You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IndvsAus : 336 मध्ये वस्त्रहरण, इंज्युरी इलेव्हन आणि नव्या भारताची भरारी
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
दुखापतींमुळे संघात सातत्याने बदल होऊनही टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर मालिकेत दिमाखदार प्रदर्शन केलं.
बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहली बोलत होता- मी जसा आहे, माझं व्यक्तिमत्व आहे, मी नव्या भारताचा प्रतिनिधी आहे. ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्यासाठी आलेला भारतीय संघही असाच आहे.
तो आव्हानांना भिडणारा आहे. प्रतिकूल परिस्थिती ओढवली तरी तो मोडणार नाही, वाकणारही नाही. टीम इंडियाच्या कामगिरीचं सार विराटच्या शब्दात आहे.
दोन वर्षांपूर्वी कोहलीच्याच नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकण्याचा पराक्रम केला होता. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट होऊ शकेल का? अशी परिस्थिती होती.
कोरोना नियमावलीचं पालन करत ही सीरिज झाली. नीचांकी धावसंख्या, दररोज निघणाऱ्या दुखापती, अनुनभवी खेळाडू, बायोबबलचे नियम अशा सगळ्या आव्हानांना टक्कर देत टीम इंडियाने बाजी मारली.
बायोबबल आणि न्यू नॉर्मल
सीरिजचं काय झालं हे लक्षात घेताना टीम इंडियाचे बहुतांश खेळाडू गेले पाच महिने घरापासून दूर आहेत आणि प्रामुख्याने बायोबबलमध्ये राहत आहेत हे लक्षात घ्यायला हवं. ऑस्ट्रेलियाच्या मालिकेपूर्वी दुबईत इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा झाली होती. दोन महिने चाललेल्या त्या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू जवळपास महिनाभर आधी दुबईत दाखल झाले होते.
दोन महिने खेळल्यानंतर तिथूनच सगळे खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. ऑस्ट्रेलिया सरकारचे क्वारंटीन नियम कठोर आहेत. त्यामुळे विदेशातून दाखल झाल्यावर 14 दिवस क्वारंटीन राहणं बंधनकारक आहे. क्वारंटीनमधून बाहेर आल्यानंतर बाहेर जाण्यायेण्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे टीम इंडियासाठी शारीरिकपेक्षाही मानसिकदृष्ट्या कसोटी पाहणारा काळ होता.
प्रदीर्घ काळ बायोबबलमध्ये राहण्याने मानसिकतेवर परिणाम होतो असं अनेक विदेशी खेळाडू म्हणत आहेत. परंतु टीम इंडियाने न्यू नॉर्मलशी जुळवून घेत दमदार खेळ केला.
दुखापतींचा ससेमिरा मात्र कणखर मनोवृत्ती
कोरोनामुळे बहुतांश खेळाडू घरीच होते. त्यानंतर आयपीएल स्पर्धा झाली आणि नंतर ऑस्ट्रेलिया मालिका सुरू झाली. न भूतो न भविष्यति असा दुखापतींचा ससेमिरा टीम इंडियाच्या मागे लागला. ब्रिस्बेन टेस्टमध्ये टीम इंडियाच्या बॉलर्सचा एकत्रित अनुभव 10 टेस्टचाही नव्हता. टीम इंडियाच्या बॉलर्सची अख्खी फळीच बाजूला झाली.
फॉर्मात असलेल्या खेळाडूंना दुखापत झाल्याने संघात बदल होतात आणि त्या खेळाडूची जागा घेऊ शकेल असा बदली खेळाडू मिळणं अवघड असतं. पण टीम इंडियाच्या राखीव खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीसाठी सक्षम असल्याचं सिद्ध केलं. अख्खा संघ होईल इतके खेळाडू दुखापतग्रस्त होऊनही टीम इंडियाचं मनोधैर्य खच्ची झालं नाही.
आपण जिंकू शकतो, ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायभूमीत टक्कर देऊ शकतो हा विश्वास त्यांच्या खेळात दिसून आला. हनुमा विहारी, रवीचंद्रन अश्विन यांनी दुखापतींनी जर्जर झालेलं असतानाही सिडनी टेस्टमध्ये साडेतीन तास किल्ला लढवत टेस्ट अर्निणित राखायला मदत केली.
वैयक्तिक दु:खाची किनार मात्र संघासाठी कायपण
ऑस्ट्रेलियात दाखल झाल्या झाल्या, मोहम्मद सिराजला अतिशय दु:खद बातमी कळली. त्याच्या वडिलांचं निधन झालं. 53 वर्षीय सिराजचे बाबा फुप्फुसांच्या आजाराने त्रस्त होते.
सिराज वडिलांच्या अंत्यविधीसाठी मायदेशी परतू शकला असता पण भारतातून ऑस्ट्रेलियात गेल्यावर त्याला पुन्हा कठोर क्वारंटीनला सामोरं जावं लागलं असतं. त्यामुळे त्याची भारतासाठी खेळण्याची शक्यता अगदीच धूसर झाली असती.
वडिलांच्या जाण्याचा आघात मोठा असतो. सिराजच्या कारकीर्दीत त्याच्या वडिलांचा पाठिंबा मोलाचा होता. सिराजच्या आयुष्यातला हा सगळ्यात भावनिक क्षण होता. एकीकडे टीम इंडियासाठी खेळू शकण्याचं स्वप्न दिसत होतं आणि दुसरीकडे जन्मदाते वडील हे जग सोडून गेले होते.
बीसीसीआयने सिराजसमोर मायदेशी परतण्याचा प्रस्ताव ठेवला. वडिलांना शेवटचं बघावं असं मुलाला वाटणं साहजिक होतं. त्याचा विचार करून बीसीसीआयने सिराजला तू भारतात जाऊ शकतोस असं सांगितलं. परंतु सिराजला आईने, घरच्यांनी धीर दिला.
तू भारतासाठी खेळावंस हे वडिलांचं स्वप्न तू साकार करू शकतोस. ते देहरुपाने आपल्यातून गेले असले तरी त्यांच्या सदिच्छा सदैव तुझ्या पाठिशी आहेत. तू भारतासाठी खेळलास तर तीच त्यांना आदरांजली ठरेल असं घरच्यांनी समजावलं. मन घट्ट करून सिराजने ऑस्ट्रेलियातच राहण्याचा निर्णय घेतला.
प्रमुख बॉलर्स दुखापतग्रस्त झाल्याने सिराजवरची जबाबदारी वाढली. ब्रिस्बेन टेस्टमध्ये त्याने डावात पाच विकेट्स घेण्याची करामत केली. मालिकेत भारतातर्फे सर्वाधिक विकेट्स त्यानेच घेतल्या.
नवे आहोत पण छावे आहोत
अडलेड टेस्टमध्ये टीम इंडियाचा दुसरा डाव 36 रन्समध्येच आटोपला होता. नीचांकी स्कोअरची नोंद झाल्याने टीका होणं साहजिक होतं. केवळ 40 मिनिटात टीम इंडियाचा घात झाला होता. मात्र त्याने खचून न जाता टीम इंडियाच्या नव्या शिलेदारांनी बिनधास्त खेळ केला.
शुभमन गिल, ऋषभ पंत, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, टी.नटराजन, नवदीप सैनी या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याचं दडपण न घेता सर्वोत्तम खेळ केला. ब्रिस्बेन टेस्टमध्ये चौथ्या डावात शुभमन गिलने साकारलेली 91 रन्सची खेळी निर्भयतेचं उत्तम उदाहरण आहे.
ऋषभ पंतने सिडनी टेस्टमध्ये 97 रन्स करताना ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगवर जे आक्रमण केलं ते विलक्षण होतं. पहिलीच टेस्ट खेळत असनूही वॉशिंग्टन सुंदरने ज्या पद्धतीने डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथला बाद केलं आणि नंतर अर्धशतकी खेळी केली ते भारतीय क्रिकेटचं भवितव्य चांगलं आहे याची ग्वाही देणारं होतं.
दोन वर्षांनंतर अंतिम अकरात संधी मिळालेल्या शार्दूल ठाकूरने बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्ही आघाड्यांवर केलेलं प्रदर्शन मुंबई क्रिकेटची परंपरा योग्य हातांमध्ये आहे याचं निदर्शक होतं.
रहाणेचं नेतृत्व
36 रन्समध्ये खुर्दा उडाल्यानंतर संघाला प्रेरित करणं अवघड आहे. त्यातच नियमित कर्णधार विराट कोहली पॅटर्निटी लिव्हसाठी मायदेशी परतल्याने अजिंक्य रहाणेकडे नेतृत्वाची धुरा आली. रहाणेने अवघड कालखंडात काटेरी मुकूट हाती घेतला.
शांत, संयमी स्वभावाच्या रहाणेने कृतीतून आक्रमकतेची चुणूक दाखवली. मेलबर्न टेस्टमध्ये शतकी खेळी साकारत रहाणेने संघासमोर उदाहरण ठेवलं. अनुनभवी बॉलर्सचं आक्रमण, दुखापतींची वाढणारी यादी या आव्हानांना पुरुन उरत रहाणेने सकारात्मक पद्धतीने नेतृत्व केलं. युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात तो आघाडीवर होता.
'इंडिया ए दौरे'
विदेशी खेळपट्यांवर, वातावरणात अचानक जाऊन खेळणं कोणत्याही संघाला अवघड असतं. त्या वातावरणाची, खेळपट्यांची सवय व्हावी यासाठी बीसीसीआयने इंडिया ए दौऱ्यांची आखणी केली. टीम इंडियाचा माजी आधारस्तंभ राहुल द्रविड यांची भूमिकाही मोलाची होती. शुभमन गिल, हनुमा विहारी, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी हे सातत्याने इंडिया ए संघासाठी खेळतात. ऑस्ट्रेलियात खेळण्याचा पूर्वानुभव त्यांच्यासाठी निर्णायक ठरला. या खेळपट्यांवर कसं खेळावं लागतं याचा अभ्यास झाला होता.
'बोलंदाजीला प्रत्युत्तर'
वाचाळ प्रेक्षकांकडून शेरेबाजी होते आहे याची कल्पना जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी मेलबर्नमध्ये संघव्यवस्थापनाला दिली. त्यांनीही ते प्रकरण सोडून देता मॅचरेफरींकडे तक्रार केली.
सिडनी टेस्टमध्ये सिराजला पुन्हा लक्ष्य करण्यात आल्यानंतर रहाणेने अंपायर्सची चर्चा केली. अंपायर्सनी सुरक्षा यंत्रणांना कल्पना दिली. सहा वाचाळ प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढण्यात आलं.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारतीय खेळाडूंची माफी मागितली. वर्ण-वंशसंदर्भात शेरेबाजी खेळाडूंची एकाग्रता विचलित करते. भारतीय खेळाडू विचलित झाले नाहीत. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्लेजिंगचा अस्त्रासारखा वापर करतात.
मात्र भारतीय खेळाडूंनी स्लेजिंगला चोख प्रत्युत्तर दिलं. सिडनी टेस्टमध्ये रवीचंद्रन अश्विनला स्लेजिंग करण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनच्या अंगलट आला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)