IndvsEng इशांत शर्मा : 32व्या वर्षी 52वर्षांचा झालेल्या इशांत शर्माची गोष्ट

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

डॅन लॉरेन्सला आऊट करत इशांत शर्माने कारर्कीदीत 300 विकेट्सचा टप्पा ओलांडला. हा टप्पा पार करणारा तो भारताचा सहावा बॉलर आहे.

300 विकेट्स पटकावणाऱ्या अनिल कुंबळे, कपिल देव, हरभजन सिंह, रवीचंद्रन अश्विन, झहीर खान यांच्या मांदियाळीत इशांतचा समावेश झाला आहे.

सतराव्या वर्षी पदार्पण केलेला इशांत आता तिशीपल्याड पोहोचला आहे. त्याच्या कारकीर्दीतील क्षणचित्रांचा घेतलेला आढावा.

शंभरावी टेस्ट हा कोणत्याही क्रिकेटपटूसाठी कारकीर्दीतला अविस्मरणीय क्षण असतो. भारताच्या संदर्भात फास्ट बॉलरने शंभर टेस्ट खेळण्याचा योग अतीदुर्मीळ आहे. वर्ल्डकपविजेते कर्णधार आणि सार्वकालीन महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी भारतासाठी शंभरपेक्षा जास्त टेस्ट खेळल्या आहेत. मात्र त्यांच्यानंतर बॅट्समन आणि स्पिनर्सचं शंभर नंबरी यादीत वर्चस्व आहे.

एक और करेगा? हाँ करूँगा

ऑस्ट्रेलियाचा संघ ऐन भरात असतानाची 2008मधली ही गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयरथाने सलग 16 टेस्ट जिंकल्या होत्या. सिडनी टेस्टमध्ये मंकीगेट प्रकरण घडलं. ती टेस्ट मॅचही ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. पर्थ टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचं पारडं साहजिक जड होतं. ऑस्ट्रेलियाने पर्थमध्ये दशकभरात मॅच गमावली नव्हती. भारतीय संघाने मंकीगेट प्रकरण बाजूला ठेऊन दमदार खेळ करत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 413 रन्सचं लक्ष्य ठेवलं.

सलामीवीर गमावल्यानंतर रिकी पॉन्टिंग आणि माईक हसी यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला होता. पॉन्टिंगची त्यावेळी जगातल्या सर्वोत्तम बॅट्समनमध्ये गणना होत होती.

जगभरात सगळीकडे खोऱ्याने रन्स करणारा बॅट्समन अशी त्याची प्रतिमा होती. पर्थ तर ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला. पण त्यादिवशी पर्थच्या गडावर पॉन्टिंगला एका पोरगेल्या दिसणाऱ्या मुलाने अक्षरक्ष नाकी दम आणला. त्या मुलाचं नाव होतं इशांत शर्मा. वय वर्ष 19. टप्पा पडून आत येणाऱ्या बॉलसमोर पॉन्टिंगची फेफे उडत होती.

क्रीझपासून थोड्या दूर अंतरावरून बॉलिंग करताना इशांतने पॉन्टिंगला जेरीस आणले. भारतीय फास्ट बॉलरने विदेशात टाकलेल्या सर्वोत्तम स्पेलपैकी तो गणला जातो. लांब केस, शिडशिडीत शरीर, अर्धवट दाढी-मिशा मात्र अंगात खूप सारी ऊर्जा सामावलेल्या इशांतला तसं बॉलिंग करताना पाहणं हा सुखद अनुभव होता.

सलग सात ओव्हर इशांत विरुद्ध पॉन्टिंग अशी जुगलबंदी रंगली. इशांतचा सामना बॅकफूटवरून करावं का फ्रंटफूटवरून या पेचात पॉन्टिंग अडकताना दिसत होता. अनेकदा बॉल त्याच्या बॅटजवळून गेला. काही बॉल त्याने अंगावर झेलले. इशांत दमलाय असं दिसत होता.

इशांतची ताकद ओळखणाऱ्या दिल्लीकर भिडू अर्थात वीरेंद्र सेहवागने कर्णधार अनिल कुंबळेला इशांतला आणखी एक ओव्हर देण्याची विनंती केली. फास्ट बॉलरला पुरवून पुरवून वापरलं जातं. सेहवागच्या आग्रहामुळे कुंबळेने इशांतला विचारलं- एक और डालेगा? इशांतने हो म्हटलं. इशांतच्या सलग आठव्या ओव्हरमध्ये पॉन्टिंगचा कॅच पहिल्या स्लिपमध्ये राहुल द्रविडने टिपला. पॉन्टिंगसारख्य मातब्बर बॅट्समनला जाळ्यात फसवत इशांतने जुगलबंदीची मैफल जिंकली. जगाने इशांतची दखल घेतली तो हा स्पेल.

इशांत शर्माचं हे पदार्पण नव्हतं. या भन्नाट स्पेलच्या वर्षभर आधी बांगलादेशविरुद्ध इशांतला टेस्ट कॅप देण्यात आली. बांगलादेशची राजधानी ढाक्यात 2007 झालेल्या त्या टेस्टमध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, झहीर खान, अनिल कुंबळे खेळले होते. इशांत त्यांच्यापुढे बच्चा होता.

2021 मध्येही इशांत खेळतो आहे आणि नुसता खेळत नाही तर फास्ट बॉलिंग विभागाचा अलिखित नेता आहे. एका फास्ट बॉलरसाठी 14 वर्षांची कारकीर्द असणं आणि 32व्या वर्षीही आणखी खेळू शकतो हे वाटणंच यश आहे. रणजी क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करून इशांतने निवडसमितीचं लक्ष वेधून घेतलं होतं. मुनाफ पटेलला दुखापत झाली आणि इशांतचा पदार्पणाचा मार्ग सुकर झाला होता.

इशांत शर्माची कारकीर्द झाडासारखी आहे. इवलंसं रोपटं लावलं जातं. त्याला पाणी, खत दिलं जातं. काडीपैलवान असं ते रोपटं थोडा वारा वाहिला तरी भेलकांडतं. मोठ्या वृक्षांच्या पसाऱ्यात त्या रोपट्याचा प्रवास सुरू होतो.

उन्हाळे, पावसाळे अनुभवून जमिनीचा ओलावा टिपत रोपट्याचं झाड होऊ लागतं. हे स्थित्यंतर हळूहळू होतं. नेमकं रोपट्याचं झाड कधी झालं हे आपल्या लक्षात येत नाही. झाडांच्या अस्तित्वावर अनेकजण टपलेले असतात.

झाडावर वरवंटा चालवून कोणीतरी कृत्रिम चकचकीत घडवू इच्छित असतं. विकृत मनोवृत्तीचं कोणीतरी झाडाच्या बुंध्यावर मोरचूद ठेवतं. झाडांना बांडगुळाचाही त्रास असतो. प्रवासातल्या अडथळ्यांवर मात करत झाड असं डेरेदार कधी होतं समजतच नाही. मग ते झाड पक्ष्यांचा आधारवड होतं. शुद्ध हवेसाठी माणसं त्याला आपलं मानू लागतात.

कोणी त्या झाडाच्या पसाराभर सावलीत विसावतं. झाडाच्या अंगाखांद्यावर वेली बहरू लागतात. बघता बघता झाडाचा आधारवड होतो. इशांत शर्माचा प्रवास म्हणजे भारतीय क्रिकेटमधल्या एका रोपट्यापासून आधारवड होण्यापर्यंतचा प्रवास आहे.

इशांतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमनाची वर्दी दिली तेव्हा भारतीय क्रिकेटच्या सुवर्णकाळाचे शिलेदार खेळत होते. इशांतसमोर झहीर खान नावाचं मोठं झाड होतं. इशांतने त्या झाडाचा पार आपला मानला.

भारतीय क्रिकेटमध्ये फास्ट बॉलरचं आगमन होऊन तो गर्दीत भिरकावलं जाण्याची उदाहरणं शेकड्याने आहेत. टेस्टचा टिळा लागला म्हणजे धन्य जाहलो असं मानणारेही खूप आहेत. इक्बाल सिद्दीकी, टिनू योहानन, लक्ष्मीपती बालाजी, इरफान पठाण, रुद्र प्रताप सिंह, व्हीआरव्ही सिंग, मुनाफ पटेल, श्रीसंत, अभिमन्यू मिथुन, जयदेव उनाडकत या समकालीन मंडळीमध्ये इशांत पुढे निघून गेला. त्याच्या बॉलिंगचा वेग कमी होत गेला.

बॉलिंगची लाईन अँड लेंथ भरकटत राहिली. बॅट्समनही त्याला चोपलंही. त्याचे आकडे उल्लेखनीय वगैरे नव्हते. दुखापती सातत्याने डोकं वर काढत असायच्या पण तो टिकून राहिला. एखादी लाट पुळणीवरून खडकांना धडका देत राहते तसं इशांत दूर लोटल्यावरही भोज्याच्या दिशेने येत राहिला. झहीरने निवृत्ती घेतल्यावर इशांत साहजिकपणे अनुभवी बॉलर झाला. वडिलांनी व्हीआरएस घेतल्यावर मुलाने कर्तेपण वागवावं तितक्या सहजतेने इशांतने ज्येष्ठता पेलली.

त्याचं वय फार नव्हतं पण त्याला लहान वयात पोक्त व्हावं लागलं. तो गुणकौशल्यं सुधारत गेला. झहीर बाजूला झाल्यानंतर इंग्लंड काऊंटी क्रिकेटमध्ये .. संघासाठी खेळत असताना त्याला जेसन गिलेस्पीच्या रुपात आणखी एक झाड मिळालं. मुळं खोलवर रुजवण्यासाठी नेमकं काय करायचं हे त्या झाडाने शिकवलं. तेव्हापासून इशांतची सेकंड इनिंग्ज सुरू झाली.

आशियाई उपखंडात वातावरण प्रचंड उष्ण आणि दमट असतं. अशा परिस्थितीत खूप घाम येतो. जगभरातले फास्ट बॉलर्स डोक्यावरचा केशसंभार हलका करून खेळत असताना इशांत खांद्यापर्यंत रुळणाऱ्या केसांनी खेळत असे.

फॉलोथ्रूमध्ये अंपायरच्या इथून सरकताना इशांतच्या केसांचं टोपलं पाहताना हा बारीक केसांनिशी का खेळत नाही? त्यालाच हलकं आणि छान वाटेल असं क्रिकेटरसिकांना हक्काने वाटत असे. पण ही 'केस'च वेगळी आहे हे हळूहळू त्यांना उमगलं.

भारतातल्या खेळपट्ट्या या प्रामुख्याने स्पिनर्सनला पोषक अशा. त्यामुळे फास्ट बॉलरला कर्तृत्व सिद्ध करायला विदेशातल्या खेळपट्ट्या खुणावतात. बॅट्समनसाठी विदेशी खेळणं अवघड असतं. भारतीय फास्ट बॉलरसाठी मायदेशापेक्षा विदेशातल्या खेळपट्ट्या अधिक घरच्यासारख्या वाटतात. कदाचित म्हणूनच इशांतने विदेशात घेतलेल्या विकेट्सची संख्या मायदेशात घेतलेल्या विकेट्सच्या दुप्पट आहे.

तुम्ही किती विकेट्स घेता याबरोबरीने तुम्ही कोणाला आऊट करता हेही किंबहुना जास्त महत्त्वाचं असतं. इशांत शर्माने टेस्टमध्ये सर्वाधिक वेळा आऊट केलंय अलिस्टर कुक, मायकेल क्लार्क, रिकी पॉन्टिंग, इयन बेल, शेन वॉटसन, हशीम अमला. सगळे खणखणीत बॅट्समन आहेत. प्रत्येकाच्या नावावर हजारो रन्स आहेत. टेलएंडर्सना यॉर्कर, बाऊन्सरने घाबरवून अनेकजण खूप विकेट्स मिळवतात पण प्रतिस्पर्धी संघाच्या मुख्य अस्त्राला निष्प्रभ करण्याची ताकद इशांतकडे आहे.

जेसन गिलेस्पी यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे इशांतने बॅट्समनच्या गुडघ्याच्या भागावर लक्ष केंद्रित केलं. भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांच्यासाठी तो मार्गदर्शक झाला. हे गुळपीठ इतकं घट्ट झालं की भारतीय बॉलर्सची जगभरातल्या बॅट्समनना भीती वाटू लागली. इशांतने त्यांची मोट बांधली. ते सावज ठरवून त्यासाठी अभ्यास करून सापळा रचत. एखाद्याची बॉलिंग चांगली होत नसेल तर आधार देऊ लागले. एकमेकांचा उत्साह वाढवू लागले. एकमेकांचे स्पर्धक असूनही त्यांनी निकोप स्पर्धा राखली. इशांतच्या अनुभवाचा फायदा नव्या मंडळींना झाला.

दिल्लीत मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला इशांत फक्त दहावीपर्यंत शिकला आहे. कारण मुलं ज्या वयात कॉलेजात जातात त्या वयात तो देशासाठी खेळू लागला होता. वडील एसीचं काम करणारे, आई गृहिणी अशा साध्या वातावरणात लहानाचा मोठा झालेल्या इशांतने कारकीर्दीत वेगवेगळ्या टप्प्यावर स्वत:ला उन्नत केलं.

52 वर्ष वयाचा किस्सा

इशांतचं वय 32 आहे मात्र भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने इशांतचं शरीराचं वय 52 असल्याचं म्हटलं आहे. क्रिकइन्फो वेबसाईटसाठी माजी खेळाडू दीप दासगुप्ता यांनी इशांतची मुलाखत घेतली. त्यावेळी इशांतने हा धमाल किस्सा सांगितला.

मी फक्त 32 वर्षांचा आहे मात्र लहान वयापासून खेळत असल्याने अनेकांना मी सीनियर वाटू लागतो असं इशांतने सांगितलं होतं. माझी बायको मला बुढ्ढा म्हणते असं इशांत सांगतो. माहीभाईंचा (महेंद्रसिंग धोनी) मेसेज येतो- ते म्हणतात और बुढ्ढे, क्या कर रहा है?

मी त्यांना सांगितलं की माझं वय 32 आहे. त्यावर ते म्हणाले, तुझं वय 32 असलं तरी तुझं शरीर 52 वर्षाचं आहे. 14 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीदरम्यान इशांतने दुखापतींचे अडथळे पार करत, बॉलिंगमध्ये सुधारणा करत बॉलिंग विभागाचं नेतृत्व मेहतनीने कमावलं. धोनीला इशांतच्या या संघर्षमय प्रवासाची कल्पना असल्यानेच त्याने इशांतचं शरीर 52 वर्षाचं झाल्याचं सांगितलं.

30 रन्सची ओव्हर आणि अश्रू

इशांत शर्मा तो दिवस आणि ती ओव्हर आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. कारण त्या घटनेमुळे आयुष्यात पहिल्यांदा क्रिकेटमुळे त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले.

2013मधली ही घटना आहे. भारत-ऑस्ट्रेलिया वनडे होती. ऑस्ट्रेलियापुढचं लक्ष्य आव्हानात्मक होतं. विकेट मिळवणं आणि रन्स रोखणं यासाठी कर्णधाराने इशांत शर्माच्या हाती बॉल सोपवला. या ओव्हरमुळे वनडे करिअर धोक्यात येईल याची जराही कल्पना इशांतला नव्हती.

ऑस्ट्रेलियाच्या जेम्स फॉकनरने इशांतच्या त्या ओव्हरमध्ये तब्बल 30 रन्स चोपून काढल्या. 18 बॉल 44 बॉल असं अवघड वाटणारं समीकरण इशांतच्या त्या ओव्हरमुळे 12 बॉल 14वर आलं. भारतीय संघाने ती मॅच गमावली.

इशांत शर्माला त्या ओव्हरसाठी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. इशांत त्याने विचलित झाला नाही. देशासाठी मॅच जिंकून देऊ शकलो नाही, कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवू शकलो नाही याची बोच त्याच्या मनाला राहिली. एखादा दिवस नव्हे तर 15 दिवस रडतच होतो असं इशांतने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

इशांतची पत्नी ही भारताच्या राष्ट्रीय बास्केटबॉल संघाचा भाग आहे. इशांतच्या मनात काय चाललं आहे याची कल्पना तिला आली. प्रतिमानेच इशांतला सावरलं. तू रडत बसू शकतोस किंवा सरावाला लागू शकतोस असा सल्ला प्रतिमाने दिला. इशांतने बायकोचा सल्ला प्रमाण मानला आणि सरावाला लागला.

मॅचविनिंग भागीदारी

2010मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया उत्कंठावर्धक स्थितीत होती. 216 पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्था 124/8 अशी झाली होती. मात्र भरवशाचा व्हीव्हीएस लक्ष्मण खेळपट्टीवर ठाण मांडून उभा होता. त्याला साथीदाराची आवश्यकता होती.

बॅटिंगसाठी फारसा प्रसिद्ध नसलेल्या इशांत शर्माने ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्याला तोंड देत लक्ष्मणला साथ दिली. लक्ष्मणने इशांतला हाताशी घेऊन धावफलक हलता ठेवला. लक्ष्मण-इशांत भागीदारीने भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. लक्ष्मण-इशांत जोडीने नवव्या विकेटसाठी 81रन्सची भागीदारी केली.

31 रन्सचं योगदान देऊन इशांत बाद झाला. मात्र त्याने त्याचं काम केलं होतं. लक्ष्मणने प्रग्यान ओझाच्या मदतीने भारतीय संघाला थरारक विजय मिळवून दिला.

चॅम्पियन्स ट्रॉफी-बोपारा आणि मॉर्गन

आयपीएल स्पर्धेत फिक्सिंगच्या घटना समोर आल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय संघ इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी रवाना झाला. दमदार संघांचं आव्हान पार करत भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत यजमान इंग्लंडचं आव्हान होतं. पावसामुळे 50 ओव्हरचा सामना 20 ओव्हरचा खेळवण्यात आला. भारतीय संघाने 129 रन्सची मजल मारली.

इंग्लंडसाठी हे माफक लक्ष्य होतं. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था 46/4 अशी झाली. मात्र आयोन मॉर्गन आणि रवी बोपारा हे अनुभवी वीर खेळपट्टीवर होते. त्या दोघांनी 55 बॉलमध्ये 64 रन्सची भागीदारी करत सामना इंग्लंडच्या बाजूने फिरवला होता. 18व्या ओव्हरमध्ये धोनीने इशांत शर्माच्या हाती बॉल सोपवला. 18 बॉल 28 असं समीकरण होतं. पहिला बॉल निर्धाव पडला मात्र दुसऱ्या बॉलवर मॉर्गनने पल्लेदार षटकार लगावला.

पुढचा बॉलला इशांतच्या हातून वाईड पडला. दुर्देव म्हणजे यापुढचा बॉलही वाईडच पडला. नशिबाचे फासे भारताविरुद्ध जाणार असं दिसू लागलं. धोनीचा इशांतला बॉलिंग देण्याचा निर्णय फसणार अशी लक्षणं होती. मात्र पुढच्याच बॉलवर इशांतने मॉर्गनला अश्विनकडे कॅच द्यायला भाग पाडलं. मोठा फटका खेळण्याचा मॉर्गनचा प्रयत्न फसला.

मॉर्गन बाद झाल्यावर बोपाराकडे सूत्रं आली. मात्र पुढच्याच बॉलवर इशांतने बोपाराला तंबूत परतावत मॅचचं पारडं भारतीय संघाच्या बाजूने फिरवलं. एका ओव्हरमध्ये दोन विकेट्स पटकावत इशांतने भारतीय संघाचं मनोधैर्य उंचावलं. पुढच्या ओव्हरमध्ये रवीचंद्रन अश्विनने जोस बटलरला बाद केलं आणि टीम ब्रेसननही रनआऊट झाला.

भारतीय संघाने अवघ्या 5 रन्सने अंतिम लढत जिंकत जेतेपदावर नाव कोरलं. 33 रन्स आणि 2 विकेट्ससाठी जडेजाला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. धोनीने इशांतच्या हाती बॉल सोपवला तेव्हा सामन्यात त्याने 3 ओव्हरमध्ये 27 रन्स दिल्या होत्या आणि त्याच्या नावावर एकही विकेट नव्हती. तरीही धोनीने इशांतच्या अनुभवाचा फायदा उचलायचं ठरवलं. इशांतने दोन विकेट्सह धोनीचा विश्वास सार्थ ठरवला.

पदार्पण केल्यापासून इशांत भारतीय क्रिकेटमधल्या महत्त्वाच्या क्षणांचा साक्षीदार आहे. काही ऐतिहासिक क्षण त्यानेच मिळवून दिले आहेत. काही कटू पराभवांचा तो भाग होता. त्या आठवणींनी तो कडवट झालेला नाही. मुरलेल्या लोणच्याप्रमाणे इशांत दिवसेंदिवस भेदक होत चालला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)