कोरोना व्हायरस : प्रोनिंग म्हणजे काय? आरोग्य मंत्रालयाने कोरोनाग्रस्तांना 'याचा' सल्ला का दिलाय?

फोटो स्रोत, Getty Images
'प्रोनिंग' म्हणजे पोटावर पालथं झोपणं हे या कोरोना काळात ज्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे त्यांच्यासाठी प्रोनिंग वरदान ठरू शकतं असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. पण त्याचवेळी प्रोनिंग योग्यरीत्या व्हायला हवं आणि योग्य ती काळजी घ्यायला हवी असं देखील मंत्रालयाने सुचवलं आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललीय. मोठ्या प्रमाणात कोव्हिड-19 रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासतेय. पण देशभरातल्या गंभीर ऑक्सिजन तुटवड्यामुळे अनेक रुग्णांचा जीव गेला आहे.
आपल्याकडे फक्त काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन उरल्याचंही देशातल्या अनेक हॉस्पिटल्सनी म्हटलं होतं. दिल्लीच्या मॅक्स हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवठ्यासाठी कोर्टाकडे धाव घ्यावी लागली होती.
श्वास घ्यायला त्रास होत असणाऱ्या रुग्णांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 'प्रोनिंग'च्या काही सोप्या पद्धती सांगितल्या आहेत. याला आरोग्य मंत्रालयाने 'प्रोनिंग फॉर सेल्फ केअर' म्हटलंय.
'प्रोनिंग' केल्याने कोव्हिड-19च्या रुग्णांना त्यांच्या शरीरातली ऑक्सिजनची पातळी सुधारण्यास मदत होऊ शकते.
'प्रोनिंग' म्हणजे काय?
योग्य प्रकारे पोटावर आडवं होत दीर्घ श्वास घेण्याच्या प्रक्रियेला प्रोनिंग म्हणतात. शरीरातली ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी याने मदत होते, असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या गाईडलाईन्समध्ये म्हटलंय.

फोटो स्रोत, Health Ministry
घरातच आयसोलेशनमध्ये असणाऱ्या आणि श्वास घ्यायला त्रास होत असलेल्या वा ऑक्सिजनची पातळी कमी असणाऱ्या कोव्हिड रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर असल्याचं या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलंय.
रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होत असेल वा त्याच्या शरीरातल्या ऑक्सिजनची पातळी 94 पेक्षा कमी झाली तर या पद्धतींचा वापर करावा, असं या सूचनांमध्ये म्हटलंय.
होम आयसोलेशनमध्ये असताना शरीरातली ऑक्सिजनची पातळी, रक्तदाब, रक्तातली शुगरची पातळी आणि शरीराचं तापमान या गोष्टी सतत मोजत रहाव्यात, असं सांगण्यात आलंय.

फोटो स्रोत, Health Ministry
योग्य वेळी प्रोनिंग केल्याने म्हणजे विशेष पद्धतीने झोपल्याने अनेक जीव वाचू शकतात, ही पद्धत 80 टक्के परिणामकारक असल्याचं या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलंय.
श्वसन प्रक्रियेत आणि ऑक्सिजन पातळीत सुधारणा करणाऱ्या या पद्धतीला वैद्यकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ही स्थिती पूर्णपणे सुरक्षित असून रक्तातली ऑक्सिजनची पातळी घसरल्यास या मार्गे त्यावर नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं. आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांमध्येही याचे चांगले परिणाम पहायला मिळाले आहेत.
व्हेंटिलेटर न मिळाल्यास ही प्रक्रिया करणं परिणामकारक ठरू शकतं.
पोटावर झोपण्यावर भर
प्रोनिंगदरम्यान पोटावर झोपण्यास सांगितलं जातं. यासाठी उशीचा वापर करावा असं सांगण्यात आलंय. मानेखाली एक उशी, एक किंवा दोन उशा छातीपासून मांड्यांपर्यंत अंगाखाली घ्याव्यात आणि आणखीन दोन उशांवर पाय ठेवावेत असं सांगण्यात आलंय.
एकूण 4-5 उशा अशा प्रकारे पोटावर झोपण्यासाठी लागतील. आणि किती जाड उशा घ्यायच्या हे ती व्यक्ती ठरवू शकते.
दर थोड्या वेळाने आपली पोझिशन कशी बदलावी हे देखील सांगण्यात आलंय. एकाच स्थितीत 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ राहू नये आणि आपली स्थिती बदलत रहावी.
प्रोनिंग कधी करू नये?
रुग्ण महिला गर्भवती असल्यास किंवा रुग्णाला हृदयविकार असल्यास प्रोनिंग करू नये.
शिवाय प्रत्येकाला जितक्यावेळ असं आरामात झोपता येईल, तेवढा वेळच अशा प्रकारे झोपावं.
जेवल्यानंतर लगेचच असं पोटावर झोपून प्रोनिंग करू नये.
24 तासांच्या कालावधीदरम्यान तुम्ही 16 तास वेगवेगळ्या पोझिशनमध्ये प्रोनिंग करू शकता.
एकाच प्रकारे झोपल्याने जर अंग दुखू लागलं तर शरीराच्या त्या भागावर येणारा ताण कमी करा आणि तुम्हाला बरं वाटणाऱ्या पद्धतीने झोपा.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








