नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करत 'रोजगार दो' हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये का आहे? #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करत 'रोजगार दो' हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये का आहे?

सोशल मीडियावर सध्या 'रोजगार दो' हा हॅशटॅग प्रचंड ट्रेंड होतोय. लाखोच्या संख्येने 'रोजगार दो' हा हॅशटॅग वापरून ट्वीट केले जात आहेत. या हॅशटॅग अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून थेट रोजगार देण्याची मागणी केली जात आहे. लोकमतने हे वृत्त दिलंय.

कोरोना आरोग्य संकटात अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. मोठ्या संख्येने उद्योगधंदे ठप्प झालेत. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत नाहीत अशा तक्रारी आहेत. या परिस्थितीत सोशल मीडियावर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच नोकरीची मागणी केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर 'रोजगार दो' ट्रेंड सुरू झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यावरून नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 'मोदी रोजगार दो' या हॅशटॅगचा वापर करत राहुल गांधींनी 'सुनो जन के मन की बात' असा सल्लाही दिला.

आयएलओच्या आकडेवारीनुसार, जागतिक पातळीवर बेरोजगारी 57 टक्के एवढी आहे. तर भारतात बेरोजगारीचे प्रमाण 47 टक्क्यांपर्यंत आहे.

2. लॉकडॉऊनची अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश - गृहमंत्री अनिल देशमुख

राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या परिस्थितीत राज्यात लॉकडॉऊन जाहीर होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत असं सांगत गृह विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. टीव्ही 9 मराठीने हे वृत्त दिलं आहे.

अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेत. ते म्हणाले, "राज्यात पुन्हा लॉकडॉऊन सुरू झाल्याची खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर सायबर सेलची करडी नजर आहे. कोणत्याही अधिकृत माहितीशिवाय लॉकडॉऊन लागू झाल्याची खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे."

यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट केले असून अफवा पसरवणाऱ्यांपासून सावधान राहण्याचे आवाहनही केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 21 फेब्रुवारीला जनतेशी संवाद साधताना काही सूचना केल्या. पण यावेळी लॉकडॉऊनची घोषणा करण्यात आलेली नाही.

3. 'राज्यातले मंत्रीच बलात्कारी' - चित्रा वाघ

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणात सरकार मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे.

सरकारमधले मंत्रीच बलात्कारी झालेत आणि प्रत्येकजण बलात्कारी नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत चित्रा वाघ यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. टीव्ही 9 मराठीने हे वृत्त दिलं आहे.

त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या. पूजा चव्हाण प्रकरणात सुरू असलेला पोलीस तपास संशायस्पद असल्याचंही चित्रा वाघ म्हणाल्या. मोबाईल, लॅपटॉपचे काय झाले? हे कोणालाच माहित नसून संजय राठोड फरार असताना अहवाल दिलाच कसा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

पोलिसांसमोर सगळे पुरावे असूनही आरोपी पकडला जात नाही. मंत्र्यांच्या संपर्कात असलेला एक मंत्री पोलिसांना सापडत नाही असं म्हणत त्यांनी पोलिसांच्या तपासवरही प्रश्न उपस्थित केलेत.

4. 'गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही' - नाना पटोले

"भाजप नेते गिरीश महाजन लहान आहेत. त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही." असा खोचक टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गिरीश महाजन यांना लगावला. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भूमिक घेतल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमांचं चित्रीकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही अशा इशारा दिला होता. नाना पटोले यांच्या या भूमिकेचा भाजपने जोरदार विरोध केला.

भाजप नेते गिरीश महाजन यांनी पटोलेंच्या विधानानंतर राज्यात मोगलाई सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर प्रत्युत्तर देत नाना पटोले म्हणाले, "भारतमातेच्या नावावर भाजप मोठा झाला आहे. त्याच भारतमातेला विकण्याची तयारी भाजपने केली आहे. गिरीश महाजन लहान आहेत. त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही."

5. कर्नाटक सरकारच्या 'या' नियमामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांची गैरसोय

महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन येणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ही टेस्ट कर्नाटकात येण्याच्या 72 तास आधी केलेली असावी असाही नियम आहे. पण याची अंमलबजावणी ऐनवेळी केली जात असल्याने महाराष्ट्रातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.

कोल्हापूर आणि बेळगावच्या सीमेवर कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल तपासण्यासाठी चेक पोस्ट सुरू करण्यात आले आहेत. राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या गाडीत बसलेल्या प्रत्येक प्रवाशाकडून कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट मागितला जात आहे. सोमावारी (22 फेब्रुवारी) ऐनवेळी असा रिपोर्ट मागितला जात असल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. कोल्हापूर आणि बेळगावच्या सीमेवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत.

रिपोर्ट नसल्यास कर्नाटक पोलीस पुन्हा परत जाण्याची सूचना करत आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून राज्याच्या विविध भागातून सीमेवर पोहचलेल्या प्रवाशांना माघारी परतावे लागत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)