शिवसेना-भाजपमध्ये राम मंदिराच्या वर्गणीवरून 'सामना' का सुरू आहे?

    • Author, नामदेव अंजना
    • Role, बीबीसी मराठी

अयोध्येतील राम मंदिरासाठी मकरसंक्रातीचा मुहूर्त साधत 14 जानेवारीपासून वर्गणी गोळा करण्यास सुरुवात झालीय. भारतातील विविध शहरं, गावांमध्ये वर्गणीसाठी कार्यालयंही सुरू केल्याचं दिसून येतं. मात्र, राम मंदिराच्या आंदोलनात सक्रियपणे उतरलेली शिवसेना मात्र, या वर्गणी गोळा करण्याच्या मोहिमेवर सातत्याने टीका करतेय.

'सामना'च्या सोमवारच्या (22 फेब्रुवारी) अग्रलेखाचा विषय होता पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींचा. मात्र, यातूनही राम मंदिराच्या वर्गणीवर निशाणा साधला गेला. या अग्रलेखात म्हटलंय की, "राम मंदिरासाठी 'चंदा वसुली' करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील आणि श्रीरामही खुश होतील."

'सामना' हे शिवसेनेचे मुखपत्र आहे. मात्र, अनेकदा सोयीस्कररित्या 'सामना' आणि पक्षाची (शिवसेना) भूमिका वेगळी ठरवली जाते. मात्र, यावेळी तसं होतानाही दिसत नाही. कारण पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राम मंदिरासाठी गोळा केली जाणाऱ्या वर्गणीवर टीका केलीय.

17 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील 'वर्षा' या निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि काही आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती.

या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "रामाच्या नावाने काही लोक घरोघरी पैसे मागण्यासाठी जात आहेत. पण आपल्याला तसं करायचं नाही. बाबरी मशिद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर उतरली होती. आता भाजप पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यावर आली आहे."

"देखो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो," असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला होता.

इतकंच नव्हे, तर राम मंदिराच्या उभारणीसाठी वर्गणी गोळा केली जाईल, असं गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ज्यावेळी घोषित झालं, तेव्हा तर शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'त विशेष अग्रलेखच छापण्यात आला होता. अग्रलेखाचा मथळा होता - 'रामाची वर्गणी'.

या अग्रलेखातून अनेक आरोप करण्यात आले, टीका करण्यात आली. "चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबवणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड 2024 चा निवडणूक प्रचार आहे. रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हातरी थांबवायलाच हवा."

राम मंदिर निर्माणासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी चार लाख स्वयंसेवक नक्की कोण आहेत? त्यांना नेमके कोणी नेमले? असे प्रश्नही या अग्रलेखातून उपस्थित केले होते.

सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे, राम मंदिरासाठी ज्यावेळी आंदोलन सुरू होतं, तेव्हा भाजपच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना सक्रीय होती. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतरही राम मंदिराच्या मुद्द्यावर शिवसेनेनी आपली भूमिका बदलली नव्हती. मात्र, आता शिवसेनेनं राम मंदिरासाठीच्या वर्गणीबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

राम मंदिराचं राजकीय श्रेय भाजप एकट्याने घेऊ पाहतंय, याची शिवसेनेला भीती वाटतेय का? आणि विशेषत: शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत असल्यानं राम मंदिराच्या वर्गणीच्या मोहिमेत सक्रीयपणे सहभागी होत नाही, त्यामुळे भाजपला श्रेय घेण्याचा मार्ग मोकळा होतोय का, याचीही भीती शिवसेनेला आहे का? की आणखी काही शक्यता यात आहेत? हे आपण या बातमीतून तपासून पाहणार आहोत.

आम्ही या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी शिवसेना आणि भाजप यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासाचा अभ्यास असणाऱ्या वरिष्ठ पत्रकारांशी बातचीत केली.

राम मंदिराच्या वर्गणीवरील शिवसेनेच्या टीकेचा अर्थ काय?

यादरम्यान वरिष्ठ पत्रकार संदीप प्रधान बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "ज्या पद्धतीने राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम भर कोरोनाच्या काळात नरेंद्र मोदी आणि भाजपनं केला, ते पाहता शिवसेना जरी भाजपसोबत असती, तरीही राम मंदिराचं श्रेय भाजपनं शिवसेनेला घेऊ दिलं नसतं."

"राम मंदिरासाठी यापूर्वी सुद्धा बऱ्याच गोष्टी गोळा केल्या होत्या. जगभरातून निधी गोळा झाला होता. तसंच, आता केंद्रात बहुमतात सरकार असताना, घरोघरी जाऊन पैसे का मागत आहात, असा शिवसेनेचा सवाल आहे," असं संदीप प्रधान म्हणतात.

मात्र, याचबरोबर संदीप प्रधान 2024 च्या निवडणुकीचा मुद्दा उपस्थित करतात. ते म्हणतात, "पुढची म्हणजे 2024 ची लोकसभा निवडणूक हिंदुत्त्वाच्या मुद्द्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. 2014 साली विकासाच्या मुद्द्यावर आणि 2019 ची निवडणूक काम करण्यासाठी आणखी काही काळ सत्तेची मागणी केली. आता विकासाची फळं दिसत नसताना कुठला मुद्दा राहतो, तर हिंदुत्त्वाचा. तोच भाजपनं उचललाय. निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा तापवण्याचा भाजपचा प्लॅन दिसतो. शिवसेनेनं हेच ओळखलंय आणि त्यामुळेच टीका सुरू केलीय."

तर वरिष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर हे शिवसेनेच्या टीकेकडे राजकीय टीका म्हणून पाहतात. ते म्हणतात, "शिवसेना राम मंदिराच्या वर्गणीबाबत जी टीका करतेय, ती टीका पक्षीय विरोधातून आहे. राम मंदिराला त्यांचा विरोध नाहीय. राम मंदिराच्या माध्यमातून भाजपला झोडपणं, असा राजकीय विरोध शिवसेना करतेय."

ही लढाई श्रेयवादाची?

मात्र, श्रेयवादाच्या मुद्द्यावर विनायक पात्रुडकर हेसुद्धा संदीप प्रधान यांच्याशी सहमत होत म्हणतात, "भाजपने राम मंदिराचा मुद्दा टेक ओव्हर केला आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन झालं, तेव्हाच स्पष्ट संदेश गेला की, भाजपनं हा मुद्दा पूर्ण हाती घेतलाय. आता शिवसेना हेच श्रेय खोडून काढतेय."

त्याचवेळी विनायक पात्रुडकर यांनी शिवसेनेच्या टीकेतली शक्यताही सांगितली. ते म्हणतात, "आम्हीही राम मंदिर उभारणीचे भागीदार आहोत, आम्हालाही श्रेय हवं, हे सांगण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसतोय. शिवाय, राम मंदिराच्या आंदोलनात आमचाही मोठा सहभाग होता, हे लोकांच्या आठवणीत राहावं म्हणूनही शिवसेनेची सध्याची धडपड दिसून येते."

याच मुद्द्याला थोडं पुढे नेत संदीप प्रधान म्हणतात, शिवसेनेनं आता ओळखलंय की, भाजपच्या सावलीत उभं राहिल्यास पक्षाची वाढ होणार नाही. उलट खच्चीकरणच होईल. त्यामुळे शिवसेनेनं वेगळा विचार करून महाविकास आघाडी स्थापनेचं धाडस केलंय.

सेनेच्या भूमिकेकडे गांभिर्यानं पाहत नाही - भाजप

दरम्यान, शिवसेनेकडून राम मंदिर निर्माणासाठीच्या वर्गणी मोहिमेवर होत असलेल्या टीकेबाबत बीबीसी मराठीनं भाजपचीही बाजू विचारली.

भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी हे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, एखाद्या वर्तमानपत्र किंवा नियतकालिकांच्या टीकेला आम्ही उत्तर देत नाही.

मात्र, राम मंदिराच्या मुद्द्याच्या अनुषंगाने बोलताना माधव भांडारी यांनी शिवसेनेच्या सध्याच्या एकूणच भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आणि टीका केली.

"शिवसेनेच्या कुठल्याच भूमिकेकडे गांभिर्यानं पाहत नाही. कारण ते स्वत:चं गांभिर्याने काही करत नाहीत. आपण काय केलं, याचा आजच्या गोष्टीचा संबंध असला पाहिजे, असं त्यांना वाटत नाही," असं भांडारी म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)