You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लसीकरण : लशीबद्दलचे समज-गैरसमज, कोणते खरे, कोणते खोटे?
कोव्हिड 19साठीच्या लसीकरण मोहीमेमध्ये आता 18 वर्षांवरील सगळ्यांना केंद्र सरकार मोफत लस देत आहे.
पण लोकांच्या मनात या लशीविषयी काही शंकाही आहेत. कोरोनाच्या लशीबद्दल भारतातही काही गैरसमज आणि मिथकं पसरली आहेत.
उदाहरणार्थ, कोरोना लस घेतल्यामुळे स्त्री किंवा पुरुषाला नपुंसकत्व येतं किंवा चेहरा अर्धांग वायूने लुळा पडतो, असी कितीतरी...या समजुती किती खऱ्या आणि किती खोट्या हे सविस्तर पाहूया. त्याचबरोबर जाणून घेऊया लस घेताना घ्यायची काळजी.
कोरोना लसीकरण आणि गैरसमजुती
जगभरात अनेक देशांत कोरोनाच्या लसीकरण मोहिमा सुरू झाल्यात. पण, त्याविषयीही लोकांच्या शंका आहेत. कारण, दहा महिन्यात लस तयार झालीय. मग काही गडबड नाही ना, घाई-गडबडीत लशींना परवानगी मिळाली नाही ना, अशा या शंका आहेत. मग 'रोग नको, उपचार आवर' म्हणण्याची वेळ लोकांवर येईल अशी भीती लोकांना वाटते. म्हणूनच लसीकरणाबरोबरच आवश्यक आहे लोकांचं समुपदेशन...
कोरोना लशीमुळे नपुंसकत्व येतं का?
कोरोना लशीमुळे स्त्री आणि पुरुषांमध्ये नपुंसकत्व येतं अशी एक समजूत फक्त भारतातच नाही तर जगभरात पसरली आहे. त्याला उत्तर देताना, हर्षवर्धन आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात,
'कोव्हिड 19च्या लशीमुळे स्त्री किंवा पुरुषांमध्ये नपुंसकत्व येतं अशा प्रकारचा कुठलाही शास्त्रीय पुरावा समोर आलेला नाही. कोव्हिड 19 रोगामुळेही नपुंसकत्व किंवा वंध्यत्व येत नाही.'
कोविशिल्ड लशीच्या जगभरात झालेल्या चाचण्यांमध्ये अशी कुठलीही घटना आढळलेली नाही. पण, लस घेतल्यानंतर साधारण पणे पहिला दिवस थोडाफार ताप, लस घेतलेल्या जागी सूज किंवा तो भाग दुखणं असा त्रास होऊ शकतो.
कोरोना लशीमुळे कोव्हिड 19 होतो का?
आणखी एक प्रश्न हर्षवर्धन यांना फेसबुक लाईव्ह दरम्यान सातत्याने विचारला गेला. लस कोरोना व्हायरसवर प्रक्रिया करून बनलेली असल्यामुळे ती घेतल्यावर उलट कोव्हिड 19 आजार होऊ शकतो का?
याला उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणाले, "कोव्हिडची लस घेतल्यामुळे तुम्हाला कोव्हिड 19 होणार नाही. पण, एक शक्यता अशी आहे की, लस घेण्यापूर्वीच तो तुम्हाला झालेला असेल. पण, त्याची लक्षणं तुमच्यात दिसत नसतील. आणि लस घेतल्यानंतर ती दिसायला लागली."
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लशी मेलेल्या कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमधील अंश घेऊन तयार करण्यात आल्यात. पण, म्हणून त्यामुळे कोरोनाचा संसर्ग तुम्हाला होत नाही. उलट या रोगाबद्दल रोगप्रतिकारक शक्ती शरीरात निर्माण होऊन रोगापासून तुमचा बचाव होतो.
पण कोरोनाची लस घेतल्यानंतरही तुम्हाला याचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
का ते जाणून घेण्यासाठी वाचा - कोव्हिडसाठीची लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग होऊ शकतो का?
लसीकरणाचा मासिक पाळीवर परिणाम होतो का?
लसीकरणाचा मासिक पाळीवर परिणाम होतो का? किंवा मासिक पाळीदरम्यान रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने लस घेऊ नये असं खरंच तज्ज्ञांचं म्हणणं आहे का यासंदर्भात आम्ही डॉक्टर गायत्री देशपांडे यांच्याशी बोललो.
डॉ. गायत्री देशपांडे या नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऑब्स्ट्रेट्रिक्स आणि गायन्कॉलॉजी विभागाच्या सीनियर कन्संल्टंट आहेत.
डॉ. देशपांडे सांगतात, "मासिक पाळी ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये कोणताही अडथळा असू नये. तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळाली असेल तेव्हा जरूर लस घ्या. तरुण मुली कामानिमित्ताने घराबाहेर पडत असतील कारण सगळ्यांना वर्क फ्रॉम होम शक्य नसतं. अत्यावश्यक सेवेत अनेक महिला काम करतात. त्यांची मासिक पाळी केव्हाही सुरू असू शकते किंवा नसू शकते. त्यांची नोंदणी झाली असेल आणि लस मिळत असेल तर त्यांनी जरूर लस घ्यावी."
लशीने तुमच्या शरीराला अपाय होण्याची भीती नाही, असंही डॉ. गायत्री देशपांडे सांगतात.
सोशल मीडियावर मासिक पाळी आणि लसीकरणासंदर्भात मेसेज फिरू लागल्यानंतर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने यासंदर्भात फॅक्ट चेक प्रसिद्ध केलं.
त्यात असं म्हटलं आहे की, मुलींनी तसंच महिलांनी मासिक पाळीच्या आधी पाच दिवस आणि नंतर पाच दिवस लस घेऊ नये असे मेसेज फिरत आहेत. ते मेसेज फेक आहेत. अफवांवर विश्वास ठेऊ नका. याबाबत सविस्तर माहिती तुम्ही बीबीसीच्या या बातमीमध्ये वाचू शकता- मासिक पाळी आली असताना कोरोना लस घेऊ शकता का?
गरोदर महिला आणि स्तनदा मातांनी कोरोनाची लस घेणं कितपत सुरक्षित?
'फॉग्सी' (Federation of Obstetric and Gynecological Society of India) देशभरातील स्त्रीरोगतज्ज्ञांची सर्वात मोठी संघटना आहे. गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या लसीकरणाबाबत 'फॉग्सी'ने एक पत्रक प्रसिद्ध केलंय.
त्या पत्रकात खालील मुद्दे आहेत -
- गर्भवती महिला, स्तनदा मातांना लस देण्यात यावी. लशीची सुरक्षा त्यांनाही मिळाली पाहिजे
- महिलांना त्यांचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असावं. स्त्रीरोगतज्ज्ञांना लस देण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून योग्य काळजी घेता येईल
- कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीनचा गर्भवती महिला आणि स्तनदा मातांवर चाचणीचा डेटा उपलब्ध नाही. पण प्राण्यांवर झालेलं संशोधन आणि शास्त्रीय माहितीनुसार, लशीचा गर्भावर किंवा जन्माला येणाऱ्या बाळावर प्रतिकुल परिणाम होत नाही
- आईच्या दुधावर असलेल्या बाळावर लशीचा प्रतिकुल परिणाम होत नाही. त्यामुळे स्तनदा मातांना लस मिळाली पाहिजे.
- या निर्णयाचा 50 दशलक्ष लोकांवर परिणाम होणार आहे.
स्त्रीरोगतज्ज्ञांची संघटना फॉग्सीचे अध्यक्ष डॉ. अल्पेश गांधी सांगतात, "कोरोनाची लाट येण्यापासून प्रतिबंध करायचा असेल. तर लसीकरण प्रभावी आणि दिर्घकाळ उपाय आहे. त्यामुळे गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना लशीची सुरक्षा मिळाली पाहिजे."
"गर्भवती महिला, स्तनदा मातांना लस दिल्यामुळे होणारे फायदे, सौम्य धोक्यांपेक्षा अधिक जास्त मोलाचे आहेत," असं डॉ. गांधी पुढे म्हणतात. याबाबत अधिक माहिती तुम्ही बीबीसी मराठीच्या या बातमीत वाचू शकता- गरोदर महिला आणि स्तनदा मातांनी कोरोनाची लस घेणं कितपत सुरक्षित?
गरोदर महिलांना सध्या देशात लस देण्यात येत नाही. पण लस घेतल्यास अशा महिलांचा गर्भपात होण्याची शक्यता वर्तवणाऱ्या अफवा चर्चेत होत्या.
याविषयी बोलताना दिल्लीतल्या मेदांता हॉस्पिटलचे डॉ. ईश्वर गिलाडा सांगतात, "कोव्हिशच्या लशीचा प्रेग्नन्सीवर कोणताही परिणाम होत नसल्याचं आतापर्यंतच्या अभ्यासात आढळलंय. अमेरिका, ब्रिटन आणि चीनमध्ये गरोदर महिलांना लस देण्यात येतेय. भारतामध्येही येत्या काही काळात गरोदर महिलांना लस देण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे."
गरोदर महिलांना भारतात लस घेण्याच परवानगी देण्यात आली तर आपल्या डॉक्टरचा सल्ला घेऊन मगच त्यांनी ही लस घ्यावी.
भारतातील लशीमध्ये डुकराचं मांस?
भारतातील काही मुस्लीम विद्वानांनी, कोव्हिड लशीमध्ये डुकराचं मांस मिसळलं असल्यामुळे मुसलमानांनी लस घेऊ नये असं सांगितलं होतं.
मात्र भारतातील दोन्ही लशींमध्ये डुकरांचं मांस मिसळलेलं नाही, हे सत्य आहे.
काही आजारांच्या लशींमध्ये पोर्क जिलेटिन वापरलं जातं. इस्लाम धर्मात डुकराच्या मांसापासून तयार झालेल्या गोष्टी हराम मानल्या जातात. हा मुद्दा ट्वीटरवर गाजला होता. कोव्हिड लस हलाल नसल्याचं यामध्ये म्हटलं होतं. अर्थात कोणत्याही एका लशीचं नाव घेऊन ही चर्चा होत नव्हती.
भारतातील कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लशींमध्ये पोर्क म्हणजे डुकराच्या मांसाचा वापर करण्यात आलेला नाही.
तसेच फायजर आणि मॉडर्ना या दोन लशींमध्येही डुकरांच्या मांसाचा वापर केला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
लस घेतल्यानंतर मांसाहार करू शकतो का?
लशीचा आणि खाद्यपदार्थांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतरही तुम्ही सर्व प्रकारच्या अन्नाचं सेवन करू शकता, असं डॉक्टर सांगतात.
लशीमध्ये मायक्रोचिप लावली आहे?
लशीमध्ये मायक्रोचिप लावली आहे अशा प्रकारच्या अनेक अफवा दुसऱ्या देशांप्रमाणेच भारतातही पसरवल्या गेल्या. एका मुस्लीम धर्मगुरूंचा याबद्दलचा एक व्हीडिओ प्रसारित झाला होता.
लशीमध्ये एक चिप लावलेली असून त्याद्वारे तुमच्या मेंदूवर नियंत्रण ठेवलं जाईल असा दावा त्यांनी यामध्ये केला होता. हा व्हीडिओ फेसबूक आणि ट्वीटरवर व्हायरल झाला होता. मात्र अशाप्रकारची कोणतीही चिप लशीमध्ये नाही.
डॉ. ईश्वर गिलाडा म्हणतात, "ही लस द्रवरूपात आहे आणि एका अत्यंत सूक्ष्म आणि टोकदार सुईने ती शरीरात टोचली जाते. मग यामध्ये चिप घालून ती शरीरात कशी सोडणार?"
मुलांमध्ये कोव्हिडची शक्यता अत्यंत कमी
लहान मुलांना कोरोनाची लस दिली तरी त्यांना त्याचा फारसा उपयोग नाही. सुदैवाने कोरोनाबाबत चांगली गोष्ट म्हणजे लहान मुलांना कोरोनाची शक्यता अत्यंत कमी आहे असं प्राध्यापक अॅडम फिन यांनी सांगितलं. युकेच्या लसीकरण कार्यक्रमात ते सहभागी झालेले आहेत.
लहान मुलांमध्ये कोरोनाची अगदी सौम्य लक्षणं आढळतात. काहींमध्ये कोणतीही लक्षणं आढळत नाहीत. कोरोना संसर्गासंदर्भात ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत हा खूपच मोठा फरक आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांचं प्राधान्याने लसीकरण करण्यात आलं.
लॅन्सेटमध्ये या प्रसिद्ध वैद्यकीय संशोधन मासिकात प्रकाशित लेखानुसार, सात देशांमध्ये तौलनिक अभ्यास करण्यात आला. दशलक्ष मुलांमागे दोन मुलांचा मृत्यू ओढवू शकतो असं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.
लस अतिशय सुरक्षित आहे मात्र धोका आणि फायदे यांचा साकल्याने विचार व्हायला हवा. याबाबत तुम्ही बीबीसी मराठीची विशेष बातमी वाचू शकता- लहान मुलांना लस देणं फायदेशीर की धोकादायक?
भारतामध्ये अद्याप लहान मुलांसाठीच्या कोणत्याही कोव्हिड लशीला परवानगी देण्यात आलेली नाही. पण त्यासाठीच्या चाचण्यांना सुरुवात झालेली आहे.
फ्लूची लस दिली की कोरोनाचा संसर्ग होत नाही?
फ्लूवर देण्यात येणारी लस दिल्यास कोरोना होत नाही असा एक समज पसरला आहे.
फ्लू शॉट्स घेतल्याने कोरोना बरा होतो या लोकांमध्ये पसरलेल्या गैरसमजाबाबत बोलताना डॉ. स्वप्नील मेहता म्हणतात, "फ्लू शॉटमुळे घेतल्यामुळे कोव्हिड-19 बरा होतो असा लोकांमध्ये गैरसमज आहे. आमच्याकडेही अनेक लोक याबाबत विचारणा करत आहेत. कोरोना व्हायरस हा इन्फ्लूएन्झा व्हायरसपासून पूर्णत: वेगळा आहे. त्यामुळे फ्लू शॉट्सचा कोरोना व्हायरसवर काहीही परिणाम होत नाही."
पुण्यात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉ. संवेदा समेळ बीबीसीशी बोलताना सांगतात, "एचआयव्ही, हृदयरोग, डायलेसिसवर असणारे रुग्ण, अवयव प्रत्यारोपण झालेले रुग्ण यांची इम्युनिटी कमी असते. अशा रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फ्लू शॉट्स फार प्रभावी आहेत. या रुग्णांच 'फ्लू' पासून संरक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे."
"कोव्हिड-19 च्या काळात रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या रुग्णांना फ्लू शॉट्स घेण्याचा सल्ला आम्ही देतो. अनेक रुग्णांना आत्तापर्यंत फ्लू शॉट्स देण्यात आले आहेत. फ्लू शॉट्समुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता 50 ते 60 टक्क्यांनी कमी होते. इन्फेक्शन झालंच तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीमुळे त्याची तीव्रता आणि गुंतागुंत कमी होण्यास मदत होते," असं त्या पुढे म्हणाल्या. फ्लूच्या लसीबाबत तुम्ही बीबीसीची बातमी वाचू शकता- फ्लू-शॉट्स किती फायदेशीर?
नवीन कोरोनापासून या लशी बचाव करतील का?
2020 हे वर्षं संपत असताना युके आणि मागोमाग दक्षिण आफ्रिकेत बदललेल्या कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरू झाला. हा व्हायरस जास्त संसर्गजन्य असल्याचंही दिसून आलं. या नवीन कोरोना व्हायरसवरही सध्याची लस काम करेल का हा प्रश्न सगळ्यांना आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणतात,
'युके आणि दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नवीन कोरोना व्हायरसपासून सध्याच्या लसी बचाव करू शकणार नाहीत, असं कुठल्याही संशोधनात आढळलेलं नाही.'
लस घेतल्यावर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगची गरज नाही?
लस घेतल्यावर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगची गरज आहे की नाही याबाबत आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केली.
एम्समध्ये ह्युमन ट्रायलचे प्रमुख डॉ. संजय राय यांच्यामते मास्क वापरायचा की नाही याच्या उत्तराचे दोन आधार असू शकतात. एक शास्त्रीय आधार आणि दुसरा सामाजिक आधार.
शास्त्रीय आधाराच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले, "कोणतीही लस शंभऱ टक्के जोखीम उचलत नाही. पण यामार्गाने विषाणूच्या संसर्गाचा धोका हळूहळू कमी करणं महत्त्वाचं आहे. लस दिली जावो किंवा नाही पण जे लोक आजारातून बाहेर पडतात ते आजाराविरोधात 'प्रोटेक्टेड पूल' तयार करतात, त्यामध्ये लसीकरण झालेले लोक हळूहळू सहभागी होत जातात.
त्यामुळे लस घेतलेल्या लोकांमध्येच फक्त संसर्गाचा धोका कमी आहे असं म्हणणं योग्य नाही. ही गोष्ट या आजारातून बाहेर पडलेल्या लोकांनाही लागू होते. शास्त्रीय आधारावर दोन्ही लोकांना मास्क वापरण्यापासून सूट दिली जाऊ शकते."
आयसीएमआरमध्ये साथरोग विज्ञान विभागात प्रमुख डॉक्टर म्हणून सेवा बजावलेले डॉ. रमण गंगाखेडकर यांनीही आपलं मत बीबीसीकडे मांडलं.
ते म्हणाले, "ज्यांना लस दिली आहे आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे अशा दोन-तीन लोकांनी एकत्र येणं ठीक आहे. मात्र त्याशिवाय लोक मास्क न घालता एकमेकांना भेटू लागले तर समस्या उद्भवू शकते. लोकांनी लस घेतली आहे हे कसं समजणार? कोण खोटं बोलत असेल तर? लोक याबाबत निर्धास्त कसे होऊ शकतील?"
याबद्दल ते आणखी एक समस्या सांगतात. "जगभरात कोरोना व्हायरसचे नवे म्युटंट येत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे लस म्युटंट व्हरायटीविरोधात किती सक्षम आहे असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. अशा स्थितीत लोकांनी मास्क न वापरणं अयोग्य नक्कीच वाटतं."
डॉ. गंगाखेडकरांना वाटतं जेव्हा आपली लढाई अनोळखी शत्रूशी असते तेव्हा तयारी करताना सर्वात वाईट स्थितीचा विचार करुन केली पाहिजे. कोव्हिड-सेफ़ प्रोटोकॉलनुसार मास्क वापरणं चांगलं मानलं गेलं आहे.
लस घेतल्यावर दारू प्यायची की नाही?
दारू पिता येणार नाही म्हणून आजही बरेच जण कोरोनाची लस टोचून घेण्यास टाळाटाळ करताना दिसतायेत. "आजही कोरोनाविरोधी लस टोचून घेण्यासंदर्भात ग्रामीण भागात अनेक गैरसमज आहेत. लस घेतल्यानंतर जीव जाईल, कोव्हिडची लागण होईल अशी भीती लोकांमध्ये आहे. तसंच काही दिवस दारू पिता येणार नाही म्हणूनही अनेकजण लस घेत नाहीत," असं लातूर जिल्हा रुग्णालयातील डॉ. गजानन हळखंचे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
ते पुढे सांगतात, "लसीकरण केंद्रात आलेल्या लोकांना लस टोचण्यापूर्वी आम्ही पुढचे काही दिवस दारू प्यायची नाही अशी सूचना करतो. पण असं सांगितल्यावर काही जण लस न घेताच परत जातात."
याविषयी बोलताना दिल्लीच्या मेदांता हॉस्पिटलचे डॉ. यतीन मेहता म्हणतात, "कोव्हिडची लस घेतल्यानंतर किमान काही दिवस थांबा. काही दिवस मद्यपान टाळावं."
तर डॉ. ईश्वर गिलाडा सांगतात, "12 तासांनी तुम्ही मद्यपान करू शकता. पण लस घेतल्यानंतर त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतोय, ते आधी पहा. कारण एखादा विषाणू शरीरात शिरल्यानंतर त्याचे शरीरावर विविध परिणाम होतात. जर सगळं काही नीट असेल तर 12 तासांनी मद्यसेवन करू शकता."
याबाबत अधिक माहिती तुम्ही बीबीसी मराठीच्या या बातमीमध्ये वाचू शकता- दारू, मृत्यू आणि आजारपणाशी संबंधित 5 गैरसमज, तथ्य काय?
लसीकरणाच्या वेळी घ्यायची काळजी
या व्यतिरिक्त, लस घेताना नेमकी काय काळजी घ्यायची आहे, लस कुणी घ्यावी, कुणी घेऊ नये यावरही आरोग्य मंत्रालयाने एक पत्रक जारी केलं आहे. राज्यसरकार आणि केंद्रसरकारला ते पाठवण्यात आलंय. त्यातलेही मुद्दे बघूया.
- 18 वर्षांवरील लोकांचंच लसीकरण करण्यात येईल.
- दोन लशींना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पण, एका व्यक्तीला दोन डोस देताना एकाच प्रकारची लस दिली जावी.
- पहिला डोस घेतल्यावर एखाद्या व्यक्तीला लशीची रिअॅक्शन आली, म्हणजे लसीचे काही विपरित परिणाम दिसून आले तर, अशा व्यक्तीला दुसरा डोस दिला जाऊ नये.
- गर्भवती किंवा बाळ अंगावर पिणारं असेल तर अशा महिलेनं लस घेऊ नये. लशीच्या चाचण्या गर्भवती महिलांवर झालेल्या नाहीत, त्यामुळे त्या अशा महिलांवर कसा परिणाम करतात हे माहीत नाही. म्हणून हा निर्णय झालाय.
- ज्यांना सध्या कोव्हिड-19 झालेला आहे आणि ते उपचार घेतायत अशांना लस देण्यात येऊ नये. आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यावर चौदा दिवसांनंतर अशा व्यक्तींचा विचार होऊ शकतो.
कोरोना लसीकरणावर बरीच माहिती समोर येते आहे. त्यातली कुठली खरी, कुठली खोटी हा प्रश्नही आहे. त्यामुळे सरकारी वेबसाईट्सवर बरीच माहिती आतापर्यंत आलेली आहे. आरोग्यविभागाची वेबसाईट, पीआयबी वेबसाईट. अशा अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवा. मिळालेली माहिती पारखून घ्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)