवासी डॉक्टरांपेक्षा कमी आहे".

मानसिक स्वास्थ्य कसं निरोगी ठेवावं?

सध्या डॉक्टरांना सुट्टी घेऊन फिरायला जाणं, मजा करणं किंवा कुटुंबाबरोबर जास्त वेळ घालवणं हे शक्य नाही. समोर सतत नकारात्मक परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. रूग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाचा सामना करावा लागतोय. जे शिकायला आलोय ते न शिकता गरजेसाठी मनाविरुद्ध काम करावं लागतंय.

त्यासाठी मानसोपचार तज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे सांगतात, "डॉक्टरांनी 'मायक्रो व्हेकेशन' केलं पाहिजे. याचा अर्थ दिवसांत 5-10 मिनिटं मिळाली तरी या परिस्थितीतून मानसिकदृष्ट्या दूर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण काही रूग्णांना अपुऱ्या सुविधांमुळे वाचवू शकलो नाही, याचा विचार न करता अनेकांना आपण जीवदान दिलं याचा विचार केला पाहिजे.

"रूग्णांची, त्यांच्या नातेवाईकांचा राग हा यंत्रणेबाबतचा आहे. ते सध्याच्या परिस्थितीत आपल्याला दोष देत असले तरी त्यांना कुठेतरी डॉक्टरचा यात काय दोष? हे माहिती असतं. अशी परिस्थिती आली तर सकारात्मकतेने हाताळली पाहिजे. आपण जे काम करतोय ती डॉक्टर म्हणून आपल्याला मिळालेली संधी आहे. त्या संधीचा योग्य वापर मी करणार हे मनाशी ठरवून काम केलं पाहिजे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)