IPL Auction 2021 : आयपीएल लिलावाविषयी जाणून घ्या सर्वकाही

इंडियन प्रीमिअर लीगच्या 14व्या हंगामासाठी 18 फेब्रुवारीला (आज) लिलाव होतो आहे. चेन्नईत लिलावाची प्रक्रिया पार पडेल.

लिलावासाठी 1097 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यामध्ये 814 भारतीय तर 283 विदेशी खेळाडू आहेत.

हे मिनी ऑक्शन म्हणजे छोटेखानी लिलाव आहे. कारण बहुतांश संघांनी प्रमुख खेळाडूंना संघात कायम राखलं आहे. त्यामुळे मोठी उलाढाल होणार नाही.

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघांनी मात्र घाऊक खेळाडूंना बाहेर केलं आहे. त्यामुळे या संघांना नव्याने संघबांधणी करायची आहे. या दोन संघांसाठी हा लिलाव महत्त्वाचा आहे.

207 खेळाडू राष्ट्रीय संघाकडून खेळलेले आहेत. 863 खेळाडू प्रथमश्रेणी आणि स्थानिक क्रिकेटमधले आहेत तर 27 खेळाडू असोसिएट देशांचे आहेत.

लिलावासाठी अफगाणिस्तान (30), ऑस्ट्रेलिया (42), बांगलादेश (5), इंग्लंड (21), आयर्लंड (2), नेपाळ (8), नेदरलँड्स (1), न्यूझीलंड (29), स्कॉटलंड (7), दक्षिण आफ्रिका (38), श्रीलंका (31), युएई (9), अमेरिका (2), वेस्ट इंडिज (56), झिम्बाब्वे (2) मिळून 283 विदेशी खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे.

सुरुवातीची अनेक वर्ष रिचर्ड मेडले लिलावाची प्रक्रिया सांभाळायचे. जगात विविध क्षेत्रांसाठी चालणाऱ्या लिलावांमध्ये ते असायचे. दहा वर्षं मेडले आणि आयपीएल लिलाव हे समीकरण झालं होतं. गेले काही वर्ष ह्यूज इडमेडस लिलाव प्रक्रिया हाताळतात. सर्व फ्रँचाईजींचे प्रशासक, लिलावासाठी उपस्थित माणसं, बीसीसीआय प्रशासन यांच्यात समन्वय साधत लिलाव प्रक्रिया आयोजिक करणं हे ऑक्शनर अर्थात लिलावकर्त्याचं काम असतं.

प्रत्येक खेळाडूची बेस प्राईज ठरलेली असते. त्या रकमेपासून संबंधित खेळाडू सगळ्या संघांकरता उपलब्ध असतो. एकापेक्षा जास्त संघांना त्या खेळाडूला संघात घेण्यात स्वारस्य असेल तर बोली लागायला सुरुवात होते. सर्वाधिक बोलीला अन्य संघांनी आव्हान दिलं नाही की संबंधित खेळाडू त्या संघाच्या ताफ्यात दाखल होतो.

एखादा खेळाडू बेस प्राईजवरच संघांना मिळतो. खेळाडूचं नाव पुकारल्यानंतर कोणत्याही संघाने बोली लावली नाही तर तो खेळाडू अनसोल्ड जातो. सगळ्या खेळाडूंसाठी बोली लागल्यानंतर, अनसोल्ड खेळाडूंची नावं पुन्हा घेतली जातात. दुसऱ्या टप्प्यात संघ त्यांना विकत घेऊ शकतात.

या लिलावात सर्वाधिक बोली कोणाला मिळते हे पाहणे रंजक ठरणार आहे. आतापर्यंतच्या लिलावांमध्ये सर्वाधिक बोली कोणाला मिळालेय हे जाणून घेऊया.

1. लिलावात वर्षागणिक सर्वाधिक बोली

2008-महेंद्रसिंग धोनी (6 कोटी)

2009-अँड्यू फ्लिनटॉफ आणि केव्हिन पीटरसन (प्रत्येकी 7.35 कोटी)

2010-कायरेन पोलार्ड आणि शेन बाँड (प्रत्येकी 3.4 कोटी)

2011- गौतम गंभीर (11.4 कोटी)

2012-रवींद्र जडेजा (9.72 कोटी)

2013-ग्लेन मॅक्सवेल (5.3 कोटी)

2014-युवराज सिंग (14 कोटी)

2015-युवराज सिंग (16 कोटी)

2016- शेन वॉटसन (9.5 कोटी)

2017-बेन स्टोक्स (14.5 कोटी)

2018-बेन स्टोक्स (12.50 कोटी)

2019-जयदेव उनाडकत आणि वरुण चक्रवर्ती (प्रत्येकी 8.4 कोटी)

2020-पॅट कमिन्स (15.5 कोटी)

2. कोणी माघार घेतली आहे?

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फास्ट बॉलर मिचेल स्टार्क आणि गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळलेला जेम्स पॅटिन्सनने 2021हंगामातून माघार घेतली आहे.

इंग्लंडचा टेस्ट संघाचा कर्णधार जो रूट तसंच बांगलादेशचा बॅट्समन आणि विकेटकीपर मुशफकीर रहीम यांनीही लिलावासाठी नोंदणी केलेली नाही.

3. सगळ्यांत युवा आणि सगळ्यात वयस्क खेळाडू कोण?

यंदाच्या लिलावासाठी अफगाणिस्तानचा 16वर्षीय डावखुरा स्पिनर नूर अहमद लखनवालने नोंदणी केली आहे. याच लिलावात 42वर्षीय नयन दोशी यांचंही नाव आहे.

कोणावर असेल लक्ष?

ग्लेन मॅक्सवेल- घणाघाती बॅटिंग, उपयुक्त स्पिन बॉलिंग आणि उत्तम फिल्डर ही ग्लेन मॅक्सवेलची गुणवैशिष्ट्यं आहेत. मात्र मॅक्सवेलला कामगिरीत सातत्य राखता आलेलं नाही. मॅक्सवेलला किंग्ज इलेव्हन पंजाबने संघाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मॅक्सवेल याआधीच्या हंगांमांमध्ये मुंबई आणि दिल्लीकडून खेळला आहे. एकहाती मॅच फिरवण्याची ताकद मॅक्सवेलकडे आहे मात्र लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्याने संघ नाराज होऊन त्याला वगळतात.

स्टीव्हन स्मिथ-ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि भरवशाचा बॅट्समन स्टीव्हन स्मिथकडे संघांचं बारीक लक्ष असेल. ऑस्ट्रेलियासाठी धावांच्या राशी ओतणाऱ्या स्मिथला आयपीएल स्पर्धेत तितक्या तडफेने रन्स करता आलेल्या नाहीत. राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व स्मिथकडे होतं. मात्र बॅटिंग आणि संघांची कामगिरी उंचावण्यात अपयश आल्याने राजस्थानने स्मिथला डच्चू दिला आहे. कोणत्याही स्वरुपाच्या खेळपट्टीवर मोठी खेळी करण्याची हातोटी, नेतृत्वक्षमता, अफलातून फिल्डर ही स्मिथची वैशिष्ट्यं आहेत.

फॅबिअन अॅलन- जगभरात विविध ठिकाणी ट्वेन्टी-20 लीग खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एक महत्त्वाचा खेळाडू. सनरायझर्स हैदराबादने त्याला एकाही सामन्यात खेळवलं नाही. संघ समीकरणांमुळे बसत नसल्याने अलनचा करार वाढवण्यात आला नाही. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही आघाड्यांवर अलन खणखणीत कामगिरी करतो. पंजाब आणि बेंगळुरू संघ फॅबिअनला ताफ्यात समाविष्ट करू शकतात.

जेसन रॉय-मनमुराद फटकेबाजीसाठी प्रसिद्ध जेसन रॉयने 2020 हंगामातून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली होती. रॉय दिल्ली संघाचा भाग होता. सलामीला येत आक्रमक टोलेबाजी करण्यासाठी रॉय प्रसिद्ध आहे. पॉवरप्लेच्या ओव्हर्समध्ये भरपूर रन्स लुटत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्याच्या दृष्टीने रॉय उपयुक्त आहे.

पीयुष चावला- आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसंच आयपीएल खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव ही पीयुषची जमेची बाजू आहे. पीयुष आतापर्यंत चेन्नई, कोलकाता, संघांसाठी खेळला आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीत पीयुष तिसऱ्या स्थानी आहे. त्याच्या नावावर 156 विकेट्स आहेत. 32वर्षीय पीयुषला 2020 हंगामात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पण त्याच्यासारखा अनुभवी बॉलर ताफ्यात असणं कर्णधारासाठी चंगळ ठरू शकतं.

हरभजन सिंग- भारतीय संघाचा माजी चॅम्पियन स्पिनर आणि आयपीएल स्पर्धेत वर्षानुवर्षे दमदार प्रदर्शन करणारा खेळाडू. चेन्नई सुपर किंग्सने 40वर्षीय हरभजनचा करार वाढवला नाही. मात्र टेस्टमध्ये 417, वनडेत 269 आणि आयपीएल स्पर्धेत दीडशे विकेट्स हरभजनच्या नावावर आहेत. रन्स रोखणं आणि मोक्याच्या क्षणी विकेट्स पटकावणं यात हरभजनचं विशेष प्रावीण्य आहे. वयाचा मुद्दा अडसर ठरू शकतो परंतु ट्वेन्टी-20 छोटा फॉरमॅट असल्याने हरभजन खेळू शकतो.

केदार जाधव-टेनिस बॉल क्रिकेटमध्ये माहीर केदार जाधवने पुणे परिसरात आपल्या बॅटची चुणूक दाखवली. महाराष्ट्र संघासाठी त्याने धावांची टांकसाळ उघडली. भारतीय संघ आणि आयपीएलमध्ये दिल्ली, बेंगळुरू,कोची, चेन्नई संघांसाठी खेळताना केदारने आपल्या बॅटची ताकद दाखवून दिली आहे. 2020 हंगामात चेन्नईला बादफेरी गाठता आली नाही. त्यामध्ये केदारची सर्वसाधारण कामगिरी हा निर्णायक मुद्दा ठरला होता. महेंद्रसिंग धोनीचा विश्वासार्ह माणूस असं असतानाही चेन्नईने त्याला करारातून मुक्त केला. पस्तिशी गाठली असली तरी जोरदार फटकेबाजी, उपयुक्त स्पिन बॉलिंग यासाठी संघ केदारला संघात समाविष्ट करू शकतात.

शिवम दुबे- बॉलिंग ऑलराऊंडर खेळाडू दुर्मीळ सदरात मोडतात. उंचपुरा, पल्लेदार फटकेबाजी करणारा, मीडियम पेस बॉलिंग करणारा, चांगला फिल्डर असलेल्या शिवमला बेंगळुरूने करारातून मुक्त कसं केलं हे कोडं आहे. शिवम दुबेला ताफ्यात घेण्यासाठी संघ आतूर असू शकतात. 27वर्षीय शिवम काही संघांच्या रडारवर असू शकतो.

ख्रिस मॉरिस- बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही आघाड्यांवर उत्तम प्रदर्शन हे मॉरिसचं वैशिष्टय आहे. दक्षिण आफ्रिका तसंच जगभरात ट्वेन्टी-20 लीग खेळण्याचा अनुभव मॉरिसकडे आहे. 33 वय आणि दुखापती यामुळे मॉरिसला संघात घेण्याबाबत संघ साशंक असू शकतात.

इंग्लंडचा ऑलराऊंडर मोईन अली आणि बॅट्समन तसंच विकेटकीपर सॅम बिलिंग्ज, फास्ट बॉलर मार्क वूड आणि लायम प्लंकेट रिंगणात आहेत. इंग्लंडचा ट्वेन्टी-20 विशेषज्ञ डेव्हिड मलानकडे अनेक संघांचं लक्ष असेल. आक्रमक फटकेबाजी प्रसिद्धी अलेक्स हेल्स स्थान पटकावू शकतो.

इंग्लंडचा जेम्स विन्स आणि न्यूझीलंडचा कॉलिन मुन्रो हे दोघे बिग बॅश स्पर्धेत चांगल्या फॉर्मात आहेत.

युवा फास्ट बॉलर झाय रिचर्डसन भन्नाट फॉर्मात आहे. बिग बॅश स्पर्धेत त्याने भरपूर विकेट्स घेतल्या आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)