हनुमा विहारी याने शांतपणे 'हे' उत्तर दिलं आणि बाबुल सुप्रियोंची विकेट घेतली

भारतीय क्रिकेटपटू हनुमा विहारीच्या खेळीवर टीका करणाऱ्या बाबुल सुप्रियो यांच्या ट्वीटला विहारीने दिलेलं उत्तर ट्विटरवर सध्या गाजतंय.

मोजक्या शब्दांत हनुमा विहारीने दिलेल्या या उत्तरानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्सही तयार करण्यात आली आहेत.

सिडनी कसोटीत चौथ्या डावात खेळताना हनुमा विहारीने 161 बॉल्समध्ये 23 रन्स काढल्या. यावरच टीका करणारं ट्वीट गायक आणि भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी केलं. विहारीच्या लो स्ट्राईक रेटबद्दल त्यांनी ट्वीट केलं.

यात त्यांनी म्हटलं होतं, "7 धावा काढण्यासाठी 109 बॉल्स! हनुमा बिहारीने जिंकण्याची एक ऐतिहासिक संधी तर घालवलीच पण क्रिकेटचाही खून केला, असं म्हणणं वावगं ठरणार नाही...जिंकण्याची थोडी तरी शक्यता असू शकते असा विचारही न करणं गुन्हा आहे.

ता. क. : मला क्रिकेटविषयी काही कळत नाही, हे मला माहिती आहे.

बाबुल सुप्रियोंच्या या ट्वीटला हनुमा विहारीने दोन शब्दांत उत्तर दिलं : * हनुमा विहारी

बाबुल सुप्रियोंच्या मूळ ट्वीटमध्ये हनुमा विहारीचं नाव चुकलं होतं.

विहारीने बाबुल सुप्रियोंना ज्या पद्धतीनं उत्तर दिलं त्यावरून ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला.

एका ट्विटर युजरने म्हटलंय - "एखाद्या गोष्टीविषयी माहिती नसण्यात काही गैर नाही, पण ते असं उघडपणे जगाला जाहीर करणं भयानक आहे."

अशा प्रकारच्या टीकेकडे दुर्लक्ष करावं असं काहींनी म्हटलंय, तर काहींनी हनुमा विहारीचा आपल्याला अभिमान असल्याचं म्हटलंय.

हनुमा विहारीने मोजक्या शब्दांत घेतलेल्या समाचाराचंही अनेकांनी कौतुक केलंय.

तर या ट्वीटमुळे आपण हनुमाचे फॅन झाल्याचं काहींनी म्हटलंय.

अनेकांनी मीम्स पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हनुमा विहारीची 'ती' खेळी

बॉर्डर - गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या टेस्टमध्ये मानहानीकारक पराभव झाल्यानंतर मेलबर्न कसोटी जिंकत भारतीय संघाने पुनरागमन केलं होतं.

तिसऱ्या सिडनी कसोटीत भारतीय संघाला जिंकण्यासाठी चौथ्या डावात 407 धावांचं टार्गेट होतं. ऋषभ पंतच्या 97 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने विजयाच्या दिशेने कूच केली होती. मात्र ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा ठराविक अंतराने बाद झाल्याने भारतीय संघाला कसोटी वाचवणंच क्रमप्राप्त होतं. टेस्ट मॅच वाचवण्यासाठी एका संयमी खेळीची आवश्यकता होती.

हनुमा विहारीने हॅमस्ट्रिंग म्हणजेच मांडीचे स्नायू दुखावलेले असतानाही 161 बॉल्समध्ये 23 रन्सची खेळी केली. पराभव समोर दिसत असताना मॅच अनिर्णित करण्याचं लक्ष्य होतं त्यामुळे धावांपेक्षाही खेळपट्टीवर ठाण मांडून टिकून राहणं गरजेचं होतं.

हनुमा विहारीने दुखापतग्रस्त असतानाही साडेतीन तासांपेक्षा जास्त काळ टिच्चून खेळत भारतीय संघाचा पराभव टाळला. विहारीने रविचंद्रन अश्विनच्या साथीने 259 बॉल्समध्ये 62 धावा करत ऑस्ट्रेलियाच्या तिखट माऱ्याला पुरून उरत पराभव टाळला.

यामुळे बॉर्डर - गावसकर मालिका सध्या 1 -1 अशी बरोबरीत आहे आणि शेवटची टेस्ट ब्रिस्बेनमध्ये होणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)