कोरोना : अमरावती आणि अकोल्यात एका आठवड्याचं लॉकडाऊन, ग्रामीण भागाला लॉकडाऊनमधून वगळलं

    • Author, नितेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन अमरावती आणि अकोला जिल्ह्यात एका आठवड्याचं लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे.

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी याबाबतची घोषणा केली. तर अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनबाबतची सूचना जारी केली आहे.

अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यात जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यानं लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेला.

हे लॉकडाऊन जिल्ह्यात अमरावती शहर आणि अचलपूर या ठिकाणी लावण्यात आलं आहे.

इतर ग्रामीण भागात लॉकडाऊन लावण्याची गरज भासल्यास तो सुद्धा लावण्यात येईल असं पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केलंय.

तत्पूर्वी, महिला व बालकल्याण मंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील संचारबंदीचा आढावा घेतला.

अमरावती जिल्हात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यात जमावबंदी तसेच विकेंडला लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनची अंमलबजावणी कशा पद्धतीने सुरू आहे याचा आढावा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज (21 फेब्रुवारी) घेतला.

शहराच्या विविध भागात त्यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वाढती रुग्णसंख्या ही धोक्याची घंटा आहे, नागरिकांनी सहकार्य करायला पाहिजे अन्यथा लॉकडाऊन शिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही, असं त्या म्हणाल्या होत्या.

अकोल्यात कंटेनमेंट झोनबाबत महत्त्वाच्या सूचना

अकोला जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता विभागीय आयुक्तांनी कंटेनमेंट झोन आणि कंटेनमेंट बाहेरील क्षेत्र त्यासंबंधातील काही आदेश जारी केले होते.

त्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील आपल्याकडे जे-जे काही कोव्हिडं प्रादुर्भाव वेगवेगळ्या नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात आहे. त्याच्या अनुषंगाने अकोट आणि अकोला महानगरपालिका संपूर्ण क्षेत्र, अकोट मूर्तीजापूर या दोन्ही नगरपालिका हे संपूर्ण क्षेत्र हे आपण कंटेनमेंट म्हणून या ठिकाणी घोषित करत आहोत.

कंटेनमेंट झोनच्या आत मध्ये म्हणजे नगरपालिका आणि महापालिकांच्या क्षेत्रात या कालावधीमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा मध्ये असलेले जी काही आपल्याकडे जीवनावश्यक दुकाने आहेत, आरोग्यसेवा आहेत आणि स्वस्त धान्य दुकाने आहेत तेवढे दुकाने सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत या कालावधीत सुरू राहणार आहेत.

या व्यतिरिक्त सर्व जे काही बिगर जीवनावश्यक आस्थापना आणि दुकाने हे सर्व या कालावधीमध्ये बंद करण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त ज्या काही आपल्या धार्मिक मंदिर, मशीद आणि चर्च, गुरुद्वार कंटेनमेंट झोनच्या आतील त्या सगळ्या बंद राहणार आहे.

याचा कालावधी राहणार आहे तो 23 तारखेच्या सकाळी सहा वाजेपासून ते 1 तारखेच्या 1 मार्च सकाळी 8 वाजेपर्यंत या कालावधीपर्यंत लॉकडाऊन आपण घोषित करीत आहोत.

या व्यक्ती या कालावधीमध्ये सर्वकाही उपहारगृह आणि हॉटेलमध्ये पर्सलची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

जळगाव शहरातील सहा मंगल कार्यालय सील

शहरातील मंगल कार्यालयांमध्ये खुद्द जिल्हाधिकारी यांनी आज पाहणी केली. पाहणीत कुठल्याही प्रकारे कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशाने महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येवून जळगाव शहरातील सहा मंगल कार्यालये सील करण्यात आले आहेत.

यात दापोरेकर मंगल कार्यालय, यश लॉन, लाडवंजारी मंगल कार्यालय, क्रेझी होम, निराई लॉन, कमल पॅराडाईज या मंगल कार्यालयांचा समावेश आहे. कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)