You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IndvsAus : विराट कोहलीने स्टीव्हन स्मिथची हुर्यो उडवणं थांबवलं होतं...
भारतीय कर्णधार विराट कोहलीने गेल्या वर्षी वर्ल्डकपदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथला प्रेक्षकांच्या हुर्येपासून रोखलं होतं.
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये वर्ल्डकप होता. 9 जूनला भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. बॉल कुरतडल्याप्रकरणी वर्षभराची बंदीची शिक्षा भोगून परतलेले डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ या मॅचमध्ये खेळत होते.
सँडपेपर गेट या नावाने ते कुप्रसिद्ध प्रकरण गाजलं होतं. खेळभावनेला बट्टा लावल्याप्रकरणी स्मिथला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलं. त्याच्यासह वॉर्नरवर वर्षभराची बंदी घालण्यात आली.
भारताची इनिंग्ज सुरू असताना स्मिथ बाऊंड्रीवर फिल्डिंग करत होता. भारतीय प्रेक्षक त्याची हुर्यो उडवत होते. भारतीय कर्णधार विराट कोहलीने ते पाहिलं. प्रेक्षक थांबत नसल्याचं लक्षात आल्यानंतर कोहलीने दोन ओव्हर्सच्या मध्ये त्यांच्या दिशेने पाहिलं आणि तुम्ही काय करताय? असं विचारलं.
खेळाचा आनंद घ्या, स्मिथला त्रास देऊ नका. त्याच्या खेळाचं कौतुक करा, असं कोहलीने त्यांना खुणावून सांगितलं. कोहलीच्या सूचनेनंतर प्रेक्षकांनी स्मिथला त्रास दिला नाही. स्मिथने त्याकरता कोहलीचे आभार मानले होते.
बॉल टेपरिंग प्रकरण घडलं त्याचं समर्थन नाही, पण त्याने चूक केली. त्याची शिक्षाही भोगली. आता तो पुन्हा खेळायला उतरला आहे. आता जुन्या गोष्टी उगाळण्यात अर्थ नाही. त्याची हुर्यो उडवणं योग्य नाही, असं कोहलीने सांगितलं होतं.
भारत-ऑस्ट्रेलिया आमनेसामने म्हटलं की वातावरण तापलेलं असतं. कोरोना काळात होत असली तरी बॉर्डर-गावस्कर सीरिज त्याला अपवाद नाही.
सिडनी टेस्टच्या तिसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रेक्षकांमधून आक्षेपार्ह शब्दात शेरेबाजी होत असल्याचं सांगितलं. भारतीय संघव्यवस्थापनाने यासंदर्भात मॅचरेफरींकडे तक्रार दाखल केली.
चौथ्या दिवशी सिराजला पुन्हा एकदा शेरेबाजीला सामोरं जावं लागलं. सिराजने कर्णधार अजिंक्य रहाणेला याची कल्पना दिली. रहाणेने अंपायर्सना याची कल्पना दिली. अंपायर्सनी सुरक्षायंत्रणांना याबद्दल माहिती दिली. सिराजने दिलेल्या माहितीनुसार, शेरेबाजी करणाऱ्या सहा प्रेक्षकांना मैदानातून बाहेर काढण्यात आलं.
वांशिक शेरेबाजीला, आक्षेपार्ह भाषेत टिप्पणीला जराही स्थान नसल्याचं सांगत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारतीय खेळाडूंची माफी मागितली. पोलिसांच्या मदतीने दोषींवर कठोर कारवाई करू अशी हमीही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली आहे.
ऑस्ट्रेलियात अशा प्रकारच्या शेरेबाजीचा सामना करावा लागतो, असं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, स्पिनर रवीचंद्रन अश्विन यांनी म्हटलं. यानिमित्ताने गेल्या वर्षीचा हा किस्सा आठवणं साहजिक.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)