You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Washington Sundar : वॉशिंग्टन सुंदरचं नाव 'वॉशिंग्टन' कसं पडलं?
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात, सिडनी टेस्टमध्ये अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्याने टीम इंडियासमोर पेच निर्माण झाला. स्पिन बॉलिंग, उपयुक्त बॅटिंग आणि चांगली फिल्डिंग असं प्रत्येक आघाडीवर जडेजा महत्त्वाचा खेळाडू आहे. संघात चायनामन बॉलर कुलदीप यादव होता. परंतु कुलदीप प्रामुख्याने बॉलर होता.
कुलदीपकडे ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव आहे. दुखापती आणि कोरोनामुळे असलेले निर्बंध यामुळे संघव्यवस्थापनाने वनडे मालिकेनंतर काही खेळाडूंना ऑस्ट्रेलियात थांबवून घेतलं. वॉशिंग्टन त्यापैकी एक होता. चांगली बॅटिंग करू शकेल असा स्पिनर आणि व्यवस्थित फिल्डर असल्याने सुंदरला पदार्पणाची संधी देण्यात आली. टीम इंडियाने वॉशिंग्टनच्या नावाला पसंती दिली.
वॉशिंग्टनच्या नावाची गोष्ट त्याच्या वडिलांनीच काही वर्षांपूर्वी उलगडून सांगितली होती. एम. सुंदर हे वॉशिंग्टनचे बाबा. तेही क्रिकेट खेळायचे. त्यांच्या घरची परिस्थिती बेतास बेत होती. त्यांना एका गृहस्थाने खूप मदत केली. ते सुंदर यांच्या घरापासून जवळच राहायचे. त्यांना क्रिकेटची प्रचंड आवड होती.
सुंदर यांना क्रिकेट खेळणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही हे लक्षात आल्यानंतर निवृत्त लष्करी अधिकारी असलेल्या त्या गृहस्थांनी सुंदर यांच्या क्रिकेटचा खर्च पेलला. क्रिकेट किट, शाळेची फी, सायकलवर सुंदर यांना मैदानावर सोडणे हे सगळं त्या गृहस्थांनी केलं.
सुंदर यांच्या आयुष्याची घडी बसली. लग्न झालं. मात्र 1999 साली सुंदर यांना मदत करणाऱ्या त्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचं निधन झालं. त्याच काळात सुंदर दांपत्याला मुलगा झाला. आपल्या आयुष्याला दिशा देण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या त्या गृहस्थांचं वॉशिंग्टन हे नाव त्यांनी आपल्या मुलाला दिलं. वॉशिंग्टन यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांनी असं केलं.
वॉशिंग्टन सुंदरच्या जन्मावेळी हिंदू परंपरेनुसार वडिलांनी पत्नीच्या कानात श्रीनिवासन हे नाव सांगितलं होतं. मात्र वॉशिंग्टन हेच नाव पक्कं करण्यात आलं.
तामिळनाडूचा वॉशिंग्टन आयपीएल स्पर्धेत सुरुवातीला रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघासाठी खेळला. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने त्याला ताफ्यात समाविष्ट केलं.
शिस्तबद्ध बॉलिंगसाठी तो प्रसिद्ध आहे. पॉवरप्लेच्या ओव्हर्समध्ये बॅट्समन आक्रमण करतात. पहिल्या सहा ओव्हर्समध्ये वॉशिंग्टन बॉलिंग करतो. रन्स रोखणं आणि विकेट्स पटकावणं या दोन्हीमध्ये तो वाकबगार आहे. संघाच्या गरजेनुसार आवश्यक क्रमांकावर तो बॅटिंग करतो आणि उत्तम फिल्डरही आहे.
तीन वर्षांपूर्वी वॉशिंग्टनने भारतासाठी वनडे पदार्पण केलं होतं. भारताच्या ट्वेन्टी-20 संघाचा तो नियमितपणे भाग असतो. आतापर्यंत त्याने 26 ट्वेन्टी-20 लढतीत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याच्या नावावर 21 विकेट्स आहेत.
आयपीएल स्पर्धेत तो आतापर्यंत 36 मॅचेस खेळला असून, त्याच्या नावावर 24 विकेट्स आहेत. 12व्या वर्षापासून तो तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन फर्स्ट डिव्हिजनमध्ये खेळतो आहे. वयोगट स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळेच आयपीएल संघांनी त्याला हेरलं.
वॉशिंग्टनची बहीण शैलजा सुंदरही क्रिकेट खेळते. तीही स्पर्धात्मक क्रिकेटचा भाग आहे.
दरम्यान ब्रिस्बेन टेस्टमध्ये, पदार्पणाच्या लढतीचं दडपण न घेता वॉशिंग्टनने बॉलिंगला सुरुवात केली. वॉशिंग्टनने सापळा रचून स्टीव्हन स्मिथसारख्या अनुभवी बॅट्समनला बाद केलं.
मोठी खेळी करण्यासाठी सरसावलेला कॅमेरुन ग्रीन सुंदरच्या वळलेल्या बॉलवर फसला. नॅथन लॉयनसारख्या अनुभवी स्पिनरला त्याने खेळपट्टीवर स्थिरावू दिलं नाही आणि पदार्पणात पहिल्या डावात तीन विकेट्स पटकावल्या. स्मिथसारखा मोठा बॅट्समन पहिली विकेट असणं हे सुंदरसाठी खास आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)