अजिंक्य रहाणे : डोंबिवली ते ओव्हल देदिप्यमान कामगिरी

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

टीम इंडियाचा भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने उभारलेल्या 469 धावांच्या डोंगरासमोर भारतीय संघ ढेपाळलाच होता. पण अजिंक्य रहाणे एक बाजू लावून धरली आणि संघाला फॉलोऑनपासून वाचवलं.

शतक करता आलं नाही तरी अजिंक्य रहाणेची या सामन्यातील खेळी अविस्मरणीय ठरली आहे. अजिंक्य रहाणेने या सामन्यात 129 चेंडूंचा सामना करताना 89 धावा केल्या. आपल्या संयमी खेळीत रहाणेने 11 चौकार आणि 1 षटकार लगावला.

अखेर, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर कॅमेरून ग्रीनने टिपलेल्या सुंदर झेलामुळे अजिंक्य रहाणे बाद झाला.

पण तोपर्यंत रहाणेने त्याचं काम केलं होतं. एक वेळ 150 धावसंख्याही पार होईल की नाही, अशी शक्यता असताना अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीने भारताला अडचणीतून बाहेर काढलं.

दोन वर्षांपूर्वी खराब फॉर्ममुळे संघाबाहेर पडलेल्या अजिंक्य रहाणने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली होती. त्यानंतर आता कसोटी क्रिकेटमधील पुनरागमनही त्याने अतिशय दिमाखात केलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा संस्मरणीय दौरा

दुखापतींचा ससेमिरा, दारुण पराभवाची पार्श्वभूमी अशा परिस्थितीत अजिंक्य रहाणेकडे टीम इंडियाची नेतृत्वाची धुरा आली. रहाणेने अनुनभवी अशा संघाला प्रेरित करत दिमाखदार मालिका विजय मिळवून दिला.

अॅडलेड टेस्टमध्ये मानहानीकारक पराभवानंतर टीम इंडियावर जोरदार टीका झाली. त्यातच या टेस्टनंतर विराट कोहली पॅटर्निटी लिव्हसाठी मायदेशी परतला.

अॅडलेड टेस्टमध्ये भारतीय संघ 36 धावात गारद झाला होता. त्याचं भूत मानगुटीवरून उतरवत भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत ऐतिहासिक विजय साकारला होता. त्या विजयाचा शिल्पकार ठरला होता अजिंक्य राहाणे. अजिंक्यने शतकी खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला होता.

या दमदार विजयासह भारतीय संघाने अॅडलेड पराभवाची परतफेड तर केलीच, शिवाय बॉर्डर-गावस्कर मालिकेत 1-1 बरोबरी केली आहे.

अजिंक्यला शतकी खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कारानेही गौरवण्यात आलं.

ऐतिहासिक आणि संस्मरणीय विजयाच्या निमित्ताने अजिंक्यचं सर्वत्र कौतुक होतं आहे.

अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी हे रहाणेचं मूळ गाव. त्याचं लहानपण मुंबईचं उपनगर असलेल्या डोंबिवलीत गेलं.

त्याचे वडील मधुकर राहाणे यांनी त्याला डोंबिवलीच्या एका क्रिकेट कोचिंग कँपमध्ये नेलं आणि तिथून खरंतर त्याच्या स्वप्नांचा प्रवास सुरू झाला.

त्याच्या वडिलांनी एकदा एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. "मी तर त्याला त्या कँपमध्ये घेऊन गेलो, कारण मला वाटायचं, त्याने शाळेनंतरचा त्याचा वेळ टवाळक्या करत वाया घालवू नये. तिथल्या कोचने त्याला एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो दाखवत विचारलं, याला ओळखतोस?

"तेव्हा तो म्हणाला, हो. सचिन तेंडुलकर.

कोचने मग विचारलं, मग एक दिवस याच्यासोबत खेळायचंय?

अज्जू हो म्हणाला. आणि मला जरा अवघडल्यासारखं वाटलं. कारण एवढं मोठं स्वप्न त्याने अचानक असं बोलून दाखवलं होतं."

रहाणे कराटेत ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहे. उंची आणि आकाराने लहान असतानाही त्याने कराटेत आपली हुकूमत दाखवली होती.

मुंबईकर परंपरेचा पाईक

उत्तम तंत्रकौशल्य, चांगल्या दर्जाच्या बॉलिंगचा सामना करण्याची ताकद, मोठी खेळी करण्यासाठी आवश्यक दृष्टिकोन, चपळ फिल्डर आणि दमदार फिटनेस या गुणकौशल्यांच्या बळावर अजिंक्यने मुंबई क्रिकेट गाजवलं.

विविध वयोगट स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर तो मुंबईसाठी खेळू लागला. मुंबईसाठी रणजी क्रिकेटमध्ये त्याने धावांची टांकसाळ उघडली. अजिंक्य ऐन भरात असताना टीम इंडियात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण असे रथीमहारथी खेळत होते.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे अजिंक्यची टीम इंडियासाठी निवड व्हायची मात्र बराच काळ त्याला राखीव खेळाडू म्हणून वावरावं लागलं.

त्याची 15 जणांच्या स्क्वॉडमध्ये वर्णी लागायची, मात्र अंतिम 11मध्ये त्याचा नंबरच लागत नव्हता. त्यासाठी त्याला तब्बल 16 महिने वाट पाहावी लागत होती.

मग 2013 मध्ये त्याला जेव्हा टेस्ट कॅप मिळाली, तेव्हापासून त्याने शतक झळकावलं आणि भारताने तो सामना गमावला, असं कधीही झालं नाही. त्याची कामगिरी त्याच्या नावालाच साजेशी ठरली आहे.

राहुल द्रविडचा विद्यार्थी

राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना अजिंक्यला टीम इंडियाचा माजी खेळाडू राहुल द्रविडचं मार्गदर्शन लाभलं. शांत, संयमी स्वभाव, खेळपट्टीवर ठाण मांडून मोठी खेळी करण्याची ताकद, ना टॅटू, ना कुठले फंकी अॅड, वाचाळपणा नाही, आक्षेपार्ह वर्तन नाही. यामुळे रहाणेच्या खेळात, वागण्याबोलण्यात द्रविडचा प्रभाव दिसतो असं अनेकजण म्हणतात.

राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना अजिंक्यने राहुल द्रविडसह अनेक भागीदाऱ्या रचला. खेळाबद्दलचे बारकावे जाणून घेतले. नेतृत्व कसं करावं हे जाणून घेतलं.

अजिंक्यच्या या स्वत:मध्ये सातत्याने सुधारणा करण्याच्या वृत्तीमुळेच राहुल द्रविडने जेव्हा राजस्थानचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा अजिंक्यच्या हाती संघाची धुरा सोपवली. द्रविडसारख्या खेळाडूचा विश्वास संपादन करणं हे अजिंक्यच्या वाटचालीचं मर्म आहे.

परदेशात झुंजार खेळींसाठी प्रसिद्ध

विदेशात दर्जेदार बॉलिंगसमोर, आव्हानात्मक खेळपट्यांवर खेळणं अवघड असतं. घरच्या मैदानावर वाघ असणारे अनेक बॅट्समन विदेशात चाचपडताना दिसतात. अजिंक्यचं वेगळेपण यामध्ये आहे. 2013 मध्ये दक्षिण आफ्रिकेत दरबानला अजिंक्यने साकारलेल्या 96 धावांच्या खेळीचे आजही दर्दी चाहते आठवण काढतात.

बोचऱ्या वाऱ्यांसाठी प्रसिद्ध वेलिंग्टनमध्ये अजिंक्यने शतकी साकारली होती.

भल्या भल्या बॅट्समनला क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर शतक झळकवायला जमलेलं नाही. अजिंक्यने 2014मध्ये लॉर्ड्सवर साकारलेली शतकी खेळी हा स्विंग बॉलिंग कशी खेळावी याचा वस्तुपाठ होता.

त्याच वर्षी ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथे विराट कोहलीसह खेळताना अजिंक्यने अफलातून शतक केलं होतं. त्या खेळीदरम्यान अजिंक्य विराटपेक्षाही आक्रमकतेने खेळत होता. मिचेल जॉन्सनसारख्या फास्ट बॉलरवर केलेलं आक्रमण विशेष लक्षात राहणारं होतं.

श्रीलंका असो किंवा वेस्ट इंडिज- अजिंक्यची बॅट विदेशी खेळपट्यांवर सातत्याने तळपते. म्हणूनच संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा त्याच्याकडे देण्यात आली.

वर्ल्डकपवारी हुकली

स्ट्राईकरेटचं कारण देत 2015 वर्ल्डकपनंतर अजिंक्यला वनडे संघातून बाजूला करण्यात आलं. अजिंक्यला वगळल्यानंतर केदार जाधव, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, विजय शंकर, ऋषभ पंत अशा अनेक खेळाडूंना संधी मिळाली. मात्र एकही जण स्थिरावू शकला नाही.

90वनडे नावावर असलेल्या अजिंक्यने 2962 रन्स करताना 3 शतकं आणि 24 अर्धशतकं झळकावली आहेत. 2019 वर्ल्डकप स्पर्धेवेळी टीम इंडियाला चौथ्या क्रमांकावर सक्षम बॅट्समनची आवश्यकता होती. टीम इंडियाने अनेक प्रयोग केले.

अजिंक्य रहाणे त्यावेळी इंग्लंडमध्येच हॅम्पशायर संघासाठी खेळत होता. त्याला समाविष्ट करावं अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र निवडसमितीने अजिंक्यच्या नावाचा विचार केला नाही. टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं

आयपीएल प्रवास

सुरुवातीच्या काही हंगामांमध्ये रहाणे मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. मात्र तिथे त्याला अंतिम अकरात खेळण्याच्या फारशा संधी मिळाल्याच नाहीत.

प्रयोगशील संघ म्हणून प्रसिद्ध राजस्थान रॉयल्स संघाने रहाणेला ताफ्यात समाविष्ट केलं. राहुल द्रविडच्या बरोबरीने रहाणे राजस्थानसाठी सलामीला येऊ लागला. भरपूर रन्स, अतिशय उत्तम फिल्डिंग यामुळे रहाणे 2012-2015 या कालावधीत राजस्थानचा अविभाज्य घटक झाला.

राजस्थान संघावर दोन वर्षांची बंदीची कारवाई झाल्यानंतर रहाणे 2016-17 अशी दोन हंगांमांसाठी रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळू लागला. नव्या संघाकडून खेळतानाही रहाणेची धावांची भूक मंदावली नाही.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत अजिंक्य अकराव्या स्थानी आहे. टेस्ट स्पेशालिस्ट असा शिक्का बसलेला, ट्वेन्टी-20 प्रकाराला याची शैली साजेशी नाही अशी टीका होत असतानाही रहाणेने तंत्रशुद्ध बॅटिंगद्वारे सातत्याने रन्स टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आयपीएल स्पर्धेत, अजिंक्यने 149 मॅचेसमध्ये 31.71ची सरासरी आणि 121.38च्या स्ट्राईकरेटने 3933 रन्स केल्या आहेत. यामध्ये दोन शतकं आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. 416 चौकार आणि 76 षटकार रहाणेच्या आक्रमक बॅटिंगची ग्वाही देतात.

15 एप्रिल 2012 रोजी रहाणेने रॉयल्ससाठी खेळताना बेंगळुरूविरुद्ध नाबाद 103 रन्सची खेळी केली होती. गेल्या वर्षी त्याने दिल्लीविरुद्ध नाबाद 105 रन्सची खेळी साकारली होती. इतकी वर्षं आयपीएलमध्ये खेळताना अजिंक्यने 59 कॅच टिपले आहेत. अफलातून फिल्डिंगसाठी तो ओळखला जातो.

राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक रन्स करण्याचा विक्रम रहाणेच्याच नावावर आहे. आयपीएलमध्ये 25 मॅचेसमध्ये रॉयल्सचं नेतृत्व करताना 9 मॅचेसमध्ये संघाने विजय मिळवला तर 16वेळा पराभवाला सामोरं जावं लागलं. जिंकण्याची टक्केवारी 36 टक्के आहे.

राजस्थान ते दिल्ली आणि राखीव खेळाडू

राजस्थानसाठी खेळताना दमदार प्रदर्शन असूनही माजी कर्णधार अजिंक्य रहाणेला त्यांनी ट्रेडऑफच्या माध्यमातून दिल्ली कॅपिटल्स संघाला दिलं. त्याबदल्यात दिल्लीकडून मकरंद मार्कंडेय आणि राहुल टेवाटिया हे फिरकीपटू राजस्थानकडे आले.

दिल्लीकडे शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत अशा आक्रमक बॅट्समनची फळी होती. अजिंक्य रहाणे हा एक दर्जेदार बॅट्समन आहे.

गेली अनेक वर्षं तो सातत्याने रन्स करतो आहे. मात्र संघ निवडताना तो फर्स्ट चॉईस नसेल असं दिल्लीचे कोच आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांनी म्हटलं होतं.

ट्वेन्टी-20 स्टाईल बॅटिंगसंदर्भात रहाणेबरोबर मी सातत्याने चर्चा करतो आहे. त्याचा उत्तम सराव सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं होतं. पृथ्वी शॉची कामगिरी खराब झाल्यानंतर रहाणेला संघात घेण्यात आलं. रहाणे दिसत नसल्याने सोशल मीडियावर भरपूर चर्चा झाली होती.

यंदा लिलावात अजिंक्यला कोलकाता नाईट रायडर्स संघाने ताफ्यात समाविष्ट केलं. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये अजिंक्यने कोलकातासाठी सलामीवीराची भूमिका बजावली. त्यानंतर त्याला वगळण्यात आलं. मात्र ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचही लौकिकाला साजेशी कामगिरी करू न शकल्याने अजिंक्यला पुन्हा खेळवण्यात आलं. दुखापतग्रस्त झालेला असतानाही रहाणेने एका सामन्यात आश्वासक खेळी केली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)